ओळख..
सुरवात कशी झाली, आठवत नाही.
पण तो दिसला नाही, की चुकल्यासारखं वाटायचं खरं.
मी राहतो कोथरूडला.
माझी फॅक्टरी आहे लोणीकंदला.
रोज दीड तास जायला.
परत यायला कितीही वेळ.
ते काही आपल्या हातात नाही.
ती सगळी वाघोलीच्या व्याघ्रेश्वराची कृपा.
वाघोलीहून लवकर सुटका झाली, तर दोन तासात घरी पोचायचो.
नाहीतर अनंत काळाचा प्रवासी.
सकाळी त्यामानानं कमी गर्दी असायची.
पुण्यातून बाहेर पडायला ,फारसा त्रास व्हायचा नाही.
खरं तर त्रास काहीच नव्हता.
गाडी ड्रायव्हरच चालवायचा.
मी फक्त मागे बसायचो.
सकाळी सकाळी जरा फ्रेश मूड असायचा.
खिडकीच्या बंद काचांतूनही बाहेर लक्ष जायचं.
संध्याकाळी मात्र फुस्स व्हायचो.
मागे मान टेकवून डोळे मिटायचो.
दीड दोन तास मस्त घोरायचो.
टाईममशीनमधे बसल्यासारखं.
घरी पोचलो की, डोळे ऊघडायचो.
वाघोली संपलं की डाव्या बाजूला शेतं सुरू व्हायची.
तिथं एक छोटंसं कौलारू घर दिसायचं.
तीन खोल्या असतील.
पुढे सारवलेलं अंगण.
एका बाजूला गोठा.
गोठ्यात दोन चार गाई म्हशी.
घरामागे हिरवीगार शेती.
तिथं तो दिसायचा.
त्याचा बाबा गोठ्यात काम करताना दिसायचा.
खरं तर रस्त्यालगत एवढी जमीन असणारी मंडळी, श्रीमंतच असणार.
पण साधी माणसं होती.
अंगणात एक डेरेदार आंब्याचं झाड.
झाडाखाली तो ऊभा असायचा.
बहुतेक वेळा शाळेत जायच्या तयारीत.
पाठीवर दप्तर.
तरीही निवांत बसलेला.
रोज दिसायचा.
तिथंच.
सगळ्या जगातला आनंद, त्याच्या चेहर्यावरून ओसंडून वहायचा.
मला जगातला तो सगळ्यात सुंदर चेहरा वाटायचा.
टवटवी , फ्रेशिला.
त्याची नजर रस्त्यावर.
रस्त्यावरचा ट्रॅफिक त्याला आवडत असावा.
दोन चार दिवस आमची नजरानजर झाली.
ओळख.
हळूहळू ओळखीचं हसू.
मग तो हात हलवायला लागला.
टाटा, बाय बाय.
खरं तर त्याच्या घरावरनं गाडी, मायक्रोसेकंदात निघून जायची.
तेवढा वेळही आम्हाला पुरेसा होता.
त्यानं केलेला टाटा ,माझं टाॅनिक झालेलं.
छान वाटायचं.
फ्रेश वाटायचं.
दिवस चांगला जाणार ,असं ऊगीचच वाटायचं.
हळूहळू आमच्या मैत्रीत मॅच्युरिटी येवू लागली.
सुटीच्या दिवशी त्याच्या हातात बॅट दिसायची.
कधी पतंग आणि चक्री.
कधी त्यानं काढलेलं चित्र हातात धरून, तो ऊभा रहायचा.
खरं तर मला काहीही दिसायचं नाही.
मी आपला ऊगाचच, हाताचा मोर करून दाखवायचो.
माझ्या साॅलीड रिस्पाॅन्सने तो अजून खूष.
मी डबलखूष.
दिवाळीत त्यानं केलेला झिरमिळी आकाशकंदील घेवून ऊभा.
नाहीतर त्याचा नवीन ड्रेस ,हाताने खुणा करून दाखवणार.
माझी रिअॅक्शन आली की खूष.
खरं तर त्याच्या हातात कधीही घड्याळ नसायचं.
तरीही त्याला वेळ कशी समजायची ,कुणास ठावूक ?
तो वेळ चुकवायचा नाही.
आम्ही एक अक्षरही बोललो नाही कधी.
तरीही .
तो दिसला नाही की मी अस्वस्थ व्हायचो.
कमल हसनच्या पुष्पकससारखं चाललेलं आमचं.
म्यूट बट हिट पिक्चर.
दोन दिवस तो दिसला नाही की..
मी विचार करायचो.
मावशीकडे गेला असेल.
ऊशीरा ऊठला असेल.
बरं नसेल त्याला.
काय वाट्टेल ते.
दोन चार दिवसांनी तो दिसला, की हुश्श.
कुणीतरी निस्वार्थ, निर्हेतुक; आपली वाट बघतोय..
ही फिलींग कसली एनर्जेटीक असते.
सिलसिला चल रहा था.
गेले पंधरा दिवस मी अस्वस्थ.
ऊगाचच चिडचीड.
कारण नसताना.
खूप वाटायचं , शांत रहावं.
जमायचंच नाही.
का असं होतंय ?
मग क्लीक झालं.
पंधरा दिवस झाले , आपला माॅर्नींग दोस्त दिसला नाहीये.
असं कधीच झालं नव्हतं.
ईतका गॅप ?
नेव्हर.
ते काही नाही.
ऊद्या त्याच्या घरापाशी गाडी थांबवायची.
तो आजारी पडला की काय?
दुसर्या दिवशी सकाळी.
वाघोली गेलं.
त्याचं घर आलं.
गाडी थांबली.
मी खाली ऊतरलो.
घरात वेगळीच माणसं.
त्याचा पत्ताच नाही.
त्यातल्याच एकाला विचारलं .
“ईथे तो छोटा मुलगा रहायचा ?
आठ दहा वर्षांचा.
कुठं आहे तो ?”
‘ तो व्हयं.?
ती फॅमिली गेली पुन्याला.
पोराच्या शिक्षनासाठी घर दार ईकून, गडी पुन्याला गेला.
पिरंगुटला कुठं तरी कंपनीत लागला.
वारज्याला जागा बघितलीय.
तिथंच राहतोय.”
मी सुन्न.
असा कसा गेला?
मला न सांगता.
माझा काय संबंध ?
एवढीशी गोष्ट.
मनाला आभाळाएवढी जखम करून गेली.
माझं रूटीनच बदलून गेलं.
हल्ली सकाळीही मी गाडीत झोपा काढतो.
मागच्या आठवड्यातली गोष्ट.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात, रांगोळीचं प्रदर्शन होतं.
आम्ही दोघंही गेलेलो.
शाळेतल्या मुलांनी रांगोळ्या काढलेल्या.
अप्रतिम.
एका रांगोळीपाशी थबकलो.
आंब्याच झाड.
मागे कौलारू घर.
हात फडकवणारा छोटा मुलगा.
भरलेले ईन्द्रधनुषी रंग.
ते रंगोलीचित्र जाम ओळखीचं वाटू लागलं.
सहज नजर वर केली.
तोच.
तेच ओळखीचं हसू.
माझा अलिबाबा झालेला.
आनंदाचा खजिना सापडलेला.
रांगोळीतले सगळे रंग माझ्या चेहर्यावर ऊमटले.
ओळख पटली.
Image by Nasir Akhtar from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
Khup mast
खुप छान
खूप मस्त
Surekh.
Apratim