खुन्नस….

जिंदगी एक सफर , है…
खरंच सुहाना सफर.
नवी कोरी गाडी.
शेजारी रसिक बायको.
आणि  दोन वर्षाची त्याची गोडुली.
नवीन गाडीची ही पहिलीच  ट्रीप.
फक्त त्याच्यासाठी…
त्याचं नाव साहिल.
किशोरदा त्याचं आवडतं गाणं गात होते.
बढिया माहौल.
नुकताच पाऊस पडून गेलेला.
गाडीत एसी लावायला त्याला कधीच आवडायचं नाही.
गाडीच्या खिडक्या सताड ऊघड्या ठेवायचा तो.
गाडीत शिरणारं गुदगुली वारं.
त्याच्या बायकोच्या केसांशी धपांडीईष्टाॅप खेळणारं.
भुरूभुरू  ऊडणारे तिचे केस.
खिडकीतून  बाहेरची मज्जा बघणारी त्याची लेक.
नाकपुड्या प्रसन्न करणारा ओल्या मातीचा धुंद वास.
म्हणूनच म्हणलं मी , सुहाना सफर.
कोल्हापूरला निघालेला तो त्रिकोण.
आॅफीसला हाफ डे.
निघता निघता पावणेतीन वाजले.
तरी बरं NH4 आहे.
जाऊ दे जोरात.
नुकताच ब्रेक  झालेला.
विरंगुळात वडापाव हाणलेला.
वर अद्रकवाली मसाला चाय.
साहिल फुल्ली चार्ज्ड.
अॅक्सीलेटरवर ऊभा राहून  गाडी  पिदाडतोय.
सटाक्..
त्यानं सटाक्कन् एका काळीपिवळीला ओव्हरटेक मारला.
पचाक्..
पचाक्कन् काळीपिवळीतनं कुणीतरी त्याच्या गाडीवर थुंकलं.
त्याच्या कुळकुळीत गाडीवर लाल रांगोळी.
त्याची सटकली.
साहिलचा एकच प्राॅब्लेम  होता.
फार लवकर चिडायचा.
साहिलची बायको तर ,
लाडात आली की त्याला चिडका बिब्बा  म्हणायची.
मनातल्या मनात तो चेकायचा.
माझी चूक नाहीये ना..
समोरच्याची चूक आहे ,हे कन्फर्म  झालं की…
याचा दुर्वास व्हायचा.
बाह्या सरसावत फुरफुरू लागायचा.
कसलीच फिकीर नाही.
एकतर सहाफूट तगडा गडी.
जिममधे रोज बादली बादली घाम गाळायचा.
काॅलेजला असताना बाॅडीबिल्डींग केलेलं.
चार माणसांना सहज लोळवू शकला असता…
त्याच्या बायकोला मात्र काळजी वाटायची.
त्याला आवरता आवरता, नाईन कम्स टू हर नोज.
आत्तासुद्धा..
साहिल फुरफुरायला लागलाच होता.
कसाबसा आवरला तिनं त्याला.
सुहान्या सफरीचा विचका नको व्हायला.
हुश्श.
कसाबसा शांत झाला तो.
तेवढ्यात  त्याचा फोन वाजला.
त्यानं गाडी  साईडला घेतली.
येस बाॅस…
आख्खी दहा मिनटं तो बाॅसशी बोलत होता.
काहीतरी कामाचं लचांड.
तिचा मूडच गेला.
कोल्हापूरला पोचल्यावर लॅपटाॅप ऊघडून बसणार तो.
तोही थोडा उखडा उखडा.
चालायचंच.
सफर पुन्हा  शुरू.
च्यामारी…
त्याच्यापुढे तीच काळीपिवळी.
अचानक…
गप्पदिशी थांबली.
कुठलाही स्टाॅप सिग्नल देता.
ड्रायव्हरला गिर्हाईक  दिसलं असणार.
साहिलची गाडी स्पीडमधे.
कशीबशी कंट्रोल  केली.
संपलं.
साहिलचा पेशन्स  संपलेला.
काळीपिवळी पाठोपाठ याची गाडीही थांबली.
बाह्या फोल्ड करत तो खाली ऊतरला.
दार ऊघडून त्या ड्रायव्हरची गचांडी धरली.
त्याला बाहेर खेचला.
आणि  ठाॅक…
साऊंड एनर्जी गेटस् कन्व्हर्टेड इन्टू हीट एनर्जी.
त्याच्या कानाखाली जाळ काढला.
हे सगळं घडलं नॅनोसेकंदमधे.
ड्रायव्हर  कळवळला.
हळूहळू  भानावर आला.
गाडीतलं पब्लिक  सुन्न.
साहिल एकच वाक्य  बोलला.
” यापुढे गाडी थांबवताना स्टाॅप सिग्नल  द्यायचा.
गपकन् थांबवायची नाही.
आता व्यवस्थित  लक्षात राहील तुझ्या .”
रिलीझ आॅफ एक्स्ट्रा एनर्जी  झालेलं.
साहिल लगेच शांत झालेला.
आता ड्रायव्हर  पेटलेला.
संतापानं तो साईडला पचकन् थुंकला.
होता सिंगल पसलीच.
फिर भी…
“फार चरबी चढलीय नव्हं का..??
कराडच्या पुढं जातूस का, ते बगतोय मी.
संगट बाईमाणूस  आहे.
शांतीला धरून र्हावं.
पर न्हाई.
तुला चांगला इंगा दावतो .”
त्यानं फोन काढला.
साहिलच्या गाडीचा नंबर बघून, तिकडे कळवला.
साहिल शांतपणे म्हणाला.
“येऊ देत.
चार पाच काय, दहा बारा येवू देत.
मी घाबरत  नाही  कुणाला.”
साहिल गाडीत बसला.
गाडी सुरू केली.
किशोरदा  पुन्हा गावू लागले.
त्याची बायको  मात्र घाबरीघुबरी.
कराडपाशी काहीतरी होणार.
तिला काळजी वाटू लागली.
लेकीच्या डोक्यावरनं तिनं हलकेच हात फिरवला.
याला काहीच कसं वाटत नाही…?
एकदम दहा बारा चालून आले तर,
हा एकटा काय पुरणार ?
एकदम आठवलं.
सुर्यकांत.
तिच्या दादाचा मित्र.
कराडला वकील आहे.
दादाला फोन करावा काय ?
थोड्या वेळानं करू.
आत्ता केला तर साहिलची पुन्हा  सटकायची.
पीप्पीऽऽप
पुढच्या ट्रकसाठी साहिलनं हाॅर्न वाजवला.
अर्धाच वाजला.
अर्ध्यातूनच हाॅर्न  मेला.
साहिलनं बॅटरी इंडीकेशन बघितलं..
लो…
बॅटरी कींवा अल्टरनेटर..
भुरभुरत गाडी एकदम बंद पडली.
त्याला समजलं.
अल्टरनेटरचा प्राॅब्लेम.
बहुधा ब्रश तुटला असणार.
कशीबशी साहिलनं गाडी साईडला  घेतली.
तो खाली ऊतरला.
कानात सूऽऽसू करणारं वारं घुमू लागलं.
शेजारी सळसळणारा ऊस.
दाटून आलेला अंधार.
शेजारी त्याची ‘वरीड’ बायको.
पोरीची किरकिर .
आणि बंद पडलेली गाडी.
मगाशी नाही. ..
आत्ता मात्र साहिल टरकला.
ऊंब्रज नाहीतर कराड.
आॅटो ईलेक्ट्रीशीयनला गाठावं लागणार.
तिथपर्यंत  गाडी टो करावी लागणार…
तो खाली ऊतरतो.
एक, दोन, पाच, सात , दहा , पंधरा…
सगळ्या गाड्यांना हात करून झाले.
एकही थांबली नाही.
ती काळी ईनोव्हा.
गाडीतली लोकं ‘विरंगुळ्या’त,
साहिलच्या शेजारच्या टेबलावर…
साहिलनंच तर कोल्हापूरहून रत्नागिरीचा रस्ता सांगितलेला.
काळ्या ईनोव्हानं, आत्ता बघून न बघितल्यासारखं केलेलं.
तो हताश.
एवढ्यात..
एक गाडी स्वतःहून थांबते.
ड्रायव्हर  खाली ऊतरतो.
तो साहिलकडे ढुंकून बघत नाही.
” वहिनी तुमी बसा मागच्या गाडीत.”
साहिलची बायको मागच्या गाडीत बसते.
खरं तर गाडी टम्म फुगलेली.
गाडीतली बायामाणसं, साहिलच्या बायकोसाठी जागा करतात.
साहिलची लेक शेजारच्या नऊवारीच्या मांडीवर.
ती म्हातारी त्याच्या लेकीला चांदोबाची गोष्ट सांगू लागते.
पोरीचं रडू थांबलेलं.
ड्रायव्हर वरच्या कॅरीअरवरची रस्सी काढतो.
एक टोक याच्या गाडीला , एक त्याच्या..
त्याची म्हातारी गाडी ,साहिलच्या गाडीचा डबललोड घेते.
हळूहळू  टोईंग करत दोन्ही  गाड्या ऊंब्रजला पोचतात.
ड्रायव्हर  साहिलला नेमक्या गॅरेजपुढे ऊभं करतो.
” सुलेमानभाई , अल्टरनेटर चेक करो..
जल्दी,.
आमचं पाहुणे हाईती.
भाऊजींची गाडी हाई आमच्या.”
साहिल वेडा झालेला.
तोच तो ड्रायव्हर.
त्याच काळ्यापिवळीचा.
खुन्नस  देणारा.
साहिलला रहावतच नाही.
तो पटकन् ड्रायव्हरला  मिठी मारतो.
” माफ करा भाऊ..”
साहिल दिल से बोला.
‘ जाऊ दे राव..
आमचं दाजी असंच भडकत्यात.
सांभाळून  घेतोच की.
तसंच तुमालाबी घेतलं’
हासत हासत ड्रायव्हर  म्हणाला.,
” भाऊजी , सुलेमानभाई  गाडी मस रिपेर करतुय.
कराडची काळजी नगं.
मी आपलं खोटंच फोन लावल्येला.
गिर्हाईकासमोर तुमी हान्लं मला.
काहीतरी खुन्नस  दावायला नगं का मला ?”
साहीलला ही खोटी खोटी “खुन्नस”  फारच आवडली.
तो खराखुरा मनापासून  हसला.
Image by cocoparisienne from Pixabay 
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

8 thoughts on “खुन्नस….

    • February 29, 2020 at 4:39 pm
      Permalink

      मस्त……

      Reply
  • August 14, 2019 at 1:10 pm
    Permalink

    Mast👌👌👌👌

    Reply
  • August 22, 2019 at 6:03 pm
    Permalink

    ☺️☺️☺️☺️

    Reply
  • August 31, 2019 at 11:17 pm
    Permalink

    मी पण घाबरलेली. हॅपी एंड .मस्त.

    Reply
  • September 21, 2019 at 3:23 pm
    Permalink

    Mast kalatani…vatla ata sudkatha hotey ki Kai.. pan nahi.. khup khup chhan.. ase chhan anubhav pan yetat .. yeu shaktat.. hey hallichya print n other media ne accept karun publish karna manavar ghyala pahije

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!