मोरपिशी….(रंग मोरपिशी)

आज सकाळीच त्या दोघांच कडाक्याच भांडण झालं. परत एकदा.

एक महिन्यापूर्वी लग्न झाल्यापासून किमान पाचव्यांदा…

लग्नाआधी एक वर्ष अफेयर आणि लग्नाचा निर्णय…

तिनेच तडकाफडकी घेतलेला…तिच्या सडेतोड स्वभावानुसार…

ऑफिसातली ओळख. मैत्री, प्रेम, अफेयर, आकर्षण…

एकटाच रहात असलेल्या ह्याच्या flat वर तिचं येण जाण.

मग आपोआप निर्माण झालेली जवळीक…सेक्स…आवेग…आनंद..

दोन महिन्यापूर्वी तिने टेस्ट केली…दिवस गेले होते तिला..

हा हादरला, ती बिनधास्त. ती म्हणाली पण काळजी नको करू. मी वाढवेन माझ मूल..

तुझं नाव नाही सांगणार कोणाला. हा भडकला. म्हणाला मी घाबरलो आहे म्हणजे पळून गेलेलो नाही.

ती म्हणाली मग लग्न करशील का? की आता मजा नाही मारता येणार म्हणून कल्टी?

त्याने तेव्हाही तिच्या कानाखाली वाजवली आणि मग तिला घट्ट मिठीत घेतली.

घरच्यांनी त्या परिस्थितीत विरोध करायचा प्रश्नच नव्हता. यथासांग रजिस्टर लग्न झाल.

ती त्याच्या घरी राहायला आली. कायमची आणि आता हक्काने…हक्क आला की फ्रिक्शन आलंच.

मग काही महिन्यापूर्वीपर्यंत एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याचा आनंद जिथे घेतला ते घरातील कोपरे त्यांच्यातील वादाच पहिलं कारण ठरले. तिला तिथे पसारा दिसू लागला आणि त्याला वस्तू सहज सापडायचे ठिकाण.

ती कोणालाही बिनधास्त नडायची, जे मनात आहे ते बिनधास्त बोलून टाकायची. हा मात्र भिडस्त. मनातल मनात ठेवणारा.

तिनेच प्रपोज केल होत. ह्याच्यावर सोडलं असतं तर आयुष्यभर असेच राहिले असते.

तिला उशिरा झोपायला आवडायचं आणि ह्याला लवकर उठायची सवय.

तिला इंग्रजी गाणी आवडायची आणि हा महेश काळेचा भक्त.

ती नेटफ्लिक्स वर सिरीज बघणार आणि हा प्रशांत दामलेच्या नाटकांनी खुश होणार.

ती मनातल्या मनात देवाला नमस्कार करून संतुष्ट तर हा रोज सकाळी साग्रसंगीत पूजा करणार.

दोघांमध्ये प्रेम वगळता काहीच कॉमन नव्हत. अगदी ऑफिसात पण हा ऑप्स मध्ये आणि ती मार्केटिंग टीम मध्ये.

ती क्लाएन्तला प्रॉमिस विकून यायची आणि हा ते  निभवायचा कसोशीने प्रयत्न करायचा.

लग्नाआधी प्रेम, रोमान्स, काही तासाचा सेक्स होता तोवर सगळ छान होत. कमीटमेंट नव्हती, जबाबदारी नव्हती, आपापल्या घरी स्वतःचा वेळ आणि स्वतंत्र सोशल लाईफ होत.

तेव्हा ते दोघेही एकमेकांसाठी on demand उपलब्ध होते. त्यात compulsion नव्हत.

आता सगळाच वेळ एकत्र घालवायला लागल्यावर एकमेकांचे स्वभाव, आवडीनिवडी ह्यातील टोकाचे फरक त्यांच्या लक्षात येऊ लागले. लहान लहान गोष्टींवरून मोठे खटके उडू लागले.

ती प्रेग्नंट म्हणून जास्त सेन्सिटिव्ह झालेली. हा आता मुलाच्या रूपाने नवीन जबाबदारी येणार म्हणून टेन्स.

त्यात दोघांनाही “हा/ ही माझं मुद्दाम ऐकत नाही” अश्या गैरसमजाने पछाडलेल.

काल दोघे अष्टमीच्या महालक्ष्मीची पूजा करून आले. घरी येईपर्यंत खुश होते. तिने महालक्ष्मीला  सांगितल देखील की “आमच्यात जरा तणाव कमी होऊन परत पूर्वीच प्रेम फुलू दे.”

घरी आल्यावर ती जरा थकली होती. तिला बघून तो म्हणाला “दमली असशील तर बाहेरून जेवण मागवू.”

त्यावर ती म्हणाली “मागवायच कशाला? तुला बेसिक जेवण येत ना करता? मग मस्त भात आणि कढी बनव ना. मला जाम मूड झालाय कढीभात खायचा.”

त्याला match बघायची होती. तो म्हणाला “मी कढी भात मागवतो. मला match बघायची आहे.”

हे ऐकून ती चिडली. म्हणाली “एक दिवस सांगते आहे की काहीतरी कर माझ्यासाठी आणि ते पण तू विचारलस म्हणून… तर तुला match ची काळजी आहे. जाऊ दे. मी माझ करून घेते.

ती फणकार्याने किचन मध्ये गेली. ह्याच पण डोक फिरलं. फ्रीज मधून बियर काढून तो सिप घेत match बघू लागला. ती बाहेर आली. ह्याचा कॅन उचलून तिने दोन सिप घेतले.

हा चिडून म्हणाला “प्रेग्नंट आहेस ना? मग आता बाळ होइपर्यंत आणि नंतरही किमान एक वर्ष नो अल्कोहोल”

ती म्हणाली “मग माझ्यासमोर घरात तू पण नको पीत जाऊ. बाहेर पिऊन येत जा.”

हे ऐकून त्याची अजून सटकली. म्हणाला “ मला काय दारुड्या समजतेस का? महिन्यातून एकदा कधीतरी एखादी बियर घेतो मी. तुझी मगाचची नाटकं पाहून माझी सटकली म्हणून आज कॅन उघडला.”

ती म्हणाली “तुला माझ्यापेक्षा match महत्वाची आहे हे मगाशी लक्षात आल होत. आता बियर देखील माझ्यापेक्षा महत्वाची आहे हे आत्ता समजल!”

हे ऐकून त्याने बियरचा कॅन सिंक मध्ये रिकामा करून कचर्याच्या डब्यात टाकला आणि तो झोपायला निघून गेला. ती एकटी नेटफ्लिक्स वर तिची आवडती सिरीज बघत कढी भात खात बसली.

आज सकाळी पण तसा अबोला होता. आज वीकेंड असल्याने दोघे घरीच होते. तो लवकर उठून पूजा वगैरे आटोपून ब्रेकफास्ट मिळायची वाट बघत पेपर वाचत होता. ती सावकाश उठून बाहेर आली. त्याला म्हणाली “आज खूप acidity झाली आहे मला. मला किचन मध्ये जायचा अजिबात मूड नाहीये. तू हॉटेल मधून काहीतरी मागव आणि माझ्यासाठी पण मागव.”

हे ऐकून तो चिडला. म्हणाला  “काल मी हे सांगत होतो तेव्हा पटल नाही आणि आता स्वतः तेच सांगते आहेस.” त्यातून शब्दाला शब्द वाढला. तो तिरमिरीत घराबाहेर पडला. गाडी घेऊन दिशाहीन ड्राईव्ह करू लागला. एका पार्कात येऊन बसला. एकटाच.

त्याच्या मागच्या बाकावर काही बायका जमा होऊ लागल्या. त्याला आवाज येत होते. बायकांची संख्या वाढत होती. सगळ्या मजेत होत्या. खिदळत होत्या. इतक्यात एकीने त्याला विचारलं “भाऊ एक फोटो काढता का आमचा?”

तो वळला. सगळ्या बायका मोरपिशी रंगाचा ड्रेस, साडी नेसून होत्या. त्याने यांत्रिकपणे त्यांचे फोटो काढले आणि म्हणाला “आज काय स्पेशल? तुम्ही सगळ्या जवळजवळ सारख्याच रंगाचे ड्रेस घालून आहात.” एका बाईंनी त्याला नवमीचा रंग मोरपिशी असतो ह्याबद्दल आणि नवरात्रीतील नवरंग संकल्पनेबद्दल माहिती दिली.

तो म्हणाला “पण हा रंग जरा फिरता नाहीये का? धड निळा नाही, धड हिरवा नाही…त्यालाही सोनेरी झाक.” बाई म्हणाल्या “तीच तर गम्मत आहे ह्या रंगाची. ह्या रंगात दोन तीन रंग आपल अस्तित्व टिकवून देखील ते इतर रंगाच्या वरचढ होऊ देत नाहीत. इतर रंगांना सामावून घेतात. त्याचं अस्तित्व त्यांच्या गुणदोषासकट स्वीकारतात. त्यांच्यात मिसळून स्वतःचा आणखी छान रंग तयार करतात.”

हे ऐकून त्याच्या डोक्यात अचानक शंभर ट्युबलाईट चा प्रकाश पडला. तो त्या बाईना thanks म्हणून तडक घरी निघाला. जाताना वाटेत त्याने  पनीर विकत घेतले. घरी पोहोचल्यावर काहीही न बोलता किचन मध्ये गेला. सर्वात आधी पनीरसाठी ग्रेव्ही  करायला टाकून त्याने एका बाजूला कुकर लावून एकीकडे दाल तडका करायला घेतली. बेडरूम मध्ये सिरीज बघत असलेली ती जेवणाच्या वासाने बाहेर आली आणि किचन जवळ येऊन उभी राहिली. त्याला जेवण करताना बघून आश्चर्याने म्हणाली “हे काय?” तो म्हणाला “तुझ्या आवडीचा पनीर टिक्का मसाला आणि माझ्या हाताचा स्पेशल दाल तडका राईस!”

ती खुश होत पण तरीही सावध पणे म्हणाली “आज अचानक हे प्रेम का?” तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला “हे बघ तू आहेस निळा रंग आणि मी हिरवा. दोघेही आपापल्या जागी जसे आहोत तसे आहोत. पण आता एकत्र आल्यावर आपण एकमेकांच अस्तित्व मान्य करून, आपल अस्तित्व मागे सोडून, एकमेकांना गुणदोषांसकट स्वीकारून एकमेकात मिसळायला हव. आपल्या दोघांच्या निळ्या आणि हिरव्या रंगांचा मिळून एक मोरपिशी रंग बनवायला हवा.”

ती म्हणाली “हम्म…खर आहे. ठीक आहे. आपण सुरुवात करुया. एकमेकांना समजून घेऊया, स्वतःत थोडे बदल घडवूया. आपला मोरपिशी रंग बनवायला घेऊया. माझा निळा, तुझा हिरवा चांगले एकजीव होतील तोवर काही महिन्यांनी त्याला परफेक्ट टच द्यायला आपल्या बाळाच्या रूपाने आपल्या आयुष्यात सोनेरी रंगाची उधळण होईल. मग आपला मोरपिशी रंग परिपूर्ण  होईल!”

त्याने तिला मायेने जवळ घेतली. म्हणाला “आजपासून वीकेंडला जेवण, नाश्ता मी बनवणार.” ती आत गेली.  फ्रीजमधून बियरचा कॅन बाहेर आणून  त्याच्या हातात देत म्हणाली “तू बियर पिताना मी ज्यूस पिणार आणि मस्त पैकी match पण बघणार. चल.”

जेवण तयार झालं होत. तिने त्याला हाताला धरून बेडरूम मध्ये नेला. Neflix बंद करून स्टार स्पोर्ट्स लावून दिल आणि म्हणाली “आलेच”

तो match बघू लागला. ती एका हातात वेफर्सचा bowl आणि दुसर्या हातात ज्युसचा ग्लास घेऊन आली. त्याच्या दंडाला धरून त्याच्यात घुसून match बघू लागली. आज  त्या दोघांनी आपापल्या वैयक्तिक सीमा ओलांडून एकत्र आयुष्याच्या नव्या एकत्र दुनियेत सीमोल्लंघन केल होत.  दसरा त्यावर शिक्कामोर्तब करणार होता. Match बघताना तिला जरा ग्लानी आली. डोळ्यासमोर अष्टमीची  महालक्ष्मी आली. तिने केलेल्या प्रार्थनेला महालक्ष्मी “तथास्तु” अस उत्तर देत होती. हिरवा आणि नीळा रंग आता तर कुठे मिसळू लागले होते. मोरपिशी रंग हळूहळू रंगत होता.

लेखक- मंदार जोग 

Image by SUMITKUMAR SAHARE from Pixabay 

14 thoughts on “मोरपिशी….(रंग मोरपिशी)

    • October 7, 2019 at 5:38 am
      Permalink

      Apratim 👌👌👌

      Reply
      • October 30, 2019 at 5:08 am
        Permalink

        सुंदर👌👌

        Reply
    • October 7, 2019 at 5:01 pm
      Permalink

      मस्तच👌👌

      Reply
  • October 7, 2019 at 5:17 am
    Permalink

    लई भारी. एकच नंबर….

    Reply
  • October 7, 2019 at 6:48 am
    Permalink

    क्लास 👌👌

    Reply
  • October 7, 2019 at 5:58 pm
    Permalink

    खूपच मस्त..!! धन्यवाद..!!!

    Reply
  • June 13, 2020 at 7:40 pm
    Permalink

    सुंदर कथा

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!