घड्याळमाणूस…..

आम्ही नगरवाली माणसं कुत्रा पाळू शकतो. मांजर पाळू शकतो. झालंच तर पोपटही पाळू शकतो.(प्रसंगी पोपट करूही शकतो. ) माझ्या आईबाबांचा मी ऐकुलता एक मुलगा. त्यांच्या सूनबाईंनी तर “नवरा”ही पाळला आहे. पण वेळ पाळायची  म्हणली की आमचं ” आता माझी सटकली ” होते. मुंबैवाली लोकं घङ्याळ पाळतात आणि त्याच्यामागे पळतात. आम्ही आपलं ” कॅलेंडर ” पाळतो.
असं असलं तरी काही नगरवाली बंडखोर मंडळी , हटकून वेळ पाळतात. आम्हीही त्यातलेच.म्हणजे घरातून कामाच्या ठिकाणी जाईपर्यंत ही मंडळी त्याच ठिकाणी , त्याच वेळी , त्याच परिस्थितीत , दिसणार म्हणजे दिसणारच.  मी मनातल्या मनात ” घड्याळ माणूस ” म्हणतो. ही मंडळी
“जशी च्या तशी ” दिसली की आपण वेळेवर चाललोय, नाही तर आपल्याला ऊशीर झालाय ऐसा मान के चलने का !
सकाळी साडेपाचला , मी घरातून बाहेर पडलो ,की ऐक डेअरीवाल्याचा टेम्पो मला दारातच दिसतो. माझ्या घरापलिकडच्या किराणा मालाच्या दुकानात तो दुधाच्या पिशव्या टाकतो.
गेली वीस वर्षे मी त्याला याच वेळी बघतोय .पठ्ठ्या ऐकही दिवस  दात दाखवून ओळखीचं हसला नाही.  त्यालाही माझ्यासारखंच वाटत असणार. पण वेळ पाळणार म्हणजे पाळणार.
प्रेमदानच्या चौकात ऐक रिक्षावाला असणार. तो म्हणजे रिक्षा लावून रिक्षापासून 500 मीटर अंतर मागे चालत जाणार आणि परत रिक्षाजवळ. पण आकाशात ऊडणार्या घारीचं लक्ष जसं पिल्लांपाशी असतं तसं याचं लक्ष रिक्षापाशी. तुम्ही नुसतं रिक्षाकडे बघितलंत तरी तो पळत पळत रिक्षापाशी येणार. त्याचं नाव मी मिल्खासिंग ठेवलंय. ऐकदा ठरवलं की हा किती चकरा मारतो ते बघू यात. पुढे गेलोच नाही. त्या प्रद्युम्नासारखा हाताने भोवरा फिरवत ,तिथेच थांबलो .पाच पस्तीस ते सहा वाजेपर्यंत त्याने वीस चकरा मारल्या.  त्याच्याही ते लक्षात आलं असावं. त्यानंतर तो ओळखीचं हसतो. आणि बोटांनीच चकरांचा स्कोर सांगतो. त्याने बोटांनी चार चकरांचा स्कोर सांगितला की मी पुढे जातो. वेळेवर चालल्याचं कन्फरमेशन.
पुढे  झोपडी कॅन्टीनपाशी ऐक नवरा बायको दिसतात. साठीपुढचे. बायको पुढे. नवरा तिच्या बरोबर पाच पावलं मागे.  ईतक्या वर्षात त्यांना “हमसफर” नाही होता आलं. एकदा बायको म्हणाली, “दिवसभरात तू माझ्याशी दहा वाक्यं सुद्धा  बोलत नाहीस.” दुसर्या दिवशी पाच चाळीसला आमची वरात झोपडी कॅन्टीनपाशी. तिला ती दोघं दाखवली.  म्हणलं ” रोजचं बोलणं साठवतोय. रिटायर्ड झाल्यावर मला तुझ्याबरोबर चालायचंय. आत्ताच सगळं ओकलो तर तेव्हा काय बोलणार ?” बायको चुप्प.
पुढे पत्रकार चौकात कट्ट्यावर ऐक म्हातारबोवा दिसणार. थकलेले.  थरथरणारे. हरवलेले.काठी टेकत चालणारे. मान खाली घालून आपल्याच पायाची नखे बघत बसणारे. ईतक्या वर्षात त्यांचा चेहरा मला काही बघता आला नाही.  पण वेळ पाळणार. मला आपलं रोजचं टेन्शन. ऐकदाचे दिसले की सुटलो. आजचा दिवस ढकलला. अजून ” वेळ ” आहे बहुतेक.
  पुढे ऐक आजी घरापुढे रांगोळी काढताना दिसणार म्हणजे दिसणारच. वेळ चुकायची नाही.  ही माझी घड्याळमाणसे माझ्याशी ऐकही अक्षर आत्तापर्यंत बोललेली नाहीत .पण माझ्याशी “वेळेने” बांधलेली आहेत. ऐखादा जरी, ऐखाद दिवस दिसला नाही, तर घड्याळाची नाही पण मनाची ” वेळ ”  नक्की चुकतेच.  आपल्या सगळ्यांना शेवटी ऐक “घड्याळ माणूस ” घेवून जायला येणार आहेच. ती वेळ जोवर येत नाही तोवर ,जियो जी भर के!
 अरे हो .अजून ऐक घड्याळ माणूस सांगायचा राहिलाच.
माझा ऐक घारा गोरा सख्खा मित्र आहे. परांजपा . सकाळी 5.30 ते 5.40 तो संडासातच असतो. दुनिया ईधर की ऊधर हो जाये ,तो वेळ आणि स्थळ चुकवत नाही.  प्रेरणा झाली नाही, तरी नुसता जाऊन येतो. खरा “घङ्याळ माणूस.”
ऐकदा तो आत शिरला की त्याच्या बिल्डिंग च्या टाकीचा वाॅल्व्ह बंद करणार आहे. वेळ पाळणार्याची वेळ चुकवली की जो तळतळाट लागतो त्याने आयुष्य वाढते म्हणे !
Image by Ruwad Al Karem from Pixabay 
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

One thought on “घड्याळमाणूस…..

  • July 18, 2019 at 9:28 am
    Permalink

    Mastch👌👌👌

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!