बर्म्युडा ट्रँगल…

असं तुमच्या बाबतीत होतं का कधी ?
म्हणजे बघा ,
आपण एखाद्या जागी, आयुष्यात पहिल्यांदा जातो.
आणि तिथं गेल्यावर ,
एकदम वाटायला लागतं…
अरे हे सगळं तर,
माझ्या खुप ओळखीचं आहे.
इथंल्या खूप आठवणी आहेत.
ती जागा एकदम मनात घर करून जाते.
कुठल्या आठवणी ?
आपण मेंदूला खूप ताण देतो.
जाम आठवत नाही.
मेंदूचा नुसता बेंगन भर्ता.
आपण अत्यवस्थ.
डिट्टो तसंच.
तसंच झालं माझ्या बाबतीत.
माती गणपती मंदिराजवळ ऊभा होतो.
एका क्लायंटची वाट बघत.
सहज समोर लक्ष गेलं.
कन्स्ट्रक्शन चालू होतं.
रस्त्याला लागून भली मोठी जागा.
पार पलीकडच्या गल्लीपर्यंत.
खरं तर, एखादी मोठी स्कीम सहज झाली असती.
पर नही…
बंगल्याचं काम चालू होतं.
बंगला कसला ?
माॅडर्न वाडा.
एखाद्या पेशवाई वाड्यासारखा लुक.
आर. सी.सी.च.
महिरपी खिडक्या , दारं..
पंधरा वीस मोठ्याल्या खोल्या असतील.
सुबक , प्रशस्त.
जुन्या नव्याचं अल्टीमेट काॅम्बो.
मालक जाम पैसेवाला असणार.
अन दर्दीही.
मी जाम ईम्प्रेस झालो.
एकदम आतून जाणवायला लागलं.
या जागेशी, माझं खूप जवळचं कनेक्शन आहे.
काय संबंध ?
माझं मलाच सांगता येईना.
गुहागरसारख्या छोट्या गावातला मी.
इथं अभिनवला अॅडमिशन मिळाली.
आणि पुण्यात पहिलं पाऊल टाकलं.
आता पुण्याचाच झालो.
ईन्टेरियरचा डिप्लोमा केला.
एका मोठ्या फर्ममधे चार पाच वर्ष नोकरी केली.
अनुभव घेतला.
चार ओळखी झाल्या.
आता स्वतःच ईन्टेरियरची कामं घेतो.
विशेषतः बंगल्यांची.
जास्त करून कोथरूड , बाणेर, औंध या भागात.
एकेक साईट सहा सहा महिने चालते.
आलात कधी , तर दाखवीन एखादी साईट.
क्लायंट खुश असतो  माझ्यावर.
दहा बारा लोकांची चांगली टीम आहे.
हळूहळू जम बसतोय.
लग्न झालंय.
एक पोरगा आहे.
सासुरवाडी कोकणातलीच.
चिपळूणातली.
स्वतःचा फ्लॅट बुक केलाय.
इकडे पेठांमधे फारसं येणं होतच नाही.
म्हणून तर म्हणतोय…
या जागेशी माझं काही कनेक्शन असणं, शक्यच नाही.
निदान या जन्मात तरी.
माझ्याकडून बघून तुम्हाला काय वाटतं ?
हा माणूस, पक्का बनेल असणार.
चूना लावणार आपल्याला.
नाही हो….
तसा नाहीये मी.
चांगला ऊंच आहे.
गोरा आहे.
फक्त..
डोळ्यांनी घोटाळा होतो.
माझ्या डोळ्यांचा रंग हिरवा आहे.
बिल्लोरी.
समुद्राचं गहिरं पाणी आणि माझे हिरवे डोळे.
बघणारा वचकतोच क्षणभर.
कुणालाही मी आतल्या गाठीचाच वाटतो.
शाळेत असताना तर मला बोका म्हणायचे.
जाऊ दे.
खूप सहन केलंय या डोळ्यांपायी.
तर मी काय सांगत होतो ?
एकदम वाटलं..
इथलं ईन्टेरियरचं काम मिळालं तर ?
मजा आयेगा.
पैसा तर मिळेलच.
पण अशा पेशवाई वाड्याचं ईन्टेरियर…
जुना काळ पुन्हा ऊभा करीन मी.
रिवाईन्ड केल्यासारखा..
मजा आयेगा.
अवघड आहे.
खूप लोकं गळ टाकून बसली असणार.
मेरा नंबर कब आयेगा ?
शायद आयेगाही नही.
ट्राय करायला काय हरकत आहे ?
समोरच्या टपरीवर चौकशी केली.
इनामदार साहेंबांच्या बंगल्याचं काम चालू आहे.
‘साहेब कुठं भेटतील ?’
‘शोरूमवर.
लक्ष्मी रोडला.
” घाटगे आणि मंडळी “
मोठ्ठं ज्वेलर्स शाॅप आहे .
तिथं भेटतील.’
बहुधा साहेब तिथं जनरल मॅनेजर असणार.
बॅगमधे लॅपटाॅप होताच.
तिथं जावून धडकलो.
जयंत इनामदार.
पंचावन्नच्या आसपास वय.
जिभेवर साखर.
आदबशीर बोलणं.
एसी केबीन.
त्याची हैसीयत दाखवणारं.
समोरचा मोठा असो वा छोटा..
सगळ्यांना आपलसं करणारं मधाळ बोलणं.
पक्का बिझनेसमन.
मी येण्याचं कारण सांगितलं.
लॅपटाॅपवर आधीच्या साईटस्चे फोटो दाखवले.
क्लायंट लीस्ट दिली.
एकाशी तो बोलला सुद्धा लगेच.
सॅटीस्फाईड.
त्यानं लगेच साईटप्लॅन दिला.
“बाकीचं काम पूर्ण होत आलंय.
इन्टेरीयरचं काम लगेच सुरू करायचंय.
दोन दिवसांत तुम्ही तुमची ड्राॅईंग्ज द्या.
कोटेशन द्या.
मग पुढचं बोलू.
अर्थात ड्राॅईंग्ज आवडायला हवीत.
बेस्ट लक “.
मी ढगात पोचलेलो.
यकीन नही आता टाईप झालेलं.
इतकं सहज काही चांगलं घडू शकतं ?
माझा विश्वासच बसत नव्हता.
दोन दिवस घड्याळ बंद.
फक्त कॅलेंडर बघायचं.
रात्रीचा दिवस आणि व्हाईस वर्सा.
प्रत्येक रूमचा डीटेल्ड प्लॅन आणि ड्राॅईंग्ज.
संपूर्ण घराच्या इन्टेरियरचा,
एक अॅनीमेटेड थ्रीडी व्हीडीओ पण केलेला.
हे काम प्रचंडच होतं.
सत्तर ऐशी लाखाचं.
पुन्हा ‘घाटगे आणि मंडळी’ची वारी.
जयंतराव झिंदाबाद.
जयंतराव हुशार माणूस.
त्यांनी व्यवस्थित क्वेरीज काढल्या.
मीही सोल्यूशन देत गेलो.
मग वाटाघाटी…
दोन तास मी किल्ला लढवत होतो.
आॅपरेशन सक्सेसफुल.
काम मिळालं.
खिशात दहा लाखाचा अॅडव्हान्सचा चेक,
घेवून मी बाहेर पडलो.
” अजून काम मिळालंय, असं फायनल समजू नका हं…
आमच्या बाईसाहेबांना, तुमची ड्राॅईंग्ज पसंत पडायला हवीत.
त्यांनी ग्रीन सिग्नल द्यायला हवा.
त्या सांगतील ते चेंजेस करावे लागतील.
घरच्या बाॅस त्या आहेत.
तुमच्या माहीतीसाठी सांगतो.
मी इनामदार.
आमचा खरं तर डेअरीचा व्यवसाय.
जोरात चालायचा.
हे दुकान आमच्या सासरेबुवांचं.
बाईसाहेबांशी  लग्न झालं.
त्या एकुलत्या एक.
सासरेबुवांनी गळ घातली.
आम्ही डेअरीचा धंदा बंद करून, या धंद्यात शिरलो.
लक्ष्मीमातेची कृपा…
एकाची चार शोरूम झालीयेत आता.
ही साईट जिथं आहे , तिथे आमच्या सासरेबुवांचा वाडा होता.
दीडशे वर्ष जुना.
बाईसाहेबांच्या फार आठवणी आहेत तिथल्या.
म्हणूनच तर बंगल्याला वाड्याचा लुक दिलाय.
बाईसाहेबांना खूष ठेवा म्हणजे झालं.”
 जयंतराव हसत हसत म्हणाले.
” मी नक्की प्रयत्न करीन “
मी आश्वासन दिलं.
दोन दिवसांनी प्रत्यक्ष साईटवर.
जयंतराव आणि बाईसाहेब.
बाईसाहेबांशी पहिली भेट.
मी हक्काबक्का.
आरस्पानी, नितळ चेहरा.
केसांचा बाॅप्कट.
कानात हिर्याचं नाजुक कानातलं.
कुठली तरी भारीतली साडी.
हलकासा मेकअप.
धुंदी सेंटी सुवासीक वावर.
मोठ्ठे बोलके डोळे.
खानदानी सौंदर्य.
हातचं राखून बोलणं.
तरीही..
सहज जाणवलं.
हा फक्त मुखवटा आहे.
खूप काही लपवणारा.
काहीतरी जळतंय.
खोल.
आतून.
डोळ्याच्या एका कोनातून, ते दुःख सहज रिफ्लेक्ट होणारं.
निदान मला तरी तसं जाणवलं.
दुसर्या क्षणी…
त्यांनी हसून स्वागत केलं.
मी बघतच राहिलो.
ह्रदयात गिटार वाजू लागली.
वाटलं , मी ओळखतो यांना.
खूप वर्षांपासून.
पण , आत्ता काहीच आठवत नाहीये.
छोडो यार.
एखादी व्यक्ती पन्नाशीत इतकी सुंदर दिसू शकते ?
त्या संतूरवाल्यांना सांगायला हवं.
बाबांनो , या बाईसाहेबांना तुमच्या अॅडमधे घ्या.
सचमुच..
उमर का पताही नही चलता.
मला काय वाटलं , शब्दात सांगणं अवघड आहे.
एवढं मात्र खरं…
मी हरवून गेलेलो.
आपण यांना पाहिलंत का ?
बाईसाहेबांनी ड्राॅईंग्ज बघितली.
आवडली.
” तुम्ही , आमच्या जुन्या वाड्यात आला होतात का कधी ?”
‘ नाही कधीच नाही.
का ?’
” काही नाही.
सहज विचारलं.
तुमची डिझाईन्स खूप ओळखीची वाटली.’
मला काहीच समजलं नाही.
काम सुरू झालं.
नंतर वरचेवर बाईसाहेबांशी भेट होवू लागली.
दिवसातून एकदा तरी, त्यांची साईटवर चक्कर व्हायची.
जयंतराव.
पुन्हा भेटलेच नाहीत.
त्यांचं आपलं धंदा एके धंदा.
बाईसाहेब येताना, नेहमी काही तरी खायला घेवून येत.
सगळ्यांसाठी.
बदामी शिरा.
मला फार आवडतो.
त्यांना कसं कळलं ?
मनापासून केलेला आग्रह.
पहिला घास तोंडात घेतला.
असं वाटलं , ही चव माझ्या खूप ओळखीची आहे..
आणि खरं सांगू ?
ही बाईही.
मी वेडा झालेलो.
घरी सोन्यासारखी बायको.
माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी.
मी कसा फसवू शकतो तिला ?
कधीच नाही.
तरीही..
ही बाई समोर आली की..
मी माझा रहातच नाही.
काही तरी वेगळंच फीलींग यायला लागतं.
खूप ओळखीचं.
एखाद दिवस बाईसाहेब आल्या नाहीत तर..
मी अस्वस्थ व्हायचो.
खरं तर आम्ही कामाचंच बोलायचो.
पण आमच्या दोघांचे डोळे..
ते काहीतरी वेगळंच करायचे.
त्या बाईची ती नजर.
हिप्नोटाईज करणारी.
कशाची तरी आठवण करून देणारी.
जुनी ओळख शोधणारी.
जुना फ्लॅशबॅक आठवणारी.
मला काहीही आठवायचं नाही.
काम जोरात सुरू होतं.
मणभर सागवानी लाकूड वापरलेलं.
तुळया, महिरपी , पेशवाई बैठक.
जुन्या स्टाईलच्या अॅन्टीक काचेच्या हंड्या.
झुंबरं.
नक्षीदार झोपाळा , भिंतीतली कपाटं.
अफलातून दिसत होतं सगळं.
जणू नितीन देसाईंनी ऊभारलेला ,पेशवाई सेट वाटावा.
मला कुठून सुचलं, हे सगळं कुणास ठावूक ?
कुठंतरी मनाच्या डोळ्यांनी पाहिलेलं.
आता प्रत्यक्षात साकारलं गेलं होतं.
का कुणास ठावूक ?
आत्ता हे सगळं खूप ओळखीचं वाटत होतं.
डेडलाईन जवळ येत चाललेली.
पंधरा दिवसांवर वास्तुशांत.
कालच जयंतराव येवून गेले.
तेही खूष.
बाईसाहेब आलेल्या.
काही जुने फोटो घेवून.
त्यांच्या वडिलांबरोबरचे .
जुन्या वाड्याचे.
काही ग्रुप फोटो.
” यांना छान फ्रेम करून घ्या.
जिन्यात लावायचेत आपल्याला , स्टेपवाईज.”
‘ओक्के..’
मी कामाला लागलो.
सुतार लोकांना सूचना दिल्या.
खास सागवानी फ्रेम वापरणार होतो.
एका ग्रुपफोटोकडे सहज लक्ष गेले.
बाईसाहेबांच्या लहानपणीचा फोटो.
त्यांचे  आईवडील.
त्या आणि वाड्यातली बच्चा गँग.
तो फोटो बघितला.
मी प्रचंड अस्वस्थ.
काहीतरी प्रचंड ओळखीचं.
डोक्यात जबरदस्त केमीकल लोचा.
सहन होईना.
घामानं थबथबलो.
काम थांबवलं.
घरी जावून झोपलो.
बरं वाटलं.
संध्याकाळी परत साईटवर.
जयंतराव आणि बाईसाहेब आलेल्या.
जयंतरावांना बघितलं.
माझा माझ्यावर ताबाच राहिला नाही.
डोळे आग ओकू लागले.
नुसता संताप.
हात शिवशिवू लागले.
वाटलं , या हातांनी जयंतरावांचा गळा दाबावा.
हिशोब चुकता करावा.
कुठला हिशोब ?
ते मात्र आठवत नव्हतं.
मी नुसताच थरथरत होतो.
एकदम बाईसाहेबांनी माझा हात धरला.
मी भानावर आलो.
” त्यांची तब्येत ठीक नाहीये , जा त्यांना घरी सोडून या.”
माझ्या दोन पोरांनी मला घरी नेवून सोडलं.
आठ दिवस सणकून ताप.
नवव्या दिवशी सकाळी.
आता बरं वाटत होतं.
आज साईटवर जायलाच हवं.
माझ्या माणसाचा फोन.
” साहेब , कळलं का ?
इनामदार साहेबांनी आत्महत्या केली.
आठ दिवसांपूर्वीच.
आत्ताच बाईसाहेब येवून गेल्या.
त्यांनी चिठ्ठी दिलीय.
ऊरलेल्या पेमेंटचा चेकही दिलाय.
काम संपत आलंय.
तुम्ही साईटवर केव्हा येताय ?”
मी उडालोच
ताबडतोब साईटवर पोचलो.
चिठ्ठी वाचू लागलो.
” आज ना ऊद्या, तुम्हाला ओळख पटलीच असती.
सहज ओळखू शकाल स्वतःला.
तो ग्रुप फोटो.
माझ्याशेजारचा तू.
तेच हिरवे डोळे.
मी पहिल्या दिवशीच ओळखलं तुला.
वाड्यातल्या दिगूकाकांचा मुलगा तू.
ते आमच्याकडेच दिवाणजी.
माझी तुझी काय बरोबरी ?
तरीही…
मला तूच हवा होतास.
तूही जिद्दीला पेटलास.
तू शिकायला दिल्लीला गेलास.
सरकारी नोकरी मिळवलीस.
मला मागणी घालायला म्हणून,  पुण्याला निघालेला.
पुण्याला पोचलास नाहीस.
दिगूकाका खंगून खंगून गेले.
जयंता.
आपल्या दोघांचा मित्र.
चिठ्ठ्या पोचवायचा.
तू गेलास दिल्लीला.
त्याचा माझ्यावर डोळा.
तुझं काही तरी बरं वाईट झालं असणार.
नव्हे त्यानंच केलं असणार.
तू आला नाहीस.
खूप वाट बघितली.
शेवटी इनामदारांकडनं रीतसर मागणी घातली गेली.
माझा नाईलाज झाला.
माझी खात्री होती.
जयंतानंच तुझ्याशी दगाफटका केला असणार.
त्यादिवशीची तुझी ती नजर.
जयंतानंही ओळखलं तुला.
खरं तर बाकी आयुष्यभर ,तो माझ्याशी चांगलाच वागला.
पण त्या पापाचं ओझं सहन होईना त्याला.
माझ्यापाशी कबूल केलं सगळं.
रात्री कधीतरी स्वतःवर गोळी झाडून घेतली.
बरं झालं.
तू वाचलास.
नाहीतर या बर्म्युडा ट्रँगलमधे खेचला गेला असतास.
खोल गर्तेत अडकला असतास.
सोन्यासारखा संसार आहे तुझा.
सांभाळ.
गेल्या जन्मीचे हिशोब, या जन्मी चुकते करायला निघाला होतास.
विसरून जा सगळं.
मी कायमची निघून जातेय लेकीकडे , आॅस्ट्रेलियात.
तुझा विश्वास असो वा नसो.
माझ्यासाठी एक कर.
धुंडीशास्त्रींशी बोललेय मी.
शांती करून घे.
तुझ्यातल्या माझ्या विश्वासला मुक्ति मिळू दे.
कायमची.
शुभम् भवतु.”
मी शाॅक्ड.
चेक घेतला.
दोन दिवसांत काम पूर्ण करून घेतलं.
चाव्या बाईसाहेबांच्या वकीलाकडे सुपूर्त केल्या.
बंगल्याची वास्तुशांत बहुधा कधी होणारच नाही.
चॅप्टर क्लोज्ड.
ती आठवण कायमची पुसली गेली.
पुन्हा कधीच, काही आठवलं नाही.
तो बंगलाही.
अन् बाईसाहेबही.
काल सहज ,माती गणणपतीशी चक्कर झाली.
एक पेशवाईस्टाईल बंगला दिसला.
पितळी नावाची पाटी दिसली.
” बर्म्युडा ट्रॅगल.”
वाटलं , या जागेशी माझं काही तरी कनेक्शन आहे.
जाम आठवण्याचा प्रयत्न केला.
नाही आठवलं.
तुम्हाला आठवतंय का काही ?
Image by Sofie Zbořilová from Pixabay 
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

6 thoughts on “बर्म्युडा ट्रँगल…

    • September 24, 2019 at 10:23 am
      Permalink

      yes… certainly hypnotized while reading… as if we are seeing it by being present there but invisibly

      Reply
  • August 18, 2019 at 10:23 am
    Permalink

    जबरदस्त!!!
    दुसरा शब्दच नाही…
    हॅट्स ऑफ कौस्तुभ भाई…

    Reply
  • September 21, 2019 at 12:50 pm
    Permalink

    Khup chhan … apratim likhan

    Reply
  • November 14, 2020 at 10:26 am
    Permalink

    Khup chhan, veglach vishay hota

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!