स्टोरी…..

“स्टोरी”
“कॅमेरामन अश्पाक के साथ, मै अनिलकुमार  त्रिवेदी…..”
सवय झाली आता.
गेली दहा वर्षे.
मुंगूस झालंय माझं.
कुठं काही ‘ब्रेकींग’चा नुस्ता वास आला की ,
सूँगते हुवे हम हाजीर हो जाते थे…
इथं मात्र  सगळंच हार्टब्रेकींग आहे.
आमची टीम इथं कशी पोचली , पूछो मत..
बाॅस म्हणाला , ” केरला कव्हर  करना है …”
बस आलो.
कसं जायचं ?
कुठं रहायचं ?
काय खायचं ?
असले प्रश्न विचारायचे नसतात…
कव्हरेज हवं.
बस…
त्यात पुन्हा  काहीतरी “हॅपनींग स्टोरी” हवी.
खरा पूर तिकडेच आलाय.
दिल्लीत.
टी. आर. पी. च्या पाण्यात,
एकमेकांना  बुडवायला निघाले आहेत सगळे.
‘दूनिया डूब मरे तो मरे..’
आपल्याला न्यूज मिळायला हवी.
जाताना बाॅस म्हणाला…
” कोई  हटके स्टोरी कव्हर कर लेना..
ऐसा चान्स  दुबारा नही मिलेगा..”
बुडत्या पाण्यात त्याला ‘ चान्स  ‘ दिसत होता.
त्याला तरी कशाला नावं ठेवू ?
इथं आल्यावर, मी तरी काय करणार आहे ?
काही तरी हॅपनींग शोधायचं…
आपला टी.आर. पी. वाढायला हवा.
बस…
आमची पोटं टी.आर. पी. वरच भरायची.
इथं एर्नाकुलमजवळ आहे.
एका छोट्याश्या गावात..
गाव ?
गाव आता राहिलाय कुठं ?
पाण्यात बुडलाय.
रेस्क्यु टीम हिंडतायेत..
शोधून शोधून  लोकांना गोळा करतायेत.
बोटीत बसवून कॅम्पवर आणतायेत.
लोक तयार नाहीत हो..
घरात जीव अडकलेला.
जीव जायची वेळ आली तरी.
काल तर स्वतः कलेक्टर आला होता.
कसाबसा  बाबापुता करून, गाव रिकामं करतायेत.
बोटीवर आमची टीम.
काल सगळं हेच कव्हरेज.
बाॅस खुष…
खरं सांगू ?
बाॅसच्या नावानं…
अरे इथं जग बुडतंय.
आम्ही  आपली बुडत्या पाण्यावर,
आमची पोळी भाजतोय .
कॅम्पवर एका छोट्या रूमवर आमची सोय.
दहा बारा जणं.
वेगवेगळ्या  चॅनल्सची.
आमचीच बिरादरीवाली.
कॅम्पवर सुमारे चार हजार लोक…
जिंदा लाश..
सर्वस्व हरवलेलं.
शून्यात  नजर हरवून बसलेले.
बायका , पोरं, तरणीताठी ,  म्हातारी ,कोतारी…
मला सहन होईना..
पाठ फिरवून खोलीत आलो.
कधीतरी डोळा  लागला.
सकाळी  तयार झालो.
आज गावातून शेवटची चक्कर.
कुणी अडकलंय का बघायला…
तेवढ्यात मुथ्थू दिसला.
साठीचा म्हातारा.
मोडक्या तोडक्या हिंदीत विनवू लागला.
भोवतालचं सगळं पाणी त्याच्या डोळ्यात जमा झालेलं.
पुरूषाला धड रडताही येत नाही.
” Going back to town ?”
मला स्टोरीचा वास आला.
” साब कुछ करो.
नही तो मेरा पोती मर जायेगा.
कल से कुछ खाया नही..”
त्याच्याशी बोललो.
कसाबसा त्यानं पत्ता सांगितला.
जवळच्या खुणा..
आमची बोटराईड सुरू..
रिकामं गाव.
पाण्यात पाय सोडून बसलेलं.
माणसांच्या भिजल्या आठवणी ऊगाळत.
दिसलं..
मुथ्थूचं घर दिसलं.
मी अश्पाकला इशारा केला.
आम्ही  ऊडी मारली.
फक्त डोकी बाहेर.
बाकी पाण्यात..
दरवाजा ऊघडाच होता.
सगळ्या घरात पाणी.
एका खोलीत परीच चित्र
अर्ध भिजलेलं.
तरंगणारा टेडी बेअर.
खजिना सापडल्याचा आनंद.
कसाबसा तिथं पोचलो.
तो भिजलेला टेडीबेअर घेतला.
कधीतरी त्याचा रंग गुलाबी असावा…
याची आठवण देणारा..
पुन्हा बोटीवर परत.
बरोबरच्या लोकांनी वेड्यात काढलं.
मला घाई झालेली.
गावात कुणी नव्हतंच.
अर्ध्या तासात आम्ही  परत.
मुथ्थू आमच्या वाटेकडे डोळे  लावून बसलेला.
हात ऊंचावून त्याला टेडी दाखवला.
बांध फुटलेला.
मुथ्थू अनावर…
पाण्यात पाय वाजवत कॅम्पवर पळालो.
मुथ्थूला टेडी दिला.
आम्ही  पळत पळत आत.
कॅम्पच्या एका कोपर्यात त्याची नात.
आई आजीशेजारी बसलेली.
कोमेजलेली.
ऊपाशी.
रडण्याचंही त्राण नसलेली.
मुथ्थूने तिला टेडी दाखवला.
जगातला सगळा आनंद, त्या इवल्याशा चेहर्यावर मावेना.
ती थुईथुई नाचू लागली.
तिची आई शहाणी .
एका ताटलीत भात घेवून आली.
तिला भरवू लागली.
आमच्या सगळ्यांची पोटं ,अश्रूंनीच भरली.
दीड दिवसानंतर पहिला घास खाल्लेला पोरीनं…
मुथ्थूनं मला करकच्च मिठी मारली.
” मेरा बेटा.,
इसका बाप कतार में.
त्यानं आणलेला हा टेडी.
मेरे पोतीके साथ हमेशा.
ऊठते, बैठते, जागते, सोते.
ऊसके बिना वो जिंदा ही नही रेह पाती.
टेडी नही वो…
टेडी में बसा हुवा ऊसका बाप है..
ऊसके बिना वो खाना नही खाती.
बहुत समझाया.
नही मानी…
साब आपने बच्ची को बचा लिया…”
अश्पाक पहिल्यापासून सगळं रेकॉर्ड  करत होता.
मला तिथं ऊभं रहावेना..
बाहेर आलो.
अश्पाक म्हणाला,
” सरजी बढिया स्टोरी है..
आॅन एअर आन दो.”
मी नको म्हणलं.
मला भावनांचा व्यापारी व्हायचं नव्हतं…
तेवढ्यात एक जण मला शोधत शोधत आला.
पाठीवर भली मोठी सॅक.
चेहर्यावर काळजीचं मणभर ओझं.
खूप लांबनं आल्यासारखा थकलेला.
माझी ओळख पटल्यावर…
पुन्हा  करकच्च मिठी.
मी ओळखलं.
मुथ्थूचा पोरगा..
माझी स्टोरी संपत आलेली .
तिचा गोड शेवट हार्टच्या मेमरीत स्टोअर केला.
कायमचा..
डिअर जिंदगी.
लव्ह यू….
……कौस्तुभ केळकर नगरवाला.
Image by Gerd Altmann from Pixabay 
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

2 thoughts on “स्टोरी…..

  • August 13, 2019 at 5:30 am
    Permalink

    Zindgi gulzar Hai 👌👌👌👌

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!