अतर्क्य (भाग 7/7)
इन्स्पेक्टर वीरेंद्र प्रधान काहीसे गोंधळून गेले खरे.
त्यांनी ठंडा करके खाओ वाला पॅटर्न वापरायचं ठरवलं.
जगनशेटचा मृत्यु पहाटे चारच्या सुमारास झालाय.
तरीही खबर मिळाली सातच्या सुमारास.
सगळे संशयित ठार खोटं बोलतायत.
सीधीसी बात.
मतलब चारच्या आसपास प्रत्येक जण जगनशेटच्या आसपासच होते.
आणि प्रत्येकाला आपलं तिथलं अस्तित्व उघड़ करायचं नाहीये.
प्रधानसाहेबांनी प्रत्येकाची कुंडली पुन्हा मांडली.
डाॅ.वर्मा….
डाॅ.वर्मांनी जगनशेटचा गिनीपीग करायचा ठरवलं खरं.
लेकिन बाद मे वो घबरा गया.
पाडव्याच्या दिवशी पहाटे चारच्या सुमारास सगळ्यात पहिल्यांदा तो जगनशेटकडे आला.
तो जाताना रफिकच्या पोर्याने बघितलं.
खिडकीतून हात घालून त्याने डोसची छोटी बाॅटल बदलली.
अन् लगेच आल्या पावली परत गेला.
तो परत जाताना चहा घेवून निघालेला रफिक त्यांना वाटेतच भेटला.
याचा अर्थ तो जाईपर्यंत जगनशेट जिवंत होता.
त्याच्या क्वार्टर्समधला वाॅचमनही पावणेचार ते सव्वाचार डाॅक्टर बाहेर गेल्याचं सांगतो.
जगनशेटने त्या दिवसाचा नेहमीचा ईन्शुलीन डोस घेतला नव्हता.
पी.एम. रिपोर्टमध्येही दुसरा कुठला औषधाचा पुरावा सापडला नाही.
ती स्पेशल डोसवाली बाॅटल डाॅ . वर्मांनी इन्स्पेक्टर प्रधानांना दिली होती.
बहुतेक त्याच्याकडे तो तेवढाच डोस असावा.
तूर्त संशयितांच्या यादीतून इन्स्पेक्टर प्रधानांनी डाॅ.वर्मांचं नाव कटाप केलं.
अर्थात विनापरवानगी घातक औषधांचा मानवी देहावर अवलंब केल्याबद्दल गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली.
रफिक. ……..
बंदी असलेला गुटखा विकल्याप्रकरणी रफिक सहा महिने आत होता.
बाहेर आल्यावर त्याने जगनशेटला तुमचा हिशोब संपवून टाकतो अशी जाहीर धमकी दिलेली. हे ही खरं.
पर वो सिर्फ गुस्सा था.
बाकी खून वगैरे करण्याईतपत त्याची मजल नव्हती.
प्रधानसाहेबांनी रफिकला अटक करणार्या अधिकार्यांकडे चौकशी केली.
रफिकच्या फक्त जीभेतच जोर होता.
आत टाकल्यावर पोलीसी खाक्या दाखवताच तो पार ठेपाळलाय.
या वाटेवर पुन्हा चालण्याईतकी हिंमत त्याच्यात नाही असं त्या अधिकार्यांचं मत पडलं.
परत आला तेव्हा रफिक सीटी बजाते हुआ आया,आसं त्याचा पोर्या सांगतो.
बहुतेक दुधाची एजन्सी देण्यासाठी जगनशेट भांडवल पुरवणार हे ऐकून तो खूष झाला असावा.
माणसं बांधून ठेवण्याच्या जगनशेटच्या स्कीलचं प्रधानांना कौतुक वाटलं.
ते काहीही असो, शीळ घालत येणारा सहसा खून करणार नाही.
प्रधानसाहेबांचा तजुर्बा हेच सांगत होता.
फिरहाल रफिक का नामभी लिस्टसे कट.
मनसुख…..
व्यापार मनसुखच्या रक्तातच होता.
तुरडाळीचा भाव ढगाला टेकणार हा त्याचा अंदाजही अचूक.
पण जगनशेटला हे मान्य नव्हतं.
त्याने स्वतः भल्याबुर्या मार्गाने भरपूर कमाई केली होती.
पण रोगी पोखरलेलं शरीर हा त्याचाच परिपाक असं जगनशेटला प्रामाणिकपणे वाटत होतं.
जमेल तसा दानधर्म करून तो आपलं पाप कमी करत होता.
गोरगरिबांचा तळतळाट घेवून कमावलेला पैसा अंगी लागत नाही ,असा त्याचा अनुभव.
हे सगळं तो मनसुखशी बोलला.
त्यातून त्याला हवं असेल तर शिवापूरची जमीन विकायची जगनशेटची तयारी होती.
त्याने जमिनीचे कागजात तयार ठेवले होते.
पण त्यावर दस्तखत करण्याची वेळच आली नाही.
मनसुखला बापाचं म्हणणं पटलं.
तशीच वेळ आली तर जास्तीचं भांडवल मी स्वतःच्या हिमतीवर ऊभं करीन.
मनसुख समाधानानं गोडावूनमध्ये गेला.
मनसुखची ही जबानी ऐकताना त्याच्या डोळ्यांतला प्रामाणिकपणा इन्स्पेक्टर प्रधानांनी सहज वाचला.
पहिल्यांदा डाॅ. वर्मा.
मग रफिक.
दोघांचेही येताना जातानाचे ठसे जिन्यावर. .
नंतर मनसुख घरातूनच चप्पल घालून बाहेर पडला.
त्याचे परत जातानाचे ठसे.
तिघांच्याही पादत्राणांचे ठसे कुठलीही फरफट , हातापाई दाखवीत नव्हते.
प्रधानांनी लिस्टमधून मनसुखलाललाही कट केला.
सलोनी आणि तोतरा कंपाऊंडर.
सलोनी.
हुशार आणि सुंदरही.
तिचे डोळे प्रामाणिकपणाची ग्वाही देणारे.
नजर , स्वर स्थिर.
भितीचा लवलेशही नाही.
तरीही…..
तिच्या हातावरच्या ओरबाडी खुणांचं पटण्यासारखं स्पष्टीकरण तिच्याकडे नव्हतं.
ती कदाचित खुनी नसेलही.
पण जगनशेटच्या मृत्युविषयी तिला नक्की काहीतरी ठावूक होतं.
कदाचित सांगता न येण्यासारखं.
अनवाणी पावलांचे ठसे दोघांचेच.
एक सलोनी ,दुसरा तोतरा कंपाऊंडर.
इन्स्पेक्टर प्रधानांनी सलोनीला विश्वासात घेतले.
तिनं अपराध केला नसेल तर तिला काहीही त्रास होणार नाही याची ग्वाही दिली.
अवघडल्या शब्दांना साथीला घेत सलोनी बोलू लागली.
मनसुख गेल्यानंतर सव्वाचारच्या सुमारास मी बाबूजींच्या खोलीत गेले.
ते निमंत्रणपत्रिकाच वाचत होते.
त्यांचा नकार ऐकून आहे मी परत माझ्या खोलीत गेले.
जगनशेट चिडलेले.
कोपर्यातला चहा कधीच बर्फ झालेला.
ईन्शुलीनचा डोस टोचून घ्यायचा राहिलेला.
जगनशेट विचार करू लागले.
जमाना बदल गया है.
सलोनी खरंच काही तरी चांगलं करायचं म्हणतेय.
तिच्या पंखांना आशीर्वादाचं बळ द्यायलाच हवं.
ऊद्घाटनाला जायचं त्यांनी निश्चित केलं.
सलोनीला तसं सांगण्यासाठी ते तिच्या खोलीकडे चालू लागले.
तिच्या खोलीचं दार बंद होतं.
जराशा ऊघड्या खिडकीतून त्यांचं लक्ष आत गेलं.
तो एकच क्षण.
जगनशेटचं मनोविश्व उद्ध्वस्त करणारा.
नुकतीच आंघोळीहून आलेली सलोनी कपडे बदलत होती.
जगनशेटची नजर थिजून गेलेली.
नजर ऊरली होती फक्त पशुची.
मादीकडे बघणारी.
कोंडमार्या वासना ऊफाळून आल्या.
अचानक……
सलोनीची नजर खिडकीकडे गेली.
जगनशेट जागे झाले.
तिच्या नजरेला नजर देण्याचं धाडस त्यांच्यात नव्हतं.
क्षणार्धात ते मागे फिरले.
स्वतःच्या नजरेतच ते मरून पडलेले.
अचानक त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र धक्का बसला.
गॅलरीतल्या कठड्याचा आधार घेत त्यांनी अस्पष्ट किंकाळी फोडली.
स्वतःला पटकन् सावरत अर्ध्या मिनटात ती बाहेर आली.
खाली तो तोतरा कंपाऊंडर सिगरेट फुंकत होता.
हातात छत्री घेवून बाहेर जायच्या तयारीत.
आरडाओरडा ऐकून तो तसाच अनवाणी जिना चढून वर आला.
तेवढ्यात बाबूजींचा तोल जावू लागला.
मी त्यांना हात देईपर्यंत ते रेलिंगच्या दुसर्या बाजूला कलंडलेले.
त्यांच्या हातांची नखे जणू माझी माफी मागत होते.
माझ्या हातावर खुणा ठेवून मृत्युनं त्यांना फरफटत नेलं.
त्या कंपाऊंडरने , त्याच्या छत्रीच्या हॅन्डलनं बाबूजींना पकडण्याचा प्रयत्न केला.
हॅन्डल तुटलं.
काॅलर फाटली.
बाबूजी खाली पडले.
निव्वळ अपघात होता तो.
अपघातच तो.
मला बाबूजींना हेच सांगायचं होतं.
पण त्याआधीच………..
आम्ही खूप घाबरलेलो.
काय करावं सुचेना.
शेवटी सात वाजता त्या कंपाऊंडरने पोलिसांना खबर दिली.
हं…….
इन्स्पेक्टर वीरेंद्र प्रधानांनी फाईल क्लोज केली.
अपघाती मृत्यु अशी नोंद करून.
कडक चहा रिचवत ते विचार करू लागले.
अतर्क्य. ….
खरंच जगनशेटच्या आयुष्यातला तो अपघातच होता.
घात करून मृत्युकडे फरफटत नेणारा.
“अतर्क्य “कहाणीचा शेवट.
समाधानाने प्रधानांनी चहा संपवला.
Image by Gerd Altmann from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
Jabardast
wa
Zakas 👌👌👌👌
सही