गिरगोटा
बर्याचदा असे होते की आपण न पाहिलेल्या लोकांबद्दल सुद्धा काहीतरी आराखडे मनात बांधलेले असतात. आपण त्यांच्याशी फोन वरून बोललेलो असतो, त्यांच्याशी इतर माध्यमातून संपर्क आलेला असतो किंवा त्यांच्याविषयी कोणीतरी काहीतरी सांगितलेले असते अन त्यावरुंनच आपलं मन असले काहीतरी आराखडे बांधत असतं. प्रत्यक्षात भेटल्यावर आपण विचार केला होता आगदी तसेच हे व्यक्तिमत्व आहे हे कळते अन आपण आपला अंदाज कसा बरोबर ठरला ह्याचा विचार करत सुखावतो. तर कधी कधी मात्र प्रत्यक्षात भेटल्यावर ती माणसं तशी नाहीत असे आपल्याला जाणवते. अशा वेळी आपलं मन खट्टू होते. असतात काही काही व्यक्तिमत्व अशी असतात की जी आपल्याला वाटतात वेगळी पण असतात निराळीच. त्याहूनही वेगळी गोष्ट म्हणजे तुम्हाच्या रोजच्या पाहण्यातील एखादी व्यक्ती तुम्हाला जशी दिसते तशी खरच नसेल तर?
ही कथा आहे आमच्या गावाच्या बाळूची. बाळू आमच्याच आळीत, आमच्या घरापासून पाच – सहा घरं सोडून राहायचा. मला आठवते तसे, मी इयत्ता पाचवीत गेलो होतो तेव्हा बाळूने चौथ्यांदा सातवीची परीक्षा दिली होती. त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच. वडील ब्यांकेत शिपाई होते. स्वतःचे वडिलोपार्जित घर होते. वास्तविक बाळू त्यांचा एकुलता एक मुलगा. बाळूची आई तो दहा वर्षांचा असतानाच वारली होती. आईवीना पोराला वाढवताना त्यांना खूप कसरत करावी लागली होती. त्याला शिक्षणात गती नाही हे पाहून त्याच्या अण्णांना म्हणजेच बाळूच्या वडिलांना खूप वाईट वाटे. आधी आधी त्यांनी त्याला धाकाने, मारून अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण बाळू काही त्यांना बधला नाही. मग अण्णांनी तो नाद सोडून दिला.
अण्णांना एक एकर वडिलोपार्जीत जमीन मिळालेली होती. दाराशी एक गाय होती. बाळूला मग तोच उद्योग मिळाला. सकाळी आवरून आणणा कामाला गेले की मग बाळू गाईला चरायला घेऊन जात असे. पण जाता येता बळूशी कोणी नीट बोलत नसे. कायम त्याची टिंगल, कोणी त्याच्या खोड्या काढी, तर कोणी त्याच्याकडून आपली कामे करून घेत असत. बाळू आपला भोळसटपणे सगळी कामे करी. कोणी कितीही टिंगल केली तरी बाळू आपला अजागळपणे “ह्ये ह्ये ह्ये” असा हसे अन निघून जाई.
बाळूची टिंगल करण्यात मोठी माणसचं काय आम्ही लहान लहान मुलं सुद्धा काही कमी नव्हतो. उगाच रस्त्याने जाताना बाळू दिसला तर त्याला हाक मारायची अन लपून बसायचे, तो दोन तीन वेळा वळून बघे अन ह्ये ह्ये ह्ये करून निघून जाई. त्याच्या गाईला दगड मारून पळवायचे, तिच्या मागे बाळूला पळावे लागे. तेव्हा मात्र तो आमच्याकडे रागाने बघे अन गाईच्या मागे जाई. ह्या प्रकारात मी जरी सामील नसलो तरी हे प्रकार माझ्या डोळ्यासमोर घडत. मला त्याबद्दल वाईट वाटे. एक दोनदा मी माझ्या बरोबरच्या मुलांना बाळूच्या गाईला दगड मारल्याबद्दल ओरडलो. ते पाहून की काय पण माझ्याबद्दल बाळूच्या मनात आदर निर्माण झाला. जाता येता मला “काय दादा बरा आहेस ना” असे तो मला विचारू लागला. मला जाम अवघडल्यासारखे होई त्यात आमचं मित्रमंडळ “ए बाळूचा दादा, बरा आहेस ना” असे मला चिडवीत.
वास्तविक बाळू माझ्याहून सात – आठ वर्षांनी मोठा पण तो मला आहो जाहो करायचा. माझ्या मित्रांनाही आहो जाहो करायचा. त्याला कितीही त्रास दिला तरी तो आपला “ह्ये ह्ये ह्ये” करे अन तिथून निघून जाई. मग मीही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागलो. दिवस पालटत होते, आम्ही मुलं मोठी होत होतो. सगळ्या गोष्टी काळाबरोबर धावत होत्या, गावात सुधारणा होत होत्या. ह्या सगळ्यात न बदललेली गोष्ट म्हणा किंवा माणूस म्हणा तो म्हणजे बाळू. तो अजूनही तसाच होता… बारीक कापलेले केस, गोल चेहरा, दाट भुवया, खुरटी दाढी अन तशीच मिशी, उन्हात राहून रापलेला वर्ण, अंगात कायम गुढग्याच्या खाली जाइल अशी हाफ प्यांट, अन वरती हाफ भायांचा शर्ट. माझ्या लहानपणापासून पाहण्यात असलेला बाळू अजूनही तसाच होता.
शाळा संपवून आमची रवानगी आता जिल्ह्याच्या गावी असलेल्या कॉलेजात झाली होती. कॉलेजचे दिवस पाखरू बनून उडून जात होते. अधून मधून गावी जाणे होई. आमच्या सारखेच इतरही बरेचजण काही ना काही कारणाने गावाबाहेर गेल्याचे समजे. येता जाता बाळूची कधी गाठ पडे. अण्णा सुद्धा आता रिटायर झाले होते. बाळूचे ते “काय दादा बरा आहेस ना” अन वरती त्याचे ते “ह्ये ह्ये ह्ये” तसेच होते. बाळू आता गावच्या वाचनालयात शिपाई म्हणून नोकरी करत होता. बाकी त्याच्या कुठल्याच गोष्टीत फरक पडला नव्हता. ना त्याच्या वागण्यात ना कपड्यांमध्ये.
काही वर्षांपूर्वी गावी गेलो होतो तेव्हा बाळूची गाय कसल्याशा आजाराने गेली असे समजले. आता आमच्या नंतरची पिढी आली होती अन ते सुद्धा बाळूला तसाच त्रास देत. पण बाळू बाळूचं एकला चलो रे चालूच होतं.
“लहानपण देगा देवा” असे मोठी माणसं का म्हणतात हे कळण्याचे दिवस एव्हाना आमच्याही आयुष्यात आले होते. नोकरी निमित्ताने मी अन माझ्या सारखे बरेच जण पुण्या – मुंबईकडे येऊन राहिले होते. कामाच्या रगाड्यात अन रोजच्या व्यापांमध्ये बाळू सारख्यांची आठवण कोणाला राहणार?
एका रविवारी निवांत पडलो होतो. दारावरची बेल वाजली. दार उघडलं अन बघतच राहिलो. दारात बाळू उभा. स्वच्छ शर्ट, फुल प्यांट, केस तेल लाऊन व्यवस्थित भांग पाडलेले, व्यवस्थित दाढी केलेला चेहरा. मी पाहताच राहिलो “कसा आहे दादा” ह्या त्याच्या वाक्याने भानावर आलो. मी दार उघडून त्याला आत घेतला. बसायला खुर्ची दिली. प्यायला पाणी दिले. बाळूचा हा नवीन बदल मला झेपत नव्हता.
माझ्या चेहऱ्यावरची चलबिचल त्याने ओळखली असावी. मी न विचारताच त्याने बोलायला सुरुवात केली. ” मला कळतंय दादा तुझ्या मनात काय चालू आहे ते. अण्णा लहानपणी मी व्यवस्थित शाळा शिकावी म्हणून मागे लागले होते. तेव्हा ते जमले नाही. बाकी दुसरं कोणी समजून घेणारं नव्हतं. अण्णांनी त्यांना जमेल तसे सगळंच केलं रे माझं. पण तुला सांगतो मी काही वेडसर नव्हतो. सगळे माझ्याशी कसे वागतात हे मला कळत होतं पण कोणाला उलटून बोलायची हिम्मत नव्हती माझ्यात. अण्णांची भीती वाटायची तेव्हा. मग नंतर वाचनालयात नोकरी लागली अन गुरु सापडला”
आता मला आश्चर्य वाटलं अन मी एकदम म्हणालो “गुरु? कोण?”
बाळू म्हणाला “बरेच जण रे, मुळात पुस्तकं हाच गुरु. ग्रंथालयात असलेल्या सगळ्या नामवंत लेखकांची पुस्तकं मी वाचून काढली. पु. ल., व. पु. तर माझी दैवतच”.
मी चाट पडलो होतो. मला मुळात बाळूच्या तोंडी ही भाषा हे शब्द हेच अप्रूप होते.
बाळू पुढे म्हणाला “अरे एवढा आश्चर्यचकित होऊ नकोस. अरे ह्या लेखकांनी जीवनातले एक एक रंग दाखवले, वेगवेगळी माणसं दाखवली, वेगवेगळ्या माणसांशी आपण कसं वागावं हे शिकवलं. खर्या अर्थाने कसे जगावे हे शिकवलं. माझ्यावर हसून इतरांना आनंद मिळत होता मग मी त्यांना हसवत राहिलो वपुंच्या पंत वैद्यांसारखा, माझ्याकडून लोकांनी कामं करून घेतली तेव्हा मी पुलंचा नारायण झालो. कधी वाटायचे रावसाहेबंसारख्या शिव्या हसाडाव्यात सगळ्यांना अन ओरडून सांगावे अरे मी तुम्हाला वाटतो तितका बावळट नाहीये रे… पण अण्णांचे संस्कार आड यायचे. शिव्या द्यायचं धाडस व्हायचं नाही. आमच्या ग्रंथापालाना वाटायचे मी कपाटामागे बसून पेंगातोय पण प्रत्यक्षात मी माझ्या गुरुंबरोबर असायचो.”
एक सुस्कारा सोडून बाळू म्हणाला “दीड वर्षांपूर्वी अण्णा गेले दादा. मी एकटाच पडलो. पण मला वेडा समजून आमच्याच लोकांनी आमची जमीन बळकावायचा प्रयत्न केला. मग ठरवलं ज्या लोकांनी माझी तर सोडाच पण अण्णांच्या हयातीत कधी त्यांची विचारपूस केली नाही ते लोक का आता हक्क सांगतायत त्यांच्या जमिनीवर? अन तेही मी, अण्णांचा मुलगा जिवंत असताना?
कोर्टात केस पडलीय सहा महिने झाले. येत असतो तारखेला. उद्या परत तारीख आहे म्हटलं आज तुझी गाठ घ्यावी म्हणून आलो. पण चालेल ना? मी असा न सांगता सवरता आलोय.”
आता माझ्या डोळ्यात आसवं जमा होऊ लागली होती. गहिवरल्या स्वरात मी फक्त एवढाच म्हणू शकलो “बाळासाहेब, अजून लाजवू नका”
बाळूने नमूद केलेली पुस्तकं आम्ही फक्त करमणूक म्हणून वाचली होती… पण ह्याच पुस्तकांनी एक माणूस घडवला होता त्याला जगायची उर्मी दिली होती. धाडस करण्याची शक्ती दिली होती. ज्या बाळूची आम्ही लहानपणी एवढी टिंगल केली होती, त्याला वेडसर समजलो होतो तो आज माझ्या घरी येउन मलाच जगण्याचं ज्ञान देत होता. बाळूच्या बोलण्यातून मी एकच शिकलो की जगाच्या पाठीवर वावरताना आपण नेहमी कोरी पाटी घेऊन फिरावे. समोरच्याने काही रेघा ओडू तर द्यात त्या पाटीवर मग त्यांच्या बद्दल मत बनवा त्याच्या आधीच तो दिसतो कसा, त्याने पेन्सिल हातात कशी धरलीय यावरून तुमचे मत बनवू नका. कारण त्या पेन्सिलने तो तुमच्या पाटीवर काही रंग भरतोय का नुसताच गिरगोटा करतोय हे त्याचा हात थांबल्याशिवाय तर तुम्हाला कळू शकत नाही.
दुर्दैवाने बाळूच्या पाटीवर आम्ही सर्वांनी सातत्याने फक्त गिरगोटाच केला होता.
Image by Eli Digital Creative from Pixabay
Latest posts by Abhijit Inamdar (see all)
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021
Chan lihita.
Thank you!
Nice 👌👌👌👌
Thank you!