बिजागरी
कितीही ठरवले लवकर जायचे तरी ज्या दिवशी लवकर जायचे असते त्या दिवशी नेमकी काही अर्जंट कामे निघतातच. श्रेयसला हे काही नवीन नव्हते. त्याच्या कंपनीत तो मॅनेजर म्हणून कार्यरत होता. कामाप्रती निष्ठा, अपार मेहनत आणि त्याचे कामाबद्दलचे भरपूर नॉलेज या जोरावर तो या पदावर पोहचला होता. आज त्याला लवकर निघायचे होते पण कामाच्या व्यापात उशीर झालाच. हातातील कामे त्याने पटापट संपवली आणि शेवटी निघाला. खरंतर २ वाजता तो निघणार होता पण आता ५ वाजले होते. आता स्वारगेटला जायला एक तास अन तिथून गाडी मिळेपर्यंत आर्धा एक तास. त्याची नाही म्हटले तरी चीड चीड झाली.
तरी नेहाला म्हणत होतो कि तुम्ही पण चला सोबत म्हणजे मग कार घेऊन जाता आले असते. पण तिला सुट्टी नव्हती तसेच मुलांची शाळा देखील होती. म्हणूनच आपण पुढे आणि ती, आई आणि मुले कार घेऊन येणार होती. हे आठवून तो शांत झाला. श्रेयसने गडबडीत बस पकडली. तरी त्याची आई म्हणत होती मी येते सोबत म्हणून. पण बरे झाले आईला नाही सोबत आणले ते. आपल्याला हा असा उशीर झाला. पुढे आता किती वाजतील माहिती नाही. आईला उगाच त्रास झाला असता. खिडकीतील मंद वाऱ्याच्या झुळुकीने त्याचा डोळा लागला. त्याला जाग आली ती कंडक्टरच्या “चला स्वारगेट वाले उतारा” ह्या आवाजानेच.
बाहेर येऊन, त्याने त्याच्या गावाकडे जाणारी गाडी पकडली. डायरेक्ट गाडी आधीच गेली होती. त्यामुळे त्याने त्याच्यागावाजवळून जाणारी गाडी त्याने पकडली. तसा गाडी मिळायला उशिराच झाला. त्यामुळे आता फाट्यावरून चालत जावे लागणार हे नक्की होते. रात्री १२ तरी वाजणार होते पोहचायला. फाट्यावरून घर ४ – ४.५ किमी लांब. कोणाला तरी फोन करून बोलवावे का? पण नको, उगाच कशाला कोणाला त्रास? श्रेयसचा बुजरा स्वभाव पुन्हा एकदा आडवा आला.
गाडी निघाली, सगळे स्थिरस्थावर झाले. तिकीट वगैरे काढून झाले आणि श्रेयस पुन्हा आपल्या विचारात गढून गेला. त्याला आता डोळ्यासमोर त्यांचा वाडा दिसू लागला. त्याचे वडील दादासाहेब जहागीरदार हे गावातील नामवंत व्यक्तिमत्व. तीस वर्षांपूर्वी गावातील दोन गटांमध्ये झालेल्या वादावादीमुळे गावची यात्रा, ग्रामदैवताची पालखी, रथ सगळेच बंद पडले होते. दोन वर्षे काहीच झाले नाही म्हणून मग दादासाहेबांनी पुढाकार घेऊन बंद पडलेली पालखी, ग्रामदैवताची यात्रा आणि रथ सगळे पुर्ववत सुरु केले. त्या गोष्टीमुळे दादासाहेबांच्या कुटुंबाला गावात मान मिळाला. आता दादासाहेब जाऊन पाच वर्षे झाली. पण पालखीचा मान अजूनही दादासाहेबांच्या कुटुंबातील सदस्यांकडे होता.
दादासाहेबांचा एकुलता एक मुलगा श्रेयस देखील त्यांच्या माघारी ती परंपरा जपत होता. म्हणूनच तो गावी निघाला होता. आता गावी कोणी राहत नसल्याने वाडा स्वच्छ करुन घ्यायला हवा होता. दरवाजे खिडक्या आता भयंकर कर्र कर्र आवाज करु लागल्या होत्या. मागच्या महिन्यात जेव्हा रखमाला वाडा स्वच्छ करायला सांगितले होते तेव्हा दत्तू सुतार पण आत गेला होता. अन मग त्यानेच फोन करुन सांगितले होते की बर्याच दारांच्या आणि खिडक्यांच्या बिजागरी गंजल्या होत्या अन त्यामुळेच ते आवाज करत होते. काही दरवाजांच्या फळ्या देखील खराब होऊ लागल्या होत्या. श्रेयसने त्याला सांगितले होते की यात्रेला आलो की करुन घेऊ ते सगळे काम.
दत्तू सुतार, पलीकडच्या गल्लीत राहणारा. फर्निचरचा व्यवसाय करणारा. दत्ता म्हणजे पाच फूट उंच, बसकं नाक, चेहर्यावर देवीचे व्रण, रापलेला काळसर वर्ण, बारीक कापलेले केस, खुरटी पांढरी दाढी, एक पाय थोडा लंगडा, त्यामुळे चालताना त्याची मूर्ती अशी हेलकावत चालल्या सारखी दिसे. बोलताना त्याची एक त्याची एक लकब होती. दर दोन वाक्यानंतर काय समजले? असा प्रश्न विचारायची त्याची खोड होती.
गाडीत आता थंडगार वार्याच्या झुळका येत होत्या. गाडी आता फाट्याजवळ पोहचली. श्रेयस एकटाच उतरला आणि गाडी पुढे निघून गेली. घड्याळात १२.३० वाजले होते. आता फाट्याजवळ कोणी असण्याची शक्यताच नव्हती. अंधारामुळे की काय पण परिसर एकदम गुढ असा वाटत होता. रातकिड्यांची किरकिर आणि मधेच एखाद्या कुत्र्याचा रडण्याचा आवाज येत होता.
श्रेयसने आपली सॅक पाठीवर अडकवली आणि चालायला सुरुवात केली. पाठीमागून कोणीतरी धावल्यासारखे वाटले. म्हणजे तसा आवाज झाला. श्रेयसने फोनची लाईट लाऊन आजूबाजूला आणि मागे नजर टाकली. त्याला तिथे कोणीच दिसले नाही. अंग गोठवून टाकनारी थंडी पडली होती. त्याने अवंढा गिळला आणि पुढे पाऊल टाकले. तोच त्याला एखादे जुनाट दार उघडताना जसा कर्र कर्र आवाज होतो तसा आवाज झाल्यासारखा वाटला. त्याला अचानक आपल्या वाड्याच्या दाराच्या उघडण्याच्या आवाजाचा भास झाला. हा असला आवाज इथे कसा येईल याचे श्रेयसला कोडे पडले. नाही म्हटले तरी त्याला थोडी भीती वाटू लागली.
त्याने मग सॅकच्या बाजूच्या कप्प्यातील पाण्याची बाटली काढली. पाणी पिऊन झाल्यावर मग श्रेयसने चालायला सुरुवात केली. मेनरोडवरुन आत आल्यावर पहिल्याच वळणावर एक पिंपळाचे झाड होते. तिथे आल्यावर श्रेयसला पुन्हा तसाच आवाज ऐकू आला. तेवढ्यात एका कुत्र्याचं रडणं ऐकू येऊ लागले. ते भेसूर असं रडणं ऐकून श्रेयसच्या अंगावर काटा आला. कधी एकदा पुढे जातोय असे त्याला वाटले. दोन पावले पुढे गेल्यावर त्याला पुन्हा कर्रर्र कर्रर्र आवाज आला. हे सगळे आवाज कुठून येत आहेत हे त्याला कळत नव्हते. त्याने पुन्हा मोबाईलची लाईट चारी बाजुंनी फिरवून पाहिली. आताही कोणीच नव्हते. दोन पावले चालला तोच त्याला कानात कोणीतरी शीळ घालून “शिऱ्या… आलास का बाबा”? असा आवाज आला. आता श्रेयस चांगलाच घाबरला. त्याने “कोण आहे”? असे ओरडून विचारले पण काहीच उत्तर आले नाही. आता पळत घर गाठावे असे त्याला वाटले पण त्याचे पायच उचलत नव्हते. शेवटी त्याने धीर एकवटून एक एक पाऊल टाकून चालायला सुरुवात केली.
पिंपळाच्या झाडापासून उजवीकडून वळून थोडे पुढे गेल्यावर अचानक श्रेयसला कोणीतरी हळू हळू चालत चालल्यासारखे वाटले. त्याने उजेड टाकला तर तो माणूस लंगडत चालत असावा असे वाटले. तो माणुस एक पाय खरडत चालला होता. त्याच्या त्या चपलांचा खरडण्याचा आवाज देखील त्या वातावरणात भयावह वाटत होता. घाबरलेल्या श्रेयसने भरभर चालत त्या माणसाला गाठले तर, तर तो दत्ता सुतार होता. त्याने आवाज दिला तसा त्याने वळून पाहिले. “अरे शिर्या तू? आत्ता इथे काय करतोयस”?
श्रेयस “अरे दत्ता काका, मी पुण्याहून आलो आत्ता. पण तू इतक्या रात्री कुठे गेला होतास”?
दत्ता भेटल्यामुळे श्रेयसला चांगलाच आधार मिळाला आणि हायसे वाटले. आता त्याला चालायला सोबत मिळाली होती.
दत्ता ” अरे बाजूच्या गावात काम सुरु आहे ना. तिकडे गेलो होतो. दोन दिवसात काम संपवायचे आहे त्यामुळे जरा उशीर झाला. काय समजलास? पण तू एवढ्या उशिरा कसा आलास”?
श्रेयस म्हणाला “अरे डायरेक्ट गाडी गेली त्यामुळे आता फाट्याजवळ उतरून आलो. तूला फोनवर म्हणालो होतो ना घराचे काम करुन घ्यायचे आहे म्हणून आलो. आता यात्रा आहे ना दोन दिवसांत”.
दत्ता “होय तर खरं. बरं झालं बाबा आलास. आत्ताच तुझे काम करुन टाकतो. काय समजलास”
श्रेयस “हो सकाळी माझे आवरुन झाले की आवाज देतो. मग ये तू”
दत्ता “अरे बाबा… सकाळी टाईम नाही. आत्ताच करुन टाकू”
श्रेयस “अरे आत्ता कुठे मध्यरात्री “?
दत्ता “अरे बाजूच्या गावात काम सुरु आहे. तेच दोन दिवस चालेल. परत मग यात्रा. मग कधी करु तुझे काम? आत्ता केलेलेच बरे. काय समजलास?”
श्रेयस “अरे पण तुला आधीच सांगितले होते की मी येतोय म्हणून. मग तू दुसरे काम कशाला घेतलेस हातात” श्रेयस जरा वैतागूनच म्हणाला. दोघेही बोलत बोलत गावाकडे चालत होते. मघाशी फाट्याजवळ एकदम घाबरलेल्या श्रेयसला दत्ताच्या सोबतीमुळे मघाचच्या गोष्टींचा विसर पडला होता.
दत्ता आपले म्हणणे खरे करत म्हणाला “अरे दुसरे काम घेतले तरी तुझे काम करणार नाही असे म्हटले नाही. काय समजलास? आत्ताच करुन टाकतो तुझे काम”
श्रेयस “अरे पण आत्ता”?
दत्ता “काही होत नाही रे. चाल तू गुपचूप”
बोलता बोलता दोघे वाड्याजवळ पोहचले. दार उघडून दोघे आत गेले. गंजलेल्या बिजागरींमुळे करकरत दरवाजा उघडला गेला. दत्ता “शिर्या तू हातपाय धुवून घे. मी तोपर्यंत सुरू करतो”.
श्रेयस फ्रेश होईपर्यंत दत्ताने पटापट कामाला सुरुवात केली. ठाकठोक करत तो त्याचे काम करत होता. जास्त खराब झालेल्या बिजागरी बदलत होता. चांगल्या बिजागरींना तेल सोडत होता. जवळपास ३ वाजेपर्यंत दत्ता काम करत होता. श्रेयसला खरंतर भयंकर कंटाळा आला होता. एवढ्या रात्री कोण ही कामे करतं? दत्ता या वेळेला हे काम करतोय याचेच त्याला आश्चर्य वाटले. पण आपले काम होतंय हे पण चांगले आहे या विचाराने तो सुखावला. पण दत्ताचा वयाच्या मानाने कामाचा उरक चांगला होता.
तेवढ्यात दत्ता म्हणाला “झाले बघ शिर्या बिजागरी बदलून. त्या मागच्या दाराच्या दोन फळ्या खराब झाल्यात त्या आज काढून ठेवतो. उद्या रात्री ते पण बसवून टाकतो. काय समजलास?”
श्रेयस म्हणाला “किती पैसे द्यायचे बाबा”.
दत्ता “ते बघू सकाळी. आता कंटाळा आलाय” असे म्हणाला अन चालायला लागला.
श्रेयसने बाहेर जाऊन पाहिले तर दत्ता एकदम गायबच झाल्यासारखा झाला. एवढ्या फास्ट तो कसा गेला हे त्याला कळेनासे झाले. पण थकल्यामुळे जास्त विचार न करता तो झोपायला निघाला. कधी एकदा अंग टेकतोय असे त्याला झाले होते. दार लाऊन तो झोपायला गेला. दरवाजा न करकरता बंद झाला. दत्ताने काम चोख केले होते.
सकाळी श्रेयस तसा उशिराच उठला. आवरुन बाहेर आला तर बाहेर गडबड सुरु होती. शेजारच्या काकांना त्याने विचारले काय झाले? कसली गडबड सुरु आहे? त्यांनी जे सांगितले त्यावर त्याचा विश्वासच बसेना.
ते म्हणाले “अरे ओढ्यावर चाललोय. आपल्या दत्ता सुताराचा दशक्रिया विधी आहे आज” .
तो “म्हणाला अहो कसे शक्य आहे हे. काल रात्री तर भेटला मला. काल रात्री उशिरापर्यंत थांबून वाड्यातील सगळ्या बिजागरी ठिक केल्या त्याने”. खरे तर त्याची बोबडीच वळली होती.
काका “अरे भास झाला असेल तुला. त्याला जाऊन ९ दिवस झाले आज दहावा आहे त्याचा”.
श्रेयसच्या अंगाला दरारुन घाम फुटला. अंग थरथरु लागले. “काय”? एवढेच तो मोठ्याने ओरडला आणि घरात परत जाण्यासाठी त्याने वाड्याचा दरवाजा ढकलला…
गंजलेल्या बिजागरींचा करकरता आवाज करत दरवाजा धाडकन उघडला गेला. त्याचवेळी
“शिर्या रात्री तर ह्या दरवाज्याच्या बिजागरी बदलल्या होत्या ना. परत कसा काय आवाज यायला लागला. असू दे… असू दे आज रात्री मागच्या दरवाज्याच्या फळ्या बदलताना ह्या बिजागरी देखील बदलून टाकू… काय समजलास”? हा आवाज श्रेयसच्या कानात घुमला आणि तो तिथे दारातच कोसळला.
Image by Lenalensen from Pixabay
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021