पत्र क्रमांक ११ आणि १२
पत्र क्रमांक 11,
प्रिय आई,
तुला पत्र लिहायला थोडा वेळ घेतला…का? तर या का चं उत्तर आहे…वेळ हवा होता..विचार करायला…तुलाही हवा असेल असं वाटलं..जे घडलं ते पचवायला…बऱ्याचदा आपण खंबीर असल्याचं नाटक करत असतो..पण आतून मात्र खूप पडझड होत असते आणि ती लपवण्याची आपली केविलवाणी धडपड सतत सुरू असते..हो नं? आपल्या जवळच्या माणसाची अशी पडझड होताना पाहणं हे आपली पडझड होताना पाहण्यापेक्षाही खूप वाईट…जशी आपण एकमेकींची पडझड होताना पाहिलीय…म्हणूनच तुला पत्र लिहिणं सर्वात कठीण होतं… म्हणून वेळ घेतला
असो..कशी आहेस? आमच्या वाढदिवसादिवशी तुझे डबडबलेले डोळे पाहिले…पण आई कधी न कधी मला बाहेर पडावंच लागणार होतं नं.. ते जाऊ दे घरात बरीच शांतता असेल मी तिथे नसल्याने..कारण सतत बडबड करण्याचं डिपार्टमेंट आपल्या घरामध्ये इतकी वर्षे एकहाती सांभाळतेय.. त्यात गौतम आणि माझी भांडणं पण नाहीत…तुला आठवतं का आई? एखाद दिवशी गौतम ठरलेल्या नेहमीच्या वाक्यांपेक्षा चार वाक्य जरा जास्त बोलला तर आपण त्याला विचारायचो की “आज पिंपळाखालून आलास का?” आणि मग तो चिडायचा…त्याला मी पत्र लिहिलं होतं आणि चक्क त्याचं उत्तरही आलं त्या पत्राला..अर्थात पत्रातल्या उत्तराचा बाज खडूसच होता..पण उत्तर आलं हेही नसे थोडके!!
मी रश्मीला, गौतमला, आजीला पत्र लिहीली आत्तापर्यंत आणि त्या सगळ्यांच म्हणणं हे होतं की मिहीर प्रकरणात मी जशी वागले ते पाहून सर्वाना माझा अभिमान वाटतो..मला तुझं मत जाणून घ्यायचंय…माझं विचारशील तर मला वाटतं मी जी काही ऍक्शन घेतली ती अभिमानासाठी नव्हे तर स्वाभिमानासाठी घेतली.
मला आठवतंय मी मिहिरबद्दल घरी तुम्हा सर्वांना सांगितलं तेव्हा त्या मुलाला तुम्ही पाहिलही नव्हतं पण केवळ माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्याला भेटायला तयार झालात. माझ्या निवडीवर तुम्ही डाऊट घेतला नाहीत. पण पुढे जे काही घडलं ते पाहून मला माझ्याच निवडीवर खूप डाउट यायला लागला..एक क्षणी असंही वाटलं की मी निर्बुद्धपणे आणि डोळ्यावर एक प्रकारची पट्टी बांधून इतके दिवस मिहिरच्या प्रेमात जगत होते…आणि जेव्हा प्रश्न माझ्या आईवडिलांच्या मानापमानाचा आला तेव्हा त्यांनी दाखवलेला विश्वास लक्षात घेऊन मी पावलं उचलली.
तुला आणि बाबांना त्या काळात जो अपमान आणि मनस्ताप सहन करावा लागला त्याबद्दल मनापासून सॉरी. तुझ्या प्रतिक्रियेची वाट बघतेय.
तुझीच,
गार्गी
ता.क. – माझ्या पत्राला उत्तर देताना आजीने तुला पत्र लिहिण्याची गळ घातली…ते वाचून मला आश्चर्य वाटलं असं नाही म्हणणार पण खूप आनंद झाला.
**************************************
पत्र क्रमांक 12,
प्रिय गार्गी,
तुमच्या जन्माच्या वेळी तुझी आजी आणि माझ्या सासूबाई मला लेबर रूममध्ये घेऊन जाईपर्यंत सतत सोबत होत्या. त्यात जुळ असल्यामुळे धाकधूक आणि वाटणारी काळजी दुप्पट होती. तुझे आजोबा नातू (च) व्हावा म्हणून देव पाण्यात घालून बसलेले..दोन मुली झाल्या तर तुझे आजोबा नाराज होणार हे माहीत होतं..पण मी ,तुझे बाबा आणि सासूबाई या जुळ्यांमध्ये एक तरी मुलगी असावी अशी प्रार्थना करीत होतो. तर घरात अशा दोन टिम्सच तयार झाल्या होत्या म्हण नं आणि पहाटे 3.55 ला तू झालीस..पहिले तू बाहेर आलीस..खूप मोठ्ठा आवाज गं बाई तुझा..नर्सने सांगितलं मुलगी..एकाच वेळेला जीव भांड्यात आणि दुसऱ्याच क्षणी तुझ्या आजोबांच्या धाकाने काळजीतही पडले..काही सेकंदात मिहीर झाला…किरकीऱ्या आवाजात, हळूहळू रडणारा (त्याचा आवाज तेव्हापासून कमीच आहे).. मी अत्यानंदाने विश्रांतीसाठी डोळे मिटले…आज जेव्हा स्वतःला विचारते की मुलगी व्हावी म्हणून इतका आटापिटा का?तर कारण एकच मुली जीव लावतात..याचा अर्थ मुलं लावत नाहीत असा का? तर नाही..पण ते म्हणतात ना घार उडते आकाशी तिचे लक्ष पिलांपाशी…पुढे ह्याच मुली मोठ्या होऊन आईवडिलांचा विचार सतत मनात ठेवून लांब राहिल्या तरी मनाने जवळ असतात..त्या आईचीही आई बनतात गं.. कदाचित या भावना शब्दात मांडायला मी असमर्थ आहे
बऱ्याचदा असं वाटतं.. म्हणजे हल्ली हल्ली मला असं वाटायला लागलंय..की आम्ही पालक मुलाच्या जन्माच्या आधीपासूनच त्यांच्यावर अपेक्षांचा दगड ठेवायला सुरू करतो का? म्हणजे बघ नं.. मुलगा कशासाठी तर म्हातारपणाची काठी म्हणून…मुलगी कशासाठी तर जीव लावायला..असं म्हणतात आई आणि बाळाचं नात सर्वात सुंदर..खरं.. पण मग तेही कालपरत्वे अपेक्षाविरहित रहात नाही का? वर्षानुवर्षे तेच चालत आलं..आणि आपणही तेच कालचक्र चालवतो…असे विचार आजकाल खूप मनात येतात
तू जेव्हा आठवी नववीत गेलीस तेव्हा तुझ्या वर्गमैत्रिणींना बहुतेक जणींना मासिक पाळी यायला सुरुवात झाली. त्यामुळे मासिक पाळी येते म्हणजे नेमकं काय होतं याविषयी तुला कल्पना आली होती.. मग तू दहावीत गेलीस..मला वाटलं तुला उशिरा पाळी येईल..म्हणून आपण तुझी दहावी संपेपर्यंत वाट पाहिली..पण त्यानंतरही येईना म्हंटल्यावर आणि धीर खचत चालल्यावर आपण डॉकटरकडे गेलो..पहिली 2 वर्ष अशीच डॉकटरकडे इथून तिथे फिरण्यात गेली..मग खरा प्रॉब्लेम समजला आणि तुझ्या ट्रीटमेंटला सुरुवात झाली.त्यानंतरही असं वाटायचं की वर्षभरात पाळी येईल पण कसचं काय.. तुला अधिक मनस्ताप..आणि तुझ्या काळजीने आम्हाला झोप न येणं हे दुष्टचक्र चक्क 5 वर्षं चालणार होतं.. खरंच देवाने परीक्षाच पाहिली आपल्या सगळ्यांची..तुला खूप मनस्ताप झाला त्या काळात आणि पालक म्हणून त्या काळात आम्हीही कधी कधी आतातायीपणाने वागलो…हे जाणवलं..जेव्हा गेल्या 5 वर्षांचा शांतपणे विचार केला तेव्हा आमच्या चुका उमगल्या.. यामागे केवळ तुझी काळजी होती हे जरी खरं असलं तरी नकळतपणे काही घाव आम्हीही केलेच असतील तुझ्या मनावर
या 5 वर्षांचा परिपाक म्हणून की काय ट्रीटमेंटला यश आल्यावर तू दुसऱ्या शहरात जाण्याचा निर्णय घेतलास…आधी पटला नव्हता मला तुझा हा निर्णय..पण विचार केल्यावर पटलं हळूहळू..आता तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देते…मिहीर प्रकरणात तू जे वागलीस त्याबद्दल मला काय वाटतं… तुला उत्तर माहितीय… खरं सांगू? अभिमानापेक्षाही मी एक अशी मुलगी जन्माला घातलीय जी आईबाबांचा मनापासून विचार करते…त्यांच्यासाठी प्रसंगी उभी राहते याचं सार्थक वाटलं…आईबापाला अजून काय हवं असतं?
असं म्हणतात की वेळीच मुलाचा हात सोडणारे आणि त्यांना निर्णयस्वातंत्र्य देणारे पालक म्हणजे खरे मायबाप..तू दूर जाण्याचा निर्णय घेतलास बरं झालं…हो मीच बोलतेय..मिहीर प्रकरणातून मीही एक धडा घेतला…गौतमला मिहिरसारखं माझ्या पदराखाली बांधून ठेवणार नाही..तुम्ही आता पुरेसे मोठे झालात..बाहेरच्या जगाचा अनुभव घ्या..प्रसंगी धडपडत, चुकत त्या चुकांमधून शिका..उद्या मी गौतमच्या होणाऱ्या बायकोसोबत चुकीची वागले तर गौतमने मला समज देण्याचं स्वातंत्र्य मी त्याला दिलंय/ देत राहीन…यामध्ये मी मोठी, तो लहान..तो मला अक्कल शिकवतो!! वगैरे वगैरे स्वतःचा इगो कुरवळणारे विचार मला मध्ये आणायचे नाहीत…आयुष्यातला हा मिहीर नावाचा धडा आपल्या सगळ्यांनाच खूप काही शिकवून गेला
असो..तुझ्या आजीने तुला मला पत्र लिहायला गळ घातली म्हणे…त्या मूळच्या वाईट स्वभावाच्या नाहीयेत..कुणीच नसतं.. आणि माझ्या मनातही त्यांच्याविषयी राग नाहीये..फक्त काही गोष्टी मनात आहेत…त्या पूर्वी माझ्याशी जश्या वागल्या आहेत ते विसरू शकत नाही मी..पण याचा अर्थ मी रोज ही अढी मनात घेऊन वावरते असा होत नाही…ठीक आहे..तूर्तास इथे पत्रोत्तर थांबवते
बाकी आपलं रोज फोनवर बोलणं होतंच. एखाद्या लॉंग विकेंडला सुट्टी काढून इकडे पुण्याला ये. नीट खात जा. काळजी घे.
तुझी,
आई
Image by Ralf Kunze from Pixabay
- सासूबाई will you be my valentine?- भाग्यश्री भोसेकर - February 23, 2020
- तुमचं आमचं प्रत्येक वेळी सेम नसत- भाग्यश्री भोसेकर - February 20, 2020
- गोष्टी लेखकांच्या –गौरी शिंदे - November 13, 2019
पाच सेकंदात मिहीर झाला या ऐवजी गौतम झाला असे हवे ना ?
हो अगदी बरोबर