वर्तुळ…

महादेवरावांनी उमाताईंच्या हार घातलेल्या  हसऱ्या फोटोकडे बघून एक उसासा टाकला आणि एकवार पुन्हा हातातल्या त्या चांदीच्या जड नाण्याकडे पाहिले. आता कसला गणपती आणि कसला त्याचा उत्सव! त्यांची अर्धांगिनी अर्ध्या वाटेवर त्यांना सोडून गेली, जाताना त्यांचा जगण्यातला आनंदच जणू स्वतःबरोबर घेऊन गेली. उमाची, त्यांच्या बायकोची गणपतीवर अमाप श्रद्धा होती. दरवर्षी त्याचा उत्सव साजरा करायचा, त्याचे लाडकोड पुरवायचा वसाच जणू त्यांनी घेतला होता. महादेवराव फारसे देवभक्त नसले तरी तिच्या आनंदात आपलं सुख मानून उत्सवासाठी स्वतः झटायचे.
मूलबाळाचं सुख त्यांच्या नशिबात नव्हतं, त्यामुळे उमाताईंनी आणि पर्यायांनी महादेवरावांनी आपलं सर्वस्व त्यांच्या गणपतीच्या सेवेत लावलं होतं. उमाताईंनी हौशीने गणपतीसाठी सर्व चांदीचे दागिने करून घेतले होते. चांदीचं ताट, वाटी, दुर्वा, जास्वंदीचं फुल अगदी सर्व काही. या सगळ्या ऐवजाबरोबर एक छोटासा चांदीचा मोदकही उमाताईंनी खास बनवून घेतला होता. सुरेख, सुबक नक्षी असलेला कळीदार मोदक होता तो. एक वेगळंच तेज यायचं त्यांच्या चेहऱ्यावर गणपतीच्या हातात तो मोदक ठेवला की. महादेवरावांनी हे अनेकदा पाहिलं होतं. ते स्वतः फारसे आस्तिक नसल्याने त्यांना त्यामागची भावना समजत नसे आणि पण उमाताईंच्या श्रद्धेचा ते मान राखत.
अश्या या उमाताई आयुष्याच्या वाटेवर काही न सांगता सवरता अचानक महादेवरावांना एकटं सोडून गेल्या. महादेवरावांना आता जगण्यात फारसा रस उरला नाही. पण म्हणून तो वर बसलेला लागलीच प्रसन्न होऊन त्यांना उमाताईंकडे घेऊन जाईल अशीही शाश्वती नाही. एक उसासा टाकून महादेवरावांनी घराची आवरासावर सुरू केली. अगदी थोडंथोडक स्वतःसाठी ठेऊन बरंचसं सामानसुमान देऊन टाकायचं ठरवलं, वाटून टाकायचं ठरवलं. प्रश्न आला सोन्याचांदीच्या वस्तूंचा. घरच्या वस्तू घरातच राहाव्यात म्हणून एकुलता एक पुतण्या होत्या त्याला द्यायच्या ठरवल्या, काही दानधर्म करायच्या ठरवल्या. उमाताईंचा आवडता मोदक मात्र त्यांनी कोणाला दिला नाही. त्यांची एकच आठवण होती ती.
महादेवराव एकेक वस्तू जसे कपाटातून काढू लागले, तसतसे उमाताईंच्या आठवणीने त्यांच्या घश्यात कढ दाटून येऊ लागले. कपाटातल्या आतल्या खणात त्यांना तो चांदीचा मोदक दिसला आणि मनात अनेक आठवणींचा फेर धरला गेला. त्यांनी मनाशी कसलातरी निश्चय केला आणि ते बाहेर पडले.
******
शिवा झपझप पावलं टाकत मंदिराकडे चालत होता. आज तसा उशीरच झाला होता त्याला. अजून झाडझूड करायची होती, हार करायचे होते, मंदिराभोवती पाणी शिंपायचं होतं. हे सगळं करून मग नोकरीवर जायचं, हा त्याचा रोजचा शिरस्ता ठरलेला होता. नोकरी साधीशीच होती, त्याला आणि त्याच्या बायकोला, पारूला सुबत्तेत ठेवेल इतकी चांगली म्हणायची.
थोडंस गावाबाहेर असलेलं गणपतीचं मंदिर म्हणजे शिवाचं दुसरं घरच जणू! या मंदिराच्या आवारातच तो खेळला, मोठा झाला आणि बघता बघता देवाचा होऊन गेला. तिथली गणेशाची मूर्ती जणू शिवाशी बोलायची. मूर्ती अतिशय सुंदर होती, सुरेख महिरपी कान, पाणीदार डोळे आणि चेहऱ्यावर अगदी लहान मुलासारखा गोडवा. कसले लागेबांधे होते माहीत नाही पण शिवा तासनतास या बाप्पाच्या सेवेत रमून जाई. गावातसुद्धा सगळेजण म्हणत, शिवासारखा गणेशभक्त सापडायचा नाही. त्या मंदिराला देखील गणपतीचं मंदीर न म्हणता “शिवाचं मंदिर” असंच सगळे ओळखत.
गणेशोत्सव आला की शिवाच्या उत्साहाला उधाण येत असे. गावातून वर्गणी जमा करणे, मंदिर सजवणे, वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन, पूजेची तयारी, रोजचा प्रसाद अशी त्याची धांदल सुरू होत असे. या मंदिरात एक छोटीशी दानपेटी सुद्धा होती. दरवर्षी गणपती उत्सवाच्या आधी शिवाने ही दानपेटी गावातल्या आठदहा लोकांसमोर उघडणे हा एक कार्यक्रमच होता. छोटंसं गाव होतं त्यांचं, असे कितीसे पैसे जमणार त्यातून? पण कमाल व्हायची. उत्सवाची उरलीसुरली गरज दरवर्षी या दानपेटीतल्या पैश्यातून बरोबर भागायची.
गेले कित्येक दिवस शिवाच्या मनात मात्र राहूनराहून एक इच्छा येत होती. उत्सवात आपल्या गणोबाला संपूर्ण सजलेला बघणे ही शिवाची मनोकामना होती. तसं त्याच्या गणपतीला काही कमी नव्हतं. पण शिवाला या वर्षी एक वस्तू अगदी आवर्जून त्या गणेशाकरता हवीशी वाटत होती. शहरात त्याने अनेक ठिकाणी ती पाहिली होती. एकदा ती घेतली की त्याचा गणपती उठून दिसणार होता. असं असलं तरी ती वस्तू त्याला काही केल्या परवडणारी नव्हती, हे ही त्याला माहित होतं. देवाकडे स्वतःसाठी कधीही काहीही न मागणारा शिवा आज देवाकडे, त्या देवासाठीच काहीतरी मागत होता.
रीतीप्रमाणे आज मंदिरात रात्री उशिरा, दानपेटी उघडण्याचा कार्यक्रम होता. शिवाने देवळातल्या चावीने ते छोटंसं कुलूप उघडलं. जमलेल्या नोटा, नाणी बाहेर काढली. कुणी जुन्या, जीर्ण, फाटक्या आता चालत नसलेल्या नोटा टाकल्या होत्या, कुणी कोऱ्या करकरीत. अगदी आठ आण्यापासून ते दहा रुपयापर्यंतची नाणी होती. शिवाला गंमत वाटली. आपल्या नको असलेल्या, कामाच्या नसलेल्या ते अगदी नवीनच मिळालेल्या वस्तूंपर्यंत लोक देवाला सगळं देत असतात. तेवढ्यात एका २० रुपयाच्या नोटेखाली त्याला काहीतरी चमकताना दिसलं. त्याने हातात घेऊन पाहिलं तर चांगलं मोठं अस्सल चांदीचं नाणं होतं ते. शिवाला आश्चर्य वाटलं. आजूबाजूला सुद्धा “इथे कोणी टाकलं असावं? चुकून टाकलं असेल का?” अशी कुजबुज झाली. मंदिराचे पुजारी नाना मात्र शिवाच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, “शिवबा, कधीचा चांदीचा मोदक करून घ्यायचा होता ना तुला आपल्या बाप्पासाठी? गेले काही महिने नुसता तोच धोशा चालू आहे तुझा. ही बघ देवानीच इच्छा पूर्ण केली तुझी. आता हे नाणं घे आणि तुला हवा तसा सुबक, सुरेख चांदीचा मोदक करून घे देवासाठी. मग बघ कसा झळाळून उठतो आपला देव!”
शिवाच्या डोळ्यातून झरझर अश्रू वहात होते. त्याने मनोभावे देवापुढे हात जोडले आणि म्हणाला, “नुसता सुखकर्ता आणि दुःखहर्ता नाहीस तर मनकवडा पण आहेस की रे !”
****
इकडे आयुष्यात पहिल्यांदाच देवळात पाऊल ठेवलेले महादेवराव रात्रीच्या अंधारात झपझप मंदिरापासून दूर चालत जाताना दिसत होते.
******
एक वर्तुळ पूर्ण झालं होतं.
*****
Image by Pashminu Mansukhani from Pixabay 
Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

6 thoughts on “वर्तुळ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!