लढाई……भाग ३.
काही दिवसांनी वॉलचंद कॉलेजचा कॉल आला. कोल्हापूरच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचाही आला. दोन्ही ठिकाणांहून इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात आलं होतं. सांगलीचा इंटरव्ह्यू होता साडेअकरा वाजता तर कोल्हापूरचा इंटरव्ह्यू होता त्याच दिवशी दुपारी दोनला.
इंटरव्ह्यूसाठी जायचं तर कपडे चांगलेच लागणार. आजपर्यंतच्या आयुष्यात मी बटनाची पॅन्ट फक्त एकदाच घातली होती. तीही आता ढुंगणावर रफू करून झाली होती. आणखी दोन विजारी होत्या पण नाडीच्या. वडिलांच्या सांगण्यावरून विचित्र पद्धतीनं शिवलेल्या. उजवा खिसा सुलट असायचा तर डावा खिसा उलट. नाडी मागून आणि पुढून असं दोन्ही बाजूंनी बांधण्याची सोय होती. हेतू हा की विजार एकाच बाजूने झिजू नये आणि लवकर फाटू नये. विजार उलटसुलट कशीही बांधली तरी फक्त उजव्या खिशातच हात घालता यायचा. डाव्या खिशात हात घालायचा तर हात उलटा करावा लागत असे.वडील जुन्या विचारसारणीचे. त्यामुळं त्यांना फॅशन चालायची नाही. बटनाची पॅन्ट ही देखील एक फॅशनच वाटे त्यांना.
दहावीला चांगले मार्क पडल्यामुळे वडील खुश होते. आम्ही सर्वजण त्यांना दादा म्हणत असू. मी दादांना घेऊन कापड दुकानात गेलो आणि आयुष्यात पहिल्यांदाच शर्ट पँटसाठी रंगीत कपडे घेतले. नववीपर्यंत खाकी हाफपॅन्ट, पांढरा शर्ट आणि गांधीटोपी असा गणवेश होता तर दहावीला पांढरी विजार, पांढरा शर्ट आणि गांधीटोपी असा पेहराव. त्यामुळं माझ्याकडे जे काही कपडे होते ते याच प्रकारातले. याआधी दोनचार रंगीत शर्ट घातले होते पण ते मोठ्या बहिणींनी घेतलेले. दादांनी रंगीत कपडे घेण्याचा हा पहिलाच प्रसंग.
टेलरकडून कपडे आणायच्या आधल्या रात्री उशीरापर्यंत झोप आली नाही. नवीन कपडे घातल्यावर आपण कसे दिसू याची उत्सुकता लागून राहिलेली. फिकट निळसर रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पॅन्ट. अण्णाबरोबर जाऊन मिरजहून बूट पायमोज्याचा एक जोडही आणला. नवीन कपडे आणि नवीन बूट घातल्यावर कमालीचा आत्मविश्वास वाढलेला!
इंटरव्ह्यू साडेअकरा वाजता होता. अकराला कॉलेजवर पोहोचलो. दादा आणि शरदबापू बरोबर आलेले. शरद बापू बीएस्सी. दूरच्या पाहुण्यांपैकी एक….पण एकदम हुशार आणि मनमिळाऊ! त्यांच्या बुलेटवरूनच आम्हीही आलेलो.
वॉलचंदवर जंबु माळी भेटला. एक वर्ष सिनिअर. आता वॉलचंदलाच फर्स्ट इअर मेकॅनिकल डिप्लोमा करत होता.
आमचा नंबर आल्यावर आम्ही आत गेलो.
“इलेक्ट्रीकल किंवा सिव्हिल मिळेल.” माझ्या हातातले कागद पाहत ऑफिसमधल्या माणसानं म्हटलं.
“मला मेकॅनिकल पाहिजे.” मी म्हटलं.
“का?…इलेक्ट्रीकल काय वाईट आहे?”
“वाईट नाही पण मला मेकॅनिकल पाहिजे.”
“मग सध्या तरी इथं मिळणार नाही!”
“मग कधी मिळेल?”
“नाही सांगता येत!…तुझा वेटिंग नंबर सात आहे!….पुढलं कुणी सोडून गेलं तर मिळेल.”
‘मेकॅनिकच पाहिजे…. डिमांड आहे.’ जंबु आम्हांला बाजूला घेऊन बोलला.
“होय, पण मिळणार कसं?” मी.
“कोल्हापूरला मिळेल की!” शरदबापू बोलले.
“कोल्हापूरचा खर्च परवडायचा का शरद?” दादांनी शरदबापूला विचारलं.
“सांगली काय आणि कोल्हापूर काय? होस्टेलला तर राहावं लागणारच आहे!…..खानावळीचा खर्च तेवढा वाढेल!”
“खानावळ तर कशाला लागत्या म्हणा?…..आमच्या दोन नंबरच्या पोरंगीचं घर हाय की बावड्याला….तिथनंच येऊन जाऊन करंल.”
“मग चालतंय की!….सिटी बसचा पास काढला की काम झालं!”
“शरदपावणं, मग जावा बघू लवकर आणि घ्या जावा अॅडमिस.” दादा बोलले आणि क्षणाचाही विचार न करता शरद बापू बुलेटकडे धावले. आम्हीही निघालो. जाता जाता दादांनी मुंड्याच्या खिशातले पैसे काढून माझ्या हातात दिले. दादांना अॅडमिशन हा शब्द शेवटपर्यंत म्हणता आला नाही. ते अॅडमिशनला ‘अॅडमिस’ असंच म्हणायचे.
शरदबापूंची बुलेट कोल्हापूरच्या दिशेनं भरधाव वेगानं पळत होती आणि मी अंग चोरून बसलो होतो. डोळे मिचमिचे करून पळणाऱ्या झाडांकडे पाहत होतो. ताराबाईच्या पुतळ्याजवळून गाडी डावीकडे वळली आणि कोल्हापूर आलं याची जाणीव झाली.
थोड्याच वेळात ‘शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर’ अशी पाटी लावलेल्या इमारतीच्या आवारात आम्ही शिरलो. ऑफिसात कागदपत्रे दाखवली.
“मेकॅनिकल पाहिजे.” मी म्हटलं.
“मिळेल.”
“थँक यू!”
“होस्टेल पाहिजे?”
“नको….माझी बहीण राहते इथं जवळच.”
“कुठं?”
“बावड्याला.”
“बावड्यावरून अपडाऊन करणार की काय?” त्यानं मला वरपासून खालपर्यंत न्याहाळत म्हटलं.
“सध्या तसाच विचार आहे.”
“नंतर विचार बदलला म्हणून होस्टेल मागायला येशील….पण तेव्हा होस्टेल मिळणार नाही.”
“चालेल.”
अॅडमिशन घेऊन आम्ही पुन्हा परतीच्या रस्त्याला लागलो.
“चल, नाष्टा करू या.” बापूंनी एका हॉटेलपुढं गाडी थांबवली.
त्यांच्यापाठोपाठ आत आलो.
“काय घेणार?” बापूंनी विचारलं.
“तुम्ही सांगाल ते!”
“दोन मसाला डोसा.” बापूंनी ऑर्डर दिली आणि मी हा पदार्थ नक्की काय असेल याचा अंदाज बांधत बसलो.
थोड्या वेळानं प्लेट आल्या.
“घे.” बापू बोलले आणि त्यांनी काटेचमच्यानं सफाईदारपणे खायलाही सुरुवात केली. मीही मग त्यांचं अनुकरण करायचा प्रयत्न केला पण जमलं नाही. माझा गोंधळ आणि धडपड पाहून बापू हसले नाहीत.
“जमत नसेल तर हातानं खा.” बापू बोलले आणि मी हातातले चमचे बाजूला ठेऊन आंबोळीवर तुटून पडलो.
क्रमश:
Latest posts by Ashok Mali (see all)
- लढाई- भाग ६ - January 28, 2020
- लढाई- भाग ५ - December 24, 2019
- लढाई- भाग ४ - December 1, 2019
👍🏻