नवव्या मजल्यावरचं रहस्य(भाग २ )

गार्गीच्या आईचं ऑपरेशन यशस्वी झालं. पाच दिवसांनंतर त्यांना आयसीयूमधून पुन्हा अकराव्या मजल्यावर न्यूरो डिपार्टमेंटला हलविण्यात आलं. किमान महिनाभर तरी त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवावं लागणार होतं. या मधल्या काळात गार्गी नवव्या मजल्यावर आलेला अनुभव संपूर्णपणे विसरून गेली होती. आईची तब्बेत झपाट्याने सुधारत असल्यामुळे ती ऑफिसलाही जायला लागली होती. त्या दिवशी सकाळी ऑफिसला जाण्यासाठी गार्गी हॉस्पिटलमधून निघाली. सगळ्या लिफ्ट्स खाली गेल्या होत्या. उशीर नको म्हणून गार्गी जिन्यानेच जायला निघाली आणि अचानक तिला ‘त्या’ दिवशीचा अनुभव आठवला. गार्गी नकळत पुन्हा त्या दरवाज्याजवळ खेचली गेली. पुन्हा तोच अनुभव.

“ओ ताई काय बघताय तिकडं? कोण तुम्ही? चला मागं व्हा. असं म्हणून तिचा हात धरून कोणीतरी तिला मागे ओढलं आणि ती भानावर आली. हॉस्पिटलची साफसफाई करणाऱ्या मावशी होत्या त्या.

“काही नाही, हा मजला बंद का आहे?” गार्गी.

“हे बघा ताई हा मजला बंद का आहे? तिथं कोणी जातं का? कधी जातं? यातलं काय बी मला ठाऊक नाय. पर तिथं जायचं नाय हे पहिल्याच दिवशी पक्क सांगितलं होतं.”

“मावशी, आत खोलीमध्ये काय आहे याबद्दल कधी कुतूहल नाही वाटलं तुम्हाला? तुम्ही कधी डोकावून बघायचा प्रयत्न केला नाहीत?” गार्गी.

“ताई, एक सांगू? कोनास्नि सांगू नका, समदयानी प्रयत्न केला पण आत अंधाराशिवाय काहीच दिसत नाही. काय नाटक हाय काय कळंना बगा.

“ठीक आहे निघते मी”, असं म्हणून गार्गी तिथून निघून गेली.

जो अनुभव तिने घेतला होता तो सगळ्यांनाच येत नव्हता. त्यामुळे त्या खोलीबद्दलचं तिचं कुतूहल वाढत गेलं. त्यांनतर गार्गीने इंटरनेटवरून त्या मजल्याच्या रहस्याबद्दल माहिती काढायचा प्रयत्न केला. पण काहीच माहिती मिळाली नाही. हॉस्पिटलमध्ये बराचसा स्टाफ नवीन होता. जुना स्टाफ काहीही बोलायला तयार नव्हता. आदित्य आणि डॉ. दिक्षितांशी तिला या विषयावर बोलायची खूप इच्छा होती. पण तिच्यासाठी तो अखेरचा पर्याय होता. शिवाय त्या दोघांना हे कितपत आवडेल, हा प्रश्नही होताच. तिला तिच्या पद्धतीने या प्रकरणाचा शोध घ्यायचा होता. लायब्ररी, इंटरनेट कुठलाच पर्याय ती सोडत नव्हती. अखेर खूप प्रयत्नांनंतर तिला एका लायब्ररीमध्ये १५ वर्षांपूर्वीचं एक जुनं वर्तमानपत्र सापडलं.

हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना, डॉ. शारंगपाणी यांचं गायब होणं आणि त्यानंतरचा पोलीस तपास याबद्दलचा एक लेख तिच्या वाचनात आला. पण त्यामधून काही विशेष माहिती मिळेल असं तिला वाटत नव्हतं पण तरीही तिने तो वाचलायला सुरवात केली.         “हॉस्पिटलला लागलेली आग आणि डॉ. शारंगपाणी यांचं अशा अतिशय विचित्र पद्धतीने गायब होणं हे दोन्ही प्रकार धक्कादायक होते. त्यात पोलिसांचा संशय डॉ. दिक्षितांवर असल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळाच रंग देण्यात येत होता. वेगवेगळ्या तर्क वितर्काना उत येत होता. “आग शॉर्ट सर्किटमुळेच लागली होती” या निष्कर्षापर्यंत पोलीस पोचले होते. परंतु, डॉ. शारंगपाणी कसे आणि कुठे गायब झाले, हे शोधायचे सर्व प्रयत्न मात्र निष्फळ ठरत होते. डॉ. दीक्षित, त्यांचे व डॉ. शारंगपाणी यांचे कुटुंबीय, हॉस्पिटलचा स्टाफ, हॉस्पिटलचे बांधकाम करणारा इंजिनिअर, तिथले कामगार, त्या दिवशी नवव्या मजल्यावर गेलेले फायर ब्रिगेडचे जवान  सर्वांची अगदी कसून चौकशी करण्यात येत होती. पण तपासाचा एक धागाही पोलिसांना सापडत नव्हता. दिवस, महिने वर्ष सरत होती. पण तपास मात्र तसूभरही पुढे सरकला नव्हता. बघता बघता चार वर्ष संपत आली. या केसचा तपास करणाऱ्या इन्स्पेक्टर राघव यांची बदली झाली. पण इन्स्पेक्टर राघवच्या डोक्यातून ही केस जायला तयार नव्हती. जाण्यापूर्वी एक शेवटचा प्रयत्न म्हणून राघव एकटेच त्या नवव्या मजल्यावर गेले ते पुन्हा परत आलेच नाहीत. आश्चर्यकारकरित्या इन्स्पेक्टर राघव गायब झाले होते.

एका इन्स्पेक्टरचं असं गायब होणं ही खूप मोठी बातमी होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला आहे. सध्या या प्रकरणामध्ये प्रसिद्ध आर्किअलॉजिस्ट डॉ. सुबोधन यांनी रस दाखवल्यामुळे व संशोधनास परवानगी मगितल्यामुळे एक वेगळीच चर्चा चालू झाली आहे.”

या लेखातून गार्गीला अपेक्षेपेक्षा जास्त माहिती मिळाली. पण यामुळे गार्गीच्या मनातला गोंधळ अजूनच वाढला. नवीन बांधकामाच्या ठिकाणी संशोधन? आर्किअलॉजिचा हा भाग तिच्यासाठी नवीन होता. तिने डॉ. सुबोधन यांना भेटायचं ठरवलं. त्यांची माहिती मिळवणं तिच्यासाठी कठीण काम नव्हतं.

डॉ. सुबोधन प्रचंड हुशार पण तसा चक्रम माणूस. भुता-खेतांच्या जागेवर, स्मशानात रात्री अपरात्री एकटाच जाऊन बसेल पण जिवंत माणसांची मात्र त्यांना अॅलर्जी. त्यांनी लग्न केलं नव्हतं. ते व त्यांची बहीण दोघेच शहाराबाहेरच्या निर्जन भागात बंगला बांधून राहत होते.  डॉ. सुबोधनचा पत्ताही गार्गीला मिळाला. आता आपल्या हाती काहीतरी लागेल, अशी आशा तिच्या मनात निर्माण झाली.

दिलेल्या पत्त्यावर गार्गी पोचली तेव्हा मात्र ती आश्चर्यचकित झाली. जुन्या हवेलीसारखा बंगला. रात्री काय अगदी दुपारीही भीती वाटेल अशी विचित्र निर्जन जागा. आजूबाजूला सगळीकडे झाडं झुडपं वाढलेली. वर्षानुवर्षे तिथे कोणी राहत असेल, अशी पुसटशी शक्यताही नव्हती. पण तरीही गार्गी हिम्मत करून बंगल्याच्या गेटजवळ गेली. संपूर्णपणे गंजलेलं गेट तिने अगदी सावधपणे उघडलं. वाढलेल्या झाडा झुडुपांतून गार्गी अगदी सांभाळून चालत होती न जाणो एखादं जनावर त्यात असायचं. पण तिथे सगळंच शांत होतं. आर्किअलॉजीला अॅडमिशन घेतल्यापासून ती इतक्या वेगवेगळ्या आणि गूढ जागांवर गेली होती की भीती हा प्रकार तिच्या आयुष्यातून केव्हाच हद्दपार झाला होता. पण या ठिकाणी मात्र तिला खूप वेगळं वाटत होतं. अगदी चिटपाखरूही नाही अशी निर्मनुष्य जागा तिने आजवर पहिली नव्हती. “इथे काहीतरी गूढ अनाकलनीय आहे हे नक्की”, असा विचार करत ती दरवाजाजवळ पोचली.

दरवाज्याजवळ गेल्यावर मात्र तिला आंतरिक ओढ जाणवत होती. असं वाटत होतं कोणीतरी तिला आतमध्ये बोलावतंय. वर्षनुवर्षं तिची वाट पाहतंय. हीच अगदी हीच भावना तिला त्या नवव्या मजल्यावर जाणवत असे. कोण असेल ती लहान मुलगी? आणि फक्त मलाच का दिसते? इथे या अनोळख्या जागी मला अशी हुरहूर का लागली आहे? काय साम्य आहे या दोन जागांमध्ये? इथे सगळंच कसं निवांत? अगदी पक्षी, फुलपाखरं, भुंगे, वटवाघूळ कोणीच कसं नाही? आत जाऊन बघू का?असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते. पण आत जाण्याची आंतरिक उर्मी तिला स्वस्थ बसू देणार नव्हती.  तिला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची आणि ‘त्या’ नवव्या मजल्यावरच्या रहास्याची उकल शोधायचा उपाय कदाचित याच घरात मिळणार होता.

“थांब तिथेच थांब, एक पाऊलही पुढे टाकू नकोस.” पाठीमागून आलेल्या एका स्त्री च्या आवाजाने गार्गी दचकली. तिने मागे वळून बघितलं तर ती बाई तिच्याकडेच येत होती.

“मला वाटलंच होतं, आज ना उद्या तू इथे येणार. आत जाऊ नकोस पोरी.”

“कोण आहात तुम्ही?” गार्गी.

“माझ्याच घरी येऊन मलाच विचारतेस, ‘कोण आहात तुम्ही?’ मी या घराची मालकीण डॉ. सुबोधनची बहीण, प्रज्ञा.”

“मला डॉ. सुबोधननां भेटायचं आहे.” गार्गी.

“ते आता या दुनियेत नाहीत”, प्रज्ञा.

हे ऐकून तर गार्गीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. पण स्वतःला सावरत ती म्हणाली, “आय अॅम सॉरी. पण कधी कसं?”

“तुला खूपच प्रश्न पडलेले दिसतायत. माझ्याबरोबर येशील? मी तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते.” प्रज्ञा.

“कुठे नेताय तुम्ही मला? जे काही सांगायचं आहे ते इथेच सांगा ना सगळं”, गार्गी.

“नाही, इथे नाही. कळत नाही तुला इथलं वातावरण किती विचित्र आहे, अचेतन आहे इथे सगळं. तुला जर तुझ्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर माझ्यासोबत यावंच लागेल”, प्रज्ञा.

“का येऊ मी तुमच्यासोबत? कोण आहात तुम्ही? तुम्हाला कसं माहिती माझ्या प्रश्नांबद्दल?”गार्गी.

“मी कोण आहे हे मी तुला मगाशीच सांगितलं आहे. बाकीच्या तुझ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, ‘अध्यात्म!!”, गूढ हसत प्रज्ञा म्हणाली.

‘अध्यात्म’ हा शब्द ऐकून गार्गीची खात्री पटली या बाईला नक्कीच काहीतरी माहिती आहे. ती काही न बोलता तिच्यासोबत जायला निघाली.

एका स्वच्छ सुंदर तळ्याकाठी असणाऱ्या शंकराच्या छोट्याशा  मंदिराजवळ दोघीजणी पोचल्या. गार्गीने ही जागा आजवर कधीही बघितली नव्हती. खूप सुंदर जागा होती ती. अगदी मंगलमय वातावरण, पाखरांची गुंजारव, मधूनच हलकीशी येणारी वाऱ्याची झुळूक, गार्गीला खूपच प्रसन्न वाटलं.

देवळाला वळसा घालून बाजूला लागूनच असणाऱ्या एका झोपडीवजा छोट्याशा घराजवळ त्या दोघी गेल्या.

“ये ना आत ये, माझंच घर आहे हे”, प्रज्ञा.

गार्गीला आश्चर्य वाटलं, पण भीती मात्र अजिबात वाटली नाही.

“गार्गी, मला माहिती आहे तू हॉस्पिटलच्या त्या नवव्या मजल्यावरचं रहस्य शोधायचा प्रयत्न करतेयस. ते रहस्य मला माहिती आहे. मी तुला सगळं सांगेन पण इथे नाही. कारण मला सगळ्या गोष्टी डॉ. दीक्षितांच्या उपस्थितीतच स्पष्ट करायच्या आहेत.” प्रज्ञा.

“डॉ. दीक्षित? त्यांना माहिती आहे सगळं?” गार्गी.

“सगळं माहिती आहे का, हे नाही सांगता येणार. पण त्यांना बरंच काही माहिती आहे, जे या दुनियेला माहिती नाही. सुबोधनने त्या रहस्याची उकल केली होती. पण तो….”

“पण तो काय?” गार्गी.

“गार्गी, मला वाटतंय सुबोधनही त्या मजल्यावर आश्चर्यकारकरित्या गायब झाला आहे. सुबोधनचा स्वभाव विक्षिप्त होत त्यामुळे ही बातमी दडवणं फार काही कठीण नव्हतं. पण तो खरंच गायब झाला का केला गेला, या प्रश्नाचं उत्तर मला डॉ. दीक्षितांच्या तोंडून ऐकायचं आहे.” प्रज्ञा.

हे सारं गार्गीसाठी अनपेक्षित होतं. ती पूर्णपणे गोंधळून गेली होती. ज्या माणसाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून तिच्या आईचे प्राण वाचवले त्या माणसावर असे आरोप? जर सुबोधनला गायब करण्यात आलं असेल तर डॉ. शारंगपाणी आणि इन्स्पेक्टर राघव यांनाही….गार्गीच्या मेंदूतले विचार तिच्या मनाला पटत नव्हते. तिच्यासमोर सगळे प्रश्न आवासून उभे होते. त्यात प्रज्ञाला तिच्याबद्दल एवढी सगळी माहिती कशी? या नवीन प्रश्नाची भर पडली होती.

“सांग गार्गी, मला मदत करशील? नाही तुला करावीच लागेल. कारण तुला लहानपणी पडणारं स्वप्न आणि त्या नवव्या मजल्यावरचं रहस्य याची उकल फक्त मीच करू शकते.” प्रज्ञा.

“तुम्हाला माझ्याबद्दल एवढी सगळी माहिती कशी काय? माझ्याबद्दलची एवढी खडान खडा माहिती फक्त माझे आई बाबाच सांगू शकतात. ज्या गोष्टी इतर कोणालाच माहिती नाहीत त्या तुम्हाला कशा कळल्या?” गार्गी.

“तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळवणं तुझ्याच हातात आहे गार्गी”, गूढ हसत प्रज्ञा म्हणाली.

गार्गी गोंधळून गेली होती. पण आता मात्र तिला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी होती. अखेर प्रज्ञाला डॉ. दीक्षितांची भेट घालून देण्याचं आश्वासन देऊन गार्गी तिथून निघून गेली.

क्रमश:

Image by Emre Akyol from Pixabay 

Manasi Joshi
Latest posts by Manasi Joshi (see all)

Manasi Joshi

कायद्याची पदवी. सात वर्ष लीगल फिल्डमध्ये काम केल्यावर नंतर स्वखुशीने स्वीकारलेला 'हाऊस वाईफ'चा जॉब. आवड म्हणून सुरू केलेलं लिखाण आता प्रोफेशनमध्ये बदललं आहे. सध्या अर्थसाक्षर.कॉम या वेबसाईटसाठी एडिटर आणि कंटेंट मॅनेजमेंटचं काम करते. - मानसी जोशी

5 thoughts on “नवव्या मजल्यावरचं रहस्य(भाग २ )

  • September 20, 2019 at 5:37 am
    Permalink

    👌👌👌

    Reply
  • September 20, 2019 at 6:20 am
    Permalink

    great. waiting for next part

    Reply
  • September 20, 2019 at 8:46 am
    Permalink

    Very interesting. Eager to read next part

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!