मालकीणबाई…..

ये शहर अपना कब लगने लगता है ?
जब शहर में अपना घर होता है !
सही बात…
आता पुणं , आपलं पुणं वाटायला लागलंय.
माझ्या नावापुढे , माझा अॅड्रेस आलाय.
ये तेरा घर,ये मेरा घर..
मी प्रचंड खूष.
आॅफ कोर्स विनय सुद्धा.
खरं तर हे रो हाऊस , आमच्यासाठी लाँग लाँग जंप.
जीव खावून ऊडी मारलेली.
होतं नव्हतं ते सब , दाँव पें लगा था.
आता बॅलन्स झीरो.
पुढची दोन तीन वर्ष सुमडीत, कडकीत काढायची.
जी लेंगे…
आर्यची सेपरेट रूम.
आईबाबा गावाहून आले तर, त्यांची सेपरेट बेडरूम.
आमची बेडरूम.
किचन ,डायनिंग ,हाॅल.
आमच्या ब्रूनोसाठी मोठ्ठा व्हरांडा.
सगळं ऐसपैस.
मनभावन.
मोजकीच लोकं.
नवीन घराच्या आनंदात, दिलसे शरीक होणारी.
माझे आणि विनयचे आईबाबा.
बस एवढेच…
वास्तुशांत दणक्यात.
चारच दिवस झाले होते ,आम्हाला ईथं येवून.
आधीचा माझा ऊत्साह पार आटून गेलाय.
ब्रूनोही प्रचंड अस्वस्थ.
घरभर सतत येरझार्या.
आढ्याकडं बघत ऊगाचच भुंकणं.
काल रात्री तर ,रडतोय असं वाटणारं बेसूर रडगाणं.
नव्या घराचा करकरीत वास, मला जाणवतच नाहीये.
काही तरी कुबट , जळकट , पंक्चर करणारं.
चालत्या गाडीला खिळ लावणारं.
एक एक क्षण जाताना, ‘मी चाललोय…’ असं सांगून जात होता.
जीवावर आल्यासारखे ,घड्याळाचे काटे फिरत होते.
हे सगळं मलाच , सिर्फ मै फील कर रही थी.
बहुतेक ब्रूनोसुद्धा.
बाकी सगळे खूष.
मी आरशापुढे.
ड्रेसिंग टेबलचा आरसा लक्कन हालला.
बेसावध हाताच्या बोटाला, सुई टोचावी तसं.
झिनझिनाट डायरेक्ट मेंदूपर्यंत.
बेडरूमच्या कलत्या दारामागून हळूच डोकवणारी ती.
हिरवी नववारी साडी.
भलंमोठं कुंकू.
घाबरट चेहरा.
मला आरशात स्पष्ट दिसलं.
मी झटकन् मागे वळून बघितलं.
गायब..
मी साडेसात रिश्टरचा धक्का बसल्यासारखी हादरले.
भास…
मला वाटलं भास झाला असेल.
रात्री आमटी करायला, गॅसचा बर्नर आॅन केला.
निळ्यापिवळ्या फ्लेममधे ती दिसली.
जळताना…
तीच होती ती.
हिरवी साडी , मोठ्ठं कुंकू.
तिच्या चेहर्यावर प्रचंड वेदना.
किंकाळ्या मूकेपणाने माझ्यापर्यंत पोचणार्या.
क्षणभरच.
अचानक गॅस संपला.
पुन्हा भास….
मी मटकन् खालीच बसले.
नंतरच्या दोन दिवसात पाच सहा वेळा दिसली.
माझ्याच घरात.
वेगवेगळ्या ठिकाणी.
हेल्प मी .., अशी आर्जव करणारी.
नंतर नंतर मी जरा सावरले.
तिनं कधी घाबरवलं नाही मला.
पण…
ती दिसली की मी प्रचंड अस्वस्थ व्हायचे.
वाटायचं , आपण एखाद्या खोल विहरीत बुडतोय.
खोल अंधार.
ती फक्त मलाच दिसायची.
बाकी कुणाला नाही.
घाबरलेली मी , आताशा चिडायचे.
माझ्याच बाबतीत असं का व्हावं ?
मी काय कुणाचं वाईट केलंय ?
माझं नवं घर…
नवं घर क्षणार्धात झपाटलेलं झालं.
वाटायचं ,निघून जावं ईथनं.
क्षणभरच…
ती नाही मी पेटून ऊठले.
प्रामाणिक कष्टानं ऊभारलेलं माझं घर.
मी का सोडून जायचं ?
तीच निघून जाईल ईथनं कायमची.
विनयला घेवून बिल्डरला गाठला.
खोदून खोदून विचारलं.
काय झालं होतं या वास्तूत ?
मी तर मालकाकडनं, वाडाच विकत घेतलेला.
एकच भाडेकरू.
एक म्हातारी.
तिचा शाळेतला नातू.
तिनं जाळून घेतलं स्वतःला.
नातू शाळेत गेला होता, म्हणून वाचला.
लिंक लागली.
घरी आले.
आजूबाजूला चौकशी केली.
दबक्या आवाजात ऐकायला मिळालं.
जागा सोडून ती कुठं जाणार ?
मालकानीच जाळून मारली तिला.
तिच्या नातवाला शोधून काढला.
बारावीपर्यंत शिकलेला पोर.
कसाबसा दिवस काढत होता.
विनयच्या आॅफिसमधे लावून घेतला.
त्याच्या पार्ट टाईम शिक्षणाची सोय केली.
म्हातारीचा फोटो मिळवला.
फ्रेम केला
त्याला हार घातला.
ऊदबत्ती लावली.
मनापासून प्रार्थना केली.
“बयो , तुझ्यावर अन्याय झाला.
आय अॅग्री.
पण माझी काय चूक ?
मला का शिक्षा देतेस ?.
माझ्यापरीनं होईल तेवढं नक्की करीन.
तुझ्या नातवाची काळजी करू नकोस.
मी लक्ष ठेवीन त्याच्याकडे.
तू बेफीकीर जा पुढच्या प्रवासाला.
आशीर्वाद हवे आहेत तुझे आम्हाला.”
मी डोळे ऊघडले.
ऊदबत्ती केव्हाच संपलेली.
कुठल्यातरी अलोट आनंदाचा वास, घरभर पसरून राहिलेला.
सगळं घर प्रसन्न.
मला नवेपणाचा वास आत्ता यायला लागला.
ती निघून गेलेली.
पुन्हा कधीच दिसली नाही.
दहा वर्ष झाली.
तिच्या आशीर्वादाने , ते घर आम्हाला छान लाभलंय.
सगळं सुख मिळतंय.
येणारे जाणारे हाॅलमधला तिचा फोटो पाहून विचारतात .
“या कोण ?…”
मी हसते.
जवाब मिलता है …
या घराच्या मालकीणबाई..
कृपा राहू द्यात.
Image by Free-Photos from Pixabay 
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

9 thoughts on “मालकीणबाई…..

    • August 31, 2019 at 7:58 am
      Permalink

      Class 👌👌

      Reply
  • August 30, 2019 at 11:09 am
    Permalink

    छान लिहिलंय

    Reply
  • September 13, 2019 at 2:11 pm
    Permalink

    क्या बात

    Reply
  • September 16, 2019 at 10:55 am
    Permalink

    मस्तच!!

    Reply
  • September 21, 2019 at 3:13 pm
    Permalink

    Apratim…. prashnach Uttar pan chhanch… nahitar nivval bhaykathach astat..surekh

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!