रिझल्ट
दहावीचा रिझल्ट लागला. अमितला ८१% मार्क्स मिळाले. नेटवरती आपला रिझल्ट त्याने पुन्हा पुन्हा चेक केला. फक्त ८१%? तो स्वतःच अस्वस्थ झाला. त्याला ९२+% ची अपेक्षा होती. अमित तसा सुखवस्तू कुटुंबातील मुलगा. वडील इंजिनिअर, मल्टी नॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर, आई बॅंकेमध्ये अधिकारी. श्री. आणि सौ. एकलव्ये यांचा एकुलता एक मुलगा. घरात कुठल्या गोष्टींची कमतरता नाही.
अमितच्या आई वडिलांनी कधीच त्याला अभ्यासाचं किंवा रिझल्टच टेन्शन दिलं नव्हतं की कधी एवढेच मार्क्स मिळायला हवेत म्हणून कधी त्याच्या मागे लागले नव्हते. अमित विचार करत होता “आई बाबा नेहमी मी नीट अभ्यास करतो का, मला काही अडचण आहे का, मला काही हवय का हे नक्कीच बघतात. त्यांच्याकडे वेळ नसतो हि बाब सोडली तर त्यांनी काहीच कमी पडू दिलं नाही. त्यांनी कधी कसल्याच अपेक्षा ठेवल्या नाहीत माझ्याकडून? त्यांनी कधी बोलून नाही दाखवले पण त्यानाही वाटत असणारच ना कि आपल्या मुलाने ९०% पेक्षा जास्त मार्क्स मिळवावेत. त्यांच्या ऑफिस मधील इतर कलीग्जच्या मुलांना मिळाले असतील तसे मार्क्स तर? त्यांना शरमल्या सारखं होईल का?”
नुकतच मिसरूड फुटलेल्या १६ वर्षांच्या अमितच्या मनात वादळ उठलं होतं. “एवढ सगळ पुरवून सुद्धा तुला मार्क्स मिळाले नाहीत असे जर ते म्हणाले तर?” अमित पुरता खजील झाला. त्यात नुकताच समोरच्या झोपडपट्टीतल्या दीपकने कसल्याही सुविधा नसताना ९१% मार्क्स मिळवले होते त्याची चर्चा बिल्डींगभर होत होती. अमितला अजूनच शरमल्यासारखे झाले. “बाबांनी काय काय नाही केले आपल्यासाठी? क्लासला जाण्यासाठी स्कूटर, मार्केटमधील बेस्ट ट्युटोरिअल्स, ब्रांडेड पेन, पेन्सिल, कंपास, खाण्यापिण्याचं तर विचारूच नका. आपल्यामुळे आपल्या आई बाबांना लाज येईल? श्याSS आपण काहीच कामाचे नाही आहोत.” त्याचा जीव घुसमटला, डोळ्यातून अश्रू वाहू लागले, जीव आफाट दुखावला गेला, स्वतःवरच तो खूप चिडला. “काही तरी करायला हवे. काही तरी करायला हवे. पण नक्की काय करायचे? कशाला जगायचे असे जिथे आपण आपल्या आई वडिलांना हा साधा आनंदही देऊ शकत नसू तर?”
“संपवून टाकू हा जीव. नकोच ते अपेक्षाभंगीत जिणं. काहीच नको”. अमित ताडकन उठला. टेरेसकडे धावला. कठड्याजवळ उभा राहिला. खोल श्वास घेतला. आता वरती चढायच अन स्वतःला झोकून द्यायचं अन संपवून टाकायचं सगळं. पण एकदम विचार आला, “जर एवढ्या वरून पडून जर जीव गेलाच नाही तर? कायमचं अपंगत्व आले तर? तर आई बाबांना अजून त्रास होईल ना?” तो पुन्हा माघारी घरात आला. “त्यापेक्षा विष घेऊ. कोणालाच कळणार नाही. पण घरात विष कुठले? बाथरूम क्लिनर घ्यावे का? नकोच त्याचा वास सहन होत नाही आपल्याला. पिणार कसे? बेस्ट वे. हॉल मधल्या पंख्याला दोरी बांधणे अन लटकणे”
दोरी नव्हती. आईच्या ड्रेसची ओढणी घेतली. स्टूल वरती उभाराहून ओढणीचं एक टोक पंख्याला बांधलं दुसरं त्याचा फास करून, तो गळ्यात अडकवला. ढगफुटी व्हावी तश्या अश्रुधारा त्याच्या डोळ्यातून वाहत होत्या. निर्धाराने त्याने डोळे पुसले. बास झालं आता फक्त पायाखालचा स्टूल ढकलून द्यायचा अन करून टाकायचा शेवट ह्या असल्या जगण्याचा.
अशातच त्याला आई वडिलांची आठवण झाली आणि शेवटचं त्यांना बघून घ्यावे म्हणून त्याने खिशातून मोबाइल काढला. नुकत्याच झालेल्या त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी काढलेला त्या दोघांचा फोटो मोबाइलवर डिस्प्ले पिक्चर होता. त्यांचे प्रसन्न, हसरे चेहरे पाहून त्याचे डोळे भरून आले. त्याने डोळे मिटले. बस एक क्षण. आता स्टूल ढकलणार तोच. त्याचा मोबाइल किणकिणला. सगळे पाश सोडून जाताना आगदी वयोवृद्ध माणसाला सुद्धा निर्धोकपणे जाता येत नाही. तो तर १६ वर्षांचा कोवळा मुलगा होता. त्याने डोळे उघडून पाहिले. नोटिफिकेशन मध्ये आईचा व्हाट्सअप मेसेज होता. मराठीमध्ये काहीतरी लिहिलं आहे. आपले मार्क्स तिला आवडले नसावेत त्याबद्दलच असावा मेसेज. जाऊ दे. असेही आपण आता संपवणारच आहोत स्वतःला. पण परत विचार आला काय आहे मेसेज ते तरी पाहू. आईचे काय म्हणणे आहे ते पाहू. जीव काय द्यायचाच आहे. त्याने गळ्यातला फास काढला, स्टूल वरून उतरला अन कोचवर बसला.
आई ने लिहिले होते “माझ्या सोन्या अमित, हो, हो, हो मला माहित आहे तुला असे म्हटलेलं आवडत नाही. तू मोठा झाला आहेस आता नाही का? पण जर तू नोटीस केले असशील तर तुझ्या लक्षात येईल, जेंव्हा मी प्रचंड खुश असते तेव्हाच तुला असे सोन्या म्हणते.
तू म्हणशील हे काय आई आज पत्र टाईप मेसेज वगैरे पाठवतीय. पण सगळ्याच गोष्टी नाही ना रे बाळा बोलून दाखवता येत. त्यात मघाशी तुझा रिझल्ट लागण्या आधी मनात एक अनामिक भीती वाटत होती. जीव घाबरल्यासारखा झाला होता. तुझीच सारखी आठवण येत होती. पण आता मी खूप खूप आनंदी आहे. पण एक सांगू बाळा तो आनंद फक्त तू आणि तूच दिला आहेस. कारण अरे मी पाहिलेय ना माझ्या अनेक मैत्रीणीना त्यांच्या मुलांना दिवसातून खूपदा फोन करताना, त्यांना अभ्यास करतोय की नाही विचारताना. मी अन तुझे बाबा आम्ही दोघांनीही कधीच असे केले नाही.
बर्याचदा रात्री तू अभ्यास करताना तुला कंपनी म्हणून तुझ्या बरोबर जागावे वाटे पण दिवसभराच्या कामाच्या दगदगिने कधी डोळा लागायचा कळायचंच नाही. बाबांचा तर माझ्या आधीच डोळा लेगतो हे तर तुला ठाऊकच आहे. त्यातून बाबा तर बर्याचदा कंपनीच्या कामासाठी बाहेरच गेलेले असायचे. तुला गरजेच्या लागणाऱ्या वस्तू आम्ही देत होतो रे पण तुला द्यायला वेळ मात्र नव्हता रे आमच्याकडे. तरीही तू आज जे हे यश मिळवले आहेस ते खूप आनंददायी आहे आम्हा दोघांसाठी.
तुला वाटत असेल इतरांना कसे जास्त गुण मिळाले. अरे आपण पाहतो ना एकाच झाडाची पाने, फळे एकसारखी नसतात, आपल्या हातांची बोटे एकसारखी नसतात मग सगळ्या मुलांची बुद्धिमत्ता सारखीच कशी असेल? अन मुळात आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचे काय असेल तर ते म्हणजे आपले १००% योगदान. अन तू तुझे १००% योगदान दिलेस हे आम्हाला दिसत होते अन म्हणूनच आम्ही खुश आहोत. तुझ्या योगदानाला तू गुणांच्या टक्केवारीच्या कसोटीवर तोलू नयेस असे आम्हाला वाटते.
हे बघ बाळा हा रिझल्ट म्हणजे तुला मिळालेले गुण आहेत तुझी गुणवत्ता नव्हे. अन तुझी गुणवत्ता खूप चांगली आहे हे आम्ही जाणून आहोत. ह्या मार्क्सवरती सुद्धा तुला चांगल्या कॉलेजला अॅडमिशन मिळेल. मुळात आम्ही तुला कसलीही मदत न करता तू हा एवढा मोठ्ठा टप्पा पार केलास याचंच मुळी आम्हाला कौतुक आहे. आपले आई बाबा आपल्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत असे जर तुला मनातून वाटत असेल अन तुला आम्हाला सांगता येत नसेल तर काही हरकत नाही आम्हाला जाणीव आहे त्याची. अन तीच मनातील सल भरून काढण्यासाठी हा पत्र प्रपंच.
पण आम्ही तुझ्यासाठीच, आपल्या भविष्यासाठीच ह्या नोकर्या करतो असा बचाव मी करणार नाही. त्यातून लवकरच काहीतरी मार्ग काढायला हवा. तूर्तास तुझ्या अपेक्षांना तुझे आई बाबा खरे उतरले नसतील तर त्याचा राग मनात धरू नकोस. मोठ्या मनाने त्यांना माफ करून टाक.
तुझेच
आई बाबा
ता क. : लवकर तुझी बॅग भरून ठेव आपण आज रात्रीच मस्तपैकी फिरायला जात आहोत. आम्ही दोघांनीही २ आठवड्यांची सुट्टी काढली आहे. आधी आठवडाभर फिरून येऊ अन पुढच्या आठवड्यात अॅडमिशन्स सुरु झाली की मग कॉलेज अॅडमिशन चे पाहू.
आईचा मेसेज वाचून अमित ढसाढसा रडला. पण त्याच्या मनावरचं असंख्य नकारात्मक विचारांचं ओझं झटक्यात उतरलं. आईची ओढणी, स्टूल जगाच्या जागी गेले. अन हसत, गुणगुणत अमितने बॅग भरायला घेतली.
दहावीच्या रिझल्ट दिवशीच एकलव्यांच्या फॅमिलीने अतिशय कठीण असा भावनिक, हळवा अन गुंतागुंतीचा पेपर दिला होता. दैवशक्तीने म्हणा किंवा पूर्वपुण्याईच्या जोरावर म्हणा, रिझल्ट मात्र त्यांनी आपल्या बाजूने लावला होता.
Latest posts by Abhijit Inamdar (see all)
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021
Very nice positive thoughts 👌👌👌👌
Thank you for Appreciation !
फारच छान
Thank You! 🙂
Khup chhan