कुर्यात सदा मंगलम्…..
खरंतर तिच्या मनात फार नव्हतंच.
कश्याला परत त्या फंदात पडायचं?
सगळं जग करतं म्हणून आपणही करायचं?
नकोच.
काय अर्थ असतो त्या देवाब्राह्मणांच्या साक्षीला?
अपेक्षाभंग होत राहतात, मन दुखावली जातात. कोणताही देव मदतीला येत नाही की अग्नीहोमाच्या साक्षीने दिलेली वचनं पाळली जात नाहीत.
एकवेळ शरीर दुखापती विसरतं, पण मनावर झालेले आघात बारीक खूणा ठेऊन जातात.
मग परत हे “लग्न” कश्याला?
पहिले ओरखडे अजून पुरते पुसलेही गेले नव्हते.
तेवढ्यात तो भेटला. आवडला, त्यांचं जमलं.
दोघ एकत्र राहायलाही लागले. कधीकाळी लिव्ह-इन बद्दल वाचलेलं, ऐकलेलं, त्यांच्या स्वतःच्या बाबतीत प्रत्यक्ष घडेल असं मुळीच वाटलं नव्हतं.
खरंतर छान होतं हे असं जगणं. एकमेकांकडून फार अपेक्षा नाहीत, इमोशनल ब्लॅकमेलिंग नाही.
दोघ एकमेकांना तितकेच कमिटेड, अगदी लग्न झालेल्या जोडप्यांसारखे, किंबहुना जास्तच.
लोकांनीना लग्नाला फार बदनाम करून ठेवलंय.
एकदा का लग्न झालं रे झालं की माणूस माणूस न रहाता, हक्क, अपेक्षा, पिळवणूक, पारतंत्र्य, यांच्यात कधी आणि कसा गुंतत जातो तेच समजत नाही.
त्याचं एकत्र असणं ते भरपूर एन्जॉय करत.
समाज काय म्हणेल याचा विचार आपण करत बसतो. पण एक सांगू का? समाजाला खरंच तितका वेळ नसतो.
दोनचार दिवस बोलतात आपल्याबद्दल आणि नंतर विसरतात.
दोघं खूश होते , फक्त लग्नाचा तो एक “छप्पा” नव्हता.
मात्र त्याच्या आईने घोषा लावला होता.
किती दिवस असे नुसते एकत्र राहणार आहात? समाजासाठी नाही म्हणत मी, पण तुमच्यासाठीच काही गोष्टी सुकर होतील म्हणून म्हणते आहे.
कागदोपत्री एकदा सगळी व्यवस्था नीट झाली की घर, गाडी, सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स, पुढे विमा वगैरेची सोय नीट होईल. शेवटी इथेच येऊन सगळ्या गाड्या अडतात.
तरीदेखील ती तयार नव्हतीच.
त्याने मनवलं. एका सहीने फारसा फरक पडणार नव्हता.
त्याच्या आईचं मन मोडायचं तिच्यादेखील जीवावर आलं.
तारीख ठरली. लग्न रजिस्टर पद्धतीने करायचं ठरलं.
ती नववधूसारखी सजली. तो तर होताच हँडसम.
रजिस्ट्रारने विचारलं, “आले का सगळे? करताय का सह्या?”
तिने दाराकडे पाहिलं.
दारातून तिचा वीस वर्षाचा मुलगा आणि अठरा वर्षाची मुलगी मस्त सजूनधजून आत येत होते.
आज आलेल्या पाहुण्यांमध्ये सर्वात आनंदी ते दोघं दिसत होते.
तिच्या मनातला सगळा कोलाहल मिटला.
“आले सगळे” ती रजिस्ट्रारला म्हणाली.
सही करताना तिचा हात अजिबात थरथरला नाही.
वाजलेल्या टाळ्यांमध्ये तिच्या दोन्ही मुलांच्या टाळ्यांचा आवाज किंचित जास्त होता की काय असं उगाचच तिला वाटून गेलं.
Image by Adam Smith from Pixabay
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
वा…..
छान कथा गौरी. मुलांंचे येणे आणि टाळ्या वाजवणे यातूनच तिने काय भोगलं असेल, याचा अंदाज येतो
Chhan katha
Masta. Tari ajun sagalya na lagna he havach.
Wow… Khup chan 👌👌
Mast
Deep and sensitive!
Koni apal nasal pn jyana apan janm dilay te sobat astil tr ajun Kay havay…khup chan