स्वेटर…(रंग- राखाडी)

आतल्या खोलीतून हाक मारल्यासारखे वाटले तशी मीना आत धावली.

“काही हवे होते का आई?”

“नाही ग काही नको. येईलच आता सुनीता. तू जा कामावर.”

“नाही नको. मी थांबते. मला सुनीताला एक दोन गोष्टी सांगायच्या पण आहेत.”

“बरं. पण उशीर करू नकोस ऑफिसला.”

नाही असे म्हणून मीना वळली. किचनमध्ये येऊन तिने आवरायला घेतले. सुनीता येईलच इतक्यात. मीनाचे ऑफिस होतेही लांब. जायला यायला मिळून तिला सहज दोन अडीच तास लागत असत. शेखर निघून गेल्यापासून तिचे सगळे विश्व तिच्या सासूबाईंभोवती केंद्रित झाले होते. मीनाने तिशी ओलांडली होती. शेखरला दुसरी कुणी आवडते म्हणल्यावर तिनेच आपणहून बाजूला व्हायचा निर्णय घेतला होता.  अदितीला मात्र सासूजवळ राहण्यात काही इंटरेस्ट नव्हता. आई कुठे जाणार होत्या मग? त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय जवळपास पक्का झाला होता. शेखर जाऊन चौकशी पण करून आला होता तीन चार ठिकाणी. तसा तर मीनाचा काही संबंध उरलाच नव्हता त्या घराशी. एक दिवस आईंनी तिला बोलावून घेतले शेखरकडे. मीनाला जायचे नव्हते खरेतर. त्या घरात तिच्या असंख्य आठवणी होत्या. स्वतःच्या हाताने तिने छोट्या छोट्या गोष्टींनी ते घर सजवले होते. तिने धाडस करून आईंना बाहेर बोलावले. आईंना मात्र तिची मनस्थिती अचूक कळली. त्यांनीच बाहेर जेवायला जायचा प्लॅन केला. मीनाने कॅब बुक करून त्यांना पीक अप केले. दोघी छान व्हेज थाळी जेवल्या.

“मीना,” आईस्क्रीम खाताना आईंनी हळूच हाक मारली.

“काय आई?”

“मी तुझ्याकडे येऊ का ग थोडे दिवस राहायला?” त्यांनी अस्फुट आवाजात विचारले.

त्यांचा आवाज ऐकून मीनाच्या पोटात तुटले. नाही म्हणले तरी अनपेक्षितच होते तिला हे.

“या की. कधी येताय?”

आईंच्या डोळ्यातून पाणी ओघळले.

“तुझ्याकडे का असे नाही विचारणार तू मला?’

“नाही हो. त्यांचे गोंधळ त्यांच्यापाशी? तुम्ही कधीही या माझ्याकडे? नाहीतर असे करा. आता मी तुम्हाला घरी सोडते. बॅग भरून ठेवा. मी तुम्हाला दोन तासांनी न्यायला येते. तोवर शेखर पण आला असेल. त्याच्याशी पण बोलून ठेवता येईल तुम्हाला. चालेल?”

आईंनी मान हलवली. त्यांना शेखरकडे सोडून मीना घरी गेली. तिने पटपट थोडी अरेंजमेंट बदलून त्यांची सोय लावली. दोन अडीच तासांनी जेव्हा ती शेखरकडे पोचली तेव्हा शेखर खालीच उभा होता. तिला तो फाटकापाशीच भेटला.

“मीना”

“काय रे?”

“का करतेयस तू हे? मला दाखवून द्यायला का माझ्यावर उपकार करायला?”

मीनाने त्याच्याकडे नीट बघितले. संतापाची एक लाट सरसरत गेली तिच्या डोक्यापर्यंत.

“नाही. दोन्ही नाही.”

“तिकडे अदिती पण चिडलीय. तुझा काही हक्क संबंध नाही या घराशी खरतर.”

“नाहीच आहे. मी आईंकडून काही हवय म्ह्णून हे करत नाहीये शेखर. माझे खरंच खूप प्रेम आहे त्यांच्यावर. माझ्या सारख्या अनाथ मुलीसाठी खूप केलय त्यांनी. माझी आजारपणे काढली आहेत. मला शिक्षण पूर्ण करायला मदत केलीय. नोकरी करत असताना तुझ्या इतक्याच प्रेमाने त्यांनी माझा डबा पण भरलाय. आज हक्काने त्या मला म्हणल्या असतील की तुझ्याकडे राहायला येते तर ते माझ्यासाठी फार मोलाचे आहे. पण असे काही तुला नाही कळणार. आत जाऊया? असे म्हणून मीना आत गेलीसुद्धा.”

ती काय बोलत होती हे उलगडायला शेखरला काही क्षण लागले. काही वेळाने तोही आत गेला. आई सामान बांधत होत्या. मीना त्यांच्या खोलीत जाऊन त्यांची औषधे भरत होती बॉक्समध्ये. अदिती धुमसत होती हे सगळे बघताना. आईंना हाताला धरून मीनाने बाहेर आणले. एक एक करून त्यांच्या बॅग्स ती खोलीतून बाहेर घेऊन आली. अदिती पटकन आईंच्या खोलीत गेली. बाहेर दोघींना कपाटाच्या दारांचे आवाज आले. अदिती बाहेर आली.

“आई किल्ल्या देऊन जा कपाटांच्या. काही लागले तर काढायला बरं”

“काही नाहीये कपाटांमध्ये आता. पण तरीही तुला किल्ल्या देते.” असे म्हणून आईंनी किल्ल्या टीपॉय वर ठेवल्या. अदिती दोघींकडे नाराज नजरेने बघत राहिली. शेखरने मीनाकडे पाहिले. तो आतल्या खोलीत निघून गेला. आईंचा चेहरा उतरला. त्यांनी घाईघाईत पदराने डोळे पुसले आणि त्या वळल्या.

या सगळ्याला सुद्धा आता जवळपास दोन वर्षे झाली होती. मीना आणि आईचे एक रुटीन सेट झाले होते. त्या बसल्या जागी तिला जमेल तेव्हढी मदत करत असत. रात्रीचे जेवण कितीही उशीर झाला तरी त्या दोघी एकत्र करत. मग हळू हळू आईंच्या स्पीडने चालत चालत सोसायटीच्या आवारात एक चक्कर मारून दोघी घरी जात. मीनाला त्यांच्या असण्याची आता कमालीची सवय झाली होती. ती घरी आली संध्याकाळी की दोघी खूप गप्पा मारत. ती त्यांना ऑफिसमधल्या काय काय गमती जमती सांगे. कधी काही टेन्शन्स असली तर ती शेअर करे. त्या त्यांच्या अनुभवाप्रमाणे ऐकून घेत किंवा काही सल्ला देत. एक स्मार्टफोन घेऊन दिला तिने त्यांना. रोज ती त्यांना काही न काही नवीन शिकावे फोनचे. एकंदरीत मस्त चालले होते त्यांचे.

मीनाला प्रमोशन मिळाले तेव्हा ती जवळपास उड्या मारतच घरी आली. वाटेत थांबून तिने आईंसाठी काय काय घेतले. किल्लीने दार उघडून ती आत आली तेव्हा आत शेखर आणि अदिती बसले होते. मीनाच्या कपाळाला आठी पडली. तिने हातातले सामान डायनिंग टेबलवर ठेवले. आत सुनीता चहा करत होती. मीना ओट्यापाशी तिच्या शेजारी जाऊन उभी राहिली.

“मीना” शेखरने हाक मारली. मीना बाहेरच्या खोलीत गेली.

“आम्ही आईला न्यायला आलोय.”

मीनाने आईंकडे बघितले. आई एकटक शेखरकडे बघत होत्या. त्यांच्या नजरेत मुलाबद्दल पुरेपूर चिडचिड उतरली होती.

“का? आता मध्येच का आठवण आली तुम्हाला त्यांची?” मीनाने शेखर आणि अदितीकडे आळीपाळीने बघत विचारले.

“तसेही तुमचा काही संबंध नाहीये खरेतर. त्यांच्या दागिन्यांवर आणि पैशावर नजर ठेवून तर सेवा करताय तुम्ही त्यांची”, अदिती सटकन म्हणली.

मीनाच्या डोळ्यात पाणी तरारले. तिने एकदा शेखरकडे आणि एकदा आईंकडे बघितले. शेखरचा चेहरा शरमिंदा झाला होता. आई मात्र अजूनही त्याच्याकडेच बघत होत्या.

अदिती अजून काही बोलणार इतक्यात आईंनी हाताने तिला थांबवले.

“शेखर तुम्ही दोघे जा इथून. मी नाही येणार तुमच्याबरोबर,” त्यांनी शांतपणे सांगितले.

“अहो पण” अदितीने पुन्हा सुरुवात केली.

“काय आहे ना अदिती आता इतक्यातच तुम्हाला माझी गरज का पडतेय हे न कळायला मी दूधखुळी नाहीये. तुमचे मूल सांभाळण्यासाठी मी घरी येणार नाही. हो, तुझ्या आईशी बोलणे झाले माझे अदिती. त्यामुळे उगाच माफी वगैरे मागू नका तुम्ही माझी. राहता राहिला माझ्या पैशाचा आणि दागिन्यांचा प्रश्न. ते माझे मी बघेन काय करायचे त्याचे ते. तुम्ही मला सांगू नका. तुम्ही जा. मला तुमची गरज नाही.”

त्यांच्या निर्वाणीच्या स्वरामुळे शेखर नाईलाजाने उठला. त्याने एकदा मीनाकडे बघितले. मीना अजून सोफ्याला धरून उभीच होती. अदिती शेखरला ओलांडून दरवाजातून बाहेर पडली.

“मीना, अदितीच्या बोलण्यासाठी मी तुझी माफी मागतो.”

मीना त्याच्याकडे बघतच राहिली. एकाच क्षणात शेखरसाठी राग आणि कणव दाटून आली तिच्या मनात. तिने हळूच डोळे पुसले.

शेखरने आईंना नमस्कार केला आणि तो घराबाहेर पडला.

“अगं मीना” आईंनी हाक मारली.

“काय आई?”

“आज तुझ्या प्रमोशनबद्दल कळणार होते ना?”

“हो”

“मग काय झाले?”

“मिळाले की”

“बघ मी तुला म्हणाले नव्हते. आहेच माझी मुलगी हुशार.”

या वाक्यासरशी मीना पटकन आईंच्या कुशीत शिरली. तिच्या डोक्यावर हलकेच थोपटत आईंनी सुनीताला खूण केली. सुनीता आत जाऊन एक मोठीशी पिशवी घेऊन आली.

“मिनू बस इथे जरा शांत”

मीना सरकून बसली. आईंनी पिशवी उघडली. आतमध्ये छान मऊ मऊ लोकरीचा हलक्या करड्या रंगाचा स्वेटर होता. त्यावर सुरेख हलक्या गुलाबी रंगाच्या छोट्या छोट्या गुलाबांच डिझाईन होते. त्यांनी मीनाचे डोळे पुसले. तिच्या हातावर तो स्वेटर ठेवत त्या म्हणाल्या

“हे बघ ग, असे दोन स्वेटर करून घेतले मी. सुनीता त्या वरच्या मजल्यावरच्या ताईंकडे जाते ना कामाला त्यांच्याकडून. एक तुला नि एक मला. आपल्या दोघींसाठी एक छान हिमाचलची ट्रिप पण बुक केलीय मी. दिवाळीच्या सुट्टीत जाण्यासाठी. तुझे प्रमोशन सेलिब्रेट करायला. तिकडे घालण्यासाठी आहेत हे स्वेटर.”

मीना डोळे विस्फारून त्यांच्याकडे बघतच राहिली.

“जग काही म्हणू दे मीना. मला माहित आहे तुझे आणि माझे नाते काय आणि कसे आहे ते. कुणी काही म्हणले म्हणून ते बदलणार नाही. तू माझी मुलगीच आहेस आणि ते शेवटपर्यंत तसेच राहील. जा आता देवापुढे पेढे ठेव आणि मला पण आणून दे. मग मी तुला सांगते मी ट्रिपचे बुकिंग करायला कसे शिकले ते.”

मीना डोळे पुसत हसत हसत उठली.

लेखिका- प्राजक्ता काणेगावकर

Image by SUMITKUMAR SAHARE from Pixabay 

18 thoughts on “स्वेटर…(रंग- राखाडी)

    • October 5, 2019 at 5:29 am
      Permalink

      खूप मस्त…

      Reply
    • October 6, 2019 at 3:45 am
      Permalink

      अतिशय सुंदर!👌

      Reply
  • October 5, 2019 at 8:44 am
    Permalink

    खूप सुंदर नातं … 👌👌

    Reply
  • October 5, 2019 at 12:33 pm
    Permalink

    राखाडी रंगात गुंफलेली हळवी कथा..खूप खूप सुरेख! 👍✌

    Reply
  • October 6, 2019 at 1:19 am
    Permalink

    खूप खूप छान कथा प्राजक्ता. यावर एक मस्त शॉर्ट फील होईल👌👌😊

    Reply
    • October 6, 2019 at 9:56 am
      Permalink

      Khoop chhan Katha. Grey sarkhya ervi Vishesh akarshan na vatnarya rangavar itki bhavuk, surel, halavya natyanchi veen ulgadnari Katha lihilyabaddal manapasun dhanyawad.

      Reply
  • October 6, 2019 at 3:16 am
    Permalink

    सुंदर….

    Reply
  • October 6, 2019 at 2:46 pm
    Permalink

    Khup chan. Abhinandan

    Reply
  • October 6, 2019 at 5:31 pm
    Permalink

    स्वेटरपेक्षा शब्दांची ऊब जास्त असते, नाही का?

    Reply
  • October 7, 2019 at 9:24 am
    Permalink

    फारच सुंदर लेख आहे .

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!