अपेक्षा….

नेहाच्या गृपचा अख्खा व्हॅलेंटाईन्स वीक अगदी नासून गेला होता. तिच्या गृपमधल्या, गेली दोन वर्ष कमिटेड असणाऱ्या मॅक आणि मितालीचं अगदी दोन तारखेलाच ब्रेकअप झालं होतं. गेल्या काही महिन्यांपासून कुरबुरी, खटके सुरू होते, पण प्रकरण ब्रेकअपवर जाईल, असं कुणाला वाटलं नव्हतं. आता दोघे कॉलेजला यायला लागले असले, तरी दोघांचा मूड खराबच होता. सहाजीकच सगळ्या गृपवरच याचं सावट पडलं होतं.
खरंतर नेहा या व्हॅलेंटाईन्स वीकची खूप अपेक्षेने वाट बघत होती. तिची अपेक्षा होती की विवेक या खास दिवसांचा फायदा घेउन, त्याचं मन तिच्यासमोर मोकळं करेल. दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल काहितरी खास आहे, हे मनोमन दोघांनाही माहीत होतं. अजुन कोणी मोकळेपणे ते प्रकट केलं नव्हतं इतकच. आणि त्याला या व्हॅलेंटाईन्स वीकपेक्षा चांगला मुहुर्त कुठला बरं मिळाला असता?
पण मॅक-मितालीच्या ब्रेकअप पासून विवेक खुपच विचित्रच वागत होता. सगळ्यांसमोर नको, पण नेहाला घराजवळ सोडताना, ते दोघे एकटेच असायचे तेव्हा तरी ! पण छे !! गुलाब नाही, चॉकलेट नाही, टेडी नाही की प्रॉमीस नाही. बाकी मिठी किंवा चुंबन तर… त्या नुअसत्या कल्पनेनेही नेहाच्या गालावर गुलाब फुलले होते. पण १३ तारीखही अशीच गेली होती. विवेकचं बोलणंही खुपच कमी आणि तुटक झालं होतं. नेहा त्यामुळे खरंतर जाम अस्वस्थ झाली होती. खूप विचार करून तिने निर्णय घेतला होता. जर व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी विवेकने नाही पुढाकार घेतला, तर ती स्वतः पुढाकार घेउन विवेकला विचारणार होती.
आजच्या खास दिवशी तिने अगदी जय्यत तयारी केली होती. जेट ब्लॅक तंग आखूड स्कर्ट आणी इंग्लिश कलरचा स्लिव्हलेस टॉप घालून, छान तयार होउन ती कॉलेजला आली होती. तिला पहाताच विवेकच्या डोळ्यात अगदी क्षणभर ती खास चमक आली होती, पण लगेच परत तो तसाच तुटक झाला होता. सगळा गृप जमला होता, नेहेमीची धमाल मस्ती सुरू होती, पण जरा हातचं राखूनच, कारण मॅक-मिताली देखील एकमेकांना टाळत गृपमधेच बसले होते.
बोलता बोलता सहज नेहाने विवेकला आजही घरी सोडण्याबद्दल विचारलं. तर नेमकं आजच त्याला परस्पर बाहेर जायचय असं तो म्हणाला. श्यॅऽऽ, म्हणजे सगळ्या गृप समोर त्याला विचारायचं !! तिचा काही धड निर्णय होईना. त्यातच विवेक मधून मधून मितालीकडे चोरट्या नजरेनी पहातोय, असा नेहाला संशय आला. नेहा एक क्षण डळमळली. पण आजचा दिवस तिला हातचा घालवायचा नव्हता. शेवटी धीर एकवटून ती उभी राहीली आणि विवेकला सामोरी गेली. आता विवेक तिला एकटक पहात होता, त्याच्या डोळ्यात एकदम काहितरी चमकलं.
“विवेक, ऐक ना…”
“हे काय घातलं आहेस?” एकदम विवेक हार्श टोन मधे म्हणाला.
“काय? स्कर्ट तर आहे.” नेहा सहज म्हणाली.
“तेच ! इतका घट्ट आणि तोकडा !! मला अजिबात नाही आवडला.” विवेक त्यच स्वरात म्हणाला.
“अरे !! पण असा स्कर्ट  मी कितितरी वेळा घातलाय की आधी.” ती त्याला समजावत म्हणाली.
“पण मी आज सांगतोय ना तुला. मला नाही आवडत ते. यापुढे घालू नकोस असलं काही.”
सगळा गृप आता या दोघांकडेच पहात होता.
“आणि केवढा हा भडक मेकअप केलाय !! आय लायनर काय, मस्कारा काय, आय शॅडो काय ! बटबटीत दिसतय अगदी. थांबव हे. मला नाही चालणार.” विवेक तिरसटपणे म्हणाला आणि नेहा थक्कच झाली. विवेक कधीच अशी टोकाची भुमीका घेत नसे. तो तिला आवडायचं एक मुख्य कारण तेच तर होतं. ती काही बोलूच शकली नाही.
” दुसरी गोष्ट, तू सारखं सारखं त्या सी डिव्हिजनमधल्या विक्रमशी हसून खेळून बोलतेस, त्याच्याशी गप्पा मारतेस, ते मला अजिबात आवडत नाही. काय गरज आहे त्याची? माझ्याशीवाय इतर कुणाही मुलाशी यापुढे काही बोलताना कुणालाही दिसली नाही पाहिजेस तू. दॅट्स फायनल !!” विवेक कर्कश्यपणे म्हणाला. नेहाला अचानक भरून आलं. आतल्या आत मोडकळल्यासारखं वाटलं तिला. आता कुठल्याही क्षणी अश्रू वहायला लागतील अशी अवस्था झाली तिची.
अगदी तेव्हाच विवेकचे डोळे थरथरले. त्याने डोळ्यांनीच तिच्याकडे विनवणी केली. एका दिशेने हलकेच डोळ्यांनी खूण केली. नेहा गोंधळून गेली. मग हलकेच काय चाललं आहे याचा तिला साधारण अंदाज आला. काही क्षण ती गप्प उभी राहिली, समजून घ्यायचा प्रयत्न करत. मग अचानक तिने प्रतिहल्ला चढवला.
“का बरं? तू नाही का त्या STJCच्या मिनिशी लाडेलाडे बोलत असतोस. मलाही नाही चालणार ते. कळलं. मी स्वतःला बांधून घ्यायचं असेल तर, तुझाही पाय अडकलेलाच हवा.” ती उफाळून म्हणाली आणि विवेकच्या चेहेर्‍यावर क्षणभर पुसटसं हास्य उमटून गेलं.
“शिवाय एका दिवसात मला पंचवीस फोन तरी केलेच पाहिजेस तू. पिरियड ! इतक्या वेळा नाही फोन केलेस तर तुझ्या भावना खोट्या आहेत असं समजेन मी. शिवाय आजुबाजुला कोणि का असेना, प्रत्येक फोन संपवताना ’मिस यूऽऽऽ’ ’मिस यूऽऽऽ’चा जप करायलाच हवा समजलं !!” नेहा करवादून म्हणाली. विवेकने कपाळावर आठ्या पाडल्या.
“माझा वाढदिवस, पहिल्या भेटीची, पहिल्या कॉफीची, पहिल्या कॅडबरीची, पहिल्या भांडणाची सुद्धा ऍनिव्हर्सरी लक्षात ठेवायची आणि साजरी करायची जवाबदारी आहे तुझ्यावर समजलं ! तू ती विसरलास आणि मी रुसले तरी गुपचूप तू मनधरणी करायची माझी, कळलं का???” आता कंट्रोल करणं विवेकला कठीण व्ह्यायला लागलं होतं. गृपमधल्या सगळ्यांनाही आता काय चाललय त्याचा अंदाज यायला लागला होता. ते आलटून पालटून दोन्हीकडे पहात होते.
“शिवाय जरा काही चूक झाली, की मी सरळ रडायलाच लागणार. तो माझा हक्कं आहे. मी काही बोलले तर तू चिडायचं नाहीस. तू काही बोललास तर मी मात्र चिडणार आणि वाट्टेल तसं बोलणार. त्याबद्दल तक्रार चालणार नाही. हे लक्षात ठेव.” आता मात्र विवेकला हसणं थांबवता येईना. नेहाने बोलताना मितालीचा टोन अगदी अचूक उचलला होता. सगळ्या गृपला या दोघांनी मांडलेला बनाव, खरंतर मॅक-मितालीसाठी आहे हे लक्षात आलं होतं. हसू दाबत सगळे त्या दोघांकडे पहात होते.
मॅक-मितालीलाही आता काय ते सगळं कळलं होतं. आपापल्या चुकांची, वागण्यातल्या खोड्यांची जाणीव झाली होती. शेवटी मॅक उठून मितालीपुढे उभा राहिला आणि कान पकडून तिला सॉरी म्हणाला. मितालीनेही विरघळून स्वतःची चूक कबूल करून टाकली !! दोघांचं पॅचअप झालं, आणि गृपमधे एकच जल्लोश झाला. गृपवरचं सावट पार विरून गेलं.
या सगळ्या गदारोळात विवेक हलकेच नेहाच्या कानात पुटपुटला, “आपल्याला एकमेकांसोबत कसं वागायचं नाही याची रंगीत तालीम करून झाली आपली. आता कसं वागायचं याची सोबत प्रॅक्टीस करायची का?” नेहाने लाजून मान डोलावली.
फारसं काही न बोलता, दोघांचा व्हॅलेंटाईन्स डे हऍप्पी झाला !!!!!
Image by Free-Photos from Pixabay 

4 thoughts on “अपेक्षा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!