पद्मिनी….
पद्मिनी…(मंदार जोग)
माझा एक मित्र कॉलेजात असतानाच सिनेमाच्या धंद्यात पडला होता. नंतर बरेच मित्र त्यात पडले. पुढे त्यातले बरेच “पडले”, अगदी थोडे तरले आणि मोजके यशस्वी झाले! तर त्या मित्राचा निर्माता गरीब असल्यामुळे त्याने आम्हा काही मित्रांना त्याच्या चित्रपटात लहानश्या भूमिकेत अभिनय (??) करायला बोलावले होते. “भूमिकेची गरज” म्हणून मला कार चालवता येणे आवश्यक होते. मी देखील हातात आलेली संधी सोडायची नाही म्हणून “कोंप्रोमाईज” करायला तयार झालो. शूटिंग दोन दिवसांनी खूप लांब असलेल्या फिल्म सिटी नामक जागेत होते. ट्रेन ने जावे लागणार होते. दोन दिवसात गाडी शिकणे मला क्रमप्राप्त होते. गिरगावातील ड्रायव्हिंग स्कूल चालवणाऱ्या आमच्या एका काकांना गाठले. रॅपिड कोर्सची फी किती विचारली. ते हसत म्हणाले “उद्या सुपर स्टार झालास तर माझ्या स्कूलच्या ब्रोशरवर फोटो फुकटात दे!!!”
टू व्हीलर येत असल्याने क्लच आणि एक्सलरेटरचे नाते माहीत होते. मामला फक्त गाडीच्या जजमेंटचा होता. मग त्या संध्याकाळी एका चिंचोळ्या गल्लीच्या नाक्यावर त्यांच्या फियाट उर्फ प्रीमियर पद्मिनीच्या स्टिअरिंगवर बसलो. बाजूला काका सूचना देत होते. एक दोनदा जजमेंट चूकून बंद पडलेली गाडी मग लिलया उचलता आली. मग रिव्हर्सचे ट्रेनिंग. डावा हात बाजूच्या सीटच्या मागे ठेऊन 180 अंशात मान वळवून रिव्हर्स घ्यायची त्यांनी त्या दोन दिवसात शिकवलेली स्टाईल इतकी डोक्यात भिनली आहे की आजही रिव्हर्स सेन्सर, तीन तीन आरसे असलेली माझी गाडी रिव्हर्स करताना माझा स्टान्स तोच असतो!
मग त्या दिवशी शूटिंग मध्ये फिल्म सिटीच्या रिकाम्या रस्त्यावर फियाट सुसाट चालवली. तो चित्रपट कधीच रिलीज न झाल्याने चित्रपट सृष्टी आणि रसिक एका सुपर स्टारला मुकले हे मी इथे सखेद नमूद करू इच्छितो! पण फियाटशी नाते मात्र जुळले. पुढे चार पैसे हाती आल्यावर पहिली गाडी घेतली ती सेकंड हँड फियाटच! स्टीयरिंगच्या डाव्या बाजूला चिकलेला गियरचा शाफ्ट, मजबूत बांधणी, दणकट बॉडी, स्वस्त सुटे भाग आणि इतर काही परवडत नसल्याने “कम में बम” सेकंड हँड फियाट माझी सखी झाली. मग तिच्या साथीने बाहेरगावच्या अनेक ट्रिप्स, मुंबईत अनेक ड्राईव्हज झाले. तिच्यात असलेल्या कॅसेट प्लेयरवर गाणी ऐकत एसी लावून आपण देखील खूप श्रीमंत झाल्याचे समाधान मिळवता आले. तिचा पंक्चर झालेला टायर बदलून तिथे स्वहस्ते स्टेपनी लावून एक महातवाचा धडा गिरवता आला. दोन वर्षात हौस भागली आणि हात साफ झाले. इतर लोकांकडे आता वेगळ्या गाड्या दिसू लागल्या. फक्त मी आणि टॅक्सीवाले पद्मिनीच्या महालात फिरत होतो हे जाणवू लागले. मित्रांच्या पावर स्टीअरिंग, फ्लोअर शिफ्ट गियरच्या अद्यावत गाड्या चालवल्यावर फियाटच्या मर्यादा लक्षात आल्या. मग एक दिवस एका ओळखीच्या टॅक्सीवाल्याला फियाट विकून टाकली. त्याने तिला काळा पिवळा झगा घातल्यावर एकदा माझी भेट करून दिली होती. मीच तिला ओळखू शकलो नाही. मग तो टॅक्सीवाला संपर्कात राहीला नाही. आयुष्य नवनवीन वळणे घेत पुढे गेले. नंतर अनेक गाड्या घेतल्या. पण माझी फियाट मुंबईतील रस्त्यावर फिरत एखाद्या कुटुंबाचे पोट भरत असेल हा विचार तिचे अस्तित्व मनात टिकवून होता. काळाच्पया ओघात एकेकाळी 63000 संख्या असलेल्या आणि जेमतेम फक्त 100 उरलेल्या फियाट टॅक्सी रद्द झाल्या. रत्यावर अभावाने दिसल्या आणि जवळजवळ दिसेनाश्या झाल्या. आता प्रायव्हेट मालकीच्या फियाट देखील रस्त्यावर दुर्मिळ झाल्या आहेत.
आजच एक प्रीमियर पद्मिनी बघितली आणि मनात आलं की तिच्या ऐन तारुण्यात पहिल्या मालकासाठी “अभिमान” असलेली, मग तिच्या उतार वयात माझी “गरज” भागावणारी आणि त्यानंतर म्हातारपणी एका टॅक्सीवाल्याच्या कुटुंबाचा “आधार” बनलेली ती फियाट अजूनही जिवंत असेल की आपलं कलेवर एखाद्या स्क्रॅप यार्डात सुटे होऊन आयुष्याच्या अंतात देखील एखाद्या स्क्रॅप डिलरचे भल करून माझ्या फियाट ने देखील मुक्ती मिळवली असेल , आयुष्यभर लोकांसाठी झिजून मृत्युपश्चात देहदान करणाऱ्या एखाद्या प्रेमळ आजीसारखी ? Rest in peace my dear “PADMINI”!!!
Image by Dimitris Vetsikas from Pixabay
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023