नवव्या मजल्यावरचं रहस्य……(भाग १)
हॉस्पिटलच्या अकराव्या मजल्यावरून चालत खाली जाणं म्हणजे तसं दिव्यच. पण सगळ्या लिफ्ट खाली निघून गेल्या होत्या. त्या येईपर्यंत थांबण्यापेक्षा पटापट जिन्याने गेलेलं बरं असा विचार करत गार्गीने जिना उतरायला सुरुवात केली. गार्गी तशी घाईतच होती. जाता जाता तिचे पाय नवव्या मजल्यावर थबकले. शहरातल्या सुसज्ज आणि प्रसिद्ध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा हा एक मजला मात्र पूर्णपणे बंद होता. जिन्याचा भाग वगळता बाकी सगळीकडे पूर्ण अंधार होता. कॉरिडॉरमधली सफाई करणारे कामगार वगळता या मजल्यावर इतर कोणी फिरकतही नसे. इतकंच काय तर या मजल्यावर एकही लिफ्ट थांबत नसे.
गार्गीची पावले नकळत मजल्यावरच्या त्या बंद दाराकडे वळली. दाराला मोठं कुलूप लावलेलं होतं. का कोणास ठाऊक तिला या मजल्याबद्दल सुप्त आकर्षण वाटू लागलं. दरवाज्याजवळ जाऊन तिने आत डोकावण्याचा प्रयत्न केला. सगळीकडे अंधार होता. दरवाज्यामधल्या काचांमधून नीट लक्षपूर्वक बघितल्यावर अचानक तिला खिडकीच्या गजाला धरून रडणारी एक चार पाच वर्षांची मुलगी दिसली. ती गोंधळलेली होती, रडत होती. असं वाटत होतं ती कुठल्यातरी संकटात आहे. हळूहळू अंधार विरु लागला आणि खोलीतली दुनिया तिला दिसू लागली. सगळीकडे पळापळ आणि आरडाओरड चालली होती. वाट मिळेल तिथून जो तो खोलीच्या बाहेर जायचा प्रयत्न करत होता. त्या मजल्यावर आग लागली होती. गार्गीला आता ती याच खोलीचा एक भाग आहे असं वाटू लागलं. गार्गी त्या मुलीला वाचवायला जाणार तेवढ्यात तिचा फोन वाजला. फोनच्या आवाजाने तिची तंद्री भंग पावली. पण तिचं मन त्या खोलीतून बाहेर यायला तयार होत नव्हतं. फोन घ्यायची अजिबात इच्छा होत नव्हती. आपण कोण आहोत? या हॉस्पिटलमध्ये का आलो आहोत? याचा काही क्षण तिला विसर पडला होता. फोनची रिंगटोन मात्र तिला या दुनियेत परत बोलावत होती. काहीशा नाखुषीने तिने पर्समधून फोन बाहेर काढला. फोनवर डॉक्टर आदित्यचं नाव बघून तिने फोन घेतला. पण तिची नजर मात्र त्या खोलीच्या आत स्थिरावलेली होती.
“हॅलो, गार्गी कुठे आहेस तू?
“मी…इथे…” बरं ऐक, सगळी कामं टाकून डॉक्टर दीक्षितांच्या केबिनमध्ये ये.”
फोनवरच्या आवाजाने गार्गी भानावर आली.
“अ..हो.. निघते… आलेच….!!”
एवढं बोलेपर्यंत एक क्षण तिची नजर खोलीपासून ढळली आणि खोलीतलं दृश्य विरून पुन्हा अंधार पसरला.
गार्गीने स्वतःला सावरलं. ती वास्तवात आली आणि लगबगीने जिने उतरू लागली.
जिना उतरताना मात्र तिच्या मनात फक्त आणि फक्त त्या खोलीचाच विचार येत होता. आपण जे काही पाहिलं तो आभास होता का वास्तव? काय होतं ते सगळं? मलाच का दिसलं? अगदी हीच घटना तिला लहानपणी स्वप्नात दिसत असे. पण आज तिने जे बघितलं ते स्वप्न नव्हतं. त्या मजल्यावर काहीतरी रहस्य नक्कीच आहे. अन्यथा शहरातील एवढ्या मोठ्या सुसज्ज हॉस्पिटलचा एक अख्खा मजला रिकामा का असेल? विचारांच्या तंद्रीत आठ मजले उतरून ती डॉक्टर दीक्षितांच्या केबिनसमोर कधी पोचली ते तिचं तिला पण कळलं नाही.
गार्गी एक आर्किअलॉजिस्ट होती. पुरातन वास्तूंचा अभ्यास करणं ही तिची आवड तर होतीच शिवाय याच विषयावर संशोधन करणाऱ्या एका नामांकित संस्थेमध्ये ती नोकरीही करत होती. डॉक्टर दीक्षित न्यूरोसर्जन होते. गार्गीच्या आईची ट्रीटमेंट त्यांच्याकडे चालू होती. तर डॉक्टर आदित्य हा डॉक्टर दीक्षितांचा ज्युनिअर आणि गार्गीचा प्रियकर होता.
केबिनमध्ये गेल्यावर डॉक्टर दीक्षित म्हणाले, “गार्गी, तुझ्या आईचे रिपोर्ट्स बघितले. आता ऑपरेशनशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि हे ऑपरेशन शक्य तितक्या लवकर करणं आवश्यक आहे. पण दोन्ही परिस्थितीत ‘लाईफ रिस्क’ आहे. ऑपरेशन तसं सोपं नाही. बट बिलिव्ह मी, ‘आय विल ट्राय माय बेस्ट!’ पण हे ऑपरेशन लवकरात लवकर करणं आवश्यक आहे. अन्यथा केस पूर्ण हाताबाहेर जाईल. सुदैवाने बाकीचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. त्यामुळे आपण ऑपरेशनचा निर्णय लगेच घेऊ शकतो. पैशांची काळजी करू नकोस. तुमचा मेडिक्लेम तर आहेच, त्यावर जे काही बिल होईल ते जसे जमतील तसे भरलेत तरी चालतील. त्याबद्दल मी बिलिंग डिपार्टमेंटशी बोलून ठेवेन. पण तू तुझ्या वडिलांशी बोलून ऑपरेशनचा निर्णय मात्र मला लगेच कळव. जर तुमचा निर्णय ‘हो’ असेल तर आज रात्रीच आपण ऑपरेशन सुरू करू. काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. मी निघतो आता मला राऊंडला जायचं आहे.” एवढं सगळं एका दमात बोलून डॉक्टर दीक्षित राऊंडला निघून गेले.
केबिनमध्ये आदित्य आणि गार्गी दोघेच उरले होते. डॉक्टरनी जे काही सांगितलं ते ऐकून गार्गीला धक्का बसला होता. सहाजिकच आहे तिची आई जीवन-मृत्यूच्या सीमेवरती उभी होती. पण आदित्यने तिला सावरलं. तिच्या वडिलांना फोन करून बोलावून घेतलं. चर्चेअंती अखेर ऑपरेशनचा निर्णय ठरला.
गार्गीच्या कुटुंबासाठी रात्र वैऱ्यासारखी होती. डॉक्टर दीक्षितांनी आपलं सगळं ज्ञान, सगळा अनुभव पणाला लावला होता. त्यांच्यासाठी ही केस म्हणजे एक चॅलेंज होतं. काहीही करून त्यांना हे ऑपरेशन यशस्वी करायचं होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या आदित्यच्या होणाऱ्या सासूबाई होत्या. आदित्य केवळ त्यांचा ज्युनिअर नव्हता तर त्यांचे बालमित्र आणि एकेकाळचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर शारंगपाणी यांचा एकुलता एक मुलगा होता.
डॉक्टर दीक्षित आणि डॉक्टर शारंगपाणी अगदी लहानपणापासूनचे मित्र. पण दोघांचे स्वभाव अगदी भिन्न. दीक्षित प्रॅक्टिकल विचार करणारे तर शारंगपाणी काहीसे भावनिक. “आमच्या स्वभावांमुळे तर तो हृदयरोगतज्ञ आणि मी न्यूरोसर्जन झालो”, असं डॉ. दीक्षित नेहमी गमतीने म्हणत असत.
हे हॉस्पिटल म्हणजे या दोघांचं स्वप्न होतं. दोघांमध्ये कधीच कुठल्या गोष्टीवरून वाद झाले नाहीत. अपवाद फक्त एका गोष्टीचा, ‘अध्यात्म’! या एकाच गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाला होता. डॉ. शारंगपाणींचा अध्यात्मावर प्रचंड विश्वास होता. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये अध्यात्म सेंटर काढायचं होतं. पण डॉ. दीक्षितांचा या गोष्टीला विरोध होता. हॉस्पिटलचं बांधकाम पूर्ण होत आलं तरी हा वाद मिटायची चिन्ह नव्हती. अखेर डॉ. दिक्षितांनी हार मानली व अध्यात्म सेंटरला परवानगी दिली आणि हॉस्पिटलचा नववा मजला अध्यात्म सेंटरसाठी निश्चित झाला.
अध्यात्म सेंटरचं काम जोमाने सुरू झालं. डॉ. शारंगपाणी सर्व कामाकडे स्वतः जातीने लक्ष देत होते. एक दिवस अचानक जोराचा वारा सुटला. वावटळ उठली त्यात भरीस भर म्हणून हॉस्पिटलला आग लागली. डॉ. शारंगपाणी तेव्हा नवव्या मजल्यावर होते. सुदैवाने फायर ब्रिगेडची गाडी त्वरित घटनास्थळी पोचली. पण त्या अगोदर काही सुजाण नागरिकांनी दोऱ्या, शिडी, झुला या उपलब्ध साधनांच्या मदतीने शक्य तितक्या लोकांची सुटका करून लवकरात लवकर त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात काम चालू केलं होतं.
फायर ब्रिगेडची टीम नवव्या मजल्यावर पोचली डॉ. शारंगपाणी त्यांच्यासोबत जायला निघाले, तेवढ्यात अचानक त्यांना त्या मजल्यावरच्या ओपन टेरेसवर असणाऱ्या खिडकीच्या गजाला धरून रडणारी एक चार पाच वर्षांची मुलगी दिसली. ती गोंधलेली होती, रडत होती. डॉ. शारंगपणींना कळेचना ती तिथे कशी गेली, पण जास्त विचार न करता ते ओपन टेरेसमध्ये गेले आणि त्यांनी त्या मुलीला आतमध्ये ओढलं. पण एक क्षण तिथेच थबकले. आणि त्यांनतर ते अचानक तिथून गायब झाले. विश्वास ठेवणं कठीण असलं तरी हेच सत्य होतं. बघता बघता डॉ. शारंगपणी गायब झाले होते. फायर ब्रिगेडच्या जवानांनी हे प्रत्यक्ष बघितलं होतं. त्यानंतर ना डॉ. शारंगपाणी कोणाला दिसले ना त्यांची डेड बॉडी मिळाली.
क्रमश:
Image by Emre Akyol from Pixabay
- माझी होशील का? - October 1, 2021
- काव्यांजली- शेवटचा भाग - February 12, 2021
- काव्यांजली- ४ - February 2, 2021
Welcome Manasi Taaii… Houdet ata Shabda Kharcha
👍👍manasi
फारच छान
Chan lihilay ..next part kadhi ?
👌
masst! welcome back!
छान. आवडली. पुढचा भाग केव्हा?