आठवडा बाजार 

“रघु, उद्या सारगावचा आठवडा बाजार आहे. आता तुझी परिक्षा संपलेय, तर मित्रांबरोबर गाव हिंडत बसण्यापेक्षा दर रविवारी माझ्याबरोबर बाजारात चल. तेवढीच जरा मदत होइल”, बाबांनी फर्मानच सोडलं आणि रघू मनातून आनंदला.  

“उद्या आठवडा बाजारात कदाचित पुन्हा ‘ती’ दिसेल. यावेळी मात्र संधी दवडायची नाही. मागच्यावेळी अगदी ओझरती दिसली होती ती! पण ती नक्की तिच असेल ना? हो तिच असणार तिच्या कपाळावरची ती काळी चंद्रकोरीसारखी खूण मी कधी जन्मात विसरु शकणार नाही”. 

“काय रे रघू, काय म्हणतोय मी? 

“अं… हो…येतो उद्या”, असं म्हणून रघू  बाहेर जायला निघाला. त्याचं उत्तर ऐकून बाबांना जरा आश्चर्यच वाटलं. 

    रघुची बारावीची परिक्षा नुकतीच संपली होती. कोकणातल्या खेडेगावात एंजॉयमेंट अशी काय असणार? त्यात उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आंबे, काजू, रतांब्याची रेलेचेल. गावातल्या बहुतेक मुलांचा संपूर्ण दिवस आंब्याच्या पेट्या भरणे, रतांबे निवडणे, काजू गोळा करणे यातच संपायचा. संध्याकाळ जरा मोकळी मिळायची त्यामुळे संध्याकाळी सगळे नाक्यावर किंवा गावातल्या एकुलत्या एका पुलावर जमून धमाल करत असत. याच पुलामुळे रघुचे गाव सारगावशी आणि मुख्य म्हणजे सारगावच्या आठवडा बाजाराशी जोडलं गेलं होतं. रघुच्या घरी ना आंब्याच्या बागा, ना कोकमाची झाडं. थोडीफार शेती आणि परंपरागत चालत आलेला दुधाचा व्यवसाय हेच त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचे साधन होते. 

    सारगावचा आठवडा बाजार म्हणजे पंचक्रोशीतील एक मोठा सोहळा असायचा. एका मोकळ्या कातळावर भरणारा हा आठवडा बाजार सराफबाजार, भाजीबाजार, धान्यबाजार,  हेडबाजार, कपडे, खाद्यपदार्थांच्या गाड्या अशा अनेक प्रकारच्या स्टॉल्सनी गजबजून जायचा. पंचक्रोशीतील नागरिक या बाजारात खरेदी – विक्री करण्यासाठी येत असत.

   रघुचा मात्र या आठवडा बाजारावर राग होता. कारण याच आठवडा बाजारामुळे ‘ती’ त्याच्यापासून दुरावली होती. पण मागच्या रविवारी याच बाजारात ‘ती’ पुन्हा त्याला दिसली आणि त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. 

   दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून रघु बाबांबरोबर आठवडा बाजारात जायला निघाला. भाज्यांची पोती व्यवस्थीतपणे टेंपोत ठेवून शांतपणे एका बाजूला बसला. कालपासूनचं त्याचं वागणं बघून त्याच्या बाबांना जरा आश्चर्यच वाटलं. आठवडा बाजाराचा राग राग करणारा आपला मुलगा आज अजिबात कसलीही तक्रार न करता बाजारात यायला तयार झाला,  यावर त्यांचा काही केल्या विश्वास बसत नव्हता. 

    आठवडा बाजारात जवळपास प्रत्येकाची जागा ठरलेली होती. इतक्या वर्षात ‘जागा’ या विषयावरुन कधी कोणाची भांडणे झाली नव्हती. तरीही शक्य तितक्या लवकर जाऊन दुकान मांडायचा शिरस्ता रघुच्या बाबांनी इतके वर्षात कधी मोडला नाही. बाजारात गेल्यावर सोबतची पोती अंथरून रघुने सर्व भाज्या व्यवस्थित मांडून ठेवल्या. बाप लेकाकडे कौतुकाने बघत होता, पण मनातून कुठेतरी एक सूक्ष्म कळ उठत होती. आपल्या हुशार मुलाला असं भाजी विकताना बघणं हे त्याच्यासाठी नक्कीच क्लेशदायक होतं. लेकाला कलेक्टर बनवायचं स्वप्न उराशी बाळगणारा बाप आज त्याला भाजी विकायला घेऊन आला होता. तो तरी काय करणार? परिस्थितीपुढे शेवटी सगळेच हतबल असतात. 

   इकडे रघुच्या मनात मात्र फक्त तिचा विचार होता. जसजसा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता, तसतसा तिचा विचार त्याला अस्वस्थ करत होता. ‘ती दिसेल ना आज?’’ या प्रश्नाचा ब्रह्मराक्षस त्याची पाठ सोडत नव्हता. 

बाजारातली गर्दी हळूहळू वाढायला लागली होती. गिऱ्हाईकाला भाव सांगण्यापासून पैसे घेईपर्यंतची सगळी कामे रघु यांत्रिकपणे करत होता. अशातच ‘ती’’ येताना दिसली आणि त्याचा चेहरा खुलला. “हो तिच आहे ही. अगदी शंभर टक्के तिच. तिच्या गोऱ्या कपाळावरची ती काळी चंद्रकोरीसारखी खूण आणि डोळ्यातले निरागस भाव अजूनही आहेत तसेच आहेत.” तो मनोमन आनंदला. 

“बाबा, मी आलोच जरा जाऊन”” 

“अरे, कुठे निघालास? बाबांचा हा प्रश्न येइपर्यंत तो निघून गेला होता. 

“कठीण आहे या पोराचं…”, असं म्हणत ते ही गिऱ्हाईकाकडे वळले. 

    तिच्याबरोबर असणारा माणूस दुसरीकडे गेल्यावर रघु तिच्यासमोर गेला आणि तिला डोळे भरुन बघू लागला. 

“ए पोरा कोन रं तू आनि हिथं काय काम तुझं?”

पाठिमागून आलेल्या भारदस्त आवाजाने रघु दचकला. हा तर हिच्याबरोबर होता तोच माणूस आहे. 

“अरे ए चल निघ इथून” तो माणूस कडाडला. 

 “हिचा भाव काय? रघुने तिच्याकडे बोट दाखवत हिमतीने विचारलं. 

यावर मात्र कुत्सितपणे हसत तो रांगडा माणूस म्हणाला, “अजून मिसरूड न्हाय फुटलं तुला चार पैक कमावायची न्हाय अक्कल नि आला मोठा भाव विचारायला.”

“ते तुम्हाला काय करायचंय? तुम्ही तुमचं काम करा आणि मला भाव सांगा.” रघु.

“मला अक्कल शिकवतोस काय, न्हाय सांगत जा. आधी कोनी मोटं मानुस असल, तर घेऊन ये माझ्यासमोर नी मग इचार भाव. चल निघ इथून.” तो माणूस संतापून म्हणाला. 

जाता जाता त्याने तिच्याकडे पाहिले. त्याला तिच्या नजरेत कारुण्य दिसले. पण का कुणास ठावूक? एक क्षण त्याला वाटलं तिनेही त्याला ओळखलय. मनाशी पक्का निश्चय करुन तो दुकानाजवळ आला. 

  “अशी हातातली कामं टाकून कुठे गेला होतास ? अचानक काय झालं तुला?”

“बाबा, मला बारावीला  चांगले मार्क मिळाले तर तुम्ही मला बाईक घेऊन देणार आहात ना?””

“हो. पण आत्ता काय त्याचं?”

“मला बाईक नको. म्हणजे मला चांगले मार्क मिळणारच आहेत. आणि तुमचं, ‘मला कलेक्टर करायचं’ स्वप्नही मी पूर्ण करेन. फक्त मी आज जे मागतोय ते मला द्या.” असं म्हणून त्याने सगळी हकीगत त्याच्या बाबांना सांगितली. 

“काय बोलतोयस तू? उगाच काहीतरी बोलू नकोस आणि तसंही ‘ती’ तिच असेल कशावरुन?”

“बाबा, मी सांगतोय ना. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. एकदा बघा तर तुम्ही. तुम्हालाही पटेल माझं म्हणणं. यापुढे तुम्ही म्हणाल ते सगळं ऐकेन. फक्त माझी ही एक गोष्ट मान्य करा.”

    लेकाचा उदास चेहरा बघून शेवटी बापाचं काळीज द्रवलं. तरीही थोडावेळ विचार करुन त्यांनी रघुचं म्हणणं मान्य केलं. बाजूच्या दुकानदाराला लक्ष ठेवायला सांगून ते रघुबरोबर त्या माणसाकडे गेले. 

  तिला बघितल्यावर त्यांना जाणवलं,  “रघू म्हणतोय त्यात खरंच काहीतरी तथ्य आहे.”

 “काय भाव हिचा?” रघुच्या बाबांनी विचारले. 

“१९,०००/-  आनि येक पै बी कमी करनार न्हाय. आनि हा अजून य्येक समदे पैके रोकडा घ्येनार.”

“ठिक आहे. पण मला हिच्या मालकाचं नाव कळू शकेल का?”

“तुम्हास्नी काय करायचय?”

“हे बघ मी तुला सगळे पैसे द्यायला तयार आहे ना? मग नाव सांगायला काय हरकत आहे?” रघुचे वडिल शांतपणे पण खंबीर स्वरात बोलत होते. 

  रघुच्या बाबांचा करारी आवाज ऐकून त्या माणसाने तिच्याबद्दची, तिच्या मालकाबद्दलची सगळी माहिती रघुच्या बाबांना सांगितली आणि त्यांना रघुचं म्हणणं बरोबर असल्याची खात्री पटली. 

“संध्याकाळी माझ्या घरी पोचती कर हिला आणि पैसे घेऊन जा. हे घे १०००/- रुपये ॲडव्हान्स आणि  हा पत्ता असं म्हणून रघुच्या बाबांनी ५०० च्या दोन कोऱ्या नोटा आणि पत्त्याचा कागद त्या माणसाकडे दिला. 

   रघु मनोमन आनंदला. आज कितीतरी दिवसांनी ‘ती’ घरी येणार होती. त्याच्या आयुष्यातली एक पोकळी भरुन निघणार होती. 

   चंद्री म्हणायचा तो तिला. तिच्या कपाळावरची काळी चंद्रकोर बघून त्यानेच तिचं नाव ठेवलं होतं. आठ वर्ष होवून गेली या गोष्टीला. त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती तशी चांगली होती. ती जन्माला आली तेव्हा अवघा सात वर्षांचा होता तो. तेव्हापासूनच ती त्याला आवडायची. त्याचा बराचसा वेळ तिच्यासोबतच जात असे. तिच्याशी मनातलं सगळं बोलत असे, तिच्याशी खेळत असे. तिलाही रघु खूप आवडायचा. कधी रघुला शाळेतून यायला उशीर झाला तर तिची नजर त्याला शोधत बसायची.  दोघांनाही एकमेकांचा लळा लागला होता. अशीच तीन वर्ष सरली. अचानक आलेल्या दुष्काळामुळे आर्थिक परिस्थिती खालावली. परंपरागत दुधाचा व्यवसाय त्यामुळे गोठ्यातली दुभती जनावरं विकणं परवडणारं नव्हत. शेती ओस पडली होती. अखेर एक गाय विकायची असं ठरलं पण कोण? चंद्री… हो चंद्रीलाच विकायचं ठरलं. चंद्री अजून दुभती झाली नव्हती. त्यामुळे तिला विकून आहे त्या परिस्थितीत फारसं नुकसान होणार नव्हतं. शिवाय तिला भावही चांगला मिळाला असता. त्यामुळे चंद्रीला विकायचं जवळपास निश्चित झालं. तेव्हा सारगावात नुकताच आठवडा बाजार चालू झाला होता. खरंतर चंद्रीला गावातूनच एक गिऱ्याईक आलं होतं. पण तरीही आठवडा बाजारतल्या हेडबाजारात (गुरांची खरेदी विक्री करणारा बाजार) जर चंद्रीला भाव चांगला मिळाला, तर तिला तिथेच विकायचं असं ठरलं. लळा फक्त माणसांचाच लागतो असं नाही, तो प्राण्यांचा किंवा पक्षांचा कोणाचाही लागू शकतो. त्यामुळे घरात नाही निदान चंद्री गावात तरी रहावी म्हणून रघु मनोमन प्रार्थना करित होता. त्याच्याच हातून चारा-पाणी खाणारी चंद्री दुसरीकडे कशी राहिल? या गोष्टीची चिंता त्याला सतावत होती.  पण हेडबाजारात चंद्रीला चांगला भाव मिळाला आणि सकाळी गेलेली चंद्री घरी परत आलीच नाही. तेव्हापासून त्याला बाजार या शब्दाचा तिटकारा निर्माण झाला. पण आज चंद्री परत येणार होती. ज्या आठवडा बाजाराने तिला त्याच्यापासून हिरावून घेतलं त्याच आठवडा बाजारात त्याची चंद्री त्याला परत मिळाली होती. 

Image by Prasanta Sahoo from Pixabay 

    

Manasi Joshi
Latest posts by Manasi Joshi (see all)

Manasi Joshi

कायद्याची पदवी. सात वर्ष लीगल फिल्डमध्ये काम केल्यावर नंतर स्वखुशीने स्वीकारलेला 'हाऊस वाईफ'चा जॉब. आवड म्हणून सुरू केलेलं लिखाण आता प्रोफेशनमध्ये बदललं आहे. सध्या अर्थसाक्षर.कॉम या वेबसाईटसाठी एडिटर आणि कंटेंट मॅनेजमेंटचं काम करते. - मानसी जोशी

3 thoughts on “आठवडा बाजार 

  • December 19, 2019 at 1:40 pm
    Permalink

    Nice 👌👌👌👌

    Reply
  • December 21, 2019 at 7:21 am
    Permalink

    फारच छान

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!