आस
अलीकडेच वर्ल्डकप झालेल्या इंग्लंडमधे मॅचेसमधे सतत खोडा घालणारा पाऊस, वारा बघून मला माझी २००७ मधली लंडनवारी आठवली. ऐन नोव्हेंबर म्हणजे थंडीच्या काळात मी दोन्ही मुलांना ब्रह्मेंकडे घेऊन गेले होते. आम्ही लंडनपासून दीडेक तास लांब असलेल्या रेडब्रिज या ठिकाणी रहायचो. साधारण पुणे तळेगाव इतकं अंतर होतं. घर अगदी लहान होतं. एक बेडरूम, एक छोटी हॉलवजा खोली आणि हीटर नसलेलं एक किचन. या किचनमध्ये डिशवॉशर नव्हता. दिवसात किमान सहा वेळा तरी भांडी घासायला लागायची. थंडीने दात वाजायचे, हाताला घट्टे पडायचे पण पर्याय नसायचा. महिनाभरात या सिंकची आणि माझी अगदी घट्ट मैत्री झाली होती.
लंडनमधला पाऊस म्हणजे महाबदमाश. चांगलं ऊन पडलेलं असताना एकदम न सांगता सवरता यायचा आणि एकदा आला की मग नको असलेल्या पाहूण्यासारखा ठाण मांडून बसायचा. बरं तो पाऊस आपल्यासारखा मृद्गन्ध घेऊन आणणारा, गाडीला किक मारून लोणावळ्याला जावंसं वाटणारा, भजी तळाविशी वाटवणाराही नाही. कीरकिऱ्या पोरासारखा रिपरिप पडणारा कंटाळा आणणारा पाऊस. पाऊस आला रे आला की प्रचंड थंडी पडायची. तापमान एकदम खाली यायचं. खिडकीतून दिवसाढवळ्याच्या अंधारात तो पाऊस पडताना पहाताना ‘गड्या आपुला गरम देश बरा’ असं राहूनराहून वाटायचं.
पाऊस नसेल असा दिवस बघून बाहेर पडावं म्हंटल की भयंकर बोचरा वारा असायचा. दोन्ही लहान मुलांना घेऊन मी एकटीने बाहेर पडणं अगदी अशक्य असायचं. यूरोपमध्ये याआधी उन्हाळ्यात राहिले होते. थंडीत रहायचा हा माझा पहिला अनुभव होता त्यामुळे कधीकधी प्रचंड उदास वाटून कंटाळा यायचा. मुलं मजेत घरात खेळत असायची, मी मात्र दिवसभर घरात राहून कंटाळलेली असायचे. थोडं तरी पाय मोकळे करायला एकटीने बाहेर पडावं असं वाटायचं. ही “Me time” मिळवण्याची संधी मला वीकेंडला मिळायची. शुक्रवार, शनिवार वीकेंड घालवायला काही मित्रमंडळी आमच्याकडे यायची. यातली बरीचशी मंडळी सडी (सिंगल) होती. ती आली की खाणीपिणी, गप्पाटप्पा होत. आमचं घर अगदीच छोटं होतं त्यामुळे सामानही फार नसायचं पण ही मंडळी साध्या आमटीभातावरही खुश असायची. अनेकदा हेच लोक किचन हातात घ्यायचे आणि काहीतरी धमाल पदार्थ बनवायचे. फार मजा यायची. विशेष म्हणजे ही सगळी मंडळी रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी सिंकमधली सगळी भांडी घासून टाकत. सकाळी उठल्यावर मला किचन अगदी चकाचक दिसे.
मित्रमंडळी आली, वीकेंड आला की बियरही आलीच. सगळी लांबून, कधीकधी ऑफिस करुन दमून आलेली लोकं. मग बियर आणायला जाणार कोण? मी ताबडतोब हात वर करायचे. कारण मला पाय मोकळे करायचे असायचे आणि मुलांच्या दिवसभराच्या चिवचिवाटातून (तो कितीही गोड असला तरी) थोडीशी सुटका हवी असायची. सॅक पाठीवर घेऊन, गरम कपडे घालून मी निघायचे. घरापासून एक मैलभर अंतरावर एका केरळी दांपत्याचं दुकान होतं. त्यांच्याकडे सर्व जीवनावश्यक सामान मिळायचं. हे दोघ अम्मा आणि अप्पा बरीच वर्ष इंग्लंडमध्ये स्थायिक असणार असा माझा कयास होता. मी एरवी यांच्याकडून घरात लागणारं सामान, दूध, केक, बिस्किटं, योगर्ट, फळं वगैरे घ्यायचे. तेव्हा दोन्ही मुलंही माझ्याबरोबर असायची. आप्पा आणि अम्मा मुलांशी हसत बोलायचे, खेळायचे. यांच्याचकडे बियरही मिळायची.
या अम्मा अप्पांना बहुदा फार आश्चर्य वाटायचं की मी आठवडाभर घरातलं गरजेचं सामान नेते, दोन लहान मुलं सांभाळते पण विकेंडला मात्र मस्तपैकी बियर घेऊन जाते, ते ही अख्खा क्रेट! त्यांना वाटत असावं, आठवडाभराचा स्ट्रेस घालवायला ही मुलगी शनिवार, रविवारी भरपूर दारू पीत असणार!
एका शनिवारी अम्मांनी मला हटकलं, “ऐक मुली, मान्य आहे, दमत असशील, दोन लहान मुलांचा ताण येत असेल पण जरा जपून पीत जा.” मी तिथेच खो खो हसायला लागले. त्यांना समजावून सांगितलं की बियर माझ्यासाठी नाही, इतर लोकांसाठी आहे. स्ट्रेस घालवण्यासाठी मला बियरची नाही, तर बियर घ्यायला येण्यासाठीच्या वॉकची गरज आहे. त्यांना हायसं वाटलेलं दिसलं. त्यानंतर मात्र त्या अत्यंत मार्मिक असं बोलल्या. “आपला देश सोडून कैक वर्ष झाली, इथे कोणालाही तुम्ही काहीही सांगू शकत नाही, प्रेमाने सल्ला देऊ शकत नाही, प्रत्येकजण आपल्या मर्जीचा मालक असतो. तुला पाहिलं आणि हक्कानी बोलावसं वाटलं, रागवावंस वाटलं, तेवढीच आमची “आमच्या” देशात छोटीशी चक्कर मारून झाली. Thanks for taking us to our roots for a little while!”
जगात कोणाला कुठे कश्याची आस लागून राहिली असते काही सांगता येत नाही हेच खरं!
Image by Roman Grac from Pixabay
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
Heyyy khup mast .. ek feri Marin alya sarkh vatal …
Thank you
हेच ते गड्या आपुला देश बरा!!! आवडली कथा.
masst!!!
Gauri khoop chhan lekh! Ajun Tari Laondon waari cha yog ala nahi but most of the Germany trips me “Herbst”/Winter madhe bochrya thandi pavsaat kelya aslyamule totally understand that gloomy, udas feeling.
Thank you Asmita. 🙂
मस्तच
मस्त चं 👌👌 कोणाला कशाची आस असेल सांगता येत नाही …
Thanks
👌👌
हेच ते गड्या आपुला देश बरा!!! आवडली कथा.
धन्यवाद
आवडतात तुमच्या कथा मला.छान लीही ता. लीहीत रहा.मी वाचीत रहाते.