ब्लू…(रंग- निळा)
विस्तीर्ण पसरलेला निळाशार समुद्र. त्याच्यासोबत कितीही वेळ घालवा मन कधी भरतच नाही. रिया.. होय रियाच घेऊन आली होती मला या समुद्राकिनारी. शहराजवळ असूनही हे गाव तसं एकाकीच. आणि हा समुद्रकिनारा म्हणजे “अंडर रेटेड पिकनिक स्पॉट”! किती स्वच्छ आणि सुंदर आहे हा. इथली वाळू पण निळसर रंगाची. जगात इतकी ठिकाणं फिरलो पण कधी अशी सुंदर निळ्या रंगाची वाळू कुठेही बघितली नाही मी. इथे क्वचितच कोणी येतं. त्याला कारण पण तसंच आहे म्हणा. या समुद्राबद्दल एवढ्या अफवा पसरल्या आहेत सगळीकडे, त्याला कोण काय करणार? हा निळाशार समुद्र म्हणे माणसाच्या लाल रक्ताचा भुकेलेला आहे. हे मला जेव्हा कळलं, तेव्हा हसावं की रडावं, असा प्रश्न पडला.
मला तर खूप आवडली ही जागा. माझ्या लिखाणासाठी अगदी परफेक्ट. रियाच्या हट्टामुळे या किनाऱ्यावरचा बंगलाही विकत घेतला. इतका प्रशस्त बंगला पण अगदी ‘वन रुम किचन’च्या भावात मिळाला. आमच्या, आमच्या म्हणजे माझ्या आणि रियाच्या खोलीला लागून असलेल्या ओपन टेरेसमधून बरोबर समोर हा समुद्र दिसतो. वरती निळेभोर आकाश आणि समोर हा विस्तीर्ण पसरलेला समुद्र.. अहाहा… अजून काय हवं? आमचा तर प्रत्येक दिवस म्हणजे हनिमून होता. रिया प्रोफेशनल फोटोग्राफर आणि मी लेखक. आमच्या दोघांच्याही प्रोफेशनला अतिशय उपयुक्त असा हा परिसर. पण जरी या जागेची किंमत कमी असली तरी एकटी रिया हा बंगला खरेदी करू शकत नव्हती. गंमत म्हणजे या जागेची आख्यायिकाच अशी होती की कुठलीही बँक या बंगल्याच्या खरेदीसाठी कर्ज द्यायलाही तयार नव्हती. प्रेमात पडलो होतो मी रियाच्या. तिच्याशी लग्न करून सुखाचा संसार करायचा होता मला. पण तिला मात्र याच बंगल्यात गृहप्रवेश करायचा होता. मग काय करणार? या बंगल्याची बँक बॅलन्स हलका करावा लागला. मी बंगला विकत घेतला रियाच्या नावावर!
रियाने कितीतरी फोटोज काढले इथले. हजारोंच्या भावात विकले गेले ते. हा बंगला घेण्यामागे रियाचा विचारही अगदी प्रोफेशनल. इथले फोटो जेवढे प्रसिद्ध होतील तेवढी या जागेची प्रसिद्धी वाढत जाईल. सळसळणाऱ्या तरुणाईला अशा ‘हॉंटेड कम रोमँटिक’ जागा नेहमीच साद घालत असतात. एखाद्या कॉलेजच्या कट्ट्यावरच्या गॅंगमध्ये अशाच जागा पिकनिकसाठी ‘शॉर्टलिस्ट’ होत असतात. एकदा का ही जागा लोकप्रिय झाली की या बंगल्याचे रूपांतर लॉजमध्ये करायचं, रेस्तराँ कम बारही सुरु करायचा इथे. तसंही, अशा हॉंटेड जागी फॅमिलीज येणारच नाहीत. त्यामुळे बार, डान्सफ्लोअर, लॉज, निळया लाटांची गाज अजून काय हवं तरुणाईला?
‘ब्युटी विथ ब्रेन असणाऱ्या मुली तशा फार कमी असतात. त्यात परफेक्ट बिझनेस वूमनचे गुण असणारी तर, रियासारखी एखादीच! आम्ही या बंगल्यात राहायला आलो, लग्न करून नाही, तर लिव्ह इन मध्ये राहू लागलो. लग्नासाठी रियाला थोडा वेळ हवा होता. पण मला काहीच प्रॉब्लेम नव्हता मी खुश होतो तिच्यासोबत. पण तिला मात्र हे सुख मंजूर नव्हतं. तिला म्हणजे नियतीला नाही, रियाला!
माझी रिया… कधी माझी नव्हतीच ती. माझा पैसा हवा होता तिला फक्त. मला फसवत होती ती आणि हे मला जेव्हा समजलं तेव्हा मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी पण काही कमी नव्हतो. माझी कित्येक पुस्तकं सुपरहिट झाली होती. दोन कादंबऱ्यांवर चित्रपटही बनले होते. एक नावाजलेला लेखक होतो मी. रियासारख्या कित्येक मुली माझ्या मागे होत्या. नाही…… रियासारख्या नाही. रियासारखं कोणी असूच शकत नाही…
आता रडून काय उपयोग? जे घडायचं ते घडून गेलं. त्यादिवशी तिला तिचा मित्र कम सहकारी असणाऱ्या नीलच्या मिठीत पाहिलं आणि तळपायाची आग मस्तकात गेली. तसा तो अधूनमधून यायचा घरी पण मला कधी संशय नाही आला त्याचा. त्या दिवशीही मी काहीच बोललो नाही. मी फक्त एक प्लॅन केला, ‘परफेक्ट मर्डर प्लॅन’! शेवटी मी एक लेखक होतो. रहस्यकथा लिहिण्यात हातखंडा होता माझा.
खरंतर हा प्लॅन मी आधीच ठरवला होता. कसं आहे ना माझ्या कथा जरी काल्पनिक असल्या तरी त्यांना प्रत्यक्षात घडताना बघितल्याशिवाय त्या कथेचा शेवट सुचत नाही मला. पण रियाच्या बाबतीत माझं प्रेम आडवं आलं. पण त्या नीलने मात्र माझं काम सोपं केलं. रियाला सुरुवातीपासून निळ्या रंगाचं प्रचंड आकर्षण. ब्ल्यू डेनिम जीन्स म्हणजे तिचा वीकपॉइंट. प्रपोज केलं तेव्हाही ब्ल्यू डायमंड रिंग घेतली होती तिच्यासाठी. सालीला दारू पण जॉनी वॉकर ब्ल्यू लेबल आवडायची आणि म्हणूनच नावात निळ्या रंगाचा भास असणारा नील तिने बॉयफ्रेंड म्हणून निवडला बहुदा. मग मी ही ठरवलं कितीही झालं तरी माझं प्रेम आहे रियावर. तिचा मृत्यूही तिच्या आवडीच्या निळ्या रंगासहच व्हायला हवा.
याच खडकावर बसलो होतो आम्ही. रिया नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. नेहमीचीच ब्लू डेनिम जीन्स, आणि ब्ल्यू जॅकेट. सोबतीला तिची आवडती जॉनी वॉकर ब्ल्यू लेबल! संध्याकाळची वेळ. आकाशही स्वच्छ, निरभ्र. पट्टीची स्वीमर होती रिया. पण या शांत निळ्या सागराला माणसांच्या लाल रक्ताची ओढ आहे त्याला कोण काय करणार. दारूच्या नशेत ती या विस्तीर्ण समुद्रात आत आत चालत गेली. नाही, ती गेली नाही, मी तिला जायला भाग पाडलं. ती पुढे पुढे जात होती आणि संध्याकाळ मावळत होती. हळूहळू सगळीकडे अंधार पसरत चालला होता. अचानक काही कळायच्या आत ती दिसेनाशी झाली. ती जिथून गायब झाली तिथलं निळं पाणी क्षणात लाल लाल दिसायला लागलं. मी बसल्या जागी थिजून गेलो. पाणी लाल? पाण्यात व्यक्ती बुडाली तर तिचं फुगलेलं शरीर वर येतं. रक्त नाही. हे काहीतरी भलतंच आहे. कितीतरी वेळ मी त्या लाल पाण्याकडे बघत तसाच बसून होतो. भानावर आलो तेव्हा माझ्या पायपर्यंतचं पाणी लाल झालं होतं. कसाबसा धावत मी बंगल्यावर परत आलो. किचनमध्ये गेलो तर समोर जॉनी वॉकर ब्ल्यू लेबल! मी घाबरलो आणि ती बाटली खिडकीतून दूर भिरकावून दिली. समोरची बडवायझर तशीच उचलून घटाघटा प्यायली. त्यांनतर जाग आली ती बेलच्या आवाजाने. दार उघडून बघितलं, तर बाहेर कोणीच नव्हतं. सहज समोर नजर गेली. समोरचा निळा समुद्र नेहमीसारखाच शांत आणि सुंदर दिसत होता. लाल रंगाचा मागमूसही नव्हता तिथे. एव्हाना रियाची बॉडी पाण्यावर तरंगताना दिसायला हवी होती. किमान तिच्या हातातली बाटली किंवा तिची कुठलीतरी वस्तू तरी किनाऱ्यावर यायला हवी होती. पण काहीच दिसत नव्हतं. सगळं अगदी स्वच्छ आणि चकचकीत. या समुद्राकिनाऱ्यावर सगळंच स्वच्छ आणि नितळ कसं? किनाऱ्यावर कधीच कुठली घाण येत नाही. तसं बघायला गेलं तर, इथे स्वच्छता करायला कोणीच येत नाही. वाळूतही कधी खेकडे दिसले नाहीत. कधी कुठली बोट, लॉन्च, काहीच दिसलं नाही. अगदी भटके कुत्रेही कधी इथे फिरकले नाहीत. काहीतरी गडबड नक्की आहे. लवकरच इथून निघायला हवं. पण मी असा अचानक निघून गेलो आणि पोलिसांना रियाची डेड बॉडी सापडली, तर त्यांना माझ्यावरच संशय येईल. काय करावं काहीच कळत नाहीये.
बेलच्या कर्णकर्कश्य आवाजाने विचारांची तंद्री भंग पावली. मनातून खूप घाबरलो पण स्वतःला सावरत कसाबसा दरवाजा उघडला. समोर नील उभा होता. त्याला बघून मला अजिबात राग आला नाही. पण त्याच्या हातातली त्याच्या लग्नाची पत्रिका बघून मात्र पायाखालची जमीन सरकली. कसबसं त्याच्याशी बोलून त्याची बोळवण केली. नीलचं लग्न ठरलं होतं याचा अर्थ त्याच्यामध्ये आणि रियामध्ये काहीच नव्हतं. म्हणजे ती मिठी…??? ती एका मैत्रिणीने मारलेली मिठी होती, प्रेयसीने नाही.
अरे देवा!!!! मी हे काय केलं? मला माफ कर रिया. मी काय करू आता? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मी खूप गोंधळलोय. हा निळाशार समुद्र मला साद घालतोय. मी राहूच शकत नाही आता. मी येतोय रिया तुझ्याकडे. काही कळायच्या आतच मी हळूहळू त्या निळ्या समुद्रात खोल चाललोय. मला समोर रिया दिसतेय. निळी जीन्स, निळा top घातलेली…निळ्या आकाशाला डोक टेकलेली. बाकी तो निळा समुद्र शांत आहे…नवीन रक्ताची वाट बघतो आहे.
लेखिका- मानसी जोशी
Image by SUMITKUMAR SAHARE from Pixabay
- प्राजक्ताचा दरवळ - September 7, 2023
- सोळा नंबरच्या आजी - February 10, 2022
- पुढचं पाऊल- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- सुचेता गोखले - July 7, 2021
Bapre…kata aala.
ओह मस्त वेगळी कथा
वाह नेहमीप्रमाणे मस्त 👌👌
👌
👍
Terrific
मस्त