लढाई…भाग १
तो सकाळी सकाळी विहिरीवर गेला. अंगावरचे कपडे काढून हळूच विहिरीत उतरू लागला. विहिरीच्या पाण्यानं तळ गाठलेला. फारतर कंबरेएवढं पाणी असेल! मृग सुरू होऊन एक आठवडा झाला तरी अजून पाऊस सुरू झाला नव्हता. मध्यंतरी एक उन्हाळी पाऊस पडून गेला होता तेवढाच. पण तेवढ्या एका पावसानं विहिरीचं पाणी कसं वाढणार? विहीरीत उतरता उतरता त्यानं विहिरीच्या पायऱ्या मोजल्या. एकशे दहा भरल्या. साध्या कच्च्या पायऱ्या. त्यामुळं एक पायरी वीतभर लांबीची तर दुसरी हातभर लांब.
त्यानं खांद्यावरची तांब्याची घागर खाली घेतली. पाण्यावर घागर पाण्यात सोडून पाणी ढवळलं. पाण्यात पडलेला कडूलिंबाचा पाला बाजूला झाला. त्यानं मग हातातली घागर अलगद पाण्यात बुडवली. बुडबुड करत घागर भरू लागली. निम्मी घागर भरली असेल तेव्हा लिंबाचा पाला पुन्हा घागरीच्या तोंडाला आला. डाव्या हातात घागर धरून त्यानं उजव्या हातानं पाला बाजूला ढकलला आणि उरलेली घागर भरून घेतली.
आता तो पाण्यात उतरला. त्यानं ताकद लावून घागर पाण्यातून वर काढली आणि एका पायरीवर ठेवून दिली. घागर कलंडू नये म्हणून तिच्या बुडाला एक मध्यम आकाराचा दगड लावला. तो आता पुन्हा पाण्यात उतरला. अंघोळीसाठी. आता त्यानं दोन्ही हातांनी पाचोळा बाजूला ढकलला. लिंबाचा पाला कुजल्यासारखा झाला होता. ‘विहिरीवरची सगळी झाडे तोडली पाहिजेत. वर्षभर पाला पडत असतो. पाला कुजला की पाणी कडवट लागते.’ तो मनातल्या मनात बोलला. त्यानं पाण्यात हळूच बसकन मारली. कंबरेला लागणारं पाणी आता खांद्यावर आलं. दोन मिनिटांनी तो उठून उभा राहिला. त्यानं आपलं अंग चोळायला सुरुवात केली. हेच पाणी पिण्यासाठी वापरलं जात असल्यामुळं अंगाला साबण लावण्याचा प्रश्नच नव्हता.
झाडावर अचानक साळुंक्यांचा किलबिलाट वाढला. या साळुंक्यांना अचानक काय झालं म्हणून त्यानं वर बघितलं तर एक साप झाडाच्या मुळ्यांवरून सरपटत चाललेला. नेमका याच्या डोक्यावर. साप चुकून खाली पडला तर तो नेमका आपल्या अंगावरच पडणार… त्याच्या मनात विचार आला आणि तो घाबरला. अंघोळ सोडून एकटक त्या सापाकडे पाहत राहिला. साप सावकाश वरच्या झाडीत निघून गेला आणि यानं अंग पुन्हा पाण्यात बुडवलं.
वर येऊन त्यानं टॉवेलनं अंग पुसलं. टॉवेल कंबरेला गुंडाळून त्यानं ओली चड्डी काढली आणि कोरडी चड्डी चढवली. ओली चड्डी दोनतीनदा पाण्यात बुचकळली आणि पिळून घेतली. कंबरेचा टॉवेल घडी करून खांद्यावर ठेवला. घागर उचलून त्या टॉवेलवर ठेवली. एका हातानं घागर आणि एका हातानं विहिरीची धकट धरून तो वर चढू लागला. वीस लिटरची तांब्याची ती जडशीळ घागर वर आणेपर्यंत त्याच्या तोंडाला कोरड पडली होती.
“काय लेका गुंड्या, इथं आहेस होय?….मी तुझ्या घराकडं जाऊन आलो की!” त्याचा मित्र विहिरीवर उभा होता.
“होय काय?…लवकर आलास की!” त्यानं डाव्या खांद्यावरची घागर उजव्या खांद्यावर घेत म्हटलं.
“निकाल लागायचा आहे म्हणून रात्रभर झोप लागली नाही लेका!….काय होईल रे माझं?”
“काय होईल?….पेपर चांगले लिहले असशील तर पास होशील आणि पेपर चांगले लिहले नसशील तर नापास!”
“ए लेका, पास होशील म्हण की!…छातीत आधीच पाकपुक व्हायला लागलंय आणि त्यात नापास बिपास म्हणून माझं टेन्शन वाढवू नको.”
“तू नक्कीच पास होशील.” तो बोलला आणि दोघेही खळखळून हसले.
हे दोघे पोहोचले तेव्हा शाळेसमोर गर्दी झालेली होती. काही मुलं आधीच पेढे घेऊन आलेली.
“हे घे पेढे!” एका मित्रानं पेढा देत याला म्हटलं.
“निकाल दिला की काय?”
“नाही अजून….माझ्या मामानं कालच प्रेसमधून काढलाय.”
“निकाल असा काढता येतो?”
“हो!….पेपरमध्ये छापण्यासाठी म्हणून कोणताही निकाल प्रेसवाल्यांकडे आधल्या दिवशीच आलेला असतो.”
“हो काय?”
इतक्यात हेडसर आले. त्यांनी हात करून सर्वांना हॉलमध्ये बोलावलं. सगळ्यांच्या छातीत धाकधूक. भीतभीतच विद्यार्थी बेंचवर बसले. पिन ड्रॉप सायलन्स. हेड्सर गेली दहा वर्षे सायलन्स सायलन्स म्हणून याच वर्गात ओरडत होते पण एकदाही एवढी शांतता नव्हती….आज सरांनी एकदाही सायलन्स शब्द वापरला नाही पण हॉलमध्ये पिनड्रॉप सायलन्स. काही मुलांचे हातपाय थरथरत होते. मामाकडे शाळा शिकायला आलेला सुहास तर रडायलाच लागला. आपण नापास झालो तर मामा आपल्याला घरी पाठवणार आणि मग बाप….
सरांनी टेबलवरचा मार्कलिस्टचा गठ्ठा सोडला आणि समोर पाहिलं. छोटे छोटे चेहरे. नुकतीच मिसरूड फुटत असलेले. भेदरलेले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर कमालीची उत्सुकता.
“तर विद्यार्थीमित्रांनो,” हॉलमधली जीवघेणी शांतता भेदत सरांचा आवाज घुमला,” आज मी इथं एसएससीचा निकाल जाहीर करण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे. निकालानंतर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे ती ही की दहावीचा निकाल म्हणजे आयुष्य नव्हे. तुमच्या पुढील आयुष्याची नक्की दिशा ठरवण्याइतपातच या परीक्षेचा उपयोग आहे. आजपर्यंत आपापल्या परीनं तुम्ही मेहनत घेतलेली आहे. जगात प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी असते, प्रत्येकाची कष्ट करण्याची कुवत वेगळी असते, शिक्षणासाठी प्रत्येकाला मिळणाऱ्या सुविधा आणि सुखसोयी वेगवेगळ्या असतात, व्यक्ती व्यक्तीत यश मिळवण्याची जिद्दही वेगळी असते. या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्याला परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवर होत असतो. त्यामुळं जास्त पडले म्हणून कुणी हुरळून जाऊ नये किंवा गर्व करू नये आणि एखाद्याला कमी मार्क पडले तर त्यानं निराश होऊ नये. एखादा विद्यार्थी नापास झाला याचा अर्थ तो विद्यार्थी जगण्याला नालायक आहे असा नाही, तर या परीक्षेसाठी त्या विदयार्थ्याचा अभ्यास कमी पडला एवढाच आहे….ज्यांना या परीक्षेत चांगलं यश मिळालंय त्यांचं अभिनंदन आणि जे नापास झालेत त्यांना पुन्हा तयारी करण्यासाठी शुभेच्छा!” सर क्षणभर थांबले. स्वतःशीच हसले आणि बोलले,”नमनालाच जास्त तेल न जाळता आता मी डायरेक्ट निकालच जाहीर करतो….”
मुलं आ वासून सरांकडे पाहत होती. सरांनी एक एक नाव उच्चारलं की एक एक विद्यार्थी जाऊन आपलं मार्कशीट घेऊन येत होता. एक दोन तीन चार पाच…… सगळे विद्यार्थी संपले तरी सरांनी याचं नाव घेतलंच नाही.
“सर, माझं मार्कलिस्ट….” हा पुढं जाऊन बोलला.
“देतो बैस जागेवर.” सरांनी बेंचकडे बोट दाखवलं. हा गुपचूप बेंचवर बसला.
“सायलेन्स.” सर ओरडले,”अजूनही तीन विद्यार्थ्यांचे निकाल द्यायचे राहिलेत.”
मुलं एकमेकांकडे पाहायला लागली.
“आपल्या शाळेत सर्वांत जास्त यश मिळवणारे तीन विद्यार्थी आहेत…….” सरांनी तीन नावं घेतली आणि हॉलमध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. एवढा कडकडाट की याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. पहिलीपासून आजपर्यंत याचा वर्गात पहिला नंबर होताच पण आता दहावीतही!….
मार्कलिस्ट घेऊन हा वर्गातून बाहेर पडला तेव्हा त्याला आकाश अगदी ठेंगणं वाटत होतं!
क्रमश:
Latest posts by Ashok Mali (see all)
- लढाई- भाग ६ - January 28, 2020
- लढाई- भाग ५ - December 24, 2019
- लढाई- भाग ४ - December 1, 2019
Nice 👌👌👌👌
Mast 👌👌
छान सुरुवात
मस्तच… 👌🏻
छान लिहीता …👌🏻👌🏻
वा फारच छान
छान लिहिले आहे