पत्र क्रमांक १६, १७ आणि १८
पत्र क्रमांक 16,
प्रिय रश्म्या
ए रश्म्या, किती अस्वस्थ आहेस आणि तसाच विचार करते आहेस. शांत हो बघू आधी. तुझं पत्र वाचलं आणि लगेच तुला पत्रोत्तर लिहायला बसले. लगेच उत्तर देणं गरजेचच होतं कारण तुझं इतकं अस्वस्थ होणं काळजी करायला लावणारं आहे.
सगळ्यात आधी अभिनंदन. खरंच खूप आनंद झाला तुझी लंडनची न्यूज ऐकून. तू मागे मला जे सांगितलं होतं तेच तुला सांगते follow your heart and you will get the world.
रश्म्या एक सांग इतका निगेटिव्ह विचार तू कधीपासून करायला लागलीस? कुणाचे आईबाप दहा वेळा बोलून दाखवत नाहीत..आणि असा विचार कर ना की ते झीजले आहेत तेवढे म्हणून त्या कष्टांची किंमत आपण ठेवावी अशी त्यांची अपेक्षा आहे इतकंच. हो पण मुलांना सतत गृहीत धरणं चुकीचेच. मला माहित आहे तू आत्ता माझं ग्यान ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेस पण मला हे बोलावच लागेल.
आपण एकमेकींना इयत्ता बालवाडीपासून ओळखतो. मी तुझ्या घरच्यांना आणि तू माझ्या घरच्यांना तेंव्हापासून ओळखतेस. मला कधीही म्हणजे कधीही अगदी एका क्षणापुरतही असं वाटलं नाही की तू तुझ्या फॅमिलीचा पार्ट नाहीस. तेव्हा सगळ्यात आधी हा आतातायी विचार मनातून काढून टाक. Please it’s a humble request. मला मुळात हे समजलंच नाही की असा विचार तुझ्या मनात का यावा?Well तुला या घटनेची आठवण करून द्यायची नाहीये पण आठवत तुला? आपण आपल्या आईवडिलांच खरं मूल नसून दत्तक मूल आहोत हे तुला साधारण 7वी 8वीत समजलं. खूप मोठ्ठा आघात होता तो तुझ्या मनावर. तू शाळेत आली नाहीस 2-3 दिवस म्हणून मी तुझ्या घरी आले. घरी वातावरण अगदीच तंग होतं. तू दोन दिवस तुझ्या रूमचा दरवाजा लावून बसली होतीस, जेवली नव्हतीस म्हणून कोणीही जेवलं नव्हतं..दादाचे डोळे रडून रडून सुजले होते..काका काकू सैरभैर झाले होते. बराच वेळ जिद्दीने प्रयत्न केल्यावर तू माझ्यासाठी रूमचा दरवाजा उघडलास. काहीही न बोलता फक्त रडत होतीस पुढचे 2 तास. त्यानंतर तू थोडक्यात सत्य मला समजावलंस. बेसिकली तू खूप हर्ट झाली होतीस. त्यावेळेला हा विचार करण्याच्या मनस्थितीत नसशील पण नंतर शांतपणे जेव्हा विचार केलास तेव्हा तुला त्यांनी कधीही वेगळं वागवलं नाही, अगदी कधीही जाणवू दिल नाही, पोटच्या पोरापेक्षा जास्त म्हणजे दादापेक्षा तुझे जास्त लाड केले हे सगळं तुझ्या लक्षात आलं. आणि खरंच आहे हे, तुझा मुद्दा एकच होता की
“तुम्ही माझ्यापासून हे का लपवल?” पण कधी त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघ. मला अगदीच मान्य आहे तुझ्यासाठी हे सत्य स्वीकारणं, पचवणं खूप कठीण असेल पण त्यांच्यासाठी देखील किती कठीण होत हे याचाही विचार कर. अश्या चांगल्या माणसांवर क्षणिक सुद्धा रागावत जाऊ नकोस गं.
बाकी पालकांच्या अपेक्षांचं म्हणशील तर घरोघरी मातीच्या चुली. तू जो प्रश्न विचारला आहेस त्याचं उत्तर देते. बायोलॉजीकली आई होणं मलाही गरजेचं वाटत नाही. याबाबतीत आपल्या आयांकडे लॉजिकल मुद्दा नसेल वाद घालायला याची खात्री बाळग.
जास्त लोड नको घेऊ. सध्या तू तुझ्या लंडनच्या ऍडमिशन प्रोसेसवर लक्ष केंद्रित कर. बाकी हळूहळू सगळं ठीक होईल.
तुझी,
गार
पत्र क्रमांक 17,
प्रिय गार,
तुझं पत्रोत्तर वाचलं. वाचून थोडं बरं वाटतंय. कधीकधी ‘ हे असं आहे ‘ हे आपल्याला माहीत असतं…कळत असतं पण वळत नसतं आणि मग कुणीतरी तेच पुन्हा सांगण्याची गरज असते. ते काम तू केलंस. मला पुन्हा एकदा सगळ्याची जाणीव करून दिलीस. छान वाटतंय.
तुझ्या पत्रात एक वाक्य होतं की इतका निगेटिव्ह विचार तू कधीपासून करू लागलीस? खरं सांगायचं तर हे एका रात्रीत घडलं नाहीये…स्वतःला सतत पॉझिटिव्ह ठेवण्याची धडपड करूनही झीट येते ना एखाद दिवशी? शाळेत असताना मला माझं सत्य समजलं..खूप विचार यायचे मनात..जसं की मला माझ्या जन्मदात्यांनी असं का अनाथाश्रमात ठेवलं असेल? मुलाचा सांभाळ करायचा नव्हता तर जन्मच कशाला द्यायचा?मग वर्षभराची असताना मला आईबाबांनी दत्तक घेतले..काय विचार करून त्यांनी मला दत्तक घेतलं असेल? असे खूप खुप प्रश्न मनात यायचे..खूपदा धडका घेऊनही दगड मऊ, गुळगुळीत होत नसेल तर माणूस धडका मारणं सोडून देतो ना तस झालं मग माझं…मी अशा उत्तर नसलेल्या प्रश्नांपायी स्वतःला त्रास देणं सोडून दिलं. खरं काय ते समजल्यावर खूप उध्वस्त झाले होते मी पण आई बाबांनी, दादाने माझ्यावर खूप मनापासून प्रेम केलंय हे मान्य करायलाच हवं.
मला माझ्या जन्मदात्या आईवडलानी असं वाऱ्यावर सोडून दिलं होतं…त्यानंतर तुझ्या केसमध्ये तुला मासिक पाळी येत नव्हती म्हणून मिहिरच्या आईवडलानी तुझा, काका काकूंचा अपमान केला…शेवटी लग्नाचा एकमेव हेतू वंशवेल वाढवणे हा एकच असतो हेच या कृतीतून सिद्ध होतं… या घटनांमुळे माझा लग्नसंस्थेवरचा, मुलबाळ जन्माला घालणे या गोष्टीवरचा विश्वास उडून गेलाय. त्यामुळे आई कितीही मागे लागली तरी सध्या मिशन लंडन.
काल सरप्रिझिंगली मिहिरचा मला फोन आला होता. भेटण्याचा आग्रह करत होता, काही गोष्टींची कबुली द्यायचीय , काही गोष्टींचा खुलासा करायचाय असं काहीतरी बोलत होता. फोनवर त्याला मी भेटण्याचं प्रॉमिस केलं नाही..पण काय करू? तू सांगशील ते करेन
रश्मी
******************************
पत्र क्रमांक 18,
प्रिय रश्मी,
तुझा मूड शांत झाला, तुझं डोकं थंड झालं हे ऐकून छान वाटलं. तू म्हणतेस ते बरोबर आहे, आपण जे अनुभवलं आहे, ज्यातून गेलो आहोत त्याविषयी एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने आपली मतं मांडली तर त्याच घटनांकडे पाहण्याची दृष्टी बदलते आपली.
असो, काका, काकू आणि दादा कसे आहेत? तुझी लंडनला जाण्याची तयारी कशी सुरुय?
आणि काय गं… मिहीर भेटायला बोलावतो आहे तर माझी परवानगी मागायची काय गरज आज तुला? मिहीर माझा बॉयफ्रेंड होता, पण त्याच वेळी तुझा चांगला मित्रही होता/आहे. आमचं रिलेशन संपलं पण म्हणून तुमचीही मैत्री संपावी असं अजिबातच नाहीये. तुला जे वाटतंय ते कर. भेटायला गेलीस तर माझी मैत्रीण म्हणून जाऊ नकोस. केवळ स्वतःला सोबत घेऊन जा.
आमच्यात जे काही घडलं त्याचा राग, मिहिरविषयीचा तिरस्कार अजूनही माझ्या मनात आहे…राहील…काळाच्या ओघात कदाचित ते घाव अस्पष्ट होतील..पण अदृश्य होणार नाहीत..तीव्रता कमी होईल पण अस्तित्व पुसलं जाणार नाही. असो. तुला मनापासून जे वाटतं ते कर आणि हे मी मनापासून बोलतेय. तू लंडनचं तिकीट बुक केलंस की सांग. आपण एकत्र काही वेळ सोबत घालवू.
तुझी ,
गार्गी
ता.क. – समजा मिहिरला भेटायला गेलीस तर त्याला एक प्रश्न जरूर विचार, “आईला विचारून भेटायला आला आहेस नं?”
Image by Ralf Kunze from Pixabay
- सासूबाई will you be my valentine?- भाग्यश्री भोसेकर - February 23, 2020
- तुमचं आमचं प्रत्येक वेळी सेम नसत- भाग्यश्री भोसेकर - February 20, 2020
- गोष्टी लेखकांच्या –गौरी शिंदे - November 13, 2019
Khup chan patra aahet tumchi. Ekdam saral aani sopi. 👍🏻