बाराखडी…
कळायला लागलं तेव्हापासून मला सतत कसलीतरी भीती वाटत असते. नाही सतत भीती वाटत नाही. सतत चिंता लागलेली असते, मला भीती वाटेल याची ! मला भीती कसलीही वाटू शकते. अळीची, किड्याची, कोळ्याची, डोळ्यांची, भूतांची, माणसांची, प्राण्यांची, अंधाराची आणि उजेडाची सुद्धा ! मी तुम्हाला आधी सांगितलं की नाही ते आठवत नाही, पण सगळ्यात जास्त भीती मला सावल्यांची वाटते.
मला कोणी मित्र नाहीयेत. सगळे म्हणतात माझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्या अपघातामुळे. गंमत म्हणजे मला देखील अगदी तसंच वाटतं. मला काही तो अपघात फारसा आठवत नाही. मी तर लहानच होतो तसा. जेमतेम पाचवीत असेन तेव्हा. बराच वेळ बेशुद्धीत काढून मी जागा झालो, तेव्हा आतून गुद्दे मारल्यासारखं ठणकणारं डोकं तेवढं नक्की आठवतंय.
सुजलेल्या डोळ्यांच्या पापण्या किलकिल्या करून मला जे दिसलं, ते माझ्याच काय पण कुणाच्याही डोक्यावर परिणाम करेल असंच होतं. आमच्या लहानशा घरातली एकही वस्तू जागेवर राहिली नव्हती. अख्खं घर वादळाने उध्वस्त केल्यासारखं दिसत होतं. एका कोपर्यात बाबांचा निष्प्राण देह, कुठल्याशा अदृश्य दोराने लटकल्यासारखा उभा होता. माझी आई पिसाटल्यासारखी, जराही न थांबता किंचाळत होती. खरंतर तिचे शांत, मायाळू डोळे मला अजून आठवतात. मी तुम्हाला आधी सांगितलं की नाही ते आठवत नाही, पण आईचं खूप प्रेम होतं माझ्यावर.
घरभर गडद सावल्या नुसत्या भिरभिरत होत्या. विचित्र, भेसूर, भयावह, प्रचंड आकाराच्या सावल्या. नख्या पारजणार्या, दात विचकणार्या, शेपट्या वेळावत, मान फुगवून हल्ला करायला तयार असणार्या सावल्या. त्यांच्या तावडीत सापडेल त्याचा घास घ्यायला उत्सुक असणार्या सावल्या. इतर कुणालाही न दिसता, फक्त मलाच दिसणार्या सावल्या.
नीट आठवत नाही, पण मी डोळे गच्च मिटून घेतले. कानात बोटं खुपसली आणि वेड्यासारखा मोठमोठ्यांदा बाराखडी म्हणायला लागलो. किती वेळ गेला कुणास ठाऊक. परत जाग आली तेव्हा कुठल्यातरी हॉस्पिटलमधे होतो. कुणीतरी धुवून टाकल्यासारखा मेंदू अगदी कोरा होता. कुणीतरी नातेवाईक मला सांभाळायला त्यांच्या घरी घेवून गेले. बाबांचा इन्शुरन्स आणि आमच्या घराची बरी किंमत आली असावी. आईची रवानगी वेड्यांच्या हॉस्पिटलमधे झाली. मला एकदाच आईला भेटायला नेलं होतं. पण इतर वेळेस शांत असलेली आई, मला पाहताच परत पिसाटल्यासारखी किंचाळायलाच लागली. बहुधा मला पाहताच त्या अपघाताच्या स्मृती जागवल्या गेल्या असतील तिच्या मनात. मी तुम्हाला आधी सांगितलं की नाही ते आठवत नाही, पण मग मी कधीच नाही गेलो आईला भेटायला.
कुणा एका नातेवाईकाकडे मी काही राहिलो नाही. जेमतेम एक वर्ष एका नातेवाईकाकडे काढलं, की शाळेच्या सुट्टीत माझी रवानगी दुसरीकडे व्हायची. ते एक बरंच होतं म्हणा. दर वर्षी नवं शहर, नवी जागा, नवी माणसं, नवा मी, नवे शत्रू आणि नव्या सावल्या ! मी तुम्हाला आधी सांगितलं की नाही ते आठवत नाही, पण मला त्रास देणार्या माणसांच्या मागे मला एक सावली दिसत राहते.
मला वाटतं लोकांना आवडतं मला त्रास द्यायला. जरा वेळ मिळाला की मला आवडतं कानात बोटं खुपसून बाराखडी म्हणायला. आता यात लोकांना त्रास होण्यासारखं काय आहे? पण होतो. लोकं मला येताजाता टपल्या मारतात. “ए वेडा”, “ए येडा”, “ए चम्या”, “ए झंप्या” अशा हाका मारतात. चित्रविचित्र आवाज काढून मला घाबरवतात. मग मी कानात अजून खोल बोटं खुपसतो आणि अजून जोरजोरात बाराखडी म्हणतो.
पाच -सहा वर्ष अशीच गेली आणि मी कॉलेजला गेलो. आत्ता ज्या नातेवाईकांकडे होतो, त्यांनी स्वस्तातलं स्वस्त कॉलेज शोधून तिथे माझी ऍडमिशन घेतली. स्वस्त कॉलेज, तसंच स्वस्त त्यातलं पब्लिक. इथे पावलोपावली मला त्रास देणारे होते. माझा छळ करणारे होते. सावल्याची गर्दी व्हायला लागली. मग मी कॉलेजला जायचो आणि लायब्ररीच्या एखाद्या रिकाम्या कोपर्यात बसून कानात गच्च बोटं खुपसून हळूच माझी बाराखडी म्हणत बसायचो. नाहीतरी आमची लायब्ररी अगदी पार रिकामी असायची. अगदी लायब्रेरियन देखील नसायचा तिथे. मी तुम्हाला आधी सांगितलं की नाही ते आठवत नाही, पण माझी बाराखडी माझ्या जन्माच्या दिवशीच कुणीतरी माझ्या कानात सांगून गेलं होतं.
त्या दिवशी मी नेहमीपेक्षा खूप लवकर येऊन लायब्ररीच्या रिकाम्या कोपर्यात बसलो होतो. तिथे फक्त आम्ही दोघेच होतो. मी आणि शांत, मायाळू डोळ्यांची ती. तिचं नाव नाही माहित मला, पण ती नेहमी तिथेच असायची. मी येता- जाताना ती माझ्याकडे बघून हसायची फक्त. मला कधीच त्रास दिला नाही तिने. पण त्याला बहुतेक तिला त्रास द्यायचा होता.
तो दबक्या पावलांनी लायब्ररीत आला, पण मला सावल्यांनी सांगितलंच. हलकेच त्याने दरवाजा बंद करून घेतला आणि चोर पावलांनी तो, तिच्याकडे गेला. माझ्या डोळ्यांवर कसलासा धूसर पडदा पसरल्यासारखं झालं. एकाच वेळी डोळ्यांसमोर दोन दृश्य दिसायला लागली, एक आत्ताचं आणि एक त्या दिवसाचं. बाबांनी देखील असाच चोर पावलांनी घरात येवून दरवाजा लावून घेतला होता.
तो आता तिच्या अगदी जवळ पोहोचला होता. त्याने मागून जाऊन तिला कवटाळलं. त्या दिवशी देखील तसंच झालं होतं. माझ्या कानांमधे दणाणा आवाज वाजायला लागले. मी जागचा उठून पुढे सरकायला लागलो. असं वाटत होतं की काहीतरी माझ्या कानांमधून रोंरावत बाहेर पडतंय. काहीतरी प्रचंड, विचित्र, भेसूर, भयावह ! नख्या पारजत, दात विचकत, शेपट्या वळवत, मान फुगवून हल्ला करायला तयार असणारं ! काहीतरी सावलीसारखं !!
त्याने तिला आता खूप त्रास द्यायला सुरूवात केली. ती कण्हायला लागली होती. मला तिला वाचवायला हवं. मला आईला वाचवायलाच हवं ! माझ्या बाराखडीत नसलेलं एक व्यंजन माझ्या तोंडून उमटलं, “घ्रोंऽऽऽ” !!! त्याच क्षणी तिने मागे वळून बघितलं होतं. माझ्या तोंडून तो ध्वनी उमटताक्षणी सावल्या साकार झाल्या. त्यांच्या प्रचंड सामर्थ्याने त्यांनी लायब्ररीत उत्पात माजवला. एखादं वादळ घोंघावावं आणि सर्व उध्वस्त व्हावं तशी लायब्ररी उध्वस्त झाली.
एका आकाराने, तेव्हा बाबांना उचललं होतं, तसं खेळण्यासारखं त्याला उचललं आणि भिंतीवर भिरकावून दिलं. शेपटीचा फास बनवून त्याला एका कोपर्यात लटकवून दिलं. तिच्या चेहर्यावर मात्र भूकंप झाला होता. तिने त्याच्याकडे एकदा बघितलं आणि तिची नजर माझ्याकडे वळली. काहीतरी निषिद्ध, अघोर पाहिल्यासारखी ती भेदरली. काही क्षण तिच्या तोंडातून काही आवाज उमटला नाही, पण मग एकदम ती पिसाटल्या सारखी किंचाळायला लागली, न थांबता, अगदी आई सारखी!
तिच्या किंचाळण्याचा आवाज मला असह्य झाला. तो थांबवायला हवा. त्यासाठी त्यापेक्षा मोठ्या आवाजात बाराखडी म्हणायला हवी ! माझ्या मनातला विचार त्या साकार सावल्यांना कळला. त्यांनी त्यांचा मोर्चा माझ्याकडे वळवला. स्वतःच्या मुक्तीसाठी ते माझा नाश करायला सज्ज झाले. त्या सगळ्यांनी एकत्र होऊन एकच प्रचंड आकार घेतला आणि एकच प्रचंड आघात केला…
“ॐ ठं कं घ्रीं ह्रीं यं ळं ल्कीं द्रां ऽऽऽ” मी बाराखडी उच्चारताच, तो साकार परत सावलीत विरघळला. सोसाट्याचा वारा तेवढा माझ्यापर्यंत पोहोचला. मी परत परत बाराखडी म्हणायला लागताच सावल्या परत कानांमधून माझ्या शरीरात ओढल्या जाऊ लागल्या. शेवटची सावली आत जाताच मी माझी बोटं कानात गच्च खुपसली आणि सावल्यांना कोंडून ठेवायला जोरजोरात बाराखडी ओरडत राहिलो. त्यातच कधीतरी माझी शुद्ध हरपली.
आता मी, ती आणि आई एकाच ठिकाणी असतो. अर्थात मला त्यांच्यासमोर नेत नाहीतच. इथे मला कुणी त्रास देत नाही फारसं, म्हणून मग मी बाराखडी मनातल्या मनातच म्हणतो. कानात बोटं मात्र खुपसलेली असतातच. आता सगळं शांत आहे.
एक आहे, इथला एक डॉक्टर, रात्रपाळीच्या नर्सला बंद दरवाजाच्या आड त्रास देत असावा असा संशय येतोय मला. बघेन एकदा बाराखडी म्हणायची बंद करून !!
Latest posts by prashantp (see all)
- मूळ पुरुष- भाग २/२ - March 5, 2020
- मूळ पुरुष- भाग १/२ - March 3, 2020
- करकोचा आणि कादंबरी- प्रशांत पटवर्धन. - February 16, 2020
Hi!
I have paid the subscription fees after the ‘Goodhal’ programme today. Please provide me the access to the portal.
Thanks
Thanks. Your access is created. pLease chek your email and login. Happy reading.
Amazing