उदरभरण
लहानपणी चांदोबा हे माझ्या लाडक्या मासिकांपैकी एक होतं, अजूनही आवडतं. यात एक गोष्ट वाचली होती. चंद्रिका नावाची एक बाई आणि तिचा नवरा असं जोडपं असतं. त्यांना मुलबाळ नसतं, दोघेच घरात राहत असतात. या चंद्रिकेला सतत भूक लागत असते. नवरा कामाला गेला की दिवसभर तिला काहीतरी खावसं वाटत असतं. ती आपली अडचण शेजारणीला सांगते. शेजारीण तिला सांगते, कोणाला तरी विचारून खात जा, मग पाप लागत नाही. चंद्रिका शक्कल लढवते. ती घरातल्या दारालाच विचारते, “दारा, दारा, मला भूक लागली आहे. काही खाऊ का?” आणि मग स्वतःच दाराचा आवाज काढून उत्तर देत असते, “हो sss खा की बिनधास्त लाडू, पेढे!” इथे तिचा गिल्ट मरत असतो आणि मग ही चंद्रिका भरपूर खातपीत असते. बायको दिवसेंदिवस वजनदार होत चालली आहे हे नवऱ्याच्या लक्षात येतं. तो एक दिवस दारामागे लपून बसतो. चंद्रिका जेव्हा दाराला विचारते, “दारा, दारा, आज काय खाऊ?” तेव्हा नवराच दाराचा आवाज काढून म्हणतो, “आज तू मार खा!” आणि चक्क तिला फटके देतो. चंद्रिकेला आपली चूक समजते, ती नवऱ्याची माफी मागते, नवरा तिला “खोटं बोलून खाऊ नकोस” वगैरे ची शिकवण देतो आणि गोष्टीचा शेवट गोड होतो.
मुळात चंद्रिकेला खाताना अपराधी का वाटत असावं हा विचार सतत माझ्या मनात येतो. चांदोबामध्ये तेव्हा अश्या पुरुषप्रधान संस्कृती उचलून धरणाऱ्या अनेक कहाण्या असायच्या. तेव्हा समजायचं नाही, पण आता एकेक अर्थ उलगडत जातात. या अश्या कथा करतात काय, तर बायकांच्या डोक्याचं कंडीशनिंग, की कोणाला न विचारता खाऊ नये, नवऱ्याला सोडून खाल्ल्यास पाप लागतं वगैरे. खरंतर स्त्री काय, पुरुष काय, दोघांनाही एक शरीर दिलेलं गेलं आहे, त्याचं पालनपोषण करायचं असेल, ते चांगलं राखायचं असेल तर अन्न हे दोन्हींना कमीजास्त प्रमाणात लागतंच. पण खाण्याचे सारासार नियम मात्र बायकांसाठी असतात! पुरूषांच्या आधी जेवू नये, मुलाबाळांचं झाल्यावर बसावं, आहे ते गोड मानून खावं, उरलंसुरलं संपवावं, शीळं टाकून देण्यापेक्षा स्वतः स्वाहा करावं, असे एक ना हजार नियम स्त्रियांना लागू असतात , नव्हे अनेकदा त्या स्वतःवर लादून घेतात.
आजही मी अनेक ग्रुप्समध्ये रेसिपीजच्या पोस्ट्सवर बायकांनी लिहिलेलं पहाते, कटलेट इतके छान झाले होते, इतके छान झाले होते, की नवरोबा आणि लेकीने सगळे गट्टम केले. मला काही उरलेच नाहीत. अमुक डिश इतकी चविष्ट झाली होती की मी खायच्या आधीच फन्ना उडाला! तुम्ही बनवलेला एखादा चटकदार पदार्थ तुमच्या नकळत संपतो, तुम्हाला चाखायला सुद्धा मिळत नाही, हे वाईट नाही काय?
मान्य, जेव्हा घरदार, कुटुंब जेवतं, तेव्हा घरातल्या अन्नपूर्णेची अर्धी भूक तिथेच भागलेली असती. जेऊ घालण्यात, करून रांधण्यात अनेक स्त्रियांना आनंद मिळतो, पण हे उदात्तीकरण करण्याआधी स्वतःच्या पोटाची भूक पण तपासू नाही काय? चांगल्याचुंगल्या पदार्थांवर आपला हक्क नाही काय? घरातली बाई ही घराचा एक महत्वाचा सदस्य आहे याकडे घरातल्या सर्वांनी, विशेषतः पुरुषांनी लक्ष दिले पाहिजे हे महत्वाचे. जगाची भूक मिटवून आणि स्वतःची मारून, कोणीही संतपदाला पोचत नाही. त्याग हा सर्वोत्तम गुणांपैकी एक आहेच, पण म्हणून तो सतत स्वतःवर लादून घ्यावा असं नाही. आपण बनवलेला पदार्थ, किंवा कोणताही पदार्थ मनसोक्त खाणे ही काही चोरी नाही.
एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवूया, चांगलं खाल तर चांगलं खिलवाल !
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
चांदोबाच्या अगणित आठवणी!!!
ही गोष्ट तर विशेषच जवळची कारण माझ्या लग्नानंतर माझा भाऊ साधारण स्वैपाकाच्या वेळेला फोन करायचा, आज काय केलयं? मी काहीही सांगितलं तरी ठरलेलं असायचं…नवरा शेतात गेल्यावर लाडू, शिरा बनवून खातेस ना,😀 खूप हसायचो.
असंही बघितलंय कि घरातील सगळ्यांंच्या आवडी निवडी सांभाळताना बायका स्वत:ला आवडणारे पदार्थ कुठे एकटीसाठीच करायचे म्हणून बनवतच नाहीत . कदाचित गोष्टीतली बाई असेच पदार्थ बनवून खात असेल.
मला वाटलं नव्हत हि गोष्ट कोणाला लक्षात असेल. 🙂 Thanks
गोष्ट काय,चित्रसुद्धा लक्षात आहे!
Khar aahe .. aani jar akhadya bai ne asa kel ki saglyanchya aadhi khalla ki mag sampalch … tila bakichya bayka kashya sansarala yogya aahet aani tu kashi ayogya aahe asa varanvar sangital jat … aani maz asa mat aahe ki baykanna khayala aawadat saglyanchya aadhi ..pan being good cha pressure tyanna tasa karu det nahi
👌