अक्षय…

गेली दोन वर्षे अक्षयला बाबाचा खूप लळा लागला होता. सकाळी उठल्यापासून रात्री झोपतानाही त्याला बाबाच लागायचा. संदीप, त्याचा बाबा त्याला म्हणायचा देखील की तुझी आई नशीबवान आहे. ती आराम करते आणि तुझं सगळं बाबा करतो. पण संदीपलाही ते आवडत असे. त्याच्यात आणि अक्षय मध्ये एक वेगळाच बॉण्ड निर्माण झाला होता.

आज सहामाही परीक्षेचा पहिला दिवस. अक्षयची पहिल्या इयत्तेतील पहिली महत्वाची परीक्षा. तयारी अर्थात बाबाने करून द्यायची! संदीप लवकर उठला. एका बाजूला अक्षयला उठवत असताना दुसऱ्या बाजूला अक्षयच्या अंघोळीची तयारी, किचन मध्ये बनवत असलेल्या अक्षयच्या आवडत्या फ्रेंच टोस्टवर लक्ष ठेवणे, एक नजर घड्याळावर, त्याची कंपास आणि शाळेची बॅग, पाण्याची बाटली एकदा चेक करणे सुरू होते. गोड आणि गाढ झोपलेल्या अक्षयला नानाविविध क्लुप्त्या वापरून तो उठवत होता. शेवटी परीक्षा झाल्यावर सुट्टीत एका अम्युझमेंट पार्क मध्ये न्यायचं गाजर कामी आलं आणि अक्षय उठला!

अक्षय अंघोळ करून, युनिफॉर्म घालून संदीपसमोर रोजच्यासारखा येऊन उभा राहिला. संदीपने त्याची हनुवटी डाव्या हातात धरत उजव्या हाताने त्याचा भांग पडला, युनिफॉर्मचा शर्ट चड्डीत नीट खोचून दिला. बूट घालून त्याच्या नाड्या नीट बांधल्या. त्याच दप्तर पाठीवर अडकवून दिलं. अक्षय स्कूलबससाठी रेडी झाला. अक्षय संदीपच्या पाया पडला. त्याला तोंडभरून आशीर्वाद देत संदीप म्हणाला “जा आई उठली असेल. आईचा पण आशीर्वाद घेऊन ये.”

अक्षय आपली छोटी पावलं टाकत बेडरूम मध्ये आला. समोरच्या भिंतीवर असलेल्या साक्षीच्या, त्याच्या आईच्या चंदनाचा हार घातलेल्या फोटोला त्याने नमस्कार केला. अचानक त्या खोलीत चंदनाचा वास पसरला. गेल्या दोन वर्षांपासून अक्षयने रोज आईला नमस्कार केल्यावर पसरत असे तसाच. अक्षयने संदीपला मिठी मारली आणि तो निघाला. संदीप साक्षीच्या फोटोकडे बघत दोन वर्षांपूर्वी ती गेली त्या अपघाताच्या भूतकाळात हरवला, अक्षय त्या चंदनाच्या वासात भविष्याकडे पाहिलं पाऊल टाकणार होता आणि साक्षीच्या डोळ्यातले अश्रू जणू बाहेर पडत होते…..तिच्या फोटोवर बाष्प साठले होते!- ©मंदार जोग

Image by Sergey Nemo from Pixabay 

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

3 thoughts on “अक्षय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!