दिपस्तंभ
“मेरे को पढना है अम्मी. तुम काय को हमेशा मेरेउपर चील्लाती रहती हो? अब्बू तो कभी कुछ नही बोलते” १२ वर्षांची सकीना आपल्या अम्मीशी वैतागून बोलत होती. तिची आम्मी म्हणजे शबनम. तिचा शोहर अन सकीनाचा अब्बू म्हणजे अब्दुल शेख. गावाच्या मध्यभागी त्याचं छोटंसं गॅरेज होतं. कुठलीही दुचाकी किंवा गावात आलेल्या काही नामवंतांच्या चार-दोन चारचाकी गाड्या तो तिथे दुरुस्त करीत असे. दुरुस्त म्हणजे काही जुजबी काम तो करीत असे. तसं त्याने काही प्रशिक्षण घेतलं नव्हतं पण खूप वर्षांपूर्वी त्याच्या मामुकडे मुंबईला त्याच्या गॅरेजमध्ये हेल्पर म्हणून त्याने काम केलं होतं तिथेच त्याचं प्रशिक्षण झालं होतं. मुंबई काही त्याला विशेष मानवली नाही. तब्येतीच्या कारणांमुळे काही वर्षांनी तो गावी परतला तो परत कधीच मुंबईला न जाण्याचं ठरवूनच.
गावी येऊन त्याने बरेच उद्योग केले. काय काय केले ते आता त्याला स्वतःलाच आठवत नसेल. गेल्या काही वर्षांत गॅरेज अन केळी विक्री हे दोन व्यवसाय तो करत आला होता. अब्दुल भाई म्हणजे किडकिडीत शरीरयष्टी, साडे पाच फुट उंच, गोरा वर्ण, पिंगट डोळे, उभा चेहरा, त्यात गालफाडं आत गेलेली, कायम मेंदी लावल्यामुळे लालसर तांबडे झालेले केस. ते कायम फिरवून मागे वळवलेले, तोंडात नेहमी पानाचा तोबरा. त्यामुळे ओठ कायम लालबुंद, बोलायला सुरुवात करण्याआधी तोंडातल्या पानाची एक जोरदार पिंक बाजूला टाकत असे. त्याची अजून एक सवय म्हणजे बोलताना, दाढेमध्ये अडकलेल्या सुपारी किंवा बडीशेपच्या तुकड्याला जिभेने खरवडून बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे होणारा वेडावाकडा चेहरा. अशा ह्या अब्दुल भाईला मी कित्येक वर्षे पाहत आलोय.
गावी आल्यानंतर त्याच्या अम्मी अब्बुनी त्याचा शबनमशी निकाह लाऊन दिला. लग्नानंतर ४ मुलं झाली. पहिला जावेद आता १४ वर्षांचा होता. दुसरी सकीना, तिसरा माजीद ५ वर्षांचा अन सगळ्यात धाकटी जस्मिन ३.५ वर्षांची. साकीनाच्या पाठी झालेल्या दोन मुली, जन्मताच कुठल्याश्या तापाचे निमित्त होऊन गेल्या होत्या. जावेद जेमतेम ९ वी पर्यंत शिकला. अन अब्बुच्या बरोबर गॅरेजवर जाऊ लागला. अब्दुल भाईने त्याला शिकवण्याचा भरपूर प्रयत्न केला पण तो काही ते ऐकत नसे. मग केळाच्या गाडीवर तो बसू लागला अन त्याचे अब्बू गॅरेजमध्ये.
घरची परिस्थिती काही खास नव्हतीच. दोन वेळच्या जेवणाची कशीतरी सोय व्हायची. आता छोट्याश्या गावात रोज रोज गॅरेज मध्ये किती गाड्या दुरुस्तीला येणार म्हणा. छोटंसं तीन खोल्यांचं घर त्याच्या अब्बुंकडून, त्याच्या वाटणीला आलं होतं. समोर एक ओसरी त्याच्या आत मध्ये तशीच अजून एक खोली. उजव्या हाताला छोटीशी रसोई. घराला कधीतरी हिरवट पिस्ता रंग दिला असावा ह्याच्या काही ठिकाणी खुणा शिल्लक होत्या. बाकीच्या भिंती आगदीच रंग उडालेल्या, कसले कसले डाग पडलेल्या अशाच होत्या. वरच्या पत्र्याच्या छपराचा गरमी मध्ये त्रास होत असे. पण काय त्या घरात राहणाऱ्या सगळ्यांनाच त्याची सवय झालेली होती.
जावेद काही पुढे शिकायचं नाव घेत नाही हे पाहून शबनम अन अब्दुल दोघांना खूप वाईट वाटत होतं. पण सकीना हुशार होती. ६ वी पर्यंत वर्गात पहिल्या पाचात तिचा नंबर असे. अब्दुल भाईला भारी कौतुक वाटे तिचं. ह्यावर्षी ७ वीतल्या स्कॉलरशिप परीक्षेला बसण्याची तिची इच्छा होती. निकम मास्तरांनी तिला वर्गात उभे करून तू नक्की बस ह्या परीक्षेला असे बजावले होते. अन तेच ती आज शाळेतून आल्या आल्या आपल्या आम्मिला सांगत होती.
शबनम: “उन्हे मास्तरांको क्या जाता परीक्षाको बैठो बोलनेको? पैसा किधर से आयेगा? और तुम्हने पढके भी घरहीच संभालनेका है. तेरे अब्बू मेरी बाता नही सुनते. पाहिलेच बोला था पांचवी तक पढाई हुई अब बस हो गया. इधर घर मे खानेको नही दाना. और तुमको परीक्षा के लिये पैसे चाहिये. कुछ पैसे वैसे नही मिलेंगे. अभी बस हो गयी पढाई. अभी २ – ३ साल मे तेरा निकाह हो जाये तो अल्लाह का शुक्रिया.”
वास्तविक जो मुलगा शिकून आपला आधार बनेल अशी आशा होती तो काही शिकला नाही अन हिला शिकवून तरी काय उपयोग ही शेवटी जाणार निकाह करून म्हणून शबनमचा तिच्या शिक्षणाला विरोध होता. ग्रामीण भागात स्वतः जन्मापासून वाढलेल्या शबनमची मुलगी म्हणजे परक्याचे धन. तिला शिकवून काय फायदा? अशी टिपीकल मानसिकता होती.
अब्दुल घरी आल्या आल्या सकीनाने त्याला स्कॉलरशिप परीक्षेबद्दल सांगितले. तो लगेच तयार झाला. हे बघून शबनम अजूनच चिडली.
शबनम : “इत्ती पर्वा कभी बेटे के पढाई की भी होती तो चल जाता. इधर घर में खानेको कुछ नही और लडकी को पढाने चले. मेरी बाता कभी सुनतेच किधर है आप”?
अब्दुल भाई : “क्या हुवा? इत्ता घुस्सा काय को उसके उपर? मैने उसको भी पढने को बोल्या था पर अगर वो खुद पढना नही चाहता तो उसमे इस बच्ची का क्या कुसूर. मै तो अभीभी तैय्यार हुं उसे भी पढाने को. पर कम्बख्त, उसे तो पुछ वो जाना चाहता है क्या स्कूल मे?”
शबनम : “आपको तो मेरे बेटेको कोसने का बहानाहाच चाहिये और क्या?
अब्दुल भाई : “देख शबनम जैसे जावेद अपना बेटा है, वैसेहीच सकुभी तो अपनीहीच बेटी है ना? मैने कभी दोनो को अलग नही समझा. अगर जावेद पढेगा लिखेगा तो मुझे को बुरा कायको लगेगा. मै उसको भी पढाउंगा.”
शबनम : “हां सबको पढायेंगे तो पैसा किधर से लायेंगे?”
अब्दुल भाई : “वो मै देख लुंगा तूम चिंता नको करु”
शबनम :”चिंता कैसे नको करु? कित्ती बार बोल्या वो गॅरेज का धंदा छोड दो. क्या मिलता है उसमे. मटन शॉप डालो बोल बोल के थक गयी.”
अब्दुल भाई : “मै भी कित्ती बार बोल्या मै नही करुंगा वैसा? गाव मे पाहिलेहीसेच एक मटन शॉप मेरे सगे भाईजान की है. तो उसके बाजू में, मै भी वहीच धंदा करू और फिर उसका धंदा बिठाऊ क्या”?
शबनम : “वाह रे भाईजान के भाई, कभी आये क्या आपके भाईजान अपनी हलत देखने के वास्ते. इत्ता तो कामते है. पर कभी पूछा है आपको”?
विषय पुन्हा जुन्याच गोष्टींकडे जातोय म्हटल्यावर अब्दुल गप्प झाला. हे नेहमीचच होतं. त्यामुळे त्यापुढे काहीही न बोलता बसून राहिला.
दुसर्या दिवशी सकीना उड्या मारत घरी आली. तिच्या परीक्षेची फी निकम मास्तरांनी भरली होती. नवीन पुस्तके दिली होती. आता फक्त अभ्यास करायचा अन परीक्षेत पास होऊन दाखवायचं, एवढच तिच्या बाल मनाला माहित होतं. पण शबनम अजूनच चिडली. अब्दुलने घरात पाउल टाकताच तिने विषय सुरु केला.
शबनम : “मेरी बात नहीच मानी ना आपने? दे दिये पैसे उसको? उपर से नयी किताबे.अब राशन कहा से आयेगा वो भी तो बताइये”?
अब्दुल : “शबनम उगाच मै घर पे आतेही झगडा नको करू. मैने नही दिये पैसे. निकम मास्तर ने भरे है. और किताबे भी उन्हीच दिलाये.”
शबनम : “उनको क्या पडी है इत्ती? जरूर कुछ होगा उनके दिमाग में. एक हिंदू होके हमारी मदत काय कु कर रहे है”
अब्दुल : “इसमे हिंदू मुस्लिम की बात कहा से आयी? वो हर साल होशियार बच्चोकी मदत करते है. जिसके पास फी भरने के पैसे ना हो वो उसको मदत करते है. बच्चे पढे, आगे बढे उसिमे उनको ख़ुशी मिलती है. और ये मै आऔर गाववाले जानते है.”
शबनम : “वो कुछ मै नही जानती. अगले साल उसका निकाह करावा दो. दिन बदिन ये मेरे गलेमे आफत ला रही है. इत्ती पढके क्या करेगी? निकाह कर के घरही संभालेगी. तो काय को ये सब कुछ? उपरसे पढ लिख के बादमे निकाह के लिये राजी ना हुई तो? वो फुफी कि आस्माने क्या किया था वो याद है ना? पढलिखके उसके पर निकल आये. फिर उसके जैसा पढालिखा दामाद कहा से मिलेगा? ये भी तो सोचो.”
अब्दुल ने तिला खूप समजावले पण ती ऐकायला तयारच नव्हती. दोन दिवस गेले अन अचानक एके संध्याकाळी अब्दुल भाई अन निकम मास्तर घराकडे येताना दिसले. शबनम बाहेर बसून काही काम करत होती ती आत पळाली. मास्तर अन अब्दुल भाई ओसरीत यॆउन बसले. त्यांची चाहूल लागताच ओढणी डोक्यावर घेऊन आणि पाण्याचे दोन ग्लास घेऊन शबनम बाहेर आली. हातातले ग्लास खाली ठेऊन झटक्यात ती पुन्हा आत जाण्यासाठी वळाली. अब्दुल म्हणाला “जरा चाय तो रख्खो शबनम”
निकम मास्तर म्हणाले “चहा राहू द्या शबनम भाभी. थोडं बोलायचं आहे तुमच्याशी”
शबनम जरा गडबडली मागे वळाली. अब्दुलने तिला थांबायला खुणावले. मग शबनम तशीच भिंतीला टेकून अंग चोरून उभी राहिली. काही क्षण शांततेत गेले.
मग निकम मास्तरांनी बोलायला सुरुवात केली “भाभी तुमची सकीना हुशार आहे, समंजस आहे. कोणाच्याही विशेष मार्गदर्शना शिवाय तिने आजपर्यंत पहिल्या पाचात नंबर काढलाय. स्कॉलरशिप मध्ये पास झाली तर चांगलच होईल. शिकू द्या तिला”
शबनम : “मास्तर उसको पढायेंगे तो क्या फायदा. आखिर है तो लडकी ही”
मास्तर : “म्हणून काय झालं भाभी? ती तुमचं नाव रोशन करेल. तुमचा मुलगा शिकला नाही म्हणून तिने पण शिकायचे नाही हे योग्य नाही. राहिला प्रश्न तिच्या शिक्षणाच्या खर्चाचा तर तो मी उचलतो. भाभी माझा स्वतःचा मुलगा पण जास्त शिकला नाही मग मी काय करायला हवे? गाव म्हणते मास्तर स्वतःच्या मुलाला नाही शिकवू शकला. पण ज्याची बुद्धी आहे तोच शिकणार. मास्तराचा मुलगा आहे म्हणून तो शिकणारच असे काही नाही आणि अब्दुल भाईची मुलगी आहे म्हणून ती शिकणार नाही असेही नाही.
अन काय तिच्या निकाहची घाई करताय? हे तिच्या निकाहचं वय नाही. तिचं शिक्षणाचं वय आहे. अन तिचं असं कमी वयात लग्न लावणे कायद्याच्या विरुद्ध पण आहे. त्या पेक्षा तिला शिकू द्या. बघा ती तुमच्या दोघांच नाव काढेल. तुम्हाला अभिमान वाटेल तिचा. असे तिचे शिक्षण थांबवू नका. तसा माझा काहीही हक्क नाही तरीही तुमच्या लेखी माझ्या म्हणण्याला काही किंमत असेल तर माझे एवढे ऐका”. मास्तर बोलायचे थांबले.
शबनमचा राग शमला. मुलगा शिकत नाही म्हणून मुलीला शिकू द्यायचं नाही ही खरी सल होती ती मास्तरांच्या बोलण्यानी कमी झाली होती.
शबनम : “अब, जैसा आप दोन्हो को ठीक लगे वैसा करो. और हं चाय लेकेही जाव” असे म्हणून डोळे पुसत शबनम आत पळाली.
मास्तरांचा विश्वास खोटा नाही ठरला. स्कॉलरशिपच्या परीक्षेत सकीना शाळेतच नव्हे तर जिल्ह्यात पहिली आली. पेपरात फोटोसहीत बातमी आली. त्यादिवशी अब्दुल अन शबनमच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. आपण आपल्या लेकीचं शिक्षण थांबवून केवढा मोठा गुन्हा करणार होतो हे शबनमला जाणवले.
“वो दिन मास्तर घर आयेच ना होते तो? उन्हे मेरेको समझाये ना होते तो? मै आपली सकूके निकाह कि बात पे ही अडी राहती तो? हाय अल्लाह… ना जाने क्या होता“. अशा कित्येक विचारांचं काहूर शबनमच्या मनात माजलं होतं.
आयुष्यात चुकीच्या विचारांच्या पगड्यात जगत असताना किंवा एखादी गोष्ट मनासारखी न झाल्यास, दुसर्या चांगल्या होऊ घातलेल्या गोष्टीलाही मन हरकत घेत असतं. तेव्हा आपल्या मनातील अयोग्य विचारांच्या काळोखात योग्य वाट दाखवणारे निकम मास्तरांसारखे दिपस्थंभ आयुष्यात येणे, खरंच किती गरजेचे असते नाही?
Image by David Mark from Pixabay
Latest posts by Abhijit Inamdar (see all)
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021
Sundar
Thank you
मस्त 👌
Dhanyavad
Mast
Thank you
uttam katha…surekh likhan