विठ्ठल विठ्ठल…
नुकतीच शाळा सुरू झालेली. तेव्हा शाळेत रोज सदैव सैनिका, जय ते जय ते ही गाणी स्पीकरवर सुरू असायची आणि सहा पंचावन्नला पहिली बेल व्हायची. संबंध वातावरणातला कोलाहल थांबून गंभीर आवाजात राष्ट्रगीताला सुरुवात व्हायची. त्यावेळी डोळ्यासमोर देश म्हणून टीचर्स रूम मध्ये खिळ्याला टांगलेला भारताचा नकाशा यायचा. कारण त्यापलीकडे देश म्हणजे काय हे माहीतच नव्हतं! पण काहीतरी सॉलिड आहे हे जाणवत असायचं! राष्ट्रगीत संपल्यावर जोरात जयsss हिंद अस ओरडून शाळेचा दिवस सुरू व्हायचा.
बाहेर जोरात पाऊस, सकाळी देखील वर्गात ट्यूब लाईट सुरू असत इतका अंधार. कधी गडगडाट, विजांचं चमकण आणि त्यात बाई शिकवत असायच्या. आमचे डोळे नोटीस घेऊन येणाऱ्या पिऊनच्या वाटेवर खिळलेले असायचे. श्रावण महिना म्हणजे पर्वणी असायची. श्रावणी सोमवारी अर्धा दिवस शाळा. इतर अनेक सणांच्या सुट्ट्या किंवा अर्धा दिवस असा श्रावण इव्हेंटफुल असे. पण आषाढाचा डौल वेगळा होता. कारण त्यात आषाढी एकादशी होती. आला…पिऊन नोटीस घेऊन आला. यंदाही आषाढी एकादशीला दिंडी निघणार होती. भाग घेणार्यानी नाव नोंदवायची होती. मी मधल्या सुट्टीत नाव नोंदवलं.
दुसऱ्या दिवशीपासून ऑफिशियली एक वर्ग बंक करून रिहर्सल करण म्हणजे आपल्याला लायसन्स टू किल मिळाल्याचा फील येत होता तेव्हा. रिहर्सल मध्ये भजनं, त्यावर आमच टाळ घेऊन लयबद्ध नाचण. ती पालखी. ह्या सगळ्याची तालीम बाई अत्यंत मेहनतीने करून घेत होत्या. काही दिवसात मस्त सराव होऊन आमची दिंडी एकदाची “बसली”.
मग तो दिवस आला. आम्ही वाट बघत असलेली आषाढी एकादशी. पाऊस खूप होता. आम्ही शाळेत लवकर पोहोचलो. आज पिरियड अटेंड करायचा प्रश्नच नव्हता. आम्ही सुरेश ड्रेसवल्याकडून भाड्याने आणलेले वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले. कपाळाला टिळा, गळ्यात माळा, डोक्यावर टोपी, हातात टाळ असा पोशाख करून स्वतःला आरश्यात बघितल्यावर का कुणास ठाऊक त्या वयातही खुप पवित्र अस काहीतरी वाटलं होतं.
मग आमची दिंडी निघाली. भजनाच्या ठेक्यावर तल्लीन होऊन नाचणारी आम्ही मुलं प्रत्येक वर्गात प्रशंसा मिळवत होतो. संबंध शाळेचं वातावरण प्रत्यक्ष वारी सारखं पावन झालं होतं. शाळेचे पंढरपूर करून दिंडी संपली. मग शाळेतर्फे कॅन्टीन मधला नाश्ता होता. त्या वेळेला रोज डबा नेणाऱ्या आम्हा मुलांना कँटीन मध्ये खाणं हे विशेष असे. त्या दिवशी पंचांगातील आषाढी एकादशी संपली पण माझ्या मनात ती तशीच कायमची कोरली गेली!
आजही जस गणेशोत्सव म्हटलं की गालावरच्या खळग्यात वाढलेली पांढरी खुरटी दाढीवाले, सुस्पष्ट आवाजात पूजा सांगणारे रानडे गुरुजी, घरात पसरलेला उदबत्ती आणि फुलांचा तो वास, तसेच निरंजनाच्या प्रकाशात तेजस्वी दिसणारी गणेश मूर्ती आणि त्याच प्रकाशात तितकेच तेजस्वी दिसणारे जांभळे कद नेसून गुरुजींच्या शेजारी पूजेला बसलेले आमचे बाब आठवतात ना तसच आषाढी एकादशी ऐकलं की माझ्या डोळ्यासमोर सर्वप्रथम ती आमची शाळेतली दिंडी आणि त्यात तल्लीन झालेले आम्ही छोटे वारकरी आणि इवल्याश्या पालखीत ठेवलेल्या विठ्ठल राखुमाईच्या लोभस मूर्ती येतात! विठ्ठल विठ्ठल!!!_/\_
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
atishay sundar varnan.. Jay Hari Vitthal!!!!
खुप सुरेख वर्णन केले आहे.