अखियोंके झरोंको से…
“व्हॉट नॉनसेन्स. मी मेधाचा खून कसा करेन? आमचं तर खूप प्रेम आहे एकमेकांवर ! आम्ही एकमेकांशिवाय राहूच शकत नाही. तुम्ही गंमत करताय ना माझी? पण इंस्पेक्टरसाहेब अशी जीवघेणी गंमत कधी परत करु नका. सगळं जग जरी आमच्या विरोधात गेलं, तरी आम्ही एकमेकांची साथ न सोडण्याची शपथ घेतली आहे. विचारा कुणालाही. कुणीही सांगेल. सगळ्यांना माहिती आहे आमच्या प्रेमाबद्दल !!” मनोज पोटतिडकीने भडाभडा बोलत होता. त्याचा कोवळा चेहेरा पिळवटून गेला होता.
इंस्पेक्टर कदमांनी अनेक प्रकारचे गुन्हेगार पाहिले होते. भावनेच्या भरात, रागाच्या उर्मीत खून करणार्यांपासून ते थंड डोक्यानी सर्व बाजुने विचार करून खुनाचा प्लॅन बनवणार्यांपर्यंत सर्व प्रकारचे खुनीही त्यांनी हाताळले होते. पण हा प्रकार काहिसा वेगळाच होता.
भर दुपारी तीन वाजता पोलीस स्टेशनचा फोन खणखणला आणि फोनवरच्या घाबरलेल्या, कुजबुजत्या आवाजाने, पोलीस स्टेशन हादरुन गेलं. माइंडस्पेस जवळच्या एका चकचकीत ऑफीस कॉम्प्लेक्समधे असलेल्या एका कंपनीच्या लेडीज टॉयलेट ब्लॉकमधे, एका तरुण मुलीचा, चाकूचे वार करून खून करण्यात आल्याची खबर होती.
ड्युटी इंस्पेक्टर कदम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सिक्युरिटीने ऑफीस सील केलं होतं, त्यामुळे खुनी निसटून जायचा प्रश्नच नव्हता. लेडिज टॉयलेटच्या दरवाजातूनच कदमांनी प्रिलिमिनरी इंस्पेक्शन केलं. दारापासून जेमतेम पाच फूट आत मेधाचा देह अस्ताव्यस्त पडला होता. कुणीतरी धारदार चाकूने, तिच्या देहावर आणि चेहेर्यावर सपासप वार केले होते. ती जिवंत असण्याची काही शक्यताच नव्हती. मर्डर वेपन तिच्या देहाच्या जवळच पडलेलं होतं.
कदमांनी फोरेन्सिक टिम बोलावली. सिक्युरिटीच्या माणसांना CCTV फुटेज काढायची सुचना केली आणि ऑफीसमधल्या माणसांची चौकशी सुरु केली. सगळेच प्रचंड धक्क्यात होते. मेधाची बॉडी सर्वात आधी नीलाने पाहून किंचाळी फोडली होती. कदमांनी तिच्यापासूनच सुरवात केली. “सर, मेधाला टॉयलेटमधून यायला बराच वेळ लागला, म्हणुन मी पाहिला गेले, तर हे…” हुंदके आणि अश्रूंना कसंबसं आवरत नीला म्हणाली. “आमचे क्युबिकल्स लागूनच आहेत. खरंतर आम्ही नेहेमी एकत्रच जायचो, पण आज नेमका माझा कॉनकॉल होता, म्हणुन मेधा एकटीच गेली. त्याने बरोब्बर डाव साधला हो साहेब !!” “त्याने? कोण तो?” कदमांनी विचारलं. “मनोज !! अजून कोण?” नीला ओरडून म्हणाली.
“चमत्कारीक आहे तो. मेधाचं आणि त्याचं खूपवेळा भांडण झालं होतं. चार-पाच महिन्यांपुर्वी त्याने मेधाला प्रपोज केलं होतं. मेधाने स्पष्ट शब्दात नकार दिला होता. एक तर तो तिला अजीबात आवडायचा नाही. शिवाय तो तिला ज्युनियर होता. मेधाचे गोल्स क्लियर होते, तिला प्रेमाच्या भानगडीत अजीबात अडकायचं नव्हतं. तेव्हा मनोज गप्प बसला, पण महिनाभराने त्याने त्याच्या आणि तिच्या प्रेमाबद्दल भलभलत्या वावड्या पसरवायला सुरवात केली आणि त्यांचं तेव्हा पहिल्यांदा भांडण झालं.”
“मी कसल्याही वावड्या पसरवलेल्या नाहीत. मी नेहेमी खरं तेच सांगितलं आहे. हे सगळे माझ्यावर खोटेनाटे आरोप करत आहेत.” ऑफीस स्टाफच्या गर्दीमधून कोणीतरी भावनातिरेकाने फाटलेल्या आवाजात ओरडलं आणि कदमांची नजर त्याच्याकडे वळली. कोवळ्या, भावुक चेहेर्याचा, जेमतेम २०-२१ वर्षांचा एक तरूण अक्षरशः थरथरत ओरडला होता. “तुम्ही कोण?” कदमांनी जरबेने विचारलं. “ही निला ज्याचं खुनी म्हणुन खोटं नाव घेते आहे, तो मनोज मीच.” मनोज म्हणाला. “तुम्हाला बोलायला वेळ देइन तेव्हा बोला तुम्ही. तोवर तोंड अगदी बंद ठेवायचं. कळलं का?” कदमांनी त्याला दरडावलं.
पण मनोजच्या या ओरडण्यामुळे नीला भेदरून परत रडायला लागली, म्हणून कदमांनी त्यांचा मोर्चा एका मध्यवयीन माणसाकडे वळवला. “तुमचं नाव काय साहेब?” “सर मी देशपांडे. इथे सिनियर एक्झिक्युटीव्ह आहे. सर मेधा अगदी सरळ मुलगी होती. सगळ्यांशी मिळूनमिसळून वागायची, पण कधी सैल वागली नाही. आता, या तरूण मुलामुलीचं आपसात काहिबाही चालत असेल, पण मेधा आणि मनोजचं भांडण तर आमच्या सगळ्यांसमोरच झालं होतं !”
“हे बघा, मी तिच्याबद्दल काही बोललोच नव्हतो. भांडत ती होती. मी फक्त, मी तुझ्याबद्दल काहीच बोललो नाही एवढंच परत परत म्हणत होतो. तुम्ही सगळ्यांनी पाहिलय ते. इतकं खोटं तरी नका बोलू. हे तरी कबूल करा !!” न रहावून मनोज परत ओरडला आणि कदमांची भेदक नजर त्याच्यावर पडताच गप्प झाला. “राणे, मनोज साहेबांना जरा एका केबीनमधे नेऊन बसवा.” कदम कडक आवाजात म्हणाले, तसा राणे पुढे झाला. त्याच्या मागोमाग एका रिकाम्या केबीनमधे जाताना, “माझा या मुलीशी काही संबंध नव्हता. मी आणि मेधा एकमेकांवर प्रेम करतो आणी कायमच करत राहू…” असं पुटपुटत असल्याचं कदमांच्या कानावर पडलं.
मनोज केबीनमधे सर्वांच्या दृष्टीआड जाताच तिथला तणाव बराच कमी झाला. “साहेब मी अनंता. इथे प्यूनचं काम करतो. मेधा मॅडम खूप चांगल्या होत्या. हे मनोजसाहेब त्यांच्याबद्दल सारखं कायकाय बोलायचे माझ्याकडे. आम्ही फिरायला गेलो, हॉटेलात गेलो, बॅन्डस्टॅन्डला गेलो, तिथे आम्ही किसिंग केलं…” अनंता पटकन बोलून गेला आणि त्याने जीभ चावली. “बोल बोल, हरकत नाही.” कदम म्हणाले. त्यांना हवी ती माहिती आपसुकच गोळा होत होती.
“साहेब, काय सांगू. अगदी रंगवून वर्णन करायचे ते त्यांच्या रोमान्सचं. आम्हाला माहिती होतं की मेधामॅडम आणि नीला मॅडम एकत्रच ऑफीसला येतात आणि परत जातात. त्या असं काही करणार नाहीत. मी मनोज साहेबांना बोललो तसं. तर ते म्हणाले की ते त्या दोघांचं सिक्रेट आहे. सर्वांसमोर ते एकमेकांशी बोलणार देखील नाहीत, पण त्यांचं बोलणं अगदी खरं आहे. आणि चार दिवसांपुर्वी तर…” अनंता चाचरायला लागला तशी कदमांनी मान डोलावून त्याला बोलत रहायला सांगीतलं. “चार दिवसांपुर्वी, सर, मनोजसाहेब म्हणाले, की… की त्यांनी आणि मेधा मॅडमनी… म्हणजे… त्या दोघांनी…एकत्र.. सेक्स केला.” हे नुसतं संगतानाही अनंता कसनुसा होवून गेला.
“सर हे तो अजून चार जणांशी देखील बोलला. असल्या वावड्या भरारा पसरतात. मेधाच्या कानावर हे गेल्यावर ती संतापाने वेडीपिशी झाली. सर्वांसमोर तिने मनोजला झाप झाप झापला आणि परत असं काही केल्यास सरळ सेक्शुअल हॅरॅसमेंटची तक्रार दाखल करायची धमकी देखिल दिली. त्यावर मनोज, विचित्रपणे, ‘यात तुझा काय संबंध? मी माझ्या आणि मेधाबद्दल बोलतोय. तू कशाला आमच्यामधे येतेस? तू तुझं बघ.’ असं अगदी सगळ्यांसमोर म्हणाला ! मीच मधे पडून त्यां दोघांना दूर केलं होतं. मनोजला मिसकंडक्टचा मेमो आणि नोटिस देखील दिली आम्ही. पण तो असं काही विचित्र करेल अशी आम्ही कोणी कल्पना देखील केली नव्हती.” देशपांडे बोलत होते.
तेवढ्यात सिक्युरिटी CCTV फुटेज रेडी आहे सांगत आले. प्रॉब्लेम असा होता, की जेन्ट्स आणि लेडीज टॉयलेट ब्लॉकचा मेनडोअर एकच होता आणि आत गेल्यावर वेगवेगळे सेक्शन होत होते. प्रायव्हसी खातर फक्त कॉमन मेनडोअर कॅमेराने कव्हर केलं होतं. त्यात मनोज बराच आधी आत गेलेला, त्या नंतर काही वेळाने मेधा गेली. मेधा आत गेल्यानंतर सात मिनिटांनी मनोज हात पुसत हसत बाहेर आला. मनोज बाहेर आल्यावरही इतर दोन पुरुष आत गेले आणि परतले आणि त्यानंतर नीला गेली आणि लगेच ओरडत बाहेर आली, असा सिक्वेन्स होता. त्या दोन पुरषांचीही चौकशी केली, पण ते दोघे एकत्रच आत गेले आणि बाहेर आले होते. त्यांच्या नजरेला काहिही संशयास्पद दिसलं नव्हतं. सर्व पुरावे मनोजकडेच बोट दाखवत होते.
कदम, मनोजला बसवलेल्या केबीनमधे गेले, तेव्हा मनोज डोळे घट्ट मिटून बसला होता. त्याच्या मिटल्या डोळ्यांमधून पाणी ओघळत होतं, तरी चेहेर्यावर समाधान पसरलं होतं. कदमांची चाहूल लागताच मनोजने डोळे उघडले. “मनोज, तू मेधाचा खून का केलास?” स्थीर आवाजात कदमांनी विचारलं तेव्हा मनोज पोटतिडकीने भडाभडा बोलला होता. काही क्षणांनंतर तो शांत झाला.
“सर, मी सगळ्यांना जे जे सांगितलं त्यातला शब्दनशब्द खरा आहे. माझं आणि मेधाचं एकमेकांवर निरातिशय प्रेम आहे. आमच्या आणाभाका झाल्या आहेत, रोमान्स झाला आणि अगदी शरीर संबंधही आले आहेत. पण आता मला आणि तिला दोघांनाही या डबल लाईफचा कंटाळा आला होता. इथल्या मेधाला मी प्रपोज केलं होतं सर. पण तिने नाही म्हंटलं आणि त्या नंतरच मला माझी मेधा भेटली !! फक्त माझी असणारी, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी मेधा !! फक्त एकच प्रॉब्लेम होता.
आपल्या या जगातही ना सर, अनेक विश्व असतात. समांतर. मी इथे या विश्वात आहे. माझी मेधा त्या समांतर विश्वात आहे. तिला इथे यायचं आहे सर, अगदी मनापासून यायचं आहे. पण इथे तर एक मेधा आधीपासूनच आहे. म्हणुन माझ्या मेधाला, खर्या अर्थाने इथे, माझ्या सोबत कायमचं येता येत नाहिये. अत्तापर्यंत मी डोळे मिटले तरच माझी मेधा माझ्यासोबत असू शकायची. डोळे उघडले, की तिला तिच्या त्या समांतर विश्वात परत जायला लागायचं. आम्ही खूप विचार केला यावर. माझ्या मेधाने तिच्या त्या विश्वातल्या काही जाणकार माणसांनाही विचारलं, तेव्हा ते म्हणाले की, “माझ्या विश्वातल्या मेधाचं चित्र, या विश्वातून पुसून टाकलं, तर कदाचित माझ्या मेधाला, तिच्या विश्वातून इथे येता येईल !!”
“आज मी फक्त तेच केलं सर. हातातल्या ब्रशने, इथल्या मेधाचं चित्र मी पुसून टाकलं आहे !! यापुढे इथली मेधा असणारच नाही. आता माझ्या मेधाला इथे येण्यापासून कुणीच अडवू शकणार नाही. आम्ही आता कायमच सोबत राहू !! चित्र पुसण्याला कुणी खून म्हणतात का? काहिही बोलतात. शिवाय मेधा आता येईलच ! तिथली काय किंवा इथली काय, मेधा असण्याशी कारण !! काय फरक पडतो? काय फरक पडतो?”
मनोजच्या विस्फारलेल्या डोळ्यातला शहाणपणा पूर्ण पुसला जाउन, आता फक्त वेड उरलं होतं !!!
Image by Gerd Altmann from Pixabay
Latest posts by prashantp (see all)
- मूळ पुरुष- भाग २/२ - March 5, 2020
- मूळ पुरुष- भाग १/२ - March 3, 2020
- करकोचा आणि कादंबरी- प्रशांत पटवर्धन. - February 16, 2020