ऋणानुबंध
नातं म्हणजे नक्की काय? आईचं मुलाशी, मुलांचं त्यांच्या आई वडिलांशी, भावा बहिणीचं एकमेकांशी, पती पत्नीचं एकमेकांशी, किंवा इतर नातेवाईकांशी, मित्राचं मित्राशी किंवा मैत्रिणीशी अन अजून अशीच कितीतरी नाती. ही एवढीच नाती असतात का? रक्ताची नसलेली पण मनानी जोडलेली, मानलेली हि नातीच असतात ना? कि त्यांना वेगळे काही म्हणावे? बरीचशी नाती अशी असतात कि त्यांना काही नाव देता येत नाही, पण त्यात सुद्धा एक धागा असतो प्रेमाचा, वात्सल्याचा, जिव्हाळ्याचा. अशी नाती कोणी जाणून बुजून जोडत बसत नाही ती आपोआप जोडली जातात अन नात्याची विण घट्ट होत जाते. अशावेळी ती नाती निभावत राहणे एवढेच आपल्या हातात असते. कारण अशा नात्यांमध्ये ना कोणतीही जबरदस्तीची जबाबदारी असते ना कोणतं दडपण. तिथे असते मनाची तयारी, समोरच्याच्या आनंदात आनंद आणि दुखा:त दुख: मानण्याची. अशा नात्यांना का कुठे नावं असतात? ही अशी नाती फक्त ते नटे समजू शकेल अश्याच माणसाला दिसतात अन ज्यांना अनुभवता येतात तेच लोक फक्त हि अशी नाती निभावत राहतात. अशीच विचारांची कधी तरी तंद्री लागते अन मग मला त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
तो माझा जवळचा मित्र प्रणव. कॉलेजात आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत एकत्र होतो. तो होताच तसा लाघवी. सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा. नेहमी काहीतरी गमती जमती सांगून सगळ्यांना हसवणारा. एखाद्या गोष्टीवर गंभीरपणे बोलायला लागला की असा बोलायचा की सारंकाही विसरून त्याचं बोलणं ऐकत राहावंसं वाटे. त्याच्या आयुष्यातील कित्येक गोष्टी तशा का होत्या हे मला त्याचा जवळचा मित्र असूनही समजलं नव्हतं. कदाचित त्यालाही त्या समजल्या नसाव्यात. मी खरंच त्याचा जवळचा मित्र होतो का असाही प्रश्न पडायचा. तो लहानपणापासून कसा वाढला हे ऐकून तर माझ्या काळजात चर्रर्र झालं. रक्ताची नाती, माणसं असूनदेखील त्याचं लहानपणापासूनचं आयुष्य अनाथालयात का जावं हा अजून एक अनुत्तरीत प्रश्न. ह्या विलक्षण माणसाची माझी कॉलेजच्या पहिल्या दिवशी भेट झाली अन लगेच मैत्री झाली. कमवा आणि शिका ह्या योजनेअंतर्गत त्याने प्रवेश मिळवला होता. बुद्धीने विलक्षण हुशार अन एकपाठी. पण कोणाकडूनही सहानुभूती किंवा दया वगैरे त्याने कधीच मिळवायचा प्रयत्न केला नाही किंबहुना कोणी तसे करायचा प्रयत्न केल्यास त्याला ते आवडायचे नाही.
आमची घरची परिस्थिती बरी असल्यामुळे मला पॉकेट मनी चांगला मिळत असे. कॉलेज कॅन्टीनचे बिल सारखे मीच देऊ करतोय हे बघून त्याने मला सॉलिड दम भरला होता. विलक्षण मानी पण तितकाच हळवाही होता तो. आपल्या घरच्यांनी आपल्याला का आपल्यापासून दूर केले हे त्याला कळले नाही. पण त्याच गोष्टीची तो डोकेफोड वा राग राग करत बसला नाही. त्या सगळ्यांना माफ करून एखाद्या निष्काम कर्मयोग्याप्रमाणे तो जगत आला. आणि म्हणूनच की काय आम्ही मित्र हेच त्याचं विश्व बनलो होतो.
अशाच एका दिवशी, कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना आमच्या दोघांच्या आयुष्यात पल्लवी आली. एकदम साधी सरळ, गोल चेहरेपट्टी असणारी, गव्हाळ वर्णाची, काळ्याभोर टपोऱ्या डोळ्यांची, चांगली लांब वेणी घालणारी. या मॉडर्न जगात आगदीच मॉड नसली तरी कुणावरही आपली छाप पडावी असं तिचं व्यक्तिमत्व नक्कीच होतं. ती आली अन आमचा ग्रुप बहरून गेला. आम्ही पाच – सात जण नेहमीच बरोबर असू. प्रणवला ती कधी आवडायला लागली हे आम्हाला कळलंच नाही. अर्थात त्याने तसे कळूनही दिले नाही आम्हाला. दिवस लोटत राहिले. त्याची चलबिचल वाढत राहिली. मी एक दोनदा त्याला विचारायचा प्रयत्न केला पण त्याने काहीतरी सांगून वेळ मारून नेली. सोनेरी पावलांनी आलेले दिवस जास्त काळ सोबत राहत नाहीत असे म्हणतात किंवा सोनेरी पावलांनी आलेले दिवस कितीही संथगतीने सरले तरीही ते दिवस आगदी भुर्रकन उडून गेले असे मनातून वाटत राहते. सुखाचे, आनंदाचे, मस्तीभरे कॉलेजचे ते दिवस काही कळण्याच्या आतच संपून गेले.
तीन वर्षे संपली. कॉलेज संपले. स्वतःला सिद्ध करण्याच्या लढाईत आम्हीही तलवारी घेऊन निघालो. कोणी पी. जी. ला गेले. कोणी नोकरीनिमित्त इतरत्र धावले. मी ही पी. जी. साठी मुंबई गाठली. प्रणवला एका चांगल्या कंपनीत तिथेच नोकरी मिळाली त्याने ती स्वीकारली. त्याचं अन माझा बोलणं फक्त फोनवर होत होतं. अन अशातच पल्लवीच्या लग्नाची बातमी आली. सुखवस्तू कुटुंबातील एका छानश्या मुलाबरोबर तिच्या वडिलांनी तिचे लग्न लाऊन दिले. जावई आयटी कंपनीत होता. नुकतंच त्याचं ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये पोस्टिंग झालेलं. सगळं अलबेल होतं. तिच्या लग्नाची बातमी मला प्रणवने सांगितली. आमची खास मैत्रीण अन तिने मला बोलावलं सुद्धा नाही? मला जरा आश्चर्य वाटले खरे.
अजून काळ सरला पी. जी. नंतर मला चांगला जॉब ऑफर झाला. मी हि कामात गुंतत गेलो. आयुष्याच्या गाडीने वेग घेतला. आठवड्याला होणारा प्रणवच्या आणि माझा कॉल आता कधीतरी होऊ लागला. माझा अन तिचा आता काहीच संपर्क राहिला नव्हता. गेल्या वर्षी माझ्या लग्नाची पत्रिका त्याला दिली पण तो येऊ शकला नव्हता. मध्यंतरी कामानिमित्त म्हणून त्या शहरी गेलो होतो. सहज म्हणून त्याच्याकडे डोकावलो. अन एक एक करत आठवणींचे पापुद्रे निघू लागले. मी स्वतः बऱ्याच दिवसांनी भेटायला आलेलो बघून प्रणवलाही बरे वाटले. भरपूर गप्पा झाल्या. बोलता बोलता पल्लवीचा विषय निघाला. त्यानंतर त्याने जे सांगितले ते ऐकून मात्र मी हेलावून गेलो.
एकेदिवशी प्रणव कॉलेज समोरच्या रोडवर उभा होता तोच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला त्याला पल्लवी दिसली. ती… इथे कशी…? ती तर ऑस्ट्रेलियाला होती. हो पण तीच आहे, तिच्या खांद्यावर एक तान्हुला पण आहे. नक्की काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी प्रणव धावला. पण रोड क्रॉस करून तिकडे जाईपर्यंत ती एका बस मध्ये बसून निघून गेली. त्याने हाका मारल्या पण काही उपयोग झाला नाही. त्याने तिच्या घरी फोन केला, तर तिच्या वहिनीकडून काहीच माहिती मिळाली नाही. रात्री उशिरा त्याचा फोन वाजला. अननोन नंबर होता. त्याने उचलला तर तिचाच फोन.
त्याने लगेच तिला विचारले “तू कुठे आहेस? कशी आहेस? दुपारी मी तुला पाहिले. तुझ्या घरी फोन केला, कोणी काहीच सांगत नाहीये. नक्की काय झालय”?
तिने फक्त त्याला एकच विचारले “मला घ्यायला येतोस”?
तो ताबडतोब तिला घ्यायला गेला. त्याच्या घरी घेऊन आला. अन मग तिच्याकडून त्याला सगळी हकीकत कळाली. तिच्या लग्नानंतर २ वर्षे आनंदात गेली. पण दुर्दैवाने तिच्या पतीचा अपघात झाला अन त्यातच तो गेला. ती इकडे परतली. जी सासरची मंडळी आगदी चांगली वाटत होती त्यांनी तिला सांभाळायला नकार दिला. तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या बाळाला कधीच दूर लोटलं नाही. पण खंतावलेले वडील हिच्या काळजीनेच गेले. आई तर आधीच गेलेली. घरी सगळी सत्ता भावाच्या बायकोकडे गेलेली. सततची बोलणी, कटकट ऐकून शेवटी ती घराबाहेर पडली ते परत कधीच तिथे न जाण्याचे ठरवून.
प्रणवने तिच्या त्या निरागस जीवाला कुशीत घेतलं. आधार दिला. त्या बिचाऱ्याला बापाची माया मिळालीच नव्हती. त्याच्या प्रेमळ कुशीत तो लहानगा जीव सुखावला… बऱ्याच दिवसांनी गाढ झोपी गेला. त्याने तिला मानसिक बळ दिलं, आधार दिला, पुन्हा नव्याने जगण्याची उर्मी दिली. डिग्री तर तिच्याकडे होतीच बुद्धीमत्ता पण होती. तिने गमावला होता तो आत्मविश्वास. तो त्याने निर्माण केला. ती प्रफुल्लीत झाली. ५ – ६ इंटरव्ह्यू नंतर तिला लगेचच जॉब मिळाला. त्याने त्याच्याच अपार्टमेंट मध्ये तिला एक फ्लॅट भाड्याने घेऊन दिला. त्याचं तिचं एकमेकांकडे रोजचं जाणं येणं आहे.
हे सगळ ऐकून मी थक्क झालो. मी त्याला म्हटलं “अजूनही तेवढच प्रेम करतोस ना तिच्यावर”? माझ्या प्रश्नावर त्याने नाही अशी मान हलवली. अन मी काही बोलण्याच्या आतच तो बोलू लागला
“हो. माझं प्रेम होतं तिच्यावर पण आता ती भावना नाही”.
मी म्हणालो “मला जाणवल होतं ते त्या वेळी. अन आता तिच्यासाठी एवढं सगळं करतो आहेस. ती सुद्धा खुश आहे तुझ्या साथीत तर, त्यावेळी तुला तिला सांगणं जमलं नव्हतं. तर आता सांग. लग्न कर तिच्याशी.”
त्यावर तो म्हणाला ” अथर्व माफ कर, पण एक गोष्ट मी कायम लपवत आलो तुझ्यापासून. मी कॉलेजच्या शेवटच्या दिवशीच तिला लग्नासाठी विचारलं होतं. पण तिला दुसरं कोणीतरी आवडत होतं. अन तो तिला विचारेल म्हणून ती आस लाऊन बसली होती. अन स्वताहून विचारायची तिच्यात हिम्मत नव्हती. मला तिने प्रांजळपणे सांगताना मी हे कोणाला सांगू नये अशी शप्पत घातली होती. मी गप्प राहिलो. तिला नाही ना ती भावना माझ्याबद्दल. मग मी पण ती भावना काढून टाकली माझ्या मनातून. तो दिवस अन आजचा दिवस. त्या दिवसानंतर मी कधीच तो विषय काढला नाही तिच्याकडे”.
एक उसासा सोडून तो म्हणाला “नकार काय आयुष्यात पहिल्यांदाच मिळाला होता असं नाही ना रे. पण आता कोणाच्या तरी उपयोगी पडतंय माझा आयुष्य ह्यातच मला आनंद आहे. तिच्या पिल्लावर माया करताना, त्याला खेळवताना बाकी कुठलाच विचार येत नाही रे मनात. त्याच्या आयुष्यातील मायेच्या माणसांची कसर अशी भरून निघाली होती. सगळं कसं छान चालू आहे”.
मी म्हणालो “ते ठीक आहे रे. पण तू काय आयुष्यभर असाच राहणार? अन मग जर ती भावना नसेल मनात तर मग नक्की काय नातं काय तुमच्या दोघांत आता?”
तो म्हणाला “प्रत्येक नात्याला नावचं लेबल लावलंच पाहिजे का”?
क्षणभर आम्ही दोघेही गप्प झालो मग
तो म्हणाला “तू कधी खळखळ वाहणाऱ्या नदीतून एखादा लाकडी ओंडका वाहताना पाहिलायस का? काय नातं असतं त्या ओंडक्याचं अन नदीच्या प्रवाहाचं? काहीच नाही. पण तरीही तो ओंडका त्या प्रवाहाचाच एक भाग असल्यासारखा वाहत असतो. संपूर्ण प्रवासात ना धड ते पूर्णपणे एकरूप होतात ना वेगळे होतात. त्यामुळे मैत्रीच्याही पलीकडे जरी आमचं नातं असलं तरी त्याला पूर्णत्वाच असं काही नाव मी तरी नाही देऊ शकत. अन मुळात आमच्या ह्या नात्याला काही नाव देण्याचा हट्टच मला पटत नाही”.
मी म्हणालो “माझा तसा काही हट्ट नाही. पण मला एकच सांग, तिला हवा होता तो आधार मिळाला. पण तुझं काय?”
नेहमीप्रमाणेच निखळ हसून तो म्हणाला “माझं काय? मी प्रवाहासारखा वाहत राहणार. मला शक्य आहे तो पर्यंत. ती जोपर्यंत माझ्या सोबत येईल तो पर्यंत तिला वाहून नेणार. आयुष्याच्या सागरात विलीन होईपर्यंत तिला साथ देईन. एखाद्या वळणावर रेंगाळलीच ती समजा, किंवा एखाद्या किनाऱ्यावर अडकली किंवा गुंतली कोणात तर आनंदाने तिला सोडून मी वाहत जाईन पुढे. पण तो पर्यंत तरी हे निनावी नातं सांभाळायला हवं नाही का? तिचं पूर्वजन्मीचं काहीतरी देणं असेल माझ्याकडे. ते चुकवता नाही ना येणार. ते द्यायलाच हवं”.
काय बोलावे ते न समजून मी आणि तो दोघेही शांत बसलो.
बराच वेळ झाला होता. जाण्यासाठी मी उठलो. त्याला मिठी मारली. लवकरच भेटू असे ठरवून, निघायला वळलो अन एकदम काहीतरी आठवल्यासारखे त्याला विचारले
“अरे पण तिला कोण आवडत होतं ते संगीतलच नाही का तिने तुला?”
तो म्हणाला “सांगितले ना. आधी तिने त्यालाच संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा नवीन नंबर, पत्ता काहीच नव्हता तिच्याकडे मग नंतर तिने मला फोन केला. माझ्याकडे होता त्याचा नंबर”.
“अरे पण मग दिलास का तिला नंबर? काय झाले पुढे”? मी आगदी उतावीळपणे विचारले.
प्रणव शांतपणे म्हणाला “दिला मी नंबर पण काही उपयोग नव्हता. ती मला भेटायच्या आधीच ऑलरेडी तुझं लग्न झालं होतं”.
मी गोंधळून त्याला विचारले “म्हणजे? त्याचा इथे काय संबंध?”
दोन क्षण शांततेत गेले. अन ती शांतता चिरत त्याचे शब्द माझ्या कानात शिरले
“पल्लवीला आवडणारा तो, म्हणजे दुसरं कोणी नव्हे, तर तूच होतास अथर्व”
Image by Gerd Altmann from Pixabay
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021