सरस्वती प्रसन्न ! ..

“पक्या यार नाही जमणार…
नांदेडच्या पुढे आहे बासर.
एवढ्या लांब ,दीड दिवसात नही जमेगा..”
खरं तर पक्याची आयडिया भारी होती.
दोघे नवीन मराठीपासूनचे सख्खे मित्र.
दोघांची पोरं आता  तीन साडेतीन वर्षाची.
पक्या टेल्कोत.
विनय महाबँकेत.
जूनमध्ये पोरं प्लेग्रुपमध्ये जाणार.
पक्या म्हणत होता, बासरला जाऊ.
तिथं सरस्वतीचं छान मंदिर आहे.
छोटीशी पूजा.
गुरूजी मुलांना मांडीवर बसवून अक्षरं गिरवतात.
सरस्वतीपूजन…
त्यांच्या शिक्षणाचा खराखुरा श्रीगणेशा..
पक्याची कल्पना विनयला फार आवडलेली.
पण फार लांबचा पल्ला होता.
ईथं बँकेत ईयर एन्डिंगची गडबड.
नाय… नो… नेव्हर..
सोमवार सकाळ.
प्रचंड गर्दी…
विनयनं स्वतःला घाण्याला जुंपून घेतलंय.
आता संध्याकाळपर्यंत घड्याळबंद.
त्यात महिन्याचा पहिला आठवडा म्हणजे, पेन्शनर्स फेस्ट.
हो..
नक्कीच.
जोशीबाईच आहेत त्या.
केबिनच्या काचेतून विनय डोळे फाडून बघू लागला.
 शनिवार पेठ ब्रँचला येवून, आत्ता कुठे महिना होतोय.
त्याला शनवारातली नवीन मराठी शाळा आठवू लागली.
पहिला दिवस.
नवीन दप्तर.
नवीन वाॅटर बॅग.
डबा..
खिशाला टोचलेला ओला गच्च रूमाल.
‘मेरी आई नही छोडूंगा’वाला अॅप्रोच…
आईनं जोशीबाईंच्या हातात हात दिला.
आई बाबा निघून गेले..
वर्गात ‘मिले सूर मिला तुम्हारा’चं काॅमन रडगाणं.
पण जोशीबाईंनी गोष्ट सांगायला सुरवात केली..
आणि सगळी मुलं आटपाटनगरात हरवून गेली.
शाळेची घंटा ऐकल्यावरच जाग आली..
तेव्हापासून शाळा कधी बुडवावीशी वाटलीच नाही.
शाळा म्हणजे जोशीबाई डोक्यात फिट्ट बसलेलं..
जे काही आत्तापर्यंत मिळवलं,
क्रेडिट गोज टू जोशीबाईंचं संस्कारी बाळकडू.
विनय पटकन केबिनबाहेर आला.
जोशीबाईंचा हात धरून आत..
चहा मागवला.
बाईंसोबत मंदार.
त्यांचा मुलगा.
विनयच्या एक बॅच पुढे.
मंदारचं पुस्तकाचं दुकान होतं ऐबीसीमध्ये.
बाई बर्यापैकी थकलेल्या..
पण मेमरी स्ट्राँग.
‘मी विन्या..’ म्हणल्यावर नेहमीसारखा पाठीत धपाटा.
विनयला टाईम मशीनमध्ये बसल्यासारखं, लहान पण मस्त वाटू लागलं.
बाई शनवारातच रहात होत्या.
मंदारबरोबर..
सेल नं. ची देवाणघेवाण झाली.
मी ईथे आहे तोवर तुम्ही येवू नका..
मी पेन्शनची स्लिप घेवून घरी येत जाईन..
विनयची विनयशील गुरूदक्षिणा..
 बाई निघून गेल्या..
संध्याकाळी पक्याशी फोनवर बोलणं.
त्याप्रमाणे मंदारलाही कळवलं.
दसर्याच्या दिवशी सकाळचा प्रोग्रॅम ठरला.
दसरा…
विनय , विद्या , अर्णव…
प्रशांत ऊर्फ पक्या , शारदा आणि ओम..
ट्रिपलेटच्या दोन जोड्या.
ट्रॅडिशनली ड्रेस्ड.
बायकांनी काठपदराच्या सिल्क साड्या नेसलेल्या.
केसांत मोगरीचे गजरे माळलेले.
पुरूषमंडळी झब्ब्या पायजम्यात.
अर्णव आणि ओमसुद्धा.
जोशीबाईंच्या घराची बेल वाजते..
मंदारनं बाईंना सांगितलं असावं बहुतेक..
बाई तयार होवून बसलेल्या..
सगळी जणं बाईंच्या पाया पडली.
विद्या आणि शारदा दोघींनी  बाईंना नव्या साडीची गिफ्ट दिली.
विनय आणि प्रशांतने बाईंचे पाय धुतले..
मग आळीपाळीने ओम आणि अर्णवला बाईंच्या मांडीवर बसवलं..
नव्या करकरीत पाटीवर, बाईंच्या हाताला धरून दोघांनी ‘श्रीगणेशा’ गिरवला.
बाईंनी भरभरून आशीर्वाद दिला.
” बापापेक्षा मोठे व्हा!”
सगळं कसं प्रसन्न वाटत होतं.
साक्षात सरस्वती देवीनं आशीर्वाद दिल्यासारखं.
शनिवार पेठेत साक्षात बासर अवतरलं होतं.
सदगदित होवून मंडळी निघाली.
बाई पण खूष होत्या.
जाता जाता म्हणाल्या..
” आनंदी रहा .. मोठे व्हा..
बरं का रे अर्णव आणि ओम,
खरे गुरू आईबाबा ., त्यांना कधीही अंतर देवू नका.”
नंतर त्यांच्या शिष्यांकडे बघत डोळे मिचकावत म्हणाल्या.
” बाकी जोडा शोभून दिसतोय बरं का.
विद्या विनयेन शोभते..
आणि शारदा प्रशांतेन !”
असं म्हणून चौघांच्या पाठीत काॅमन धपाटा.
त्या दोघांना पुन्हा नवीन मराठी शाळेत गेल्यासारखं, वाटू लागलं.
पोरांची ” शाळा ” सरस्वतीमंदिरातून सुरू झाली होती.
….. सरस्वती प्रसन्न ||
Image by Sasin Tipchai from Pixabay 
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

6 thoughts on “सरस्वती प्रसन्न ! ..

  • November 5, 2019 at 1:01 pm
    Permalink

    सुरेख! छानच विचार मांडलाय तुम्ही!!

    Reply
    • November 18, 2019 at 10:12 am
      Permalink

      Khup chan kaustubh ji nehamipramane

      Mast as usual

      Reply
  • November 5, 2019 at 4:18 pm
    Permalink

    काय लीहायची काॅमेंट, तुमच्य सर्वच कथा मला खुप आवडतात. प्रत्त्येक कथा एका पेक्षा एक. .

    Reply
  • May 1, 2020 at 7:09 pm
    Permalink

    खरयं ……प्राथमिक शाळेत शिकवणार्या शिक्षकांचा आयुष्य घडवण्यात मोलाचा वाटा असतो

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!