नवऱ्यास पत्र

प्रिय अहो (नीरज),

मी तिकडून इकडे आलीय खरी पण ती केवळ शरीराने. मन मात्र अजूनही तुझ्यापाशी आणि त्या राजस्थानमधील त्या शहरात घुटमुळत आहे. इकडे येऊन ८ दिवस उलटून गेलेत खरे पण मी अजूनही त्या पिंक सिटीतच वावरत आहे. एक आवर्जून सांगावेसे वाटते ते असे की, तुझे सरप्राईज मात्र अप्रतिम आणि अवर्णनीय होते. मला पहिले काही तास खरेच वाटत नव्हते की तू मला तिकडे बोलावून घेतले आहेस ते. आईनी आणि बाबानी मला सांगितले की खरेच मला जायचे आहे तेव्हा टेन्शनच आले होते. त्यांना काय वाटत असेल, ते चिडले असतील का, त्यांना राग आला असेल का मला एकटीलाच बोलावून घेतले म्हणून. पण आईंनी किती प्रेमाने समजावून सांगितले आणि समजून घेतले. तुझ्यातल्या समजूतदारपणाचे मुख्य स्रोत कोण ते या निमित्ताने समजले.

तरीही एकटीने प्रवास तो ही ट्रेन ने म्हणजे दिव्यच. पण तुझ्या भेटीच्या ओढीने सगळे जमून गेले. तरीही मी बोलले नाही पण एक सांगू का, बाबा काय म्हणत होते माहित आहे? मी येतो तुला सोडायला आणि तुला सोडून दुसऱ्या ट्रेन ने तिथून परत येईन. शेवटी आईंनी जरा दटावले, अहो मोठी आहे ती, करेल ती मॅनेज. खरंच आई बाबांची माया खूप छान आहे. तू इथे नाहीस तर मला कोणी दुखावू नये म्हणून ते जातीने लक्ष ठेऊन असतात.

दीड महिन्यांनी तुला त्या दिवशी पहिले तेव्हाची अवस्था काय सांगू, मनातील हुरहूर, काळजी, प्रेम सगळंच कसं संमिश्र होतं. भर स्टेशनवर वसू अशी कोणी हाक मारतं का रे? त्यात तुझी वसू ही हाक खरंच जादू करते. मी माझ्यात उरत नाही. हे तुला माहिती आहे तरीही मुद्दाम असे केलेस ना मला त्रास देण्यासाठी? वाईट्ट आहेस एकदम. हे असे काहीतरी करून मला छळायला आवडते हे आता मला गेल्या ९ महिन्यात पुरते कळून चुकले आहे.

साखरपुड्याचा वाढदिवस? तो काय साजरा करायचा? तुमच्या नव्या पिढीचे काहीतरी फॅड असतात हे असे आमच्या पिताश्रींचे मत असताना. तू सगळे लक्षात ठेऊन एवढे सगळे प्लॅन केलेस याचे खरंच कौतुक वाटले आणि आनंदही तितकाच झाला. माझ्या इच्छा, अपेक्षा न सांगताही पूर्ण करणारं माझं हक्काचं माणूस तुझ्या रूपाने मिळालं ही खरंच माझ्यासोबत घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट आहे.

त्या दिवशीचे सेलिब्रेशन, केक कटिंग, नंतरचे कॅण्डल लाईट डिनर आणि अविस्मरणीय अशी रात्रीची डेझर्ट राईड. हे सगळे मी शब्दात नाही मांडू शकत. म्हनुनच म्हटले मी अजूनही मानाने तिथेच तुझ्याजवळ आहे. आठ दिवसांचा तो सहवास हा मला उटीपेक्षाही जास्त आवडला. तुझ्याबद्दल बऱ्याच नविन नविन गोष्टी समाजात गेल्या. किंबहुना तुझी नव्याने ओळख झाली. किती छोट्या छोट्या गोष्टींचे प्लॅनिंग तू केले होतेस. माझ्या आवडीनिवडी जपण्यासाठी चाललेली तुझी धडपड खरंच सुखावणारी होती. आपण काहीतरी मागणे मागावे आणि देवाने भरभरून दान आपल्या पदरी टाकावे असा तू मला लाभालास… आगदी भरभरून… भरघोस प्रेम करणारा.

परतीच्या प्रवासात उगाच ट्रेनचा प्रवास नको म्हणून डायरेक्ट पुण्याचं फ्लाईट तिकीट काढलंस तेव्हा खरेच माझे डोळे पाणावले होते. तू विचारले देखील काय झाले म्हणून? मी सांगितले काही नाही काहीतरी गेलंय डोळ्यात. तेव्हाचं खरं कारण हे होतं. ९० मिनिटात मी पोहचले पुण्यात आणि पुढच्या तासाभरात घरी. तुझ्यापासून निघून अवघ्या ३ तासात आपल्याच माणसात पोहचले हे किती छान झाले. ट्रेन चा प्रवास असता तर पूर्ण प्रवास मी रडत केला असता.

आता तुझी खूप आठवण येते आहे. कारण तुला नक्की माहित आहे. तू, तुझे वसू वसू म्हणत मला कुशीत घेणं, मधेच काहीतरी पांचट जोक मारणं, मी हा काळ एन्जॉय करतीय ना यावर बारीक लक्ष ठेवणं आणि अजून न बोलता येण्यासारख्या अनेक गोष्टी करणं हे सगळं सगळं मिस करतीय मी.

बाकी तुमचा तो कुक कोण? मनोज, हां मनोज त्याला मी दुपारच्या वेळात तू ऑफिसला गेला असताना आपल्या काही रेसिपीज शिकवल्या आहेत. एव्हाना त्यातल्या काही त्यांनी केल्या असतीलच अन तुला ते जाणवले असेलच. तेवढीच आपल्या घरच्या जेवणाची अधून मधून आठवण त्या रेसिपीज मुळे तुला होत राहील.

घरच्या सगळ्यांना त्यांच्यासाठी आणलेल्या सगळ्या गोष्टी आवडल्या. विशषतः नलूला बांधणीचा ड्रेस मस्त बसलाय आणि तिला आवडलाय देखील. आत्ता पर्यंत दहादा दादाला थँक यु सांग असे माझ्याजवळ सांगून झालंय. सासरी असून देखील सुनेच्या चेहऱ्यावरील आनंद हा सगळ्या घराचा सोहळा असू शकतो हे मी अनुभतेय आणि हे घर मला माझे सासर वाटतच नाहीये. ह्या सगळ्याचं क्रेडिट तुला जाते. मी तुझी जीवनसाथी म्हणून केलेली निवड ही अगदी सार्थ आहे याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय येत आहे.

ह्या आनंदी नोटवर आज इथेच थांबते. तब्ब्येतीची काळजी घे. रात्री उशीरपर्यंत जागरणं करू नकोस.

ता. क. – माझ्यासाठी काही खास खरेदी का केली नाहीस असे सगळे विचारात आहेत. आता त्यांना काय सांगू? तुझा आठ दिवसांचा सहवास हेच मला सगळ्यात मोठे गिफ्ट आहे, हेच आणि असेच मी सगळ्यांना सांगितले आहे. अन तू पण तेच सांग. कळले का? मोठा हार्ट शेप हातात घेतलेला टेडी घेतला माझ्यासाठी असले काही निदान आई बाबाना तरी सांगू नकोस. तुझा भरवसा नाही म्हणून म्हटले.

काळजी घे… मिस मी… आय मिस यु सो मच… ILU

तुझीच
वसू

Abhijit Inamdar

Abhijit Inamdar

लेखक परिचय : नाव- अभिजित अशोक इनामदार. सातारा जिल्ह्यातील म्हासुर्णे माझे बालपण हे (वयाची पहिली १४ - १५ वर्षे) हे खेडेगावामध्ये गेले. मी इंजिनिअरिंग केले असून एमबीए इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये केले आहे. नोकरीनिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरून झाल्यानंतर सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच मला कला क्षेत्राबद्दल जिव्हाळा आहे. काही नाट्यप्रयोग तर काही म्युझिकल शोज चे अँकरिंग केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपणही काहीतरी लिहू शकतो याची मनाला आस लागून राहिली होती अन म्हणूनच मग फेसबुक वर २०१२ पासून लिखाण सुरु केले. माझे क्षेत्र जरी यांत्रिकी असले तरी लिखाणामुळे नवी उर्जा मिळते.

2 thoughts on “नवऱ्यास पत्र

  • October 16, 2019 at 4:48 pm
    Permalink

    Masta. This also equally romantic

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!