ऐक ना…
प्रिय राधिका,
मला तुझे नाव खूप आवडते. तू म्हणशील हे सांगण्यासाठी पत्र लिहिले आहेस का? तसे नाहीये. मला लिहायचे खरतर बरच काही आहे. पण जी गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडते तिने सुरुवात करावी म्हणून हे पहिले सांगितले. रागावू नकोस ग.
मला तुझे नाव आवडते कारण कृष्णाची राधा हा त्यातला एक संदर्भ आहे आहे म्हणून, खरतर मी कुणी कृष्ण नाही पण मला त्या दोघांचे एकमेकांवर निरपेक्ष अफाट जीव लावणे फार भावते म्हणून राधा आणि राधिका ही दोन्ही नावे माझी खूप खूप आवडती. मला मान्य आहे की तुझी माझी नुकतीच मैत्री झालेली आहे, त्यामुळे मी असे थेट म्हणल्याने तुला रागच येईल माझा. पण राहवले नाही सांगितल्याशिवाय.
तुला पहिल्यांदा बघितले तेव्हा काही मला दिल मे घंटी बजी वगैरे काही झाले नाही. पण मला तू आवडलीस. तुझ्याशी आपणहून बोलावेसे वाटले. तुझा मनमोकळा स्वभाव आवडला. तुझ्याशी बोलताना हेही उमजले की फार सहज आहे तुझ्याशी मैत्री करणे. फार मोठा दिलासा होता हा मला.
पण नंतर बोलतो आता. काम आहे खूप ऑफिसमध्ये.
धनंजय
चॅटिंगच्या जमान्यात मेल टाकतोय म्हणून आश्चर्य वाटेल तुला. पण हे जुन्या काळातल्या पत्र लिहिण्याच्या बरच जवळ असल्याने मेल टाकावीशी वाटली. शक्य असते तर पत्रच लिहिले असती तुला खूप मी.
प्रिय धनंजय,
हे खूप गोड आहे तुम्ही जे लिहिलेत ते. अजून काय लिहू मी? तुम्ही खूप अबोल आहात त्यामुळे तुमची मेल पाहून मला खूप आश्चर्य वाटले. बाकी माझे नाव इतके छान आहे हे मलापण आजच कळले. खूप कॉमन नाव असल्याने मला खरतर फारसे आवडत नव्हते. आता तुम्ही म्हणालात तसा विचार केल्यावर कळले की ते किती छान आहे ते.
तुम्ही अचानक बंगळुरूला नोकरी घ्याल असे वाटले नव्हते. थोडे दिवस अजून पुण्यात असतात तर चालले असते असे वाटले बातमी ऐकून. तुम्ही माजी विद्यार्थी म्हणून कॉलेजमध्ये आलात, तुम्हाला जावे लागेल हे कळत होते पण वळत नव्हते मला.
आमच्या प्लेसमेंट्स या आठवड्यात आहेत. बघूया कुठे मिळतेय ती. बंगळुरूला मिळाली तर नक्की सांगेन. म्हणजे मग भेटूच. आता तुम्ही पुण्यात कधी येणार आहात? मला सांगा. आपण नक्की भेटूया.
राधिका
मलाही चॅटिंग पेक्षा मेल लिहायला आवडेल तुम्हाला.
प्रिय राधिका,
अरे वा… ऑल द बेस्ट तुला नक्की मस्त जॉब मिळणार कॅम्पस प्लेसमेंट्स मध्ये. बंगळुरूला आलीस तर काही काळजीच करू नकोस. इथे आपल्या कॉलेजचे खूप विद्यार्थी आहेत. इथे काहीच अडचण येणार नाही तुला. आणि मी आहे ना.
धनंजय
तुझी मेल कालच वाचली. अनरेड पण करून ठेवली. पण वेळच होईना रिप्लाय द्यायला. पळतो आता.
प्रिय धनंजय,
मधले काही दिवस खूप पळापळ झाली माझी. तुम्हाला खरतर कळलेच असेल प्लेसमेंट बद्दल. माजी विद्यार्थी नेटवर्क ठेवून असतातच ना. पण मला माहित आहे तुम्हाला माझ्याकडून ऐकायचे असेल. मला मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली आहे. जॉइनिंग मुंबईत आहे. नंतर कुठे पाठवतात माहित नाही. मी खरेतर टॉप लोकेशन बेंगळुरू दिले होते. पण प्रोजेक्ट मुंबईत असल्याने मला मुंबईत जॉईन करावे लागणार आहे.
ऑफर लेटर मिळाल्यावर पहिला फोन तुम्हाला करायचा होता मला. असे वाटले की सगळ्यात आधी तुम्हालाच सांगावे. पण नाही केला. तुम्हाला काय वाटेल असे वाटले. तुम्ही नंतरच्या मेलमध्ये मला इंटरव्ह्यूसाठी खूप मोलाच्या सूचना केल्या होत्या. त्या कामी आल्या. पॅकेज पण मस्त आहे आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरात पोस्टिंग मिळतंय. आता घरी पैसे द्यायला पण जमेल. खूप मोठे टेन्शन उतरलय. ही सेमिस्टर पार पडली की खरं शिक्षण सुरु होईल माझे. घरी तर सगळेच खूप खुश आहेत.
पण अगदी खरं मनातले सांगू?
मला बेंगळुरू पोस्टिंग हवे होते अगदी मनापासून.
राधिका
प्रिय राधिका,
हार्दिक अभिनंदन !!
आज मात्र सगळी कामे बाजूला ठेवून सगळ्यात आधी तुझ्या मेलला उत्तर द्यायला बसलोय. अगं ही तर सुरुवात आहे. आगे आगे देखते चलो… होता है क्या…
आज मी माझ्या टीमला स्पेशल ट्रीट दिली. तुझ्या वतीने, सेलिब्रेशन म्हणून. तू भेटलीस की वसूल करेनच बघ तुझ्याकडून (हा मात्र निव्वळ विनोद आहे हा. नाहीतर म्हणशील मी तुम्हाला पार्टी द्यायला सांगितले होते का किंवा मग भेटणारच नाहीस मला)
पण खरंच मस्त वाटले. आता सांगायला हरकत नाही तू ज्या दिवशी प्लेस झालीस त्याच दिवशी मला पॅकेज सकट डिटेल्स कळल्या होत्या. पण मला तुझ्याकडून ऐकायचे होते. समोरासमोर. फोन होईलच नंतर आपला. पण तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघता आला असता. व्हिडीओ कॉल केला असता की असे म्हणशील तू पण मग तुझे आनंदाचे नाचरे डोळे जवळून कसे बघायला मिळाले असते? भेट होईल तेव्हा बोलूच. असो….
तू जॉईन झालीस मुंबईत की सांग. आता फार दिवस नाहीयेत जॉइनिंगला. मी एखादा वीकएंड मुंबईत येऊन भेटून जाईन तुला. रहायची काय सोय आहे मुंबईत तुझी? डिटेल कळव. म्हणजे काय करता येईल ते बघतो.
धनंजय
प्रिय धनंजय,
खूप खूप सॉरी. मला वेळच नाही मिळाला तुम्हाला लिहायला काही. प्लेसमेंट्स, परीक्षा आणि आता जॉइनिंगच्या गडबडीत रोज इतकी पळापळ होतेय की दिवस मावळतोय कधी हेच कळत नाहीये. नाराज नाही ना झालात? नाराज होऊ नका माझ्यावर प्लीज.
इथे मला खूप छान अपार्टमेंट मिळाली आहे. कंपनीकडून मिळाली आहे. सध्या तरी दुसरी मिळेपर्यंत इथे राहायला सांगितले आहे. पण मी विचार करतेय की थोडे जास्त रेंट असले तरी इथे राहावे. जागा छान आहे. सगळ्या सोयी आहेत. मुख्य म्हणजे स्टेशन पासून पण फार लांब नाहीये आणि सेफ आहे. तुम्हाला खूप आवडेल ही जागा. खिडकीतून सी लिंक दिसतो आणि संध्याकाळी मुंबई झगमगत असते खिडकीत माझ्या. कधी येताय इकडे? मला माहित आहे तुम्ही मुंबईचेच असल्यामुळे तुम्हाला फारसे कौतुक नाहीये पण मला आहे ना आणि सांगितल्याशिवाय राहवले नाही.
तुम्हाला माझ्या हातचे जेवायला आवडेल का? मी स्वयंपाक करते घरी कुठे बाहेर जाण्यापेक्षा. छान जेवण करू आणि मस्त गप्पा मारू.
आणखी एक … तुम्ही मागे फोनवर म्हणालात की मी तुम्हाला अहो जाहो करू नये म्हणून. पण मला नाही जमणार तुम्हाला अरेतुरे करायला.
लवकर या भेटायला.
राधिका
प्रिय राधिका,
तुझ्या घरातून सी लिंक खरंच फार सुंदर दिसतो आणि झगमगती मुंबईसुद्धा. पण खरं सांगू? मी मुंबई बघायला आलो नव्हतो.
मी आलो होतो तुला भेटायला. तुझ्यासाठी फक्त. तुला मी आवडतो का नाही ते मला माहित नाही राधिका. कदाचित नसेनही आवडत तितकासा. कारण तसे काही फार नाहीये माझ्यात आवडण्यासारखे. मला शब्दांमध्ये मांडता येणार नाहीत काही गोष्टी. पण प्रयत्न करतो.
मी तुला कॅम्पसमध्ये बघितले तेव्हाच मला तू खूप आवडलीस. पण तुझ्याभोवती गराडाही खूप असायचा आणि शिवाय मी तिथे काही सांगणे बोलणे उचितही ठरले नसते. तुला बघितले त्या दिवशी माझे शब्दच हरवले. तसेही शब्द माझे मित्र कधीच नव्हते. तुला कधी जाणवलेही नसेल की तू मला खूप आवडतेस ते. आई नाहीये मला राधिका. त्यामुळे मुलींशी कसे वागतात ते मला पटकन कळत नाही. आपल्या हातून कुणाचा अवमान अजाणताही होऊ नये म्हणून मग मी लांबच राहतो. तसेच तुझ्यापासूनही लांब राहायचा प्रयत्न केला खूप. पण तुझ्याशी बोलता येईल असे का कोण जाणे खूप आतून वाटले पण म्हणून बोलता झालो आणि आज हे सगळे बोलतोय.
त्या दिवशी तुझ्या घरी गॅलरीतून सी लिंक दाखवतानाचा तुझा उत्साह, तुझे हसरे आनंदी डोळे आणि तुझे थुईथुई शब्द यातच मी हरवलो. तुला बघावे का तुझ्याशी बोलावे हेच कळत नव्हते मला. तू मी न सांगताही माझा आवडता स्वयंपाक केलास. आतापर्यंत होस्टेलवर जेवत आलोय मी. पार लहानपणापासून. तुझ्या हातचे जेवताना हळूच पाणी आले माझ्या डोळ्यात. ठसका लागल्याचे नाटक करावे लागले मला. तू पटकन पाणी देताना माझ्याकडे रोखून बघितलेस. तुला कळले मला काय म्हणायचे होते ते. मला ठाऊक आहे तुला कळले ते. पटकन नजर फिरवलीस तू. नंतर कितीतरी वेळ तू माझ्याकडे अधूनमधून हळूच बघतही होतीस. मला जाणवत होते ते.
जेवण झाल्यावर आपण गाणी ऐकत होतो. गुलाम अली पासून नवीन हिंदी गाण्यांपर्यंत सगळ्या नव्या जुन्या गाण्यांची उजळणी झाली असेल.राफ्ता राफ्ता वो मेरे हस्ती का सामान हो गाणे तर लूपवर ऐकले त्या दिवशी. किती खरं होते ते माझ्यासाठी. पहले जाँ फिर जानेजाँ फिर जानेजाना हो गये. कसे सांगणार होतो तुला मी ते?
निघताना दारापाशी तू अलगद माझ्या बोटात बोटे गुंफलीस. तुझा श्वास जाणवेल इतकी जवळ होतीस तू माझ्या. तुला जवळ घेतल्यावर माझाही श्वास थांबला एक क्षण. तू मिठीत घेतलेस मला. तुला जवळ ओढून मी फक्त तुझा गंध भरून घेत राहिलो माझ्यामध्ये. तुझ्या खांद्यावर ओठ टेकले आणि तुझ्या अंगावर फुललेल्या काट्यावरून हळुवार बोट फिरवले. तू माझ्याकडे नजर उचलून वर बघायला तयार नव्हतीस. तुझा चेहरा ओंजळीत घेऊन मी तुझ्या कपाळावर ओठ टेकले. तू विरघळलीस. माझ्या मिठीत विसावलीस. राधिका खूप बळ लागले मला तुझ्यापासून लांब जायला त्या दिवशी. जायचे नव्हते मला. तुझ्या मिठीत सकाळ झालेली पाहायची होती. झोपेत तुला जवळ घेतल्यावर तुझे विश्वासाने मला बिलगणे मनात भरून घ्यायचे होते. आणि का कोण जाणे म्हणूनच पटकन निघून गेलो तिथून.
या सगळ्यापेक्षाही खूप बोलायचे होते तुझ्याशी. जे कुणाला सांगितले नाही ते सांगायचे होते. राहूनच गेले हिंमत गोळा करायच्या नादात….
तुला लग्नासाठी मागणी घालायची आहे. तू हो म्हणालीस तर माझे एकटेपण विसरायचे आहे. तू हो म्हणालीस तर तुला खूप सुखात आनंदात ठेवायचे आहे. तुझ्यासाठी सकाळी मला जमेल तसा चहा करायचा आहे. तुझ्याशी भांडायचे पण आहे. रुसायचे आहे. तुझी समजूत काढता काढता डोळ्यात पाणी आणून तुझ्याकडे बघायचे आहे. तुझ्या हातचे जेवायचे आहे. तुझे दुखणे खुपणे, त्रास व्यथा सगळे ऐकायचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुझा उत्तम मित्र व्हायचे आहे जो तुला वेळ पडली तर भले बुरे ऐकवेल पण तुझे वाईट कधीही चिंतणार नाही असा. तुझ्या बाजूने आयुष्यभर ठाम उभा राहील असा मित्र आधी आणि मग पती. चालेल तुला? मला एक फोन करून सांगशील तुला चालणार असेल तर?
तुझाच धनंजय
राधिकाने धनंजयचे पत्र खाली ठेवले. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. त्याची मिठी आठवून तिच्या मनावर मोरपीस फिरले. त्याच्या ओठांचा हळुवार स्पर्श जाणवला. त्यापेक्षाही त्याच्या मिठीतून जाणवलेला आश्वासक आधार तिला कळला होता त्याच दिवशी. त्याचे असे पटकन निघून जाणे तिला पचवता आले नव्हते बराच वेळ. पण न बोलूनही त्याला जे सांगायचे होते ते तेव्हाच तिला उमगले होते.
तिने फोन उचलला
धनंजय
बोल
उत्तर हो आहे. आपल्या घरी या धनंजय. मी वाट बघतेय तुमची.
त्याने डोळे पुसले.
आय लव्ह यू राधिका
Image by Free-Photos from Pixabay
- Kaleidoscope- मुझे तुमसे मुहोब्बत है दिवानगी की हद तक - May 28, 2021
- Kaleidoscope- लव्ह ऍक्चुअली - April 29, 2021
- Kaleidoscope- दिल तो आखिर दिल है ना - April 14, 2021
छानच. कथा डोळ्यासमोर उभी राहीली.
छानच जमलीये कथा
कथा छान लीहीली आहे. व्यक्त करण्याची भाषा फारच छान आहे.
Bhavsparshi
Khupach chan lihita tumhi. Kharach partra lihinyachi aani vachanyachi maja chatting Madhye nahi
खूपच सुंदर
खुपचं छान