लढाई- भाग ४

ऑगस्ट महिन्यात कॉलेज सुरू झालं. हा आपल्या बहिणीकडे बावड्याला गेला. बहीण बावड्याला नसायचीच. ती असायची नगर जिल्ह्यात. तिचे मिस्टर सरकारी दूध डेअरीत. पण घरी तिचे दीर आणि जावा होत्या. जावांची मुलंही होती. बहिणीच्या मोठ्या जावेचा मोठा मुलगा याच्यापेक्षा वर्षादोन वर्षांनी मोठा. त्यामुळं त्या दोघांची चांगलीच मैत्री जमलेली.
       कॉलेजचा पहिला दिवस. आक्काचा लहान दीर याला सोडायला कॉलेजात आलेला. प्रिन्सिपल साहेबांचं लेक्चर.  ते काय काय बोलत होते हे याला कळलंच नाही. प्रिन्सिपलसाहेबांचं लेक्चर झाल्यानंतर मॅथेमॅटिक्स. मग इंजिनीअरिंग ड्रॉइंग. सगळे विषय इंग्रजीमधून. त्यातही टेक्निकल शब्दांचा भरणा. दहावीपर्यंत मराठीत शिकलेला हा पुरता गोंधळून गेला. टी स्क्वेअर, सेट स्क्वेअर, स्केल असले शब्दही त्याला समजत नव्हते. बरं, ते उघड उघड कुणाला विचारायची सोयही नव्हती. ‘एवढं समजत नाही का?’ म्हणून एखाद्या सरांनी झापलं किंवा बाकीची मुलं फिदीफिदी हसली तर काय करावं?
        मधल्या सुट्टीत यानं याला त्याला काही शंका विचारून बघितल्या पण जमलं नाही. कुणीच याला समजावून सांगितलं नाही. त्यात याचा स्वभाव बुजरा आणि अबोल. दहावीपर्यंत टेक्निकल विषय नसल्यामुळं आणि मराठी माध्यम असल्यामुळं तर याचा आत्मविश्वासच गेला. पुरता गोंधळून गेला हा! आपल्याला तर इथं शिकवलेलं काही येत नाही आणि काही समजतही नाही, मग आजपर्यंत आपला पहिला नंबर येत होता ते कसं? दहावीला आपल्यापेक्षा कमी मार्क असलेली मुलंही आपल्यापेक्षा चांगलं ड्रॉइंग काढतात.
         वर्गात टिपुगडे नावाचा एक मुलगा होता. अपंग. कापशीहून बसनं येऊन जाऊन करायचा. त्याचे पाय वाकडे होते आणि हातही. त्याचे कोपरापासूनचे हात लांबीला कमी होते. ह्याला गोंधळलेल्या स्थितीत पाहून टिपूगडे  याच्या बेंचवर आला. टिपूगडेनं बारावी सायन्स केलं होतं टेक्निकल घेऊन. टिपुगडेनं याच्या पाठीवर हात ठेवला. सगळ्याच मुलांची कमीजास्त प्रमाणात अशी स्थिती असते तेव्हा घाबरून जाऊ नको म्हणून धीर दिला. संध्याकाळी दोघांनी जाऊन याच्यासाठी सेट स्क्वेअर, टी स्क्वेअर, ड्रॉईंग सीट्स  असं साहित्य विकत घेतलं. एक ड्रॉइंग बोर्ड घेतला.
              हा तेव्हा बावड्यातून सायकलनं यायचा. बहिणीच्या घरून. सकाळी जेवण करून आला की संध्याकाळी जेवायला परत. दुपारी भूक लागली तर श्यामच्या गाड्यावर एखादा वडा खायचा. श्यामचा वडा तेव्हा प्रसिद्ध. सगळी मुलं दिवसातून एकदा तरी तिथं जायचीच.
टिपुगडेचं आणि याचं चांगलंच जमलेलं. दोघं एकत्रच असायचे. हा आपल्या सायकलवरून टिपुगडेला स्टँडवर वगैरे सोडून यायचा. ऑफ पिरियड बघून दोघं संगमला किंवा इतर कोणत्यातरी थिएटरला सिनेमा बघायचे. त्यावेळी जितेंद्र, श्रीदेवी आणि जयाप्रदा यांचे सलग पिक्चर यायचे. जस्टीस चौधरी, तोहफा, हिम्मतवाला, दिल एक मंदिर, सुहागन आणि असे बरेच. मिथुन चक्रवर्तीही त्यावेळी बऱ्यापैकी चाललेला. दिलवाला, जाग उठा इंसान हे त्यावेळी मिथुनचे याला आवडलेले पिक्चर.
        कॉलेजवरून घरी आला की हा इकडं तिकडं करायचा. गुऱ्हाळावर जा, शिवाबरोबर ऊस खात बस, ट्रॅक्टरमधून गावात जाऊन ये, शेकोटी करून शेकत बस असे उद्योग. अभ्यासाचं मुळी नावच नाही! मुळात त्या घरात कॉलेजला शिकणारं कोणी नव्हतं. त्यामुळं शैक्षणिक वातावरणही नव्हतं. याला अभ्यास करावा वाटत नव्हता आणि अभ्यास कर म्हणून कुणी याला सांगतही नव्हतं. अभ्यासाचा चुकून विषय निघालाच तर ‘गुंडाला कशाला अभ्यास करायला लागतोय?…मुलखाचा हुशार आहे तो!’  सगळेजण असंच बोलायचे.
       दोन एक महिने गेले असतील. याचं कॉलेज बरं चाललेलं होतं. हा रोज सायकलनं वेळेवर कॉलेजला जायचा. एखाद्या लेक्चरला बसायचा. एखादं लेक्चर बंक करायचा. कधी टिपुगडेबरोबर तर कधी शिवाबरोबर पिक्चरला जायचा.
        …..आणि एक दिवस आक्का आली. अहमदनगरहून. रात्री हा झोपल्यावर कधी तर आली होती. सकाळी उठून दात घासत घासत हा स्वयंपाकघराकडे जातोय तर समोर आक्का. याला बघताच तिनं याचा हात खस्सकन ओढला आणि याला घेऊन ती बाजूला गेली.
“काय गं आक्का, काय झालं?….माझं काही चुकलं काय?” यानं घाबरून विचारलं.
“इथं का राहतोयस तू?” आक्काच्या डोळ्यांत अंगार फुललेला.
“का?…काय झालं?….कोणी काही बोललं काय?”
“आपली बहीण नसताना इथं राहायला तुला लाज वाटत नाही?…..माझे दीर, जावाभावा मला काय म्हणतील?”
“काय म्हणतील?….मी इथं शिकायला आलोय, जगायला नाही!….आणि त्यात तुला कमीपणा वाटण्यासारखं काय आहे?” हा बोलला.
“ते मला माहित नाही;  तू आजच्या आज तुझी सोय बघ.”
        हा काही बोलला नाही. यानं तोंड धुतलं, चहा घेतला आणि हा खोलीत आला. कपडे घातले. शबनममध्ये आपलं सामान भरलं आणि आणि हा खोलीतून बाहेर पडला. समोरच शिवा आणि त्याची आई उभी होती.
“गुंडा, कॉलेजला चाललास काय?” शिवाच्या आईनं विचारलं.
“होय.” यानं तिची नजर चुकवत म्हटलं.
“आज लवकर?”
“वर्कशॉप आहे!”
“जेवण?”
“कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे, तिथंच होईल.” यानं खोटं खोटंच सांगितलं. तो आता जाण्यासाठी मागे वळला होता.
“गुंडा सायकल रे?” शिवाची आई पुढं विचारत होती.
“नको, बसनं जातो…..संध्याकाळी जमलं तर मी मालगावला जाणार आहे!” मागं न बघताच यानं उत्तर दिलं आणि झपाझप पावले टाकत तो रस्त्याला लागला.
         तो बसस्टॉपवर आला तेव्हा त्याचे डोळे भरून वाहत होते.बहिणीचं घर सुटलं याचं त्याला दुःख नव्हतं पण बहिणीनं त्याचा आणि त्याच्या गरीबीचा ज्या पद्धतीनं अपमान केला होता तो अपमान त्याच्या जिव्हारी लागला होता.
क्रमश:
Image by azboomer from Pixabay 
Latest posts by Ashok Mali (see all)

One thought on “लढाई- भाग ४

  • December 4, 2019 at 9:18 am
    Permalink

    पुढे काय? उत्सुकता वाढत चालली आहे. खरंच लढाई आहे ही 👌🏻👌🏻👌🏻

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!