सिक्रेटभाषा.
आपण भारतीय जन्माला येतो तेच बहूभाषिक म्हणून. त्यात हौस म्हणून, पर्याय नसतो म्हणून, कामासाठी म्हणून, आपण अनेक भाषा शिकत असतो. आपल्याला येत असणाऱ्या भाषांपैकी एक असते राष्ट्रभाषा, एक मातृभाषा, क्वचित एक पितृभाषाही, त्यात आजकाल एखाद्या परकीय भाषेचीही भर पडली आहे. भारतीयांना दरडोई किमान तीन भाषा तरी येतात असं सर्वेक्षणं सांगतात.
या शिवाय आपल्या सर्वांना एक कोणती तरी सिक्रेट भाषा येत असते. सिक्रेट भाषा म्हणजे संवाद साधणाऱ्या दोघांना समजणारी, पण तिसऱ्याला न समजणारी, पेचात पाडणारी किंवा गंडवणारी. उदाहरणार्थ, लहानपणी र फ ची किंवा च ची भाषा आपली सिक्रेट भाषा असते. या सिक्रेट भाषेत बोलून आपण कितीतरी मजा केलेली असते. विशेषतः ज्याला ही येत नाही त्याच्यासमोर चरफटापटा बरफोलून आपण उगाचच शायनींग मारलेली असते! भाषेशी खेळण्याची, तीचं शास्त्र समजण्याची ही केवढी मोठी चंधीस चापल्यालाअ मिळत असते.
परदेशात गेलं आपली मातृभाषाच आपली सिक्रेट भाषा बनते. परदेशी लोकांसमोर आपल्या भाषेत बोलून आपल्याला आपसात बरेच प्रश्न सोडवता येतात, निषेध नोंदवता येतो, मस्करी करता येते. एकदा जर्मनीत मी आणि माझी मैत्रीण एका वेटरला जर्मनमध्ये चहाची ऑर्डर देता देता अक्षरशः थकलो होतो. आम्ही दुधातला चहा मागतो आहेत हे काही केल्या त्याच्या ‘पचनी’ पडेना. माझी मैत्रीण त्याच्यासमोर चेहरा (चहासारखा!) कोरा ठेऊन शुद्ध मराठीत ‘असा काय वागतो आहे ग हा हेंद्ऱ्यासारखा’ असं म्हणाली, तेव्हा मला आतून फूटणारं हसू लपवायला काय प्रयास पडले असतील ते तो भगवंतच जाणे!
र फ ची नवलाई मागे पडते आणि मग सुरू होते अक्षरात बोलता येणारी इंग्रजी भाषा. ही भाषा लहान मुलं असलेल्या आईवडिलांची सिक्रेट भाषा असते. म्हणजे, लेट्स गो टू द एम ओ व्ही आय ई व्हेन द किड्स एस एल ई ई पी. ते किड्स बिचारे आ करुन आपल्या आईवडिलांकडे बघत असतात, त्यांना माहीत असतं की काहीतरी आपल्या बाबतीत चाललंय पण नक्की काय याचा थांगपत्ता लागत नसतो. मुलं बी आय जी होतात, त्यांना स्पेलिंगसकट भाषा कळू लागते, ‘तुम्ही मूव्ही आणि स्लीप म्हणालात, कळलं मला ss असं असं ती मोठ्मोठ्यानं यूरेकाच्या सुरात म्हणायला लागतात आणि पालकांची गोची व्हायला लागते. मग त्यांना डोळ्यांनीच ‘अरे मी रागावते आहे ना त्याला, मग तू नको ना बोलूस’ असे संवाद साधायला लागतात.
माझ्या जाऊबाई तेलुगूभाषक आहेत. लग्न करुन परराज्यात येणं, तिथली भाषा आत्मसात करणं सोप नाही, पण त्यांनी हे आव्हान लीलया पेललं आहे. पण अजूनही त्यांना ऑफीसमध्ये, बँकेत, त्यांची भाषा बोलणारं कोणी भेटलं की परमानंद होतो. साहजिक आहे, आपल्याला नाही का पॅरिसमधे कोणी अगदी “यूरो का छुट्टा मिलेगा?” असं विचारल्यावरही आनंद होतो तसाच असतो हा! तर या माझ्या जाऊबाईना सध्या एक तेलुगूभाषक कामवाली बाई मिळाली आहे. हा आनंद काय असावा, हे ज्याचं त्यालाच समजत असावं. ती घरात आली रे आली की या दोघी त्यांच्या सिक्रेट भाषेत बोलायला लागतात. आम्ही नुसतेच डोळे मोठे करुन त्यांचं ‘एन ss री, अपडी पोडे, जंपिंगम् थंपिंगम् , चुस्कान् , मुस्कान् ऐकत असतो.
काल त्या दोघी असंच त्यांच्या सिक्रेट भाषेत बोलत ब्रह्मानंदाचा आस्वाद घेत होत्या. मी कानावर पडणाऱ्या जिल्ब्या झेलत त्यांचं बोलणं ऐकत होते. क्षणात त्या दोघीत काहीतरी शाब्दिक देवाणघेवाण झाली, माझ्या जाऊबाईंचा चेहरा जरा हिरमुसला. मी हसायला लागले. त्यांनी माझ्याकडे पहात विचारलं, ‘हसतेस काय? समजलं का तुला त्या काय म्हणतायत?’ मी म्हणाले, ‘समजलं तर! उद्या येणार नाहीत त्या, हेच सांगतायत ना?’ माझ्या जाऊबाईंनी आश्चर्याने विचारलं, ‘आमची सिक्रेट भाषा यायला लागली की काय तुला?’ मी म्हणाले, ‘छे! काही गोष्टी यूनिव्हर्सल असतात. त्यांना भाषा कळायची गरज नसते!’
एका मर्यादेपलीकडे मातृ, पितृ, राष्ट्र, सिक्रेटभाषा वगैरे सगळं संपून जातं आणि मग सुरू होते ती ही वैश्विक भाषा.
‘शब्दावाचून कळले, शब्दांच्या पलिकडले’ पाडगावकरांना एका फार रोमँटिक क्षणी सूचलं असावं. मला मात्र राहून राहून काल जिल्ब्यादेवाणघेवाणी दरम्यान हेच शब्द आठवत होते!
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022