अतर्क्य (भाग4/7)
मनसुखलाल.
जगनसेठचा एकुलता एक मुलगा.
वय वर्षे तेहतीस.
बी.काॅम.
ही डिग्री जगासाठी .
धंद्यासाठी त्याचा काही ऊपयोग नाही.
धंद्याचं बोलाल तर त्यानं डाॅक्टरेट मिळवलेली.
व्यापार त्याच्या रक्तातच.
दहावी झाल्यापासून तो पेढीवर बसायचा.
जगनसेठचं बोट धरून त्यानं धंद्यातली मुळाक्षरं गिरवली.
आणि आता , धंद्याची युनिव्हर्सिटी काढून बसलेला.
दिवस रात्र धंद्याशिवाय याला दुसरं काही सुचत नसे.
पेढीत खतावणीत डोकं खुपसून बसणार.
मान तिरकी.
मान आणि कान यांच्यामध्ये सतत टेलिफोन आसर्याला.
दुपारचा जेवणाचा डबा पेढीवरच यायचा.
सकाळी नऊ ते रात्री सात हा पेढीवर.
सातनंतर घरी गेला तरी सेलफोनवर सिर्फ धंदे की बात.
गावोगावी फोन चालायचे.
भावांचे चढउतार.
जोडीला याचा पारा वरखाली व्हायचा.
पैशाच्या जोरावर चार विश्वासू माणसं जोडलेली.
त्यामुळे धंदा पळत होता.
अगदी टाॅप गिअरमध्ये.
धान्याची कोठारं ओसंडून वहात होती.
तसा मनानं चांगला.
नफ्यातला दहा टक्के हिस्सा दान करायचा.
जिथे खरी गरज आहे अशा ठिकाणी.
सत्पात्री दान.
पुन्हा गुप्तदान.
या हाताची त्या हाताला खबर नाही.
आता धंदा म्हणला की साठेबाजी आली.
दहा ठिकाणी कायदा वाकवणं आलं.
हात ओले करणं आलं.
मनसुखलाल ‘तयार’ माणूस होता.
कधी कुणाला फसवणार नाही.
कुणाचं नुकसान करणार नाही.
स्वतःचं तर नाहीच नाही.
फक्त टॅक्स म्हणलं की त्याची सटकायची.
आपल्या मेहनतीच्या जोरावर आपण पैसा कमवतो.
मग तीस चाळीस टक्के सरकारच्या घशात कशाला घालायचा ?
शक्य तितक्या प्रामाणिकपणे तो टॅक्स चुकवायचा.
कायदा वाकवायला जायचा तो अशा वेळी.
मनसुखलालच्या मते हे पाप नव्हतंच.
तरी सुद्धा या पापापासून मुक्ती हवी म्हणून ते दहा टक्के सत्पात्री दान.
त्या दहा टक्क्यांच्या जोरावर आपले नव्वद टक्के पचतात असं मनसुखचं धंद्याचं प्रामाणिक गणित.
मनसुखची महत्वाकांक्षा खूप मोठी होती.
चांगला अभ्यास होता.
जणू भावांच्या चढउताराची भाषा फक्त त्यालाच समजत होती.
त्याचा अंदाज कधीच चुकायचा नाही.
पंधरा लाखाचे तो सहज पन्नास करी.
पण त्याच्यामते खरे गुंतवायला हवे पन्नास लाख.
मग त्याचे…..
जाऊ दे ना.
अजूनही जगनसेठ पेढीवर येत.
तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडेच होत्या.
मनसुखला चाव्यांमधे कधीच इन्टरेस्ट नव्हता.
त्याच्यासाठी महत्वाची होती ती धंद्यातली गुंतवणूक.
ती वाढवायला जगनसेठ तयार नव्हते.
जगनसेठच्या मते कुठं थांबायला हवं, हे मनसुखको समझ नही आ रहा है….
ईथंच जगनसेठ आणि मनसुख यांच्यात फाटायचं.
बापावर त्याचा जीव होता.
पण धंदा त्याचा जीव की प्राण होता.
अगदी कुणाचाही जीव घेण्याईतका , त्याचा जीव धंद्यात अडकलेला.
तुरडाळीचा भाव वाढणार …. ढगाला भिडणार.
मनसुखला खात्री होती.
कमीत कमी साठ लाखाचा माल भरला पाहिजे.
दोन अडिच कोट मुनाफ्याला मरण नाही.
पण जगनसेठ तयार होईनात.
शिवापूरची पाच एकर जमीन विकली तर सहज जमेल.
तेवढी रिस्क घ्यायलाच हवी.
शिवाय मनसुखलाल कर्जाऊ पैसे मागत होता.
नाही… तरीही नाही.
……..
जगनसेठनं दुनियेला अलविदा केला , त्या वक्ताला त्याच्या खोलीत शिवापूरच्या जमिनीचे कागजात सापडलेले.
पण आखिर तक जगनसेठनं त्याच्यावर दस्तखत केला नाही.
……..
कही….
धंद्यासाठी पैसा दिला नाही म्हणून मनसुखचा गुस्सा बेकाबू झाला अन् त्यानं जगनसेठला कायमचा रिटायर्ड केला…
कनफ्युज्ड.
साला, काय बी कळत नाय.
जल्दी का करते तुमी ?
आत्ता तर कुठे फाईल ओपन झालीय.
तपास चालू आहे.
(क्रमश 🙂
Image by Gerd Altmann from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
,👌👌👌
Lavakar purn kara tapas rao
aropi vadhat challet
pudhache bhaag ajun ale naahit ka?
👌👌👌