भुतं…मनातली- निरंजन काणे

आज सकाळची सूर्याची चमकदार किरणं मला नवी ऊर्जा देत आहेत. त्या उबदार अशा सूर्यप्रकाशात मी न्हाऊन निघालोय. काल पर्यंतच्या भयाण रात्रींनी माझा आत्मविश्वास गडद काळ्या रंगात रंगवलेला. तो आता केशरी रंगात रंगतोय. मन अडकतंय पुन्हा…त्या…तिन्हीसांजेच्या वेळी…

पेइंग गेस्ट म्हणून खोली घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी आजींच्या खोलीची मी बेल वाजवली. आजींनी बऱ्याच वेळाने दरवाजा उघडला, आणि हातात पोह्यांचा डब्बा दिला. आजोबांना पाहून मला धक्काच बसला. आजोबा संपूर्ण उघडे, डोक्यावर टोपी, हातात आरसा आणि बॅटरीचा लाईट एका डोळ्यात मारून आरश्यात एक टक डोळे मोठे करून बघत होते. त्यांची पापणीही हलत नव्हती. कोणी आल्या गेल्याच त्यांना भान नव्हतं. घरात एक विचित्र शांतता होती. “त्यांना काही मदत हवीय का?” मी विचारलं. “नकोय, लागली तर बोलवेन” आजींनी दरवाजा बंद केला. मला आश्चर्य वाटलं. नेमकं काय होतं हे? रात्रभर मी त्याच विषयांत गुरफटून गेलो.

दुसऱ्या दिवशी कामं आटोपून संध्याकाळी घरी आलो. आजींकडून डब्बा घ्यायला दरवाजा वाजवला. पुन्हा दुसरा धक्का बसला. अर्धवट उघडलेल्या त्या दरवाजातुन दिसलेलं आतलं चित्र कालपेक्षा भयावह वाटलं. बंद खिडक्या, पडदे ओढून घेतलेले, खोलीत अंधार. चार रांगांमध्ये खोलीभर मेणबत्त्या पेटवलेल्या, इकडे तिकडे विखुरलेले कागदाचे तुकडे. त्यांच्यावर न समजणाऱ्या आकृत्या लाल रंगात काढलेल्या. एक खेळण्यातली बाहुली खुर्चीवर ऐटीत बसवलेली. आजोबा मेणबत्यांच्या मधोमध बसून मोठ-मोठ्याने किंचाळू लागले. त्यांनी दोन्ही हातात दोरखंड धरलेला, तो छताच्या हुकाला अडकवलेला. त्या दोरखंडाला धरून आजोबा कमरेत वाकत…ताठ होत…परत वाकत…परत ताठ होत. त्यांची मान वर खाली करत. त्यांचे लांब पांढरे केस मानेवरून चेहऱ्यावर आणि चेहऱ्यावरून मानेवर उडवले जात. न थांबता त्यांची ही क्रिया सतत चालूच होती. हळू हळू त्यांच्या ह्या कृतीचा वेग वाढला. त्यांच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट क्रूरता दिसत होती. डोळे लाल झालेले. चेहरा ओढल्यासारखा झालेला. इतक्यात दुरून कुठून तरी कुत्रा विचित्र आवाजात रडू लागला. त्या भयानक वातावरणात ह्या आवाजाने आणखीन भर घातली आणि माझा धीर सुटला. धुपाचा वास आणि धूर घरात पसरला होता. आजी इतक्यात जेवणाचा डबा घेऊन आल्या. काहीही बोलू नकोस असं खुणावत आजींनी डबा हातात देत दरवाजा बंद केला. मला वर जाणं कठीण झालं. जिन्यात जड पावलांनी बराच वेळ घुटमळत राहिलो. काय आहे हे? कोण आहेत ही? कसाबसा वर गेलो. आजींनी दिलेलं जेवण मी उघडूनही पाहू शकलो नाही. रात्र कशीबशी ओसरली, पण मन भीतीच्या अंधारात पार बुडालं.

तो पाहिलेला प्रकार डोक्यात घोळत राहिला. आजोबांचं ते किंचाळणं, विचित्र हावभाव करणं, खिडकीतून बाहेर किंवा आकाशात एकटक बघत राहणं तर कधी मलूल पडून राहणं हे तसंच चालू होतं. मी मनातून पुरता घाबरलो होतो. स्वतःच्याच कोशात राहायला लागलो. लोकांशी बोलणं कमी झालं. घरी सांगणार तरी काय? घरात ही गोष्ट कोणी मानणार तर नाहीच पण माझ्यावरच हसतील त्यामुळे मी त्यांनाही काही सांगू शकलो नाही. आजींना मी नियमित प्रश्न करत राहिलो. पण त्या तोंडातून वाफही जाऊ देत नव्हत्या. आजींचा बंगला व्यस्त शहरापासून एक दीड किलोमिटरच आत होता, बंगल्याच्या आसपास नुकतीच वस्ती वाढत होती. आजींनी जेवणाच्या डब्याची व्यवस्था मला स्वतःला करायला सांगितली. आता फक्त पैसे देण्यासाठी त्यांचा संबंध येणार होता. आजूबाजूला मी डब्यासाठी विचारपूस केली. डबा मला स्वतःला येऊन घेऊन जावा लागेल ह्या अटीवर सोय झाली. माझ्या डोक्यांतील विचारांचं सत्र मात्र तसंच चालू होतं.

या गढूळ मानसिकतेत माझे काही महिने असेच भीत भीत गेले…आणि मी जिथून डबा घ्यायचो त्या काकुंकडून काही पुसटश्या गोष्टी खोदून खोदून विचारल्यावर कळाल्या. काकू बोलू लागल्या, “ती जागाच आता शापित आहे. तो म्हातारा, म्हातारी, त्यांची मुलगी, मुलगा, सून आणि नात अशी लोक रहात होती. साधारण पंधरा वर्षांपूर्वी आजूबाजूला वस्ती नसताना इथे फक्त त्यांचंच घर होतं”.  “म्हणजे?” मी विचारलं. “म्हाताऱ्याने पूर्वी गावातल्या इतरांना फसवून, दादागिरी किंवा करणी करून इतरांच्या जागा हडपल्या होत्या. म्हाताऱ्याची नात बागेत खेळायची, मुलगा चांगला शिकून कामाला जात होता, सून घरातच कसला तरी व्यवसाय करायची. मुलीचं लग्न नव्हतं होत, बाकी म्हाताऱ्याचं सगळं नीट चालू असताना त्याला आणि म्हातारीला जिवंत ठेवत बाकी सगळ्यांना हाल हाल करून मारलं. त्यांच्या कुत्र्याला, त्या मुक्या प्राण्यालाही सोडलं नाही. संध्याकाळी सात-साडेसात वाजल्यापासून ते पहाटे चार पर्यंत मारणं चालू होतं. वाईटासोबत वाईटच व्हावं,पण म्हातारा सोडून शिक्षा त्या निष्पाप जीवांना द्यायला नको होती. तेव्हापासून म्हातारा म्हातारी एकटे आहेत. जगाशी कमीत कमी संपर्कात. कधी त्या घरातून निरनिराळे आवाज येतात, कधी आठवडाभर त्या घरातला दिवाही लागलेला दिसत नाही. तुझ्या अगोदर एक दोन मुली येऊन राहिल्या होत्या. त्या सोडून गेल्या…जगल्या की वाचल्या ठाऊक नाही. तू कसा आलास इथे?” काकूंनी आश्चर्यानं विचारलं. मी…? आजींना माझ्या गाडीचा धक्का लागलेला. जरा खरचटलेलं त्यांना. तेव्हा सावरताना ओळख झाली, तेव्हा इथल्या जागेचं कळालं. मी शांतपणे सांगितलं. काकू भीत भीत म्हणाल्या “सांभाळून बाळा, तिथे काही जणांना म्हाताऱ्याचं मेलेलं कुटुंब दिसतं. म्हातारा तर विचित्र आहेच”. मी स्मितहास्य करत खोलीवर निघून आलो.

महिनाभरापूर्वी तिन्हीसांजेच्या वेळी, सहज घड्याळाकडे नजर गेली. सात वाजलेले. पुस्तक बंद करून मी उठलो. अचानक बाहेरून कुत्र्याच्या रडण्याचा आणि भुंकण्याचा आवाज येऊ लागला. खाली आजोबांचं विचित्र वागणं चालू झालं की काय? मला प्रश्न पडला. आतल्या खोलीचा लाईट बंद होता. तो चालू करावा म्हणून मी त्या खोलीकडे वळलो, आणि एक अस्पष्ट आकृती माझ्या शेजारहून लगबगीने पुढे गेली. आणि अंधारात गुडूप झाली. लांब सडक केस, मान खाली झुकलेली आणि शरीरापासून हात लांब केलेले, अशी ती करड्या रंगातील आकृती डोळ्यांपुढून जात नव्हती. कुठे गेली ती? आतच आहे का? काहीच कळत नव्हतं. कामं आटपून लवकरच झोपायला गेलो. कुत्रं बाहेर ओरडत आणि रडतंच होतं. लाईट रात्रभर चालूच ठेवला. रात्रीच्या शांततेत बेसिनमध्ये थेंब थेंब गळणाऱ्या नळाचा आवाजही अस्वस्थ करणारा होता. जे दिसलं तो भास होता की खरं? ह्या गजबजलेल्या शहरात असं काही असेल? रात्री झोप फार उशिरा लागली. असल्या गोष्टींवर माझा कधीच विश्वास नव्हता, पण मन आता कचरत होतं.

ऑफिस मध्ये बसल्या बसल्या सारखी तीच करडी भयानक आकृती डोळ्या पुढे येई. बऱ्याच वेळेस काम करतानाही कॉम्प्युटर वर तिचे हावभाव दिसू लागायचे आणि मी कॉम्प्युटरहुन नजर हटवून खाली बघे. माणसांनी भरलेल्या ऑफिसमध्ये मी एकटाच असल्याचा भास होई. मागून सतत कोणी हालचाल करतंय असं भर दिवसा पण वाटू लागलं. ऑफिसहून खोलीवर यावसं वाटत नव्हतं. टेबलवरील फाईल्सच्या गराड्यात कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटरवर त्या आकृतीचा भास मला होत होता. घाबरत घाबरत मी कॉम्प्युटरकडे बघत होतो. कामाचा व्याप वाढत चालला होता आणि मी तो आटोपण्यात असमर्थ ठरत होतो…

रात्री उशिरा मी घाबरतच घरी येऊ लागलो, माझा कोणीतरी पाठलाग करतंय असं वाटत होतं. पण मागे वळून बघण्याची हिंमत होत नव्हती. आजींची खोली बंद. त्यांच्या खोलीतून रात्री अपरात्री भांडी आपटण्याचे,  किंचाळण्याचे, रडण्याचे, भांडणांचे आवाज येऊ लागले. माझा दरवाजा कोणीतरी ठोकत होतं. मी घरात एकटा असताना कोणीतरी अजून रहातंय असं वाटू लागलं. माझ्या आजूबाजूला कसल्यातरी हालचाली होत होत्या. माझ्या खोलीकडे येण्याचे जिने कोणीतरी चढतंय असा आवाज येत होता. माझ्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसू लागली होती. कुठलाही उत्साह वाटत नव्हता.

एक दिवस ऑफिसहुन घरी आल्यावर दरवाजा उघडताच अनेक उंदीर भींतींवर, जमिनीवर इकडून-तिकडे धावताना आणि उच्छाद मांडताना दिसले. मी दरवाजा बराच वेळ बंद ठेवला. आणि बाहेर दरवाजाला टेकून बसलो. काही वेळाने दरवाजा उघडताच आंत काही नव्हतंच. समोर घड्याळात पाहिलं, सात नुकतेच वाजले होते. आंत मध्ये शिरताच पहातो तर कान, नाक, डोळे आणि ओठ नसलेली एक व्यक्ती  रक्ताने माखलेल्या अवस्थेत लंगडत लंगडत माझ्या जवळ धीम्या गतीने येत होती. पंजा नसलेले तिचे हात तिनी पुढे केले. एवढ्यात एका मागून एक अशा दोन स्त्रिया आणि एक लहान मुलगीही लंगडत लंगडत बाहेर आल्या. त्यांनाही कान, नाक, डोळे, ओठ आणि हाताचे पंजे नव्हतेच. मला प्रचंड घाम फुटला. बाहेर सोसाट्याचा वारा सुटला होता. खिडकी बाहेर धुळीनी धुरकट दिसत होतं. माझ्या घराचा दरवाजा बंद झालेला. मी मागे मागे सरकू लागलो. नक्की कशामुळे माहीत नाही पण घरातले लाईट बंद-चालू होता होता बंद झाले. त्या लहान मुलीकडून तिच्या कडेला अडकवलेली बाहुली खाली पडली. ती मुलगी विचित्र रडू लागली.मी दोनही कान माझ्या हातांनी बंद केले. कानठळ्या फोडणारा तिचा आवाज थांबता थांबत नव्हता. ते तिघे तिच्या कडे लंगडतच वळाले. मी दरवाजा कडे धूम ठोकली. दरवाजा उघडेच ना. पंजा नसलेल्या हाताने कशीबशी बाहुली पुन्हा कडेवर घेत ती लहान मुलगी, भराभर माझ्या कडे सरसावली. कसातरी दरवाजा उघडला आणि मी निसटलो. धापा टाकत आजींचा दरवाजा वाजवला. समोरुन असाच डोळे नसलेला कुत्रा धावत येत होता. त्याच्या गळ्यातील घंटेचा कर्णककर्ष आवाज असह्य होत होता. तो गेट जवळच थांबला पण त्याचं गुरगुरणं मधेच विव्हळणं आणि भुंकणं मात्र तिथूनही धडकी भरवणारं होतं. कोणीतरी जिन्यातून खाली येतंय असा आवाज येत होता. वरून चेहरा नसलेल्या त्या व्यक्तींपैकी कोणी जिन्यातून येईल काय ह्याची भीती. रात्री आजी दरवाजा उघतील की नाही ह्याची भीती. बाहेर पळायचं तर तो कुत्रा फाडून खाईल की काय ह्याची भीती. मी सगळ्या बाजुंनी पुरता अडकलो होतो. आजींना खूप हाका मारल्या, बऱ्याच वेळानी आजींनी दरवाजा उघडला. आजींनाही घाम फुटलेला, भेदरलेल्या अवस्थेत आजी हुंदके देत रडत होत्या. तरीही त्या नेहमीप्रमाणे खंबीरच होत्या. “अ…आजी ते ब…बाहेर…तुम्हाला काय झालं? मी घाबरत विचारलं आणि आत न विचारताच शिरलो. आतल्या खोलीत आजोबांना पाहताच माझ्या हृदयाची धडधड आणखीन वाढली.

“आजोबांचे लांब पांढरे केस आज चक्क काळे केलेले होते. भुवयांमध्ये लहानशी लाल टिकली, ओठांवर गडद लाल लिपस्टिक लावलेली. मोत्याचे कानातले घातलेले. बागेतल्या सुवासिक फुलांचा गजरा माळलेला. मोरपिशी रंगाचं नक्षीदार पोलकं-परकर घातलेलं. मांडीवर तीच बाहुली ठेवून आतल्या झोपाळ्यावर शृंगार करून आजोबा झुलत होते.” मी अवाक झालो. आधी घडलेलं सगळं विसरायला झालं. आजोबांचे डोळे मधेच मोठे होत, दात ओठ खाऊ लागत. मधेच झुळणं थांबवून बाहुलीला ते मायेने कुरवाळत. पुन्हा झुळणं चालू. “चालता हो भोसडीच्या, निघ…निघ इथून… निघ…” डोळे मोठे करत ते ओरडू लागले. आजी मला खेचत बाहेर काढू लागली. तेवढ्यात आजीच्या घरातली एक काठी त्यावेळी कशीबशी उचलून मी बाहेर पडलो तो गेट मधील कुत्र्याला मारायला आणि तिथून बाहेर पडायला. पण कुत्रा दिसेनासा झाला होता. अंगावर काटा आलेला. मी धापा टाकत टाकत स्टेशन पर्यंत पोहचलो. रात्र स्टेशनवर काढून काकूंकडे आलो. झालेला सगळा प्रकार काकू अवाक होत तोंडावर हात ठेवून ऐकत होत्या. सगळं आवरून काकूंचा मोठा मुलगा मला त्याच्या मावस बहिणीकडे म्हणजे मानसोपचार तज्ञाकडे घेऊन आला.

मनोसोपचार तज्ञाना पाहून मी बेहद्द खुश झालो. “गेली बरीच वर्ष फेसबुकवर तुला खूप शोधलं, दिसली नाहीस” मी म्हटलं. अरे, मी आत्ता वापरायला लागले फेसबुक. मानसोपचार तज्ञ म्हणाल्या.

‘श्रुणोत्तरा काळे- मानसोपचारतज्ञ’ बोलता बोलता मी लगेच फेसबुकवर शोधलं. मनावर मोठा दगड ठेवून म्हटलं “नांव मस्त ठेवलंय तुझ्या नवऱ्यानी, आवडलं मला.”

सासरची श्रुणोत्तरा माझ्या शाळेच्या वर्गातील अनन्या. शाळेत असल्यापासून तिच्याशी बोलायचे अनेक प्रयत्न केले पण अयशस्वी ठरले…आणि आज ह्या हताश अवस्थेत बोलायची वेळ आली. मी भानावर आलो. झाला प्रकार सांगितला. श्रुणोत्तरानी खूप आधार दिला. मला बोलतं केलं. माझ्या मनातून ती भीती जमेल तेव्हढी बाहेर काढली.

मी ही गोष्ट कोणासोबत तरी बोलायला हवी होती.

भूत किंवा त्या संबंधीचे अनुभव म्हणजे एखाद्या गोष्टीचा मनावर प्रचंड प्रभाव पडल्याने भ्यायलेल्या मानसिक अवस्थेत, खरं तर कलात्मक पद्धतीने मेंदूने केलेले भावनांचे वर्णन.” 

अशी ठाम समजूत तिनी मला दोन दिवस वेगवेगळ्या समुपदेशनच्या साधनांनी घालून दिली.

श्रुणोत्तरा सोबत दोन दिवसांनी मी खोलीवर आलो. आजीचं घर उघडंच होतं. आजी पलंगावर निपचित पडल्या होत्या. आजोबा मात्र दिसत नव्हते. मी आणि श्रुणोत्तरा आंत आलो. बाहुली, रंग रंगोटी केलेले कागद, मेणबत्त्या, घडी करून ठेवलेले पोलकं आणि परकर, लिपस्टिक, टिकली, कानातले, आरसा, टोपी आणि बॅटरी सगळं व्यवस्थित ठेवलेलं. घर  नेहमीपेक्षा स्वच्छ होतं. आंत आजोबांच्या फोटोला हार घातलेला होता. ते बघून माझ्या अंगावर काटा आला. “केव्हा?” मी आजीला खुणावलं. आजींना बोलताना त्रास होत होता तरी आजी आज बोलल्या “काल”. आजोबांनी काही दिवसांपूर्वी लिहून ठेवलेल्या कोर्टाच्या एका कागदाकडे आजींनी बोट केलं. मी ते सगळं वाचत होतो. आजींच्या मनातलं वादळ शमत असताना बाहेर जोरात वादळ सुरू झालं, संध्याकाळचे सात वाजत आले. आजी अस्वस्थ झाल्या. श्रुणोत्तराच्या विशेष शैलीत तिनी आजींना बोलतं केलं.

“आमी भुतं न्हाईत. मानसं होत. ल्हान पोर बागेत हुती, वार केलं…पोरगं अडवायला गेलं त्याचं बी हात कापलं. सुनेचं लांब सडक केस तीच बनवलेल्या म्येनबतीनी जाललं. ती रातभर जलून म्येली. माजे पोरीला पावनं बगाला येनार हुती, ती नटून झुल्यावर बसली हुती आरशात डोकं चेचून चेचून तिला बी मारलं. बाप्याला दोराने बांधून सगलं बगाया लावलं. मला सुध नवती, जवा जवा जाग याची माजे डोक्यावर ब्याट्री मारत रहाले. त्या परिस पोरानं सवताला मारून घेतलं. आमच्या काळूला बी न्हाय सोडलं. मी नी बाप्या सोडून सगली म्येली. मारनारं कोन न्हाई म्हाईत. ल्योक बोलतात हिथ आता भुतं हायेत. पन तसं काय नाय, बाप्या भरसटलेला, त्येच कराचा ज्ये शेवट बगीतलं.” आता मला आजोबांच्या वागण्याचा आणि मला झालेल्या भासांचा संदर्भ लागत होता. आजोबा त्यांच्या मुलीप्रमाणे शृंगार करताना आणि नातीप्रमाणे बाहुली खेळवतानाच मी शेवटचे पाहिलेले. आजोबांवर प्रचंड आघात झालेला. तो आघात मी स्वतःच्या मनावर करून घेतलेला. आजींना जोरात धाप लागू लागली. श्वास घेणं जड झालं. काहीतरी बोलायचं होतं पण आवाज निघत नव्हता. सातचे ठोके पडले आणि आजींचा जीव घाबरा घुबरा झाला. आजी दीर्घ श्वास घेऊ लागल्या, उसासे सोडू लागल्या. श्रुणोत्तरानी आजींचा हात हातात घेतलेला. मी आजींच्या डोक्यावरून हात फिरवत होतो. जे शब्द आजी बोलू शकत नव्हत्या ते त्यांच्या अश्रूंतून घळाघळा बाहेर पडू लागले. कुत्र्याच्या रडण्याचे, माणसांच्या कींचाळण्याचे, ओरडण्याचे आवाज न जाणो कुठुन मला एकाच वेळी ऐकू येत होते. इतक्यात आतून परवा दिसलेल्या त्या चेहरा नसलेल्या आकृत्या लंगडत लंगडत जवळ येत होत्या. मी आवंढा गिळला, श्रुणोत्तराला खूण केली. ती ह्या बाबतीत निर्धास्त होती, तिला असलं काही दिसत नव्हतं. आजी जोरात किंचाळल्या, दीर्घ श्वास घेत आजींनी प्राण सोडला. श्रुणोत्तराला माझी अवस्था कळाली. तिनी फक्त मान हलवत मला धीर दिला…मी माझं मन घट्ट केलं आणि पाहतो तर त्या सगळ्या आकृत्या एकामागून एक लुप्त झाल्या. मी डोळे मिटले. बाहेर शांतताच होती, “मनातल्या शांततेवर खरं तर बाहेरची शांतता अवलंबून होती.”

आजीचं अंत्यकर्म विधिवत पार पाडलं. आजोबांच्या मृत्युपत्राप्रमाणे आजोबांच्या सगळ्या वस्तूंची विल्हेवाट लावली. आजोबांचं राहतं घर आणि जमीन शासनाच्या इस्पितळाला दान दिली. त्या कुटुंबाच्या इतर कुठल्याही खुणा तिथे राहू दिल्या नाहीत.

पुढल्या दिवशी, मी माझं सामान घेऊन निघालो. इथून जाताना माझी तब्येत खालावली, ह्यावर्षीचं प्रमोशन गमावलं. श्रुणोत्तरा नावाचं माझ्या आयुष्यात कधीही न उघडलेलं एक पान उघडता उघडता बंद झालं. आजी आजोबांचा भूतकाळ नक्की काय ह्यात मी त्यानंतर शिरलो नाही. पण इथून श्रुणोत्तरानी दिलेली मानसिक ताकत आणि असाह्य वृद्ध दाम्पत्यांची शेवटची ईच्छा पूर्ण करण्याचं पुण्य सोबत घेऊन चाललो होतो. संध्याकाळचे ठीक सात वाजले होते. गेट मधून श्रुणोत्तरा सोबत मी बाहेर पडलो. मागे वळून घराकडे पाहिलं तर काळू गेट जवळ शांतपणे बसून माझ्याकडे बघत होता…

– स्वानि (निरंजन काणे)

Image by Pete Linforth from Pixabay 

3 thoughts on “भुतं…मनातली- निरंजन काणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!