सेकंड बेसमेंट…

“रुची & राहुल” झळाळणार्‍या नेमप्लेट कडे अभिमानाने बघत रुची रोजच्या सारखी क्षणभर थबकली. नव्या कॉम्प्लेक्स मधल्या नव्या कोर्‍या फ्लॅट मधे राहायला येऊन जेमतेम सहा महिने होत होते. अनाथ (आई-वडील लहानपणीच अपघातात गेल्यामुळे) पण हुशार आणि जिद्दी राहुलशी सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता सात वर्षांपूर्वी केलेलं लग्न, सोसलेले कष्ट आणि आता मिळत चाललेली प्रगतीची आणि संपन्नतेची झळाळी !

गेला पंधरवडाभर राहुल परदेशातच होता. त्या आधी, पहिल्यांदाच त्यांचं भांडण झालं होतं. मुद्दा काही खास नव्हता. मित्रानी सुचवलेल्या एका अनाथ मुलाला आर्थिक मदत करण्यावरून ठिणगी पडली आणि वाढतच गेली. शेवटी “तू घेशील तो निर्णय मान्य” असं सांगून तो गेला होता. “मी बसलेय उगाच कुणाला पैसे वाटायला.” रुची विचार करत होती.

नवीन फ्लॅटचा एकच प्रॉब्लेम होता. यांना पार्किंग सेकंड बेसमेंट मधे मिळालं होतं, म्हणजे जमिनीच्या खाली दोन मजले. त्यातून यांना मिळालेलं पार्किंग, चांगलं प्रशस्त पण अगदीच आडबाजूला होत. आधीच सुनसान बेसमेंट, त्यातच अर्धवट प्रकाश, नव्या माणसाला भीतीच वाटावी. रुची एकटी असेल तेव्हातर पळतंच लिफ्ट गाठायची. पण पंधरा दिवसांपूर्वी एका उंचवट्यावर आपटून तिचा पाय रक्तबंबाळ झाला होता, तेव्हा पासून पळत येणं बंद झालं होतं.

हल्ली चार दिवसांपासून रुची बेसमेंट मधे जाताना अस्वस्थच असायची. नक्की काय सांगता येत नाहीये, पण मानेवरचे उभे राहणारे केस, अंगावर उगीच येणारा शहारा, काही सूचना देतायत असं सारखं वाटत राहायचं. तशी ती डरणारी नव्हती, पण सामना कशाशी करायचा ते कळलं तर पाहिजे.

आजसुद्धा लिफ्ट बेसमेंट मधे थांबली. अॅटोमॅटिक दरवाजा उघडताच, रुची, घाईघाईने कार कडे निघाली. ‘फञफडञफडञ’ अचानक विचित्र आवाज करत डोक्यावरची ट्यूब फडफडायला लागली. आधीच भयाण एकाकी वाटणारे बेसमेंट, या फडफडत्या प्रकाशात भेसूर वाटायला लागले. कसंबसं गाडीपर्यंत पोहोचून रुचीनी, ऑटोलॉकचं बटन दाबलं. “चॉय चॉय” लॉकच्या आवाजानी रुची दचकलीच.

दरवाजा उघडून बसायला जाणार, इतक्यात, तिचं सीटकडे लक्ष गेलं. गडद रंगात एक हाताचा पंजा सीटवर उमटलेला होता. पाच बोटं विस्फारलेला, लहानखुर्‍या हाताचा पंजा ! “टक” ट्यूब लखलखून पेटली आणि त्या क्षणभरात तो पंजा नाहीसा झाला. गाडीत बसायचं धाडस होत नव्हतं, पण बेसमेंट मधे अजून थांबणं शक्यच नव्हतं. गाडी स्टार्ट करून शक्य तितक्या वेगाने रुची वर आली. उजेडात येताच तिला जाणवलं, तिने स्टिअरिंग गच्च आवळून धरलं होतं आणि घामाचे ओघळ तिच्या कपाळावरून चेह‌र्‍यावर ओघळत होते.

दिवसभर एक अस्वस्थता भेडसावत राहिली रुचीला. घरी परतायला नेहमीप्रमाणे उशीरच झाला. बेसमेंटमधे जायच्या रॅम्पवर रुची क्षणभर थांबली. “जे होईल ते” रुचीनी गाडी सुरू केली. काहीही त्रास न होता ती पार्किंगला पोहोचली. स्फोटासारखा उच्छवास बाहेर पडला, तेव्हा तिला जाणवलं, तिने श्वास रोखून धरला होता.

स्वतःवरच हसत रुचीने हेडलाईट बंद केले. त्या क्षणी तिला जाणवलं, समोरच्या भिंतीवर हाताचा तोच ठसा उमटलेला आहे. घाईघाईने दिवे परत लावले, तर भिंत स्वच्छ कोरी! धडपडत कारच्या बाहेर येऊन ती लिफ्टकडे निघाली, अर्थातच, मधल्या त्या उंचवट्यावर न आपटायची काळजी घेऊन. त्या उंचवट्याजवळून जाताना तिच्या अंगावर शहार्‍यावर शहारे यायला लागले. घशामागे खवखवायला लावेल असा विचित्र वास जाणवला. “ब्ब्बुब्बुळ्ळूऊऊघ्ह्घ्घ….” जणू काही उकळत्या डांबरातून कुणी वर यायचा प्रयत्न करत असावं असा आवाजसुद्धा आला. जीव मुठीत धरून रुची घरापर्यंत पोचली.

पुढच्या दिवशी देखील तोच प्रकार परत झाला, फक्त पंजा आज चारच बोटं दाखवत होता. त्या उंचवट्यावर काळोख साकळल्यासारखा वाटत होता. मढं उकरल्यासारखा कुबट दुर्गंध येत होता आणि जणू रुची यायची वाटच पहात असल्यासारखी ट्यूब फडफडली होती. दोन रात्री झोप अतिशय अस्वस्थ लागत होती आणि सारखा दचका बसून जाग येत होती.

तिसर्‍या दिवशी, चारांची तीन बोटं झाली होती. ‘जणू कोणीतरी काउंटडाऊन करतंय’ रुचीच्या मनात आलं. त्या रात्री परत येताना तिला खूपच अस्वस्थ वाटत होतं. देवाचं कुठलसं स्त्रोत्र मनाशी म्हणत, रुची गाडीतून उतरून लिफ्टकडे निघाली. मधे तो उंचवटा होताच.

पण आज उंचवटा रिकामा नव्हता !! नीट दिसत नव्हतं, पण फिक्कट रंगाचा विटका गाऊन घातलेली कुणी बाई बसली असावी असं वाटत होत. रुची जाग्यावरच थांबली. “ख्ख्ख्ख्ख्क्क्कुकुकुक्णाण्णाआआच्च्च्च भल्ल्लल ककककससरररर…….” कसा खरखरता आणि काटेरी आवाज !! जणू रक्तानी भरलेल्या गळ्यातून कुणी महत् प्रयासाने बोलतंय.

सगळा धीर गळून रुची धावत सुटली. लिफ्टची वाट न पाहता दोन जिने चढून ती आधी ग्राऊंड फ्लोअरला आली. नक्की काय होतं ते? जे काही होतं, ते नक्कीच मानवी वाटत नव्हतं. “व्हाय मी? मी काय वाईट केलंय? आणि हा नक्की काय प्रकार आहे?” प्रश्न खूप होते, उत्तरं तेवढी माहीत नव्हती.

“बास, आता राहुल परत येईपर्यंत, मी सेकंड बेसमेंटमधे पाऊलसुद्धा टाकणार नाही” सकाळी उठून एकदा हे ठरवताच रूचीच्या मनावरचा ताण जरा हलका झाला. भांड्यांची पारुबाई आल्याआल्या बडबडायला लागली. “साहेब कधी यायचे हो बाय? लई दिवस झाले ना?” “हं, येतील ८-१० दिवसात”, “काय हो बाय, नाय राग मानू नका, पण घरात तिसरं माणूस हवंच की. तसा उशीरच झाला तुमाला नाय? काय प्ल्यॅनिंग का काय म्हनतात ते चालू हाय का अजून?” आपण नकळत दुखर्‍या नसेवर बोट ठेवलंय हे पारुला कळलंच नाही.

कसनुसं हसून विषय बदलायचा म्हणून रुचीने विचारलं, “पारु, आपल्या बिल्डींगमधे, “तसं काही” आहे का ग?” पारुच्या हातातून घासत असलेलं भांड, ठण्ण्ण्णकन्‌सिंकमधे पडलं. “लोकं बोलतातंच कायबाय. पन एक नक्की, रातच्याला भांडी घासायला म्या बिल्डींगमदे पाऊल बी टाकायची नाय. ही बिल्डींग बांधणारा ब्यील्डर आन कान्ट्रॅक्टर कसा म्येला ठावं हाय का तुमाला? सगळी हाडं तुटून, हिरवं-निळं पडून कुनी मरतं व्हय? ते बी येकाच दिवशी?” ” काय सांगतेस !!” “मंग. बरं बाय, उद्याच्याला मी नाय यायची कामाला, उद्या अमुशा हाय ना.” उद्या अमावस्या ! काउंटडाऊन संपणार ??? डोक्यात एक नवीनच भुंगा सोडून पारू निघून गेली.

बेसमेंट मधे जायचं नाही, हे नक्की केल्याच्या आनंदात रुची शॉवर घ्यायला गेली. वाफेनी कोंदटलेल्या बाथरुममधे, मस्त शॉवर घेताना सगळा शीण गळून जातोय असं वाटत होत. मनसोक्त अंघोळ झाल्यावर टॉवेल घ्यायला रुची वळली, तर कॅबिनेटच्या आरशावर दोन बोटं दाखवणारा हाताचा ठसा उठून दिसत होता !! थरथरत्या हातानी तो ठसा पुसायला जाताना रुचीला जाणवलं, आरशात, तिच्या हाताच्या प्रतिबिंबाशिवाय अजूनही कुणाचं तरी प्रतिबिंब दिसतंय. त्याचवेळी बाथरुममधला CFL सुद्धा फ्लिकर व्हायला लागला, एक्झॉस्ट फॅनचा आवाज बदलला.

वाफेने धुरकटलेल्या आरशात कुणाचा तरी चेहरा दिसत होता. लहानखुर्‍या चणीची कुणी बाई. पण तिचे डोळे, काय धाक होता त्या डोळ्यात. ओठ हलत नव्हते, पण तरी रुचीला काहीतरी ऐकू येत होतं. “म्म्म्म्म्द्द्द्द्त्त्त क्क्क्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र” सगळं सहन न होऊन रुचीला भोवळ आली. त्याच क्षणात CFL लक्ख पेटला, एक्झॉस्ट सुरळित झाला आणि आरसा रिकामा ! आपल्याला दिसलेलं खरंतरी होतं का? हा विचार करत रूची आवरू लागली. दिवस कसाबसा रेटला ऑफिसात. महत्वाची कामं आटपून ती सरळ लवकर घरी आली. गाडी वापरायला बेसमेंटला जायचा विचार देखील तिच्या मनाला शिवला नाही.

घरी नुसतं बसून काय करायचं, म्हणून टीव्ही लावला, तर नेमकी कुठली तरी हॉरर सिरीयल. फाटकन चॅनल बदललान तिने. घरातलंच काहीतरी खाऊन, परत टीव्ही समोर बसली, एवढ्यात फोन वाजला. “राहुल !! कधी येणारेस परत? मला फार काळजी वाटत्ये रे इथे. ये ना लवकर….” ..बीप..बीप…बीप फोन कट झाला होता. “मीच करते” म्हणत फोन केला तर नेटवर्कच नाही ! घड्याळात पाहिलं तर जवळजवळ बारा वाजायला आले होते. ‘एवढा वेळ कसा गेला? झोपूया आता’ म्हणून रुचीने टीव्ही बंद केला. पण टीव्हीच्या काळ्या पडद्यामागची ‘ती’ अजूनच ठळक झाली. हो सकाळचीच आरशातली ‘ती’ ! तसेच धाक भरले डोळे घेऊन बघणारी ‘ती’ !! “म्म्म्द्द्द्द्त्त्त्त क्क्क्क्र्र्र्र्र्र्र्र्र……म्म्म्द्द्द्द्त्त्त्त क्क्क्क्र्र्र्र्र्र्र्र्र…….म्म्म्द्द्द्द्त्त्त्त क्क्क्क्र्र्र्र्र्र्र्र्र” रुचीची शुद्ध हरपली.

जाग आली तेव्हा सकाळ झाली होती. अंग ठणकत होतं, तोंड कडू जहार झालं होतं, डोकं कलकलत होतं आणि अंगावरचे कपडे धुळीत लोळल्यासारखे खराब झाले होते !! “आज अमावस्या” स्वतःच्या अवताराकडे लक्ष जायच्या आधी रुचीच्या मनात पहिला हाच विचार आला. काल काय झालं ते आठवायचा प्रयत्न केला तर नीट काही आठवत नव्हतं, कंटाळा, टीव्ही आणि दिसलेला तो चेहेरा आणि हरपलेली शुद्ध. टीव्हीतून घरात उतरलेली ‘ती’ तिला आठवतच नव्हती !!

थकवा इतका होता, की तिने ऑफिसला फोन करून रजा कळवून टाकली होती. दिवसभर काहीही वेडवाकडं घडलं नाही. ‘वादळापूर्वीची शांतता’ तिच्या मनात आलं. वेळ कसा घालवायचा हे एकीकडे कळत नव्हतं आणि त्याचवेळेला वेळ पुढे सरकूच नये आणि रात्र कधी येऊच नये असं देखील वाटत होत. पण काही गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या असतात. दिवसभर एक प्रकारच्या ट्रान्स मधे असल्यासारखी अवस्था होती तिची. संध्याकाळ होताच तीच अंग रसरसून आलं. कधी नव्हे ती कातरवेळची झोपली ती. कुणीतरी हलवून उठवल्यासारखी अकरा वाजता जाग आली. झोपायचे कपडे घालायला कपाट उघडून तिने एक गाऊन खेचून घेतला आणि आवरायला गेली.

हिंमत नव्हती तरी आरशाकडे नजर गेलीच. या वेळेस स्वतःचं प्रतिबिंब पाहूनच ती दचकली. लाल होऊन खोल गेलेले डोळे, तारवटलेला चेहरा आणि पिंजारलेले केस. ‘कुणी मला असं पाहिलं तर, मलाच भूत समजतील’ जेमतेम आवरून ती बाहेर आली. घड्याळात पाहिलं तर पावणेबारा ! वेळ जातोय तरी कुठे? या विचारासरशी सगळ्या घराचे दिवे फडफड करायला लागले. त्या दिव्यांची भूल पडल्यासारखी रूची त्यांच्याकडे बघतच राहिली. त्याचवेळी मागून करडा आवाज आला, “चल माज्यासंगट”. सपाट्याने मागून काहीतरी पुढे गेलं आणि एखादं कळसूत्र चालावं तशी रुची मागोमाग चालू लागली.

भान आलं तेव्हा जाणवलं, ती सेकंड बेसमेंटमधे होती, अगदी त्या उंचवट्याजवळ. त्या उंचवट्यावर ‘ती’ बसली होती. “हिं हिं हिं, तुला काय वाटलं, घरात बसलीस तर सुटश्याल माज्या पासून? आगं माज्या रगता-मांसावर हुबी हाय ही बिल्डींग. मला हवं तिथं मी जाव शकत्ये आनि मला हवं त्याला हितं आनु शकत्ये” मशेरीने काळे झालेले दात विचकत ’ती’ बोलली. मान वाकडी करुन ‘ती’ने दोन्ही हात वर पसरले आणि रुचीच्या डोळ्यासमोर आजूबाजूचा देखावा विरघळला.

तिला वाटलं आपण एका तीस फूट खोल खड्ड्यात उभे आहोत. आता ‘ती’ कसल्यातरी नशेच्या अंमलाखाली असल्यासारखी पडली होती. शेजारी दोन माणसं उभी होती. एक काळा, बळकट हाडापेराचा, निष्ठुर दिसणारा माणूस आणि दुसरा चश्मा लावलेला, गोरा, पक्का बनीया. “मेहता शेट, फार विचार करू नका. दोनदा दोन मजले उभी राहिलेली बिल्डींग पडली. जमीन बळी मागते आहे. हिच्या पेक्षा चांगलं सावज मिळायचं नाय. एक लहान पोर हाय फक्त, बाकी कोन नाय. तुमची “हां” मात्र पायजेलाय. तरंच बळी साधेल” निब्बर आवाजात तो काळा माणूस बोलला. “कल्लाप्पा, मले यातला काय कळते नाय. पण धंद्यामदी नुसकानी नाय परवडते. बिल्डींग पूरी नाय जाली, तर मी डुबून जाईल.” “मेहता शेट, भरोसा ठेवा, हाच येक उपाय हाय. बाकी समदा मी सांभाळीन, पन जमीन तुमची हाय. बळीवर पयला घाव तुमचा पायजे” कल्लप्पा म्हणाला. कल्लप्पाने ’ती’ला बसतं केलं. कसे कोण जाणे ‘ती’चे डोळे उघडले. “माज्या पोराला सांभाळा, मंग मला मारलात तरी चालंल. माज्या पोराला सांबाळा !!” एवढंच बोलू शकली ती. मेहता शेटचा पहिला वार तिच्या पोटात बसला. पुढचं काम कल्लप्पाने सराईतपणे उरकलं. जमीन रक्ताने माखून गेली.

“पायलंस, हितंच मारून पुरली मला. माजं रगत सांडल हितं, आन तू खुशाल माजी जागा तुडवून धावतेस?” डोळ्यातून आग ओकत ‘ती’ म्हणाली. “ठाठाउउउउक नव्हत्त्त” बोबडी वळलेली रूची म्हणाली. “हिं हिं हिं, कुनालाच ठावं न्हाय. मी नाय पन, आन हाय पन. मला मारनार्‍यांचा पार इस्कोट केला म्या. मला मारलं तर मारलं, माज्या पोराला भिकेला लावला. येवडा हुशार माजा लेक, आता शाळंला जायाचं मुश्किल जालंय त्याला.” आग ओकणारे डोळे भरून आले होते. “तुला तर मी कवाच संपिवलं असतं गं, पन तू रगत सांडलस ना माज्या जाग्यावर. तेनी तुजी समदी कथा सांगितली मला. तवाधरनं तुज्या संगट बोलायचं व्हतं. तुज्या नवर्‍याकडं मदत मागतंय ते पोरगं माजं हाय. त्येला मदत कर, नायतर ये माज्यासोबत हितंच र्‍हायला.”

“मारून टाक मला. तुझ्यावर कोणी अन्याय केला म्हणून आता तू सगळ्यांवर अन्याय कर. पण तुझा सूड तू घेतलायंस. त्या दोघांना तू ठार केलंस. आता मला मारलंस ना तर मी पण भूत बनेन आणि कायम तुझ्याविरुद्ध झगडेन आणि लक्षात ठेव तेव्हा तू हरशील..” रुचीच्या रागाच्या ज्वालामुखीचा स्फोट झाला. ” तुझ्यावर खूप मोठ्ठा अन्याय झालाय हे मान्य आहे मला. तुझ्या मुलाच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी मी घेते. पण आता मुक्त हो. खुप सोसलंस, आता जा बाई पुढे.”

रुचीच्या डोळ्यासमोर ‘ती’चा चेहरा झरझर बदलला. “पक्क्या काळजाची हाएस तू बाय. चल माजा शबुद देते. मी निघून जाईन, पन तुझा शबुद  तू पाळ.” “मी वचन देते, तुझ्या मुलाला शिकवेन, मार्गी लागायला मदत करेन.” रुची मनापासून म्हणाली. “जिते पणी कुनि चांगलं मानुस नाय भेटलं, आता मेल्यावर तू भेटल्येस. जाता जाता दुवा देऊन जाईन. तुज्या मनातलं पुर्न होईल. जा आता घरला. शबुद पाळ…. शबुद पाळ….” ‘ती’ काळोखात विरघळून गेली. धक्का बसून रुची भानावर आली तेव्हा ती घरात होती.

सकाळी पहिला फोन रुचीने त्या अनाथ आश्रमाला केला. राहुलने सांगितलेल्या मुलाच्या शिक्षणाची आणि बाकी आवश्यक सामग्रीची संपूर्ण जबाबदारी आम्ही उचलायला तयार आहोत हे कळवून, त्यांना चेक घ्यायला बोलावलं. श्रमाने गलितगात्र झालेली रुची जरा बसायला जाणार इतक्यात तिच्या पोटात ढवळून आलं आणि उमाशावर उमासे येऊन तिला कोरड्या उलट्या सुरू झाल्या.

‘ती’ने देखील दिलेला शब्द पाळला होता !

Image by Ryan McGuire from Pixabay 

3 thoughts on “सेकंड बेसमेंट…

  • July 26, 2019 at 10:55 am
    Permalink

    बापरे! फारच थरारक!!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!