रुजवात- (रंग हिरवा)

ती होतीच पहिल्यापासून रंगवेडी. आपल्या सभोवतालचे, विशेषतः निसर्गातले सर्व रंग तिला मनापासून आवडायचे. निळ्याशार आकाशात, काळ्याभोर चांदण्या रात्रीत, पांढऱ्याशुभ्र हिमनगात, पिवळ्याजर्द फुलांत, हिरव्यागार रानात, सूर्याच्या लालचुटुक प्रतिबिंबात ती हरवून जायची, हरखून जायची. निसर्ग आपल्यावर इतक्या वेगवेगळ्या रंगांची उधळण करत असतो, ते किती आणि कसं मनात साठवून घ्यावं हेच समजत नसे. अश्या या रंगांच्या प्रेमात असलेल्या रंगवेडीला “तो” मिळाला, तर तो निघाला नेमका रंगांधळा. पिस्ता, तपकिरी रंगाला सरसकट हिरवा म्हणणारा, मॅजेंटा, गुलाबीला बेधडक लाल म्हणणारा, गुलबक्षी, मरून आणि लाल या सगळ्या रंगांना एकच समजणारा.
त्यांचे संवाद सुद्धा मजेशीर असायचे.
ती : ए तो अबोली रंगाचा टॉप घेऊ का?
तो : तो गुलाबी ना? घे की बिनधास्त.
ती : तो गुलाबी नाहीये रे, अबोली आहे.
तो : मला तर गुलाबीच दिसतो आहे, बोलत नाही म्हणून त्याला अबोली रंग म्हणतात की काय?
ती : विनोद सुचतायत तुला? साधं अबोली आणि गुलाबी मधला फरक कळत नाही तुला!  तो : हे बघ, अबोली रंगाचा घे किंवा गुलाबी, तुला दोन्ही रंग छान दिसणार आहेत, मग झालं तर!
ती : 🤦
ती : ती साडी कशी वाटते?
तो : मस्त आहे की, ती हिरवी ना?
ती : हिरवी नाही रे ती. रामा ग्रीन रंग आहे तो!
तो : हरे रामा! असं आहे होय? रामा ग्रीन पण रंग असतो? पण मग सीतालाल ही असेल, लक्ष्मणपिवळा? गेला बाजार मारुतीनिळा?
ती : 🤦
ती : ए त्या बाईची साडी मस्त आहे ना रे?
तो : कोणती बाई?
ती : ती काय, पारव्या रंगाची साडी.
तो : हां! ती जांभळी ना? मस्त आहे.
ती : जांभळी नाही रे. पारवा रंग आहे तो!
तो : हे बघ आपल्यासमोर दोन साडी नेसलेल्या बायका आहेत. त्यातला नेमका पारवा कुठला आणि जांभळी कुठला?
ती : हे बघ, डावीकडचा आहे तो पारवा आणि उजवीकडे त्या उंच बाईंनी नेसलाय तो जांभळा.
तो : असंय होय! छान आहेत हो दोघी.
ती : काय?!
तो : साड्या म्हणतो आहे मी. उजवीकडचा पारवा आणि डावीकडचा जांभळा, दोन्ही छान आहेत!
ती :🤦
ती : हे मरून नेलपेंट लावू का? छान दिसेल?
तो : साधं नेलपेंट लावायला मरायची काय गरज आहे?
ती : 🤦
ती: हा पिस्ता रंगाचा शर्ट मस्त दिसेल तुला.
तो : हा हिरवा? नको रे बाबा. त्यावर ब्राऊन पॅन्ट घालून गेलं की ऑफिसमधले लोक म्हणतात, “आज अख्खा आईस्क्रीमचा कोन दिसतो आहेस!”
ती : हिरवा नाहीये तो, पिस्ता आहे! इतका कसा रे तू रंगांच्या बाबतीत अनभिज्ञ?
तो : हे बघ, आता एकदा वैज्ञानिक संशोधनाने सुद्धा ठरवलंय ना, की पुरुषांना जगात फक्त सातच रंग दिसतात आणि बायकांना सात हजार? मग झालं तर, राणी कलर काय, अन राजा कलर काय, आपल्याला सगळे सारखेच.
ती : 🤦
अश्या त्या दोघांच्या जगात इवलूश्या सोनपावलांची चाहूल लागली. दोघांचं जग आता तिघांचं होणार होतं. तिने त्याला ही गोड बातमी सांगितली आणि म्हणाली,”आज मी इतक्या आनंदात आहे ना, की माझ्या भावना नेमक्या कश्या व्यक्त कराव्यात तेच समजत नाहीये.” साहजिकच तो ही खुश होता.
तो : मी सांगू? तुझ्या भावना आज फक्त एका रंगातच सांगितल्या जाऊ शकतात.
ती : खरंच? रंगात? त्या कश्या काय? सांग बघू माझ्या आजच्या भावना व्यक्त होतील असा कोणता रंग आहे?
तो : सांगतो. आज तुझ्या आनंदाचा रंग म्हणजे झाडावर नुकत्याच फुटलेल्या पालवीचा रंग. तो असतो बघ, मऊ लुसलुशीत, उन्हात चमकणारा, कधी सोनेरी, कधी हिरवागार दिसणारा, कधी पिवळसर झाक असलेला, सृष्टीतला सर्वात सुंदर रंग. तोच रंग आहे तुझ्या आनंदाचा आज. जरासा पोपटी असतो तो, थोडासा तपकिरी  आणि खूपसा हिरवट. एक नवीन झळाळी आणि लकाकी असलेला तुकतुकीत रंग. जगात सर्वात जास्त छटा हिरव्या रंगाच्या असतात म्हणे. तुम्ही स्त्रिया फार नशीबवान असता बुवा!तुम्हाला या सगळ्या सृष्टीला जीवन देणारा रंग प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो. हो ना? आहे ना तुझ्या भावना व्यक्त करणारा हा रंग?
तिने हसून मान डोलावली आणि म्हणाली, “परफेक्ट!” मग मात्र स्वतःशीच म्हणाली, वाटतो तितका रंगांधळा नाही हा. मनाचे रंग सहज दिसतात त्याला, आणि सृष्टी पहायला नुसती रंगांची पारख नव्हे तर दृष्टी हवी. एक सुंदर दृष्टी असलेल्या सहचराबद्दल तिने देवाला आणि त्याचबरोबर संपूर्ण आणि सतत नवीन जीवनाची रुजवात करणाऱ्या, रंगांनी भरलेल्या सृष्टीला मनोमन नमस्कार केला.
लेखिका- गौरी ब्रह्मे
Image by SUMITKUMAR SAHARE from Pixabay 

14 thoughts on “रुजवात- (रंग हिरवा)

    • October 4, 2019 at 2:33 pm
      Permalink

      Hi, want to read this

      Reply
  • October 4, 2019 at 5:32 am
    Permalink

    Wow ..khup chhan nital

    Reply
    • October 4, 2019 at 5:49 pm
      Permalink

      Gauri khoop chhan ! Ha Rama hirva Ranga malahi lagnantar sasubainkadun samajla. Tovar Mala Pan Sitamaicha Ram, kiva far far tar Rama gadi mahit hota;-) Sitalal, Laxmanpivla & Maruti Nila lol..hasun murkundi valali Majhi:-)

      Reply
  • October 4, 2019 at 6:14 am
    Permalink

    खूप गोड़ 👌👌

    Reply
  • October 4, 2019 at 6:16 am
    Permalink

    झकास 👌

    मरून नेलपेंट 😂

    Reply
  • October 4, 2019 at 10:19 am
    Permalink

    वाह…. अगदी प्रत्येक स्त्री हाच विचार करत असते …की आपल्याला पात्राला तेवढं रंग ज्ञान नाही…पण खरे बघायला गेले तर त्यांना पण अगदी सगळे कळत असते पण आपल्याला त्रास देऊन ते बावळट असल्याचा आपण जो दाखला देतो तो कदाचित आवडतो त्यांना… रंग कपड्यांचे काय आणि माणसांचे काय कळण्यापेक्षा उमजणे महत्वाचे नाही का

    Reply
    • October 6, 2019 at 1:13 am
      Permalink

      धन्यवाद. मस्त कॉमेंट

      Reply
  • October 4, 2019 at 6:23 pm
    Permalink

    सुरेख कथा बाकी त्याचे रंगांचे ज्ञान म्हणजे कहानी घर घर की 😊

    Reply
  • October 7, 2019 at 2:05 am
    Permalink

    किती छान लिहिलं आहेस गौरी👌🏻👌🏻

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!