एकुलती एक नोकरी करणारी…
त्याने आजवर आठ मुलींना नकार दिला होता. आज त्याला पहिला नकार मिळाला. अभिनव मध्ये खरं तर नकार देण्यासारखं काहीच नव्हतं. रुबाबदार व्यक्तीमत्व, इंजिनियर आणि एमबीए करून लठ्ठ पगाराची नोकरी. आईवडिलांचा एकुलता एक. तीन बेडरूमचे घर. पण रुहीने त्याला नकार कळवला. अभिनव चे आईवडील टेन्शन मध्ये आले. त्याने ह्यापुढील स्थळ न नाकारता सरळ होकार देऊन मोकळं व्हावं असं सांगू लागले. वरून त्याची अट होती सुंदर, मनमिळाऊ, शिकलेली ह्या बरोबर “नोकरी करणारी एकुलती एक!” अश्या कॉम्बिनेशनच्या मुली मुळात कमी मिळत. त्याही हा रिजेक्ट करत असे आणि त्याला मिळालेलं आता हे पाहिलं रिजेक्शन! आईवडील टेन्शन मध्ये होते पण अभिनव मात्र एका वेगळ्याच विचारात होता!
दुसऱ्या दिवशी अभिनव ऑफिसात रुहीचा बायोडेटा वाचत होता. त्यात तिच्या ऑफिसचे नाव होते. त्याने गुगल करून पत्ता शोधला आणि लंच मध्ये तो तिच्या ऑफिसात धडकला! त्याला बघून रुहीला आश्चर्य वाटलं. अभिनव म्हणाला-
अभिनव- हाय.
रुही- हाय. तुम्ही….इथे?
अभिनव- हो जरा बोलायचं आहे.
रुही- काल माझ्या बाबांनी फोन केला ना?
अभिनव- हो. म्हणूनच बोलायचं आहे. आज हाफ डे घेऊ शकशील का? तू म्हणशील तिथे जाऊ आणि बोलू.
रुही- पण…
अभिनव- विश्वास ठेव ही आपली शेवटची भेट असेल. ह्यानंतर मी तुला कधीही कॉन्टॅक्ट करणार नाही.
रुहीने क्षणभर विचार केला आणि ऑफिसात कळवून दोघे निघाले. तिच्या ऑफिसच्या इमारतीतच असलेल्या एका कॉफी शॉप मध्ये दोघे पोहोचले. एक स्टॅंडर्ड ऑर्डर देऊन दोघे शांत बसून होते. आपल्यासमोर आपण नकार दिलेला मुलगा बसला आहे ह्या जाणीवेने रुहीला खूप ऑकवर्ड वाटत होतं.
अभिनव- तू इथे किती वर्षे नोकरी करतेस?
रुही- पाच वर्षे होतील पुढल्या महिन्यात. माझी सीए केल्यावरची पहिलीच नोकरी.
अभिनव- कन्सल्टीग एमएनसी म्हणजे पगार उत्तम असेल.
रुही ह्या अनपेक्षित प्रश्नाने चकित झाली.
अभिनव- मला माहित आहे पगार छानच असेल. असो. लग्नानंतर पण नोकरी करणार?
रुही- हो.
अभिनव- नवऱ्याने नको करू सांगितलं तर?
रुही- तर मी नवऱ्याला सोडीन.
अभिनव- इंटरेस्टिंग. बरं एका प्रश्नच खरं उत्तर देशील?
रुही- काय?
अभिनव- मला रिजेक्ट का केलंस? आय मीन माझा ईगो हर्ट झाला.
रुही- कारण बघण्याच्या कार्यक्रमात तुम्ही इनसिस्ट केलेली अपेक्षा.
अभिनव- कोणती?
रुही- तुम्हाला मुलगी नोकरी करणारीच हवी आणि लग्नानंतर नोकरी सोडावी असे तुम्ही म्हणालात.
अभिनव- हो. कारण गरजच नाहीये आम्हाला तुझ्या नोकरीची.
रुही- माझ्या नोकरीची गरज आहे. माझ्या आईबाबांना! अभिनव माझ्या घरची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. माझ्या बाबांकडे खरच पैसे नव्हते आणि नाहीयेत. जे काही होते ते त्यांनी माझ्या लग्नासाठी साठवून ठेवले आहेत. ते देखील इतके कमी आहेत की त्याच्या व्याजात त्या दोघांचा महिन्याचा खर्चही निघणार नाही. बाबांनी मला दोन गोष्टी मात्र आवर्जून दिल्या. एक म्हणजे चांगले संस्कार आणि दुसरी म्हणजे शिक्षण!
अभिनव- ओके. मग?
रुही- मी आईबाबांची एकुलती एक मुलगी. आज चांगली नोकरी करते आहे. चांगला पगार आहे. आता कुठे आम्हाला पैसा दिसू लागलाय. माझ्या बाबांना परदेशाबद्दल कुतूहल आहे. ते पेपरात आणि पुस्तकात विविध देशांची माहिती वाचत असतात. त्यांना वाचनाचा छंद आहे. पुढे त्यांचं वयानुसार येऊ शकणार आजारपण, औषध असू शकेल.
अभिनव- बरं मग? Come to the point. मला नकार का? ह्याच्याशी माझा काय संबंध?
रुही- तुमच्या ह्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. तुमचा माझ्या आईवडिलांशी संबंध नाही, ते तुमची जबाबदारी नाही. आपलं लग्न झालं की मी तुमची. मग माझाही काहीच संबंध नसेल त्यांच्या जबाबदारीशी असा अर्थ आहे.
अभिनव- अर्थात.
रुही- मला तेच मान्य नाहीये. मला आई बाबांना परदेशात टूरला पाठवायचं आहे, चांगल्या हॉटेल्स मध्ये जेवायला घालायचं आहे, घरात सर्व सुखसुविधा द्यायच्या आहेत, त्यांच्या म्हातारपणाची आर्थिक जबाबदारी घ्यायची आहे. नोकरी करणारी एकुलती एक ही एक महत्वाची अट असणाऱ्या माणसाशी लग्न करून मी हे सर्व करू शकणार नाही हे माहीत असल्याने मी नकार दिला इतकंच! तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. प्रॉब्लेम माझा आहे तुमचा नाही!
अभिनव- सीमा म्हणजे शिवराम आणि आनंदी बाई जोश्यांची एकुलती एक मुलगी. बीए शिकलेली आणि सरकारी नोकरीत. शिवराम जोशी भिक्षुक. परिस्थिती यथातथा! सीमाच लग्न झालं. ती संसारात रमली. लाडक्या मुलीबरोबर तिच्या पगाराचा घराला असलेला आधार एका दिवसात परका झाला! वर्ष सरत गेली. शिवराम भाऊ आणि आनंदीबाई आयुष्यातील मूलभूत सुखांनी वंचित असे आयुष्य जगत लेकीचा सुखी संसार बघून आनंद मानत होते! सीमाने पंचेचाळीस वर्षांची असताना व्हीआरएस घेतली. भरपूर पैसे हाती आले.त्या पैशात थोडी भर टाकून त्यांनी त्यांच्याच इमारतीत अजून एक मोठी जागा घेतली. शिवरामभाऊ आणि आनंदीबाई मात्र दहा बाय दहाच्या खोलीत आयुष्य कंठत होते! तिथेच यथावकाश वर्षभराच्या अंतराने दोघे संपले!
रुही- बघा हे असंच होत. माझ्या आईबाबांच्या बाबतीत हे होऊ नये म्हणून मी तुम्हाला नकार दिला!
अभिनव- रुही माझ्या आईच नाव सीमा आहे आणि मी सांगितलेली गोष्ट माझ्या सख्या आजी आजोबांची आहे! मला मोठा झाल्यावर त्यांची अगतिकता लक्षात आली पण खूप उशीर झाला होता. चूक माझ्या आईची देखील नाही. तेव्हा बाबांची परिस्थिती पण अशी होती की काही वर्षे आईच्या पगारावर घर चालू होतं. मग बिझनेस जोरात सुरू झाला आणि दिवस बदलले. पण आजीआजोबांची हालाखी तोवर सवय होऊन गेली होती. कोणालाच त्याच वाईट वाटत नसे. आणि कोणालाही ती खटकत नसे!
रुही- हम्म
अभिनव- आजीआजोबा गेल्यावर मी ठरवलं की एका अश्या मुलीशी लग्न करायचं जी एकुलती एक असेल आणि नोकरी करणारी असेल. तिने लग्नानंतर नोकरी केलीच पाहिजे आणि कमावलेले सगळे पैसे लग्नाआधी जसे वापरायची किंवा खर्च करायची तिथेच त्याच पद्धतीने खर्च करेल! माझ्या आजीआजोबांसारख्या हजारो एकुलत्या एका मुलीच्या आईवडिलांपैकी एका आईवडिलांना तरी मी माझे आजी आजोबा होण्यापासून थांबवायचा प्रयत्न करेन. रुही होत काय माहित्येय का? लग्न केल्यावर एकतर सासरी गरज नाही म्हणून अनेक मुली उत्तम करियर असलेली नोकरी सोडून देतात किंवा नोकरी करत राहून सासरला हातभार लावायला सुरुवात करतात. पण दोन्ही बाबतीत एकुलत्या एका मुलीचे आईवडील ज्यांना उतारवयात त्या मुलीची नोकरी हा म्हातारपणाचा आर्थिक आधार असू शकतो त्यांचा कोणीच विचार करत नाही. म्हणून माझी ती अट होती. तू मला रिजेक्ट केल्यावर मला खूप आनंद झाला. आणि आज तुझ्याकडून मला अपेक्षित असलेले कारण ऐकून खूपच आनंद झाला. आजवर देखणा, श्रीमंत, वेल सेटल्ड अभिनव दिसल्यावर, आपलं उज्वल भविष्य दिसल्यावर माझ्या सर्व अटी मान्य करून आपल्या आईवडिलांचा फार विचार न करणाऱ्या मुली मी नाकारल्या! सो माझी ऑफर अशी आहे की माझ्याशी लग्न केल्यावर तू नोकरी करत राहाशील! तुझे आणि तुझ्या आईवडिलांचे बँकेत जॉईंट अकाउंट असेल. तू तुझे जे प्लान आहेत ते पूर्ण करशील. तुझ्या आईवडिलांचा आर्थिक भार तू पेलशील! मी म्हणालो तसा माझा त्याच्याशी संबंध नसेल! फक्त कधी तुला भार सोसला नाही तर पाठीशी माझा हात कायम असेल! आता सांग मी रिजेक्ट की सिलेक्ट?
डोळ्यातून अश्रू वाहात असलेली रुही त्या प्रश्नाने लाजली! शिवरामभाऊ आणि आनंदीबाई पूर्वेला क्षितिजावर उगवलेल्या दोन ताऱ्यांच्या मागून डोळ्यातले अश्रू पुसत दोघांना मनापासून आशीर्वाद देत होते. आकाशात आजचा सुपर मून खूपच लोभस दिसत होता!©मंदार जोग
Image by StartupStockPhotos from Pixabay
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
फारच छान
छान आहे स्टोरी
Khoop chhan.
Khup chan
Kharrach apratim!
फारच छान.
मी तुमचं लिखाण गेली अनेक वर्षं वाचतेय . हलकं फुलकं , कुणावरही टीका न करणारं बहुतांशवेळा वास्तव्याशीं धरून असलेलं . मी सहसा रिमार्क देत नाहीं .., कारण कांहीच नाहीं . पण परदेशांत अधिकाधिक आयुष्य घालवलेल्या मला अजूनही मराठीतलं लिखाण आनंद देतं .लिखते रहो .