थांग…

गायत्रीने मार्करचं टोपण लावलं आणि स्क्रीनवर ‘Thank you’ झळकवणारं पीपीटी बंद करायला म्हणून ती लॅपटॉपकडे वळली. लेक्चर हॉल पूर्ण रिकामा झाला होता. राहता राहिली एक मुलगी अजून तिथेच घुटमळत होती. गायत्रीला अनुभवावरुन माहीत होतं ती का थांबली असावी.

”येस? एनी मोअर क्वेश्चन्स?” असं तिने खणखणीत आवाजात त्या मुलीला विचारलं. मुलगी घुटमळतच पुढे आली आणि म्हणाली, ”नो मॅम. तुम्ही खूप सुंदर शिकवता. एवढंच सांगायचं होतं. आजचं प्रेझेंटेशन तर जबरदस्त होतं. खूप ऊर्जा देता तुम्ही. इतकंच सांगायला म्हणून थांबले होते.” गायत्रीने हसून तिला थँक्स म्हणलं. या कॉम्प्लीमेंट्स तिच्या ओळखीच्या होत्या. गायत्रीने तिला ‘उद्याचं लेक्चर बुडवू नको’ असं म्हणत हसून दटावलं. विद्यार्थिनी निघून गेली आणि गायत्रीचं विचारचक्र सुरु झालं.

तीन वर्षांपूर्वी काव्या झाली आणि आता पूर्णपणे आपल्या बाळाकडे लक्ष द्यायचं म्हणून कॉर्पोरेटमधली चांगली नोकरी तिने सोडली. काव्याच्या पालनपोषणात ती पूर्ण रमून गेली होती. गायत्री उत्तम प्रोजेक्ट मॅनेजर होती. मैत्रीणींचे, बॉसचे परत ऑफिस जॉइन कर म्हणून फोन येत. पण तिला आता तिच्या प्रायोरिटीज माहीत होत्या. काव्याकडे पूर्ण लक्ष देणे हेच जणू तिच्या आयुष्याचे ध्येय झालं होतं. समीर, तिचा नवरा म्हणायचा सुद्धा, ‘अति गुंतू नकोस काव्यात, पुढेमागे नोकरी करायला लागलीस, की तिला सोडून राहणं कठीण होईल.
पण गायत्रीने ठरवलं होतं, आता फक्त मिशन काव्या. तिच्या बाळलीला, खाणेपिणे, झोपवणे यात दिवस कसा निघून जाई हे ही तिला समजत नसे. काव्या हळूहळू मोठी होत होती. गायत्री तिच्या मोठं होण्याचा आनंद पूर्णपणे अनुभवत होती.

पण कधीतरी काहीतरी सलायचं. काय ते नक्की समजायचं नाही. एखाद्या संध्याकाळी अगदी उदास वाटायचं, काही नको असं वाटायचं. घरात सुखात असलेली, भरपूर मित्रमैत्रिणी असलेल्या गायत्रीला आपल्या आयुष्यात नक्की कमी काय पडत असावं याचा थांग लागत नव्हता. नोकरी मिस करत आहोत का? तर नाही. घरी काव्याचं करण्यात मस्त मजेत वेळ जातोय की’ असा तिचा स्वतःशीच संवाद सुरू असायचा. असेल एखादी फेज” म्हणत तिने ती अस्वस्थता उडवून लावली होती. पण कधीकधी तिला प्रमाणाबाहेर रेस्टलेस वाटायचं. समीरने सुचवलं सुद्धा, एखाद्या कौंसेलरकडे जाऊन ये. उपाय समजेल. दिवसागणिक गायत्रीचाही कौंसेलरकडे जायचा, कोणाकडून तरी मदत घ्यायचा विचार पक्का होऊ लागला.

काही दिवसांपूर्वी तिच्या एक लेक्चरर मैत्रिणीने तिच्या कॉलेजमध्ये मार्केटिंग स्किल्सबद्दल प्रेझेंटेशन करणारी चांगली व्यक्ती हवी आहे असं बोलता बोलता सुचवलं होतं. मैत्रिणीने खूप आग्रह केला, “अग एखाददोन सेशन्स घेऊन तर बघ, छान करशील तू.” काव्या आता आजीकडे तीन चार तास रहाण्याइतकी मोठी झाली होती. गायत्रीने बराच विचार करून शेवटी होकार दिला. तिच्या नेहमीच्या कामाच्या पद्धतीप्रमाणे सेशन्सची व्यवस्थित तयारी केली.

बरेच वर्षांनी ती इतक्या लोकांसमोर उभी राहून काहीतरी बोलणार होती. नाही म्हणलं तरी थोडं टेन्शन होतंच. समीर तिला सोडायला, खरं म्हणजे धीर द्यायला कोलेजपर्यंत आला, काव्याचे बोबडे “आल द बेस्ट आई” गायत्रीच्या कानात घुमत होते. एक मोठा श्वास घेऊन तिने लेक्चर सुरू केलं. आणि जादू झाल्यासारखी गायत्री पुढचे तीन तास बोलत होती. तिची विषयावरची पकड समोर बसलेल्या सर्वांवर प्रचंड प्रभाव पाडत होती. टाळ्यांच्या कडकडाटात सेशन संपलं. गायत्रीची मैत्रीण तिच्या जवळ येऊन तिला मिठीत घेऊन म्हणाली, “सुपर्ब जमलं तुला, बघ मी म्हणत होते, तू जबरदस्त करणार प्रेझेंटेशन. आता सुटका नाही बरं का गायत्री. कॉलेजमध्ये शब्द टाकणार आहे मी, तुला रेग्युलरली असे सेशन्स करायला लावायला हवेत म्हणून!”

इकडे गायत्रीच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू होते. आता इतकं छान, प्रसन्न वाटत होतं तिला! ते वेळीअवेळी येणारं औदासिन्य जणू पळून गेलं होतं. आपल्या आयुष्यात नक्की काय कमी पडत होतं याचा थांग तिला लागला होता. मातृत्व हे बहुतांश स्त्रियांना पूर्णत्वाकडे नेतं हे खरं पण फक्त मातृत्वच प्रत्येक स्त्रीला पूर्ण करेल असं नाही. तिच्या अनेक वेगळ्या गरजा, इच्छा, आकांक्षा असतात ज्या मातृत्वाशिवाय इतर गोष्टींनी पूर्ण होतात. आज गायत्रीला असंच अगदी “पूर्ण” वाटत होतं. तिला अधूनमधून जाणवणारी पोकळी जणू भरून निघाली होती.

बाहेर जाऊन तिने समीरला फोन लावला. फोन उचलताच त्याने विचारलं, “काय मस्त झालं ना सेशन?” गायत्री म्हणाली, “हो एकदम झकास! आणि समीर, ते कौंसेलरकडे वगैरे आता जायची गरज नाही. मला माझा थांग लागला आहे.”

Image by Pexels from Pixabay 

Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

15 thoughts on “थांग…

  • August 16, 2019 at 6:59 am
    Permalink

    खूप छान!Familiar feeling!

    Reply
    • September 1, 2019 at 3:17 am
      Permalink

      काही ठराविक वेळी अशी रिकामी पोकळी होते.तीचा. विचार व्हावा.छान एकदम.

      Reply
  • August 16, 2019 at 10:51 am
    Permalink

    👌👌👍👍

    Reply
    • August 21, 2019 at 10:26 am
      Permalink

      thanks

      Reply
  • August 16, 2019 at 8:06 pm
    Permalink

    Mala hi Kahi tari janavalay hya lekhatun ….thnx dear

    Reply
  • August 18, 2019 at 11:33 pm
    Permalink

    kadhitari asa thang lagane atyant jaruri asate.khup chan.

    Reply
  • August 19, 2019 at 11:21 am
    Permalink

    क्या बात है!!1

    Reply
    • August 29, 2019 at 4:29 am
      Permalink

      Thanks

      Reply
    • August 29, 2019 at 4:29 am
      Permalink

      Thanks

      Reply
  • September 1, 2019 at 3:17 am
    Permalink

    काही ठराविक वेळी अशी रिकामी पोकळी होते.तीचा. विचार व्हावा.छान एकदम.

    Reply
  • September 13, 2019 at 9:52 am
    Permalink

    खुप छान

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!