वडिलोपार्जित…
माझे आजेसासरे ९५ वर्ष जगले. आम्हाला सर्वांनाच त्यांचा भरपूर सहवास लाभला. त्यांच्या बोलण्याची पद्धत, काही लकबी अगदी लक्षात राहण्याजोग्या होत्या. ते रोजच्या व्यवहारात, बोलण्यात त्यांचे काही ठेवणीतले शब्द वापरायचे. ‘नीच मनुष्य आहे, ही कार्टी मेणगुणी आहे अगदी, परंतु, भोसडीचा, हृदरोग लागला आहे मागे आमच्या’, वगैरे असे अनेक पुस्तकी किंवा शेलके शब्द ते रोजच्या बोलण्यात अगदी सहज वापरायचे. खूप उशीर होणार असेल की ते म्हणायचे, ‘बारा बारा वाजेपर्यंत वाट बघायला लावू नका, वेळेत या.’ बारा वाजणे म्हणजे उशीर होण्याचा परमावधी, अगदी कडेलोट असा त्यांचा अगदी पक्का समज होता. माझ्या सासऱ्यांच्या बोलण्यातही अनेकदा त्यांच्या कळत नकळत हे सगळे शब्द डोकावतात.
मी लग्न होऊन ब्रह्म्यांकडे आले तेव्हा माझी नणंद, दीर अजून सडे होते. आम्ही चौघेजण थोड्याफार फरकाने समवयस्क आहोत. त्यात आमचं लग्न लवकर झालेलं (बालविवाह म्हणतात इथे त्याला) त्यामुळे आमच्या घरी त्याकाळी कॉलेजकट्टाच पडलेला असायचा. सुट्टीच्या दिवशी एकत्र बाहेर जेवायला जाणे, पिक्चर पहाणे, मॅगी करणे, खरेदी, रात्री उशिरापर्यंत टीव्हीवर फ्रेंड्स पहाणे हे असले अनेक उद्योग आम्ही चौघं करायचो.
आम्ही रात्री उशिरा घरी आलो की माझे सासरे दार उघडताना म्हणायचे,’ अरे काही लाजा आहेत की नाही तुम्हाला? बारा बारा वाजले तरी बाहेर उंडारताय!’ हे ऐकून आम्हाला माझ्या आजेसासऱ्यांची जोरदार आठवण यायची. आम्ही या वाक्याला इतके सरावलो की नंतर नंतर त्याचं हसू यायला लागलं. मग
‘बारा बारा’ हा आमचा एक खाजगी विनोदच बनून गेला. आम्ही एकमेकांना सकाळी दहा वाजता सुद्धा ‘अरे बारा बारा वाजले, तरी तुझी अंघोळ झाली नाहीये? किंवा एखादा पदार्थ नीट जमला नाही की ‘बारा बारा वाजेपर्यंत उंडारायचं आणि मग म्हणायचं मला स्वयंपाक येत नाही’ असं काहीही बोलायचो. हेतू असा की त्या गोष्टीचं वाईट वाटू नये किंवा टेन्शन येऊ नये.
कालांतराने माझ्या दिराचं आणि नणंदेचं लग्न झालं. आमचा कॉलेजकट्टा मोठा झाला. आम्ही सहाजण आजही एकमेकांचे घनिष्ट मित्र आहोत. आणि विशेष म्हणजे आमच्यात ‘बारा बारा’ चा विनोद अजूनही टिकून आहे. ‘बारा बारा वाजले तरी तुमचं पॅकिंग अजून झालं नाहीये? सहाचं फ्लाईट आहे तुमचं! किंवा ‘बारा बारा वाजेपर्यंत फोन बडवू नका तुमचे’ असं आम्ही सतत एकमेकांना म्हणत, चिडवत, हसत असतो.
परवा रात्री मी बऱ्याच उशिरापर्यंत लॅपटॉपवर काम करत बसले होते.( होय, कामच करत होते. ब्रह्मे नव्हते ऑनलाईन!) सकाळी उठल्यावर लेकाला शाळेला जाण्याआधी दूध बनवून दिलं तर त्यात साखर घालायची विसरली होती. तर आमचा लेक म्हणतो, ‘एक तर बारा बारा वाजेपर्यंत जागायचं आणि मग हे असं विसरायचं! आम्ही दोघेही यावर भरपूर हसलो.
काही वास्तू, दागिने, वस्तू वडिलोपार्जित असतात असं म्हणतात. आमच्याकडे तर विनोदच वडिलोपार्जित झालाय म्हणायचं!
Image by Gerhard Janson from Pixabay
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
मस्त
मस्त
Mastch. Your writing creates smile on the reader’s face. 👌
मस्त मज्जा!
हे असं बारा बारापर्यंत जागत ताटकळलायला लावायचं आणि मग सुंदर किस्सा सांगायचा. मस्त
😂😂😂 aavadlay
mast…