कंपासपेटी (रंग- नारिंगी)
दिपू जरा हळूहळूच चालत होता आज परतीच्या वाटेवर. खरतर नेहमीसारखे पळत पळत जाऊन दप्तर फेकायचे, पटकन काहीतरी खाऊन गल्ल्लीच्या टोकाशी असलेल्या ग्राउंड वर खेळायला जायचे हा त्याचा रोजचा दिनक्रम. पण आज त्याचा पाय उचलत नव्हता. यावर्षी नवीन पुस्तके घेऊया असे बाबा म्हणलं होता. पण ऐन वेळी मग सिद्धूची पुस्तके घेऊन आली आई. आई सिद्धूच्या घरी पोळ्या आणि बाकीचे काम करायला जायची. सकाळी सकाळी तिला बाबा त्याच्या गाडीवरून सोडायचा. मग घरी यायचा आणि पटकन काहीतरी खाऊन दिपूला शाळेत सोडून कामावर जायचा. दिपूची शाळा सुटली कि दिपू चालत चालत घरी येई. कधीतरी त्याची आई लवकर निघाली कामावरून तर त्याला घ्यायला येई. तसे काही दिपूला कुणी न्यायची आणण्याची गरज नव्हती. कालच आजी म्हणाली होती ना दिपू आता मोठा झालाय म्हणून. पण तरीही बाबा त्याला सोडायला यायचा.
सिद्धूची पुस्तके छान होती. सिद्धू वापरायचाही एकदम नीट. त्याच्या आईने म्हणजे मायामावशीने सिद्धूला सांगून ठेवले होते की नीट वापरून पुढच्या वर्षी ही पुस्तके दिपूला दे म्हणून. सिद्धू त्यामुळे पुस्तकांना खूप जपे. पण तरीही यावर्षी दिपूला स्वतःची कोरी पुस्तके हवी होती. त्याची जुनी पुस्तके वापरायला ना नव्हती पण त्याला मनातून बाकीच्या मुलांसारखी एकदा तरी नवी कोरी पुस्तके घ्यायची होती. शेजारी बसणाऱ्या मंजूने एकदा त्याला तिच्या नव्या पुस्तकांचा वास घ्यायला लावला होता. दिपूला तो वास इतका आवडला होता की नंतर बराच वेळ तो मंजूच्या सगळ्या पुस्तकांचा वास घेत बसला होता. मंजूने शेवटी त्याच्या हातातून पुस्तक हिसकून घेतले होते
“सगळा वास उडून जाईल की रे. सारखा सारखा काय वास घेत बसतोस माझ्या पुस्तकांचा”.
दिपूने अपराधी चेहरा करून तिला पुस्तके परत केली होती. मंजू त्याची खूप चांगली मैत्रीण होती. अधूनमधून तो तिला घरी केलेली दाण्याची चटणी देत असे. ती त्याच्यासाठी शिरा घेऊन येई. मंजू, दिपू, प्रकाश,अनुज, महेश असे सगळे एकत्र डबा खात. महेश दिपूच्या शेजारच्या चाळीत राहत असे. संध्याकाळी शाळेतून ते बऱ्याचदा एकत्र येत. दोघेही क्रिकेटच्या एकाच टीमकडून खेळत. दिपूची आई महेशच्या आईच्या चांगल्या ओळखीतली होती.
पुढच्या वर्षी आपण आठवीत जाणार. बरेच दिवस तो विचार करत होता की बाबाला सांगायचे मला पुढच्या वर्षी कोरी पुस्तके घेऊन दे म्हणून. त्यात आज प्रकाशने नवीन चकचकीत पत्र्याची कंपासपेटी आणली होती वर्गात. छान केशरी नारिंगी रंगाची होती. त्यात दोन कर्कटक, पट्टी असे बरच काय काय होते. कर्कटक अडकवण्यासाठी एक छान प्लॅस्टिकची खाचा असलेली पट्टी पण होती आत. प्रकाशला ती कंपासपेटी त्याच्या आत्याने दिली होती. तिने आठवणीने प्रकाशासाठी आणली होती म्हणाला तो. खरतर दिपूला अजून ती हातात ठेवून बघायची होती. त्या पेटीचे कोपरे मऊ होते छान. पण प्रकाशने हात पुढे केल्यावर दिपूला ती परत द्यावी लागली. म्हणूनच दिपू शांतपणे विचार करत करत चालला होता. आता बाबाला पुस्तके मागवीत का कंपासपेटी हे त्याला कळेना झाले होते.
तो घरापाशी आला तेव्हा बराच वेळ झाला असावा. आई कारण चाळीच्या गॅलरीत ये जा करत होती. त्याचीच वाट बघत असावी बहुतेक. तो पळत पळत घरात शिरला.
काय रे इतका वेळ का लागला तुला?
अगं मी जरा आरामात चालत चालत आलो ना.
दिपूच्या आईने त्याच्याकडे निरखून बघितले.
रडला आहेस का बाळा? तिने मायेने त्याच्या तोंडावरून हात फिरवला. दिपूचे डोळे भरून आले. पण आता तो मोठा मुलगा झाला होता ना. त्यामुळे तो रडला नाही.त्याने तिच्या पदराला तोंड पुसले.
खायला दे ना. भूक लागलीय. अभ्यास पण आहे खूप.
दिपूची आई उठली. तिने एका ताटात पोळी आणि गूळ तूप त्याच्यापुढे ठेवले.
गोड नको ग. चटणी दे ना
अरे चटणी संपलीय. करते एक दोन दिवसात.
म्हणजे आता बाबाला किंवा आईला पैसे मिळेपर्यंत चटणी होणार नाही घरात हे त्याला कळले. त्याने गूळ तूप घालून पोळीची गुंडाळी करून खाल्ली. ग्लासभर पाणी पिऊन तो गॅलरीत आला.
काय रे.. खेळायला नाही का जायचे आज?
नाही नको.
का रे? भांडण झाले का कुणाशी?
नाही ग
मग? जा जरा खेळून ये.
आईने बळेच बाहेर ढकलले. त्यामुळे तो घराबाहेर पडला. शेजारच्या ग्राउंडवर पोचला तेव्हा जवळपास अंधार झाला होता. लांबूनच गेम आवरणारे मित्र त्याला दिसले. तो आल्या पावली मागे वळला आणि घरी गेला. घरी गेल्या गेल्या त्याने कोपऱ्यातून आपले दप्तर उचलले कॉटवर बसून अभ्यासाला सुरुवात केली. बाबा घरी आलेला होता. त्याने दिपूकडे बघितले. पण दिपू मान खाली घालून पुस्तक वाचत होता.
काय रे दिपू डॉन? काय करतोय रे?
अभ्यास करतो रे बाबा.
बरं बरं कसला अभ्यास करतो रे?
गणिताचा
असा? पुस्तक वाचून?
अरे बाबा मी आधी गणित वाचून बघतोय मग सोडवतो.
बाबाच्या मनात खरतर दिपूबरोबर खूप मस्ती करायचे होते. पण आज दिपूच शांत बसल्यामुळे बाबाचा पण नाईलाज झाला. जेवायची वेळ झाली तरी दिपू काही जागेवरून उठेना. शेवटी आई बाहेर बघायला आली. दिपू खूप मन लावून पुस्तक वाचत होता.
दीपुडी जेवायचे नाही का बाबुड्या तुला?
दिपूने आईकडे बघितले. ती कुतूहलाने त्याच्याकडेच बघत होती.
आलो ग आई म्हणत दिपू उठला. शांतपणे जाऊन तो पानावर बसला. मान खाली घालून त्याने जेवायला सुरुवात केली. त्याचे काहीतरी बिनसलंय हे आता बाबाच्या, आजीच्या पण लक्षात आले होते. आईने त्यांना डोळ्यांनी काही विचारू नका आता असे सांगितले.
रात्री सगळे आवरून आई बाहेरच्या खोलीत आली तेव्हा दिपू झोपी गेला होता. पटपट आवरून ती त्याला कुशीत घेऊन आडवी झाली. त्याला हलक्या हाताने थोपटत राहिली. उद्या महेशच्या आईला विचारायला पाहिजे शाळेत काही झाले का म्हणून विचारात तिचा डोळा लागला.
दुसऱ्या दिवशी दिपू जेव्हा शाळेत गेला तेव्हा त्याने नकळत प्रकाशच्या बाकाकडे बघितले. ती चकचकीत नारिंगी कंपासपेटी त्याच्या बाकावर समोरच ठेवली होती त्याने. दिपूला मनापासून ती उघडून बघायची होती परत एकदा. पण प्रकाशकडे मागायचे त्याच्या जीवावर आले. प्रकाशने खिशातून रुमाल काढून ती कंपासपेटी स्वच्छ पुसली. त्याची नजर दिपूकडे गेली. दिपू पेटीकडेच बघत होता. प्रकाशच्या ते लक्षात आले. त्याने पेटी उचलून दप्तरात टाकली. दिपू हिरमुसला. नंतर बाई वर्गात आल्या आणि पाढे सुरु झाले तशी तो ती पेटी विसरून गेला. आज तर त्याला बाईंनी शाबासकी पण दिली छान पाढे म्हणून दाखवल्याबद्दल. बाबाला सांगायलाच हवे होते आता संध्याकाळी. दिपू खुश झाला स्वतःवरच. त्या आनंदात त्याने गणिताचे पुस्तक उघडले आणि बाईंनी दिलेला अभ्यास करायला सुरुवात केली.
मधली सुट्टी झाली. मंजूने त्याला हाक मारली.
दिपू शिरा दिलाय रे आईने तुझ्यासाठी.
दिपूच्या चेहऱ्यावर हसू पसरले. आजचा दिवस मस्तच म्हणायचा.
अगं पण आज चटणी नाही आणली मी. संपली आहे घरातली. आई म्हणतेय थोड्या दिवसांनी करेन म्हणून.
बरं मग आई चटणी करेल तेव्हा मला दे काय नक्की आठवणीने.
दिपूने मान हलवली. मंजूने शिऱ्याचा डबा उघडला. दिपूचा चेहरा आनंदाने फुलून आला. मंजूच्या आईने आठवणीने त्याच्यासाठी शिऱ्यावर केळीचे काप घातले होते. त्याने चाटून पुसून शिरा खाल्ला. मंजू आणि तो मग बराच वेळ शाळेच्या पायरीवर बसून बोलत राहिले मधली सुट्टी संपेपर्यंत.
मंजू मी ना मोठा झालो की पुस्तकांचे दुकान काढणार आहे
अरे वा मग मी तुझ्या दुकानात येऊन पुस्तके घेऊन जाईन
चालेल. मग मी तुझ्यासाठी छान छान पुस्तकाने आणून ठेवीन.
पण मग तू वास नाही घ्यायचा त्यांचा.
नाही घेणार.
शप्पत?
हो अगदी. शप्पत?
दिपूने गळ्याला चिमूट लावली. मंजू हसली. मधली सुट्टी संपली. दोघेही वर्गात आले. आता भूगोलाचा तास होता. दिपूने पुस्तक काढले. नकळत त्याची नजर प्रकाशच्या बाकाकडे गेली. प्रकाशच्या बाकावर कंपासपेटी नव्हती. प्रकाश त्याच्याकडेच बघत होता. दिपूच्या लक्षात आले. तो काही बोलला नाही. प्रकाशने बॅगेत हात घालून कंपासपेटी काढली आणि बाकावर ठेवली. दिपूचे डोळे लकाकले. त्याची नजर प्रकाशकडे गेली. प्रकाश अजूनही त्याच्याकडेच बघत होता. दिपू ओशाळला. त्याने मान फिरवली. भूगोलाचा तास संपल्यावर प्रकाश पेटी उचलून त्याच्याकडे आला.
ए दिपू .. तुला बघायचीय का पेटी? त्याने दिपूच्या समोर पेटी धरली.
नाही नको.
का रे? कालपासून डोळे फाडून फाडून बघतो तर आहेस पेटीकडे?
हो चुकले माझे. दिपू शांतपणे म्हणाला. मंजू रागाने प्रकाशकडे बघत होती.
सांगू का माझ्या आत्याला तुझ्यासाठी एक आणायला?
नको. माझ्या बाबाला आवडणार नाही.
जा तर मग. परत असे डोळे वटारून माझ्या पेटीकडे बघू नकोस.
दिपूने प्रकाशकडे बघितले. प्रकाशच्या चेहऱ्यावर कुचकट हसू होते. दिपूने त्याच्या हातातल्या पेटीकडे बघितले.
नाही बघणार तुझ्या पेटीकडे मी परत.
तेच सांगतोय मी. बघू नकोसच. आणि हवी असेल तर सांग. माझी आत्या आणून देईल तुला पण एक.
प्रकाश त्याच्या जागेवर जाऊन बसला. मंजूने दिपूकडे बघितले. दिपूने हनुवटी आवळून धरली होती. त्याचे आजूबाजूला लक्ष नव्हते. वर्गातल्या सगळ्यांना कळले होते काय झाले ते. त्याच्या सुदैवाने त्यानंतर लगेच शाळा सुटली.
बाबा ….
त्याच्या दिशेने हाक आली. दिपूने मान वर केली. त्याची छोटीशी परी सई त्याला बोलावत होती. दिपू तिच्यापाशी गेला. सई कंपासपेटी बघत होती. तिच्या हातात एक बाहुलीचे चित्र असलेली छान मॅग्नेटची कंपासपेटी होती. तिच्या पाठीमागे तिचे आजोबा उभे होते. ते कुतूहलाने दोघांकडे बघत होते.
बाबा मी ही घेऊ?
बेटा शाळेत चालणार नाही ही तुझ्या?
पण मला ही आवडली ना.
दिपूने सईकडे बघितले. तिच्या डोळ्यात बाबाबद्दल खात्री डोकावली. तिच्या चेहऱ्यावरची आस बघून दिपू हेलावला. त्याने तिला जवळ घेतले.
घे
सई उड्या मारतच तिच्या आईकडे पळाली. दिपूला हसूच आले तिचे. तिचे आजोबाही हसले. खरेदी आटपून तो बिलिंग काउंटरला आला. कार्टमधून एकेक वस्तू काढून तो काउंटरवर ठेवत होता. बिलिंग झाले. हेल्परने सगळ्या वस्तू पिशवीत भरायला सुरुवात केली
थरथरत्या हातानी सईच्या आबांनी एक खोका काउंटरवर ठेवला.
दिपू याचे पैसे मी देणार आहे आज असे म्हणत त्यांनी शंभराची नोट त्या बॉक्स वर ठेवली.
त्यांनी तो बॉक्स उचलून दिपूच्या हातात ठेवला. दिपूला काही कळलेच नाही. त्याने बॉक्सचे कव्हर काढले. त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्यांने बाबाला मिठी मारली.
त्याला थोपटत बाबा म्हणाला
दिपू मी नाही रे घेऊन देऊ शकलो तुला त्यावेळी. खूप ऐकलेस ना तू.
दिपूने विस्मयाने बाबाकडे बघितले. त्याला कसे कळले असेल काय झाले ते
बाबाने त्याच्या पाठीवर थोपटले.
जाऊ दे. नको विचार करुस त्यावर इतका.
हातात एक साधी नारिंगी कंपासपेटी घेतलेल्या बाबाचे डोळे आबा का पुसतायत हे मात्र सईला उमजत नव्हते.
लेखिका- प्राजक्ता काणेगावकर
Image by SUMITKUMAR SAHARE from Pixabay
- प्राजक्ताचा दरवळ - September 7, 2023
- सोळा नंबरच्या आजी - February 10, 2022
- पुढचं पाऊल- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- सुचेता गोखले - July 7, 2021
खूपच सुरेख… डोळे पाणावले आणि शहारा आला 👌👌
भावपूर्ण ! लहान मुलांच्या विश्वात शिरलो की आपणही त्यांच्याएवढेच होतो, आणि त्यांची सुखदुःखे ही आपलीच होतात.
मनाला स्पर्श करुन गेली. सुरेख!
मनापासून धन्यवाद 🙏
हल्ली काय म्हणतात नं तशी टचिंग कथा आहे ही.
खूप छान
Top class
फारच सुरेख…कधी कधी वाटते आपल्या मुलांना हे असे अनुभव कळतील का… ही समज त्यांच्यात येईल का?
माझ्या मुलाला नक्की वाचून दाखवणार आहे मी ही गोष्ट
Khup chan. Ekdam bhavasparshi
मस्तं.. मला वाटतं आपण प्रत्येक जण ह्या प्रसंगातून कधी न कधी जातोच….
खूपच छान..
👌.
खुपच छान कथा 👌👌
too good
Super!
खूपच छान👌🏻
touching!!