Bitte….

प्रत्येक भाषेची स्वतःची अशी एक ओळख असते, तिचे स्वतःचे, हक्काचे असे विशिष्ट शब्द असतात, त्या शब्दांचा कधी एकच किंवा कधी दहा वेगवेगळे अर्थ असतात. त्यांच्यात बारीकबारीक फरक असतात. उदाहरणार्थ, मराठी भाषेत एखाद्याचे आभार मानायचे असतील तर ते व्यक्त करायला एकच शब्द आहे, तो म्हणजे फक्त ‘धन्यवाद’ किंवा फारफारतर ‘आभार’. ते सुद्धा आपण फारसे वापरत नाहीच, थँक्स किंवा थँक्यू वर काम चालवतो, आजकाल ‘चालतंय की’ सुदधा अधेमधे वापरतो.😉 सोशल मिडियावर सध्या ‘धन्यवाद’ चा वाढता वापर पहाते आहे आणि ही फारच चांगली गोष्ट आहे. हेच जर्मन भाषेमध्ये मात्र ‘Please’ म्हणण्यासाठी एक शब्द आहे Bitte आणि हे Bitte आपण तब्बल पाच वेगवेगळ्या अर्थाने वापरू शकतो.
एक Bitte म्हणजे ‘धन्यवाद’.
दुसरा Bitte म्हणजे ‘आपले स्वागत आहे’.
तिसरा Bitte म्हणजे ‘कृपया हे घ्या’ (आपण काहीतरी वस्तू दुसऱ्याच्या हातात देत आहोत या अर्थाने)
चौथा Bitte म्हणजे ‘कृपया परत एकदा सांगाल का’?
आणि पाचवा Bitte म्हणजे ‘मी आपली काही मदत करू शकतो का?’
जर्मन लोकं Bitte या शब्दाचा अमर्याद वापर करतात. कोणतीही भाषा त्या त्या देशाच्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करते असं म्हणतात. जर्मनीमध्ये Bitte या शब्दाच्या वारेमाप वापरावरून हे लोक किती सहजतेने, दैनंदिन आयुष्यात कृतज्ञता व्यक्त करतात हे दिसून येतं. थोडासा विचार केला तर असं लक्षात येईल की Bitte या शब्दाचा You are welcome किंवा ‘आपले स्वागत आहे’ हे व्यक्त करणारा एकच असा मराठी शब्द आपल्याकडे नाही. याचा अर्थ आपण (मराठी लोकं) कृतज्ञ नसतो का? असतो की. पण आपण ‘वेलकम’ , ‘इट्स ओके’ किंवा ‘असू दे असू दे’ सारख्या शब्दांवर काम चालवतो, किंवा कधी नुसते हसून वेळ मारून नेतो.
जर्मन लोकांमध्ये ‘Danke’ आणि ‘Bitte’ या शब्दांचा खेळ तर न संपणारा असतो. एकजण Danke म्हणत राहतो, दुसरा त्याला Bitte ने उत्तर देत राहतो. यावर कडी म्हणजे Bitte या शब्दाला sehr जोडलं तर ते आणखी आदरार्थी म्हणून वापरलं जातं. Bitte sehr म्हणलं की ‘आपले खूप खूप आभार’ किंवा ‘अगदी जरूर’ असाही अर्थ होतो.
जर्मनीमध्ये रेस्तराँमध्ये वेटरनी येऊन आपल्याला वाढलं की आपण Danke Sehr म्हणतो, त्यावर लगेच तो वेटर Bitte Sehr म्हणतो, म्हणजे ‘माझं कामच आहे ते, ‘आपले स्वागत आहे’ किंवा ‘सावकाश जेवा’ या अर्थाने. मराठीत Bitte Sehr ला कुठलाच पर्यायी शब्द नाही. एकदा एका रेस्तराँमध्ये वेटरनी जेवण आणून दिलं, तर माझ्या तोंडून आपसूक थँक्यू (ही सवय मला लवकरच ‘धन्यवाद’ म्हणत बदलायची आहे!) निघालं. त्यावर तो वेटर वाकून, किंचितसं हसून म्हणाला, ‘काही लागलं तर सांगा’. हेच ते Bitte Sehr होतं तर!
लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल Danke Sehr! उत्तरादाखल काय म्हणाल ते तुम्हाला माहीत आहेच.😊
Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

4 thoughts on “Bitte….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!