टेस्ट ड्राईव्ह…

प्रसाद ने ज्योतीला विचारलं-
प्रसाद- जर त्यावेळी मी तुला प्रपोज केलं असतं तर तू हो म्हणाली असतीस का?
ज्योती- (त्याच्या डोळ्यातील उत्सुकतेला हसत) तुला काय वाटतं?
प्रसाद- ते आजही माहीत नाहीये आणि तेव्हाही माहीत नव्हतं म्हणून तर तेव्हा विचारायची हिम्मत झाली नाही.
ज्योती- त्यात कसली हिम्मत? जास्तीतजास्त नाही म्हणाले असते मी.
प्रसाद- नाही म्हणणं सोपं असतं पण नाही स्वीकारणं खूप कठीण असतं. भीती त्याचीच होती. म्हणून हिम्मत नव्हती.
ज्योती- तुला काय वाटतं? मी काय म्हणाले असते?
प्रसाद- खरं सांगू का ज्योती?
ज्योती- आज तरी खरं सांग.
प्रसाद- मी तुझ्याशी कधीच खोटं बोललो नाहीये. आता इतक्या वर्षांनी तर गरज पण नाही खोटं बोलायची.
ज्योती- हम्म…काय सांगत होतास?
प्रसाद- त्यावेळी ना आपलं जमू शकणार नाही हा विचार मनात आलाच नाही कधी. आय मीन मनातल्या मनात मी आपलं जमलं आहे हेच समजून होतो.
ज्योती- का?
प्रसाद- का म्हणजे? ग्रुप मध्ये असून आपण वेगळे असायचो. त्या लहानश्या जगात आपलं दोघंच फक्त आपल्यालाच माहीत आणि जाणवत असलेलं एक विश्व होत.
ज्योती- (लाजून) चल काहीतरीच तुझं.
प्रसाद- काहीतरी नाही ज्योती. तूच सांग आपण कोलेजच्या पायर्यावर, कॅन्टीन मध्ये ग्रुपबरोबर बसलेले असताना लोक जे काही बोलायचे त्यातलं किती तुला समजायचं?
ज्योती- सगळं. का?
प्रसाद- गप्प बस तू. आज मान्य नको करू पण तुझं सगळं लक्ष माझ्याकडे असायचं.
ज्योती- तुला काय माहीत?
प्रसाद- कारण तेव्हा माझं सगळं लक्ष फक्त तुझ्याकडे असायचं.
ज्योती- काहीही बोलतोस तू.
प्रसाद- अग शप्पथ सांगतो, तेव्हा मला इतर कोणीच दिसायचं नाही. सागर मधलं ते गाणं आहे ना “ये अरमा है शोर नहीं हो खमोशी के मेले हो, इस दुनिया में कोई नहीं हो, हम दोनो ही अकेले हो” ते मी तुझ्या बरोबर जगलो आहे कित्येकदा. ते गाणं आपल्या दोघांसाठीच लिहिलं आहे असं मला वाटायचं तेव्हा.
ज्योती- मग तू अपर्णाशी भांडायचास का वेडयासारखा? ती माझी बेस्ट फ्रेंड होती माहीत असूनही? माझी पोझिशन ओकवर्ड व्हायची तुमच्या भांडणात.
प्रसाद- खरं सांगू?
ज्योती- परत विचारू नको. आज फक्त खरं बोल.
प्रसाद- मला अपर्णाचा राग यायचा. ती माझी स्पर्धक वाटायची तुझ्या बाबतीत.
ज्योती- What? Are you serious?
प्रसाद- हो. म्हणजे बघ ना. ती सतत तुझ्या बरोबर असायची. अगदी प्रत्येक ठिकाणी. आपण दोघे कधी चुकून एकटे भेटलो तर दोन मिनिटात अपर्णा हजर. मला ती आपल्या दोघांच्या मध्ये येत आहे असं वाटायचं. आज हा विचार कितीही चुत्याट वाटला तरी तेव्हा ते माझं मोठं फियर होतं.
ज्योती- शी. तू अजूनही शिव्या देतोस घाणेरड्या?
प्रसाद- एके काळी तुला हे शिव्या देणं पण आवडायचं माझं. बरोबर ना?
ज्योती- अगदी तसंच नाही. पण i didnt mind it then.
प्रसाद- माझी तुला एकाच न आवडणारी गोष्ट म्हणजे माझं स्मोकिंग.
ज्योती- यक! सोडलस ते की अजून ओढतोस?
प्रसाद- सोडलं होतं कॉलेज संपल्यावर. पण तुझं लग्न झाल्याचं कळल्यावर परत सुरू केलं!
दोन क्षण शांतता….
ज्योती- ए तुला आपली एसवाय मध्ये असतानाची महाबळेश्वर ट्रिप आठवते.
प्रसाद- मला कॉलेजच्या पाच वर्षातला प्रत्येक दिवस आठवतो. त्या ट्रिपवरून परत येताना…
ज्योती- तू नेहमी प्रमाणे अपर्णाशी भांडला होतास. मग आपण दोघे मागे बसलो होतो आणि बाकी गँग अपर्णाला समजावत होती.
प्रसाद- हम्म…तो प्रवास स्वप्नवत होता. काही मिनिटात संपला. त्यानंतर मी इतक्या लवकर महाबळेश्वर वरून परत आलो नाही.
ज्योती- काहीही काय? सकाळी निघालो आपण आणि ओलमोस्ट संध्याकाळी पोहोचलो. जवळजवळ आठ तास.
प्रसाद- त्यावेळी ते आठ तास माझ्यासाठी आठ मिनिटांसारखे होते पण त्यांची आठवण आयुष्यभर पुरणारी ठरली. अगदी आजवर पुरते आहे. खंडाळा घाटात बस उतरत असताना तू मळमळत होत म्हणून डोळे बंद करून घेतलेस. नकळत झोप लागल्यावर तुझं डोकं माझ्या खांद्यावर टेकलस. तो मावळणारा सूर्य, त्याच्या तांबूस प्रकाशात चमकणारा तुझा गोरा सुंदर चेहरा, वाऱ्यावर उडून माझ्या चेहऱ्याला गुदगुल्या करणारे तुझे केस, झोपेत विलग होऊन माझ्यापासून काही इंचावर असलेले तुझे गुलाबी ओठ, तुझ्या दंडाचा मला होणारा स्पर्श आणि पराकोटीने मनावर आणि शरीरावर संयम ठेऊन तुझ्याकडे बघणं टाळणारा स्थितप्रज्ञ मी! त्या दिवशी मी तप करणारे ऋषी आणि तप भंग करणाऱ्या अप्सरा ह्यांची गोष्ट स्वतः अनुभवली!
ज्योती- इतकं सगळं आठवत तुला?
प्रसाद- तुझे ड्रेस, तुझे फ्रॉक, तुझे टॉप्स, तुझे कानातले, ट्रॅडिशनल डे ला साडी नेसलेली तू, कॉलेजच्या पार्टीला डिस्को मध्ये शॉर्ट स्कर्ट मध्ये आग दिसत असलेली पण बावरलेली तू, तुझे सॅंडल, गुलाबी फुलांच्या डिझाईनचे पांढरे पावसाळी शूज सगळं आठवत मला. म्हणजे मी ते विसरलोच नाहीये. ते कोरल गेलंय मनात खोल कुठेतरी! तू सगळं विसरली असशील ना?
ज्योती- असं नाही म्हणता येणार. आहेत ना काही आठवणी. तुझं वर्गात लेक्चर सुरू असताना माझ्याकडे बिनधास्त बघणं, माझ्यावर इम्प्रेशन मारायला बरोबरच्या मुलांची चेष्टा करून माझ्याकडे एक लुक देणं, मी आणि अपर्णा फिरायला पार्क मध्ये जायचो नेमकं त्या वेळेला तिथे फिरायला येणं, तुझं ते काळ मायकल जॅक्सन सारखं जॅकेट, तुझं शिव्या देणं, बेदरकारपणे सिगारेटचा धूर हवेत सोडणं आणि मी समोर दिसले की हळूच सिगारेट टाकून देणं. आठवत मलाही काही काही!
प्रसाद- भें@# तुला हे सर्व आठवत?
ज्योती- हो. ती पहिली शिवी दिलीस ना आत्ता ती मायनस करूनही सगळं आठवत. तू अजिबात बदलला नाहीयेस. फक्त केस विरळ झालेत आणि उरलेले डाय करतोस.
प्रसाद- तू पण होतीस तशीच आहेस. केस पण अजून काळेभोर आहेत. फिगर पण एकदम मेंटेड. फक्त पूर्वी मेरवानचा मावा केक होतीस आता मलई बर्फी झाली आहेस. अजून गोड!
ज्योती- गप ए काहीही!
प्रसाद- अग खरच. तेव्हा तुझी स्तुती करायची हिम्मत नव्हती. आता करतोय तर ऐकून घे ना. आणि ती पण मनापासून. शून्य अपेक्षा ठेऊन.
ज्योती- नक्की? काहीच अपेक्षा नाही?
प्रसाद- अपेक्षा एकच. खरं उत्तर.
ज्योती- कसलं उत्तर?
प्रसाद- हेच की मी त्यावेळी तुला प्रपोज केलं असत तर तू हो म्हणाली असतीस का?
ज्योती- देते मी खर उत्तर. पण आता तुला ते का जाणून घ्यायचं आहे?
प्रसाद- त्यावेळी प्रपोज न करता मी तुझा होकार गृहीत धरला होता. मग ते अपर्णा बरोबर माझं मोठं भांडण. तुम्ही घेतलेले वेगळे सब्जेक्ट. मग अचानक अनपेक्षितपणे आपल्या ग्रुप मध्ये आलेला दुरावा. मग इगो आणि मग हळू हळू सगळं संपण! सुरू होण्याआधीच! मला इतकंच जाणून घ्यायचं आहे की त्यावेळी चार वर्षे मी जे स्वप्न जगलो, आजवर जतन करत आलो ते सत्यात उतरायची शक्यता होती की तो माझा वेडेपणा होता.
ज्योती- हो…
प्रसाद- काय हो?
ज्योती- तू मला तेव्हा प्रपोज केलं असतंस तर मी एका क्षणाचाही विलंब न करता हो म्हणाले असते!
प्रसाद- काय? खरच?
ज्योती- (त्याच्या डोळ्यात बघत) आणि आजही माझं उत्तर तेच असेल.
प्रसाद- What? क…काय म्हणालीस तू?
ज्योती- जे तू ऐकलस तेच.
प्रसाद- यु मीन…ए ज्योती हे काय बोलते आहेस ग तू? आग आपलं लग्न झालंय. संसार आहेत दोघांचे.
ज्योती- मी कुठे अमान्य करते आहे ते.
प्रसाद- मग? आत्ता काय म्हणालीस?
ज्योती- प्रसाद प्रेम हे प्रेम असतं. आणि पहिलं प्रेम हे अमर असतं. परिस्थिती, माणस, वातावरण सगळं बदलू शकत पण पाहिलं प्रेम अढळ असतं. जे तुझ्या आणि माझ्या मनात आज कॉलेज संपून वीस वर्षांहून जास्त झाली तरी तसंच जिवंत आहे.
प्रसाद- पण म्हणून…
ज्योती- म्हणून काय प्रसाद? मी म्हणतच नाहीये की आपण आपल्या सध्याच्या आयुष्याला विसरू, आपण पळून जाऊ, समाजात बदनाम होऊ असलं काही नाही. आपण जसे जगतो आहोत तसेच जगू. पण आपल्या मनात एकमेकांसाठी असलेला जो हळवा कोपरा आहे ना, इतकी वर्षे कुलूप लावून बंदिस्त केलेला तो उघडू! आज इतक्या वर्षांनी रियुनियनच्या निमित्ताने एकत्र आलोय आपण. ह्यापूढेही भेटी होतील. मग आपल्याला माहीत असलेल्या एकमेकांबद्दलच्या भावना एकमेकांकडे उघडपणे मान्य करून त्याचा स्वीकार करायला काय हरकत आहे? कॉलेजात एकमेकांचा होकार अध्यारुत धरून एक छान फुलू शकणार नात आपणच मारलं. मग आता उरलेली वर्ष एकमेकांचा नकार गृहीत धरून परत एका वेगळ्या रुपात जन्म घेऊ शकणार नात आपण परत का मारून टाकायचं?
प्रसाद- म्हणजे आपलं अफेयर…??
ज्योती- प्रसाद ह्या नात्याला नाव नको देऊया. अफेयरला अनैतिकतेची किनार असते. आपलं नात ह्या सर्वांच्या पलीकडल आहे असं मला वाटतं. अगदी लग्नापेक्षा पवित्र आणि जुनं!
प्रसाद- म्हणजे?
ज्योती- म्हणजे बघ हा.तू लग्न केलंस, मी पण केलं. पण कोणाशी केलं? आपल्या सगळ्या किंवा बहुतेक अपेक्षा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीशी बरोबर?
प्रसाद- हो.
ज्योती- कारण लग्नाच मूळच अपेक्षा हे असतं. त्यात चूक काहीच नाही. पण आपण एकमेकांवर प्रेम केलं ते कोणतीही अपेक्षा न ठेवता. In fact आपण प्रेम केलं नव्हतं ते झालं होतं. आपोआप! मग मला सांग, आज इतक्या वर्षांनी आपल्यावर एकेकाळी निरपेक्ष प्रेम करणार कोणीतरी भेटणं ही किती मोठी गोष्ट आहे! अरे आपली सख्खी मुलंही आपल्याकडून अपेक्षा ठेवतात तिथे इतर जगाबद्दल न बोललेलंच बरं!
प्रसाद- हम्म…
ज्योती- बघ तू अजिबात बदललेला नाहीस. अजूनही प्रेमाबद्दल बोलताना टेन्श होतोस.
दोघे हसतात.
ज्योती- चल मी सांगते तुला I love you and will always do!
प्रसाद- Me too…पण ते सध्या फेमस आहे ते नाही बरं का?
ज्योती- गप रे तू…
दोघे- काहीही बोलतोस…
दोघे हसतात!
प्रसाद- ए हा जन्म अर्धा गेलाच. पण पुढल्या जन्मी भेटू तेव्हा मी लगेच प्रपोज करून तुझं बुकिंग करून टाकणार आहे. नाहीतर परत हीच चु#गिरी होईल!
ज्योती- नाही होणार पुढल्या जन्मी ही चु#गिरी. मी तेव्हा प्रेमाला गृहीत धरणार नाही आणि तुलाही धरू देणार नाही. पण उरलेला अर्धा जन्म तुला किती प्रेम करतोस ते दाखवून द्यावं लागेल. हा उरलेला जन्म आपली टेस्ट ड्राईव्ह आहे असं समज. पुढल्या जन्मीच्या लॉंग ड्राईव्हसाठी!
इतक्यात सगळी गँग त्यांच्याजवळ येते. धमाल मस्ती सुरू होते. खुर्चीच्या मागे ज्योती आणि प्रसादने एकमेकांचे हात घट्ट धरलेले असतात. एक नवं, निरपेक्ष, पवित्र, खूप जून नात उमलायला सुरुवात झालेली असते! टेस्ट ड्राईव्ह पण लॉंग ड्राईव्ह होणार ह्याची दोघांना खात्री असते!
Image by TanteTati from Pixabay 
mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

2 thoughts on “टेस्ट ड्राईव्ह…

  • December 17, 2019 at 12:06 pm
    Permalink

    Nice new thought 👌👌👌👌

    Reply
  • December 18, 2019 at 6:45 am
    Permalink

    खूप मस्त….

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!