टू इन वन…

..मला वाटतं ती शनिवार संध्याकाळ असेल. म्हणजे असेलच. कारण आम्ही शक्यतो तेव्हाच जायचो सहकुटुंब नातेवाईकांकडे. म्हणजे तेव्हा लोक सहकुटुंब एकमेकांच्या घरी जायची पद्धत प्रचलित होती तेव्हाची ही आठवण आहे. तर अशीच एक शनिवार संध्याकाळ. मी आणि माझा भाऊ एकाच ताग्यातून शिवलेले शेम टू शेम शर्ट आणि खाली हाफ चड्डी घालून तयार. हो हे खरं आहे. तेव्हा आमच्याकडे सेम कापडात शिवलेले शेम टू शेम दिसणारे काही शर्ट होते. इतकंच काय तर एकाच ताग्यातून मी माझा सख्खा भाऊ, एक मावस भाऊ आणि एक मामेभाऊ ह्यांना शिवलेले चार शर्टही होते. तेव्हा खरं तर तशी फॅशन असावी किंवा जास्त कापड स्वस्तात मिळत असल्याने मध्यमवर्गीय वडिलांनी केलेली ती सोय असावी. कारण शेम टू शेम शर्ट घालणारी अनेक मुलं बाहेरही सहज दिसायची. मुख्य म्हणजे शेम टू शेम शर्ट घालणे तेव्हा “शेमफुल” न वाटता “कूल” वाटत असे. तर आम्ही शेम टू शेम शर्ट घालून तयार होतो. आईबाबा पण तयार. आज काहीतरी खूप अजब आणि नवल बघायला मिळणार होतं.

आम्ही चालत बस स्टॉपवर आलो. हो तेव्हा पांढरपेशे लोक सहकुटुंब बेस्ट बस ने किंवा ट्रेन ने सहज प्रवास करू शकत. गर्दी फारशी नसे. आणि कधी झालीच तर सगळे स्वच्छ, सभ्य, कुटुंबवत्सल लोक सहप्रवासी असत. गोष्ट साधारण आमच्या मुंबईला “बंबई” नामक कॅन्सर ने पूर्ण ग्रासयाच्या आधीची आहे. असो. तर आम्ही बसमध्ये वरच्या मजल्यावरील सर्वात पुढल्या सीटवर बसलो. बस निघाल्यावर समोरून लागणारा वारा मी आणि भाऊ आ वासून छातीत भरून घेत होतो. तेव्हा अश्या लहान लहान गोष्टीतून मिळणारा आनंद खूप मोठा होता. तेव्हा मुंबईची हवाही प्रदूषित नव्हती. आजच्या मानाने खूप कमी रहदारी असलेल्या रस्त्यावरून प्रवास करून वीस मिनिटात आम्ही आमच्या स्टॉपवर उतरलो. आज त्याच प्रवासाला एक ते दीड तास लागतो. असो!

आम्ही चालत मामाच्या घरी पोहोचलो. आजोबा, आजी, मामा, मामी स्वागताला तयार होतेच. माझ्या आणि भावाच्या चेहऱ्यावर प्रचंड कुतूहल! समोर कापडाखाली काहीतरी झाकून ठेवले होते. आम्ही सगळे त्याच्या शेजारी कोंडाळे करून बसलो. त्यातून निघालेली एक वायर भिंतीवरच्या लाकडी बॉक्सवर बसवलेल्या काळ्या रंगाच्या प्लगमध्ये अडकवलेली होती. आजोबांनी त्या प्लगच्या बाजूचं मोठ्ठ काळ बटण सुरू केलं आणि ते आमच्यात येऊन बसले. मामाने हळूच त्या गोष्टीवरच कापड बाजूला केलं. त्याखाली रेडिओ सारख पण त्याहून आकर्षक दिसणार काहीतरी होत. मामा म्हणाला माझ्या हातावर लक्ष ठेव. मी हाताने इशारा केला की शाळेतील एक कविता मोठ्या आवाजात म्हण. मी प्रचंड उत्सुकतेने तयार झालो. मामाने त्या रेडिओच्या वर असलेली दोन बटणे एकत्र दाबली. त्यातील एकावर लाल टिकली होती. मी कविता म्हणालो. बाकी सर्व चिडीचूप बसले होते. मग भावाने कविता म्हटली. मामा म्हणाला आता मजा बघा. मामाने एक बटण दाबल. काहीतरी सर्रर्रर्र आवाज झाला. मामाने परत एक बटण दाबल आणि त्या रेडिओ मधून चक्क मी कविता म्हणू लागलो. माझ्यानंतर भाऊ कविता म्हणू लागला! आम्ही दोघे आश्चर्य आणि आनंदाने वेडे झालो. आश्चर्याचा भर ओसरल्यावर हळूच त्या रेडिओला हात लावला. मामा म्हणाला हा नॅशनल पॅनासोनिक कंपनीचा टू इन वन. ह्यात रेडिओ पण लागतो आणि कॅसेट पण. वरून आवाज रेकॉर्ड करता येतो. त्याने आमच्या कविता रेकॉर्ड केलेली कॅसेट आम्हाला बाहेर काढून दाखवली. सोनी कंपनीची ती लाल कॅसेट आम्ही आयुष्यात पहिल्यांदा बघत होतो. ती ठेवायचं कचकड्याच कव्हर तेव्हा खूप आवडलं होत. मग बराच वेळ आम्ही लांब उभं राहून, जवळ बसून, ओरडून, हळू बोलून गाणी, कविता आणि काहीतरी संवाद रेकॉर्ड करत होतो. मग सर्व रेकॉर्डिंग ऐकलं. खूप विस्मयजनक अनुभव होता तो.

नंतर मामाच्या घरी मस्त जेऊन आम्ही निघालो. परत तीच बस, आम्ही वरच्या मजल्यावर पहिल्या सीटवर. मस्त वारा येत होता. मला आणि भावाला डुलकी लागली. आम्ही आईबाबांच्या खांद्याला धरून झोपी गेलो होतो. मनात कुठेतरी तो टू इन वन दिसत आणि वाजत होता! खूप छान दिवस होते ते. लहान लहान गोष्टीत खूप मोठा आनंद मिळत असे तेव्हा!!!©मंदार जोग

Image by AndressaRodrigues from Pixabay 

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

4 thoughts on “टू इन वन…

  • August 9, 2019 at 10:31 am
    Permalink

    खरच छान दिवस असतात लहानपणी चे 👍

    Reply
  • August 9, 2019 at 8:54 pm
    Permalink

    वाह! माझ्या मामाकडेच पहिल्यांदा अनुभवलेल्या headphone नामक जादूई अनुभवाची आठवण झाली! 😊

    Reply
    • November 27, 2019 at 1:50 pm
      Permalink

      Wah Masta. Old good days. Lahan lahan goshtit kiti ananda milalya cha tenvha. Tyachi aathavan Karun dilya baddal dhanyavad

      Reply
  • August 10, 2019 at 5:49 am
    Permalink

    Golden memories 👌👌👌👌

    Reply

Leave a Reply to dattatrayabobade Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!