पैठणी..(रंग जांभळा)

कल्याणीने साडीची नीट घडी केली, कोपऱ्यावर कोपरे व्यवस्थित दुमडले, कडा ताठ केल्या आणि एकवार तिच्या तलम पोतावर प्रेमाने हात फिरवून, समाधानाने ती पैठणी कपाटात आतल्या खणात ठेऊन दिली. तिची अत्यंत आवडती जांभळी पैठणी. साडी कसली, तिची जिवश्र्चकंठश्च मैत्रीण म्हणलं तरी चालेल. जांभळाजर्द रंग, त्याला हिरवे सुबक काठ, संपूर्ण साडीवर नाजूक, सुंदर सोनेरी बुट्टे, तिचं रेशीम मऊशार आणि हातावर विणलेलं होतं, आणि पदरावरचे मोर तर क्षणात समोर येतील की काय वाटावं इतके जिवंत होते. ही सुरेख कलाकुसरीची पैठणी कल्याणीच्या काकूची, जानकीकाकूची होती. काय सुंदर दिसत होती तिची लहानखुरी काकू लग्नात या पैठणीत. एखादी देवीचं जणू!
पण दुर्दैवाने काकूने, त्या साडीने, सुखाचे दिवस फार पाहिलेच नाहीत. दैवाने घात केला. हीच पैठणी नेसून नटूनथटून सकाळी पहिली मंगळागौर पूजत असलेली तिची जानकीकाकू त्याच रात्री वैधव्याला सामोरी गेली. देशमुखांच्या घरात काळ राक्षस बनून आला होता. त्या रात्री, अवघा २८ वर्षांचा कल्याणीचा काका हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाची दाट छाया पसरली होती. पैठणीचा जांभळा रंग जणू जानकीकाकूसाठी कायमचा शत्रू , दुःखाचा रंग बनून गेला होता.
कल्याणी लहान होती, त्यात तिला थोड्याच दिवसांच्या सहवासात जानकीकाकूचा खूप लळा लागला होता. काकूदेखील कल्याणीवर खूप माया करायला लागली होती. म्हणून मग कल्याणीची दुसरी आई बनून जानकीकाकू सासरीच राहिली. जनरीतीप्रमाणे घरी, माहेरी परत कधी गेलीच नाही.  सगळ्यांनी, अगदी घरातल्या थोरामोठ्यांनी आग्रह करून सुद्धा पुन्हा लग्नाला उभी राहिली नाही की पुन्हा संसार मांडला नाही. देशमुखांची बनून आली ती आयुष्यभर देशमुखांचीच बनून राहिली.
कल्याणीचं आणि जानकीकाकूचं जोरदार गुळपीठ होतं. कल्याणीच्या पालनपोषणात, तिचे लाड पुरवण्यात, जानकीकाकू आपलं दुःख पार विसरली. लहानपणी खेळताखेळता कल्याणी अनेकदा जानकीकाकूच्या खोलीत असलेल्या कपडे ठेवायच्या मोठ्या पेटीपाशी जाई आणि हळूच ती उघडे. पेटीच्या तळाशी तिला हवी असलेली वस्तू सापडे. ती हळूच ती जांभळी पैठणी बाहेर काढे. काय कोण जाणे, ती साडी पुन्हा पुन्हा पाहायला फार आवडते असे कल्याणीला. तिचा चमकता जांभळाजर्द रंग, सुरेख बुट्टे, त्यावरचं नाजूक काम बघण्याचा, हात फिरवण्याचा तिला जणू छंदच जडला होता तिला. एरवी प्रचंड माया करणारी, कधीही न ओरडणारी कल्याणीकाकू, त्या पैठणीपाशी गेलं की मात्र कल्याणीला रागे भरे. “दूर हो त्या पेटीपासून. अवलक्षणी आहे ग ती साडी, कश्याला खेळतेस सारखी तिच्याशी? दुःखाच्या खाईत लोटणारा आहे तो जांभळा रंग. टाकून देता येत नाही, म्हणून ठेऊन दिली आहे, तर तू सारखीच तिच्या जवळ जातेस.” कल्याणी म्हणायची, “ए काकू, देऊनबिऊन काही टाकायची नाही काय ती साडी. इतका सुरेख रंग आहे, रेश्मासारखी मऊ साडी आहे. ठेव माझ्यासाठी ही. आणि वाईट, अपशकुनी रंग वगैरे असं काही नसतं. आपल्या मनाचे खेळ असतात हे सारे. माझ्या लग्नात हीच साडी नेसवायची आहेस बरं का तू मला.” जानकीकाकू लटके रागवत तिला खोलीतून तिला बाहेर नेत असे.
यथावकाश कल्याणी मोठी झाली,  तिच्या आवडीचा जोडीदार मिळून, तिचं लग्न ठरलं. लग्नाची खरेदी करायची वेळ आली तसं मात्र तिने घरात जाहीर करून टाकलं, काही झालं तरी लग्नात जानकीकाकूची जांभळी पैठणीच नेसेन. जानकीकाकू तर बिथरलीच, पण कधीही शकुन अपशकुन न मानणारी तिची आईसुदधा कल्याणीला रागावली. “इतक्या ढिगानी साड्या पडलेल्या असताना, आमची नवी घ्यायची तयारी असताना, हे काय भलतंच घेऊन बसली आहेस डोक्यात?” “आई, ती साडी मला फार फार आवडते ग. नेसू देत की मला. बघ काकूसुद्धा काय खुश होईल मला त्या साडीत पाहिलं की. आणि या घरातली माझी सगळ्यात लाडकी गोष्ट तू मला माझ्याबरोबर नेऊ देणार नाहीस?” तिने हजार मिनतवाऱ्या केल्या तेव्हा घरचे एकदाचे कसेबसे तयार झाले.
पण डोळ्याचं पारणं फिटावं इतकी सुंदर दिसत होती कल्याणी त्या जांभळ्या पैठणीच्या, एखादी गौरच जणू! जानकीकाकूला आपल्या लग्नाच्या साडीतलं तिचं ते साजरं रूप पाहून सतत आनंदाचे कढ दाटून येत होते. कल्याणीला सुरेख सजलेली पाहून जांभळ्या रंगाबद्दलच्या आजवरच्या तिच्या सगळ्या गैरसमजुती, कटू आठवणी जणू विरत चालल्या होत्या. अनिकेत, कल्याणीचा नवरासुद्धा अनिमिष नेत्रांनी कल्याणीकडे पहात म्हणाला होता, “काही म्हण. जांभळ्या  रंगात खुलून दिसतेस तू.”
दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला. लग्नाला वर्ष झालं आणि कल्याणी आणि अनिकेतने जेजुरीला देवदर्शनासाठी जायचं ठरवलं. कल्याणीने पुन्हा एकदा तिची आवडती जांभळी पैठणी नेसली व अनिकेतच्या नजरेत दिसणाऱ्या तिच्या सौंदर्याच्या पावतीला हलकेच हसून मान देत, ती गाडीत बसली. देवदर्शन आणि परत येताना जरा इकडंतिकडं फिरून येऊ असा त्यांचा प्लॅन ठरला होता.
मात्र नेमकं अघटित घडलं. देवदर्शनावरून परत येत असताना काळाने डाव रचला. रात्री एका धाब्यावर निवांत जेवून, एका आडबाजूच्या रस्त्यावरून येणाऱ्या अनिकेत कल्याणीच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती, की कल्याणी, अनिकेत गाडीतून बाहेर फेकले गेले. ट्रकवाला पळून गेला. सुनसान रस्त्यावर रात्रीचं कोणीही नव्हतं. कल्याणीच्या हाताला थोडे ओरखडे आले होते, डोक्यालाही किंचित मार बसला होता. एक पाय अगदी रक्तबंबाळ झाला होता. तिच्यापासून थोड्याच अंतरावर अनिकेत पडला होता. तो मात्र पुरता बेशुद्ध होता. तिच्यापेक्षा त्याच्या दुखापती निश्चितच जास्त गंभीर होत्या. कल्याणीने उठायचा प्रयत्न केला, तर दुखऱ्या पायामुळे अजिबात उठता येईना. पण तिला उठणं भाग होतं. याक्षणी मदत मिळणं, अनिकेतचा जीव वाचवणं जास्त महत्वाचं होतं. ती तशीच खुरडत अनिकेतकडे आली. “अनिकेत, अनिकेत” तिने हाका मारल्या. पण अनिकेतची शुद्ध पुरती हरपली होती. जबरदस्त रक्तस्त्रावही होत होता. रस्त्यावर किर्रर्र अंधार होता. या परिस्थितीत करायचं तरी काय? कल्याणी हवालदिल झाली, मनोमन देवाचा धावा करू लागली. मदतीसाठी ओरडू लागली पण काही उपयोग होईना. धाय मोकलून रडायला लागली. पण रडून काहीच फायदा नाही हे तिच्या लक्षात आलं. आलेल्या संकटाचा सामना करायचा असेल तर तिला हिंमत घालवून बसणं चालणार नव्हतं.
रस्त्याच्या कडेने खुरडत, दुखरा पाय ओढत, जांभळ्या साडीतली कल्याणी पुढे जाऊ लागली. मधेच थांबायची, हवालदिल व्हायची, पण तेवढ्यात अनिकेतचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. एक मोठा श्वास घेऊन परत पुढे जायची. डोकं शांत ठेवत, मदतीसाठी कोणी मिळतंय का ते पहात ती जवळजवळ मैलभर तशीच चालत आली. पायाची जखम अतिश्रमाने आता भळभळ ओघळू लागली होती. कुठल्याही क्षणी कल्याणी बेशुद्ध पडू शकत होती. मात्र तिच्या मनाची शक्ती मोठी होती. हा तिच्या कसोटीचा क्षण होता. दूर एका गाडीचा मिणमिणता दिवा तिला दिसला ती जिवाच्या आकांताने ओरडू लागली, रस्त्याच्या मध्ये जाऊन कशीबशी उभी राहिली.
गाडीवाल्याने क्षणाचाही विलंब न करता मदत केली, तातडीने ऍम्ब्युलन्स बोलावली, अनिकेत आणि कल्याणीला हॉस्पिटलात पोचवलं. डॉक्टरांनी  ताबडतोब उपचार केले, कल्याणीचा पाय वाचवला आणि अनिकेतला अक्षरशः मृत्यच्या दाढेतून बाहेर काढलं. दोघांच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. डॉक्टरांनी कल्याणीच्या हिंमतीचं कौतुक केलं आणि म्हणाले, “वेळेत मदत मिळाली नसती तर अनिकेतच्या जीवाची काहीच शाश्वती देता आली नसती. हॅट्स ऑफ टू यू!”
त्या दिवशी संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये जानकीकाकू कल्याणीला भेटायला आली तेव्हा मात्र दोघींना भडभडून आलं. कितीतरी वेळ दोघी एकमेकींच्या गळ्यात गळे घालून रडत होत्या. मग जानकीकाकू हलक्या आवाजात दटावत म्हणाली, “नशीब बलवत्तर म्हणून वाचलीस. आता रागावशील मला, पण तुला आधीपासून सांगत होते, ती जांभळी साडी नेसू नकोस, पण तू ऐकायला…….कल्याणीने जानकीकाकूच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, “काकू, अग साडीचा काय दोष त्यात? जे व्हायचं होतं ते झालं. आणि खरं सांगू? त्या साडीनेच खरंतर वाचवलं आम्हाला. जांभळा रंग कसा बनतो माहीत आहे ना तुला? जेव्हा लाल आणि निळा रंग एकत्र येतो तेव्हा. लाल रंग हे धाडसाचं, शौर्याचं प्रतीक असतं आणि निळा रंग शांततेचं, स्थैर्याचं. त्या रात्री मला या दोन्ही गुणांची गरज पडली. एकप्रकारे माझी परीक्षाच होती ती. माझं मन शांत ठेऊन, सैरभर न होता, हातपाय न गाळता, धाडसाने वागायला लागलं. तरच माझा आणि अनिकेतचा जीव वाचणार होता. आणि ती शक्ती या जांभळ्या रंगानेच दिली. मला माझ्यात असलेल्या शक्तीची जाणीव करून दिली या रंगाने मला. माझ्या लाडक्या काकूच्या साडीने! त्यामुळे यापुढे जांभळ्या रंगाला अजिबात नावं ठेवायची नाहीत, समजलं का?” जानकीकाकू प्रेमाने तिला जवळ घेत म्हणाली, “किती मोठी आणि समजूतदार झालीस ग तू कल्याणी! अपघातात तुझ्या लाडक्या साडीची अगदी लक्तरं झाली आहेत ना? आपण नवीन जांभळी पैठणी घेऊया का ग तुला?” कल्याणी हसत जानकीकाकूच्या कुशीत शिरली.
आकाशात क्षितिजावर लालसर आणि निळा रंग एकत्र येऊन जांभळट छटा पसरली होती.
लेखिका- गौरी ब्रह्मे
Image by SUMITKUMAR SAHARE from Pixabay 

21 thoughts on “पैठणी..(रंग जांभळा)

  • October 6, 2019 at 3:48 am
    Permalink

    खूप छान!

    Reply
  • October 6, 2019 at 3:53 am
    Permalink

    Khup chan. Aadhiche pan sagale rang manala bhavale.

    Reply
    • October 8, 2019 at 1:47 am
      Permalink

      सुरेख! 😊

      Reply
  • October 6, 2019 at 4:28 am
    Permalink

    खूप छान

    Reply
  • October 6, 2019 at 6:04 am
    Permalink

    सुरेख 👌👌

    Reply
    • October 7, 2019 at 6:51 am
      Permalink

      Thank you Roopali.😊

      Reply
  • October 6, 2019 at 5:35 pm
    Permalink

    शेवट एकदम भिडला.

    Reply
  • October 7, 2019 at 6:51 am
    Permalink

    धन्यवाद.

    Reply
  • October 7, 2019 at 9:19 am
    Permalink

    Gauritaai….speechless

    Reply
  • October 10, 2019 at 8:59 am
    Permalink

    khup chan
    Jambhlya ranga varun katha lihina tasa avghad
    hota.
    Pan tya rangacha vishleshan karun katha chan paddhatine mandli aahe

    Reply
    • October 19, 2019 at 12:24 pm
      Permalink

      धन्यवाद😊

      Reply
    • June 13, 2020 at 7:43 pm
      Permalink

      अप्रतिम कथा

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!