GA_400
आदित्य आणि संयुक्ता… आगदी अवखळ. कॉलेजच्या दिवसांपासून एकत्र… आगदी लव्ह बर्डस. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे. आनंदी आणि निरागस. दोघांचेही कॅम्पस मधेच सिलेक्शन झालेले. दोघांनीही टॉप आय टी कंपनींचे इंटरव्ह्यू क्रॅक केलेले. नशिबाने दोघांनाही मुंबईमध्येच पोस्टिंग मिळालेलं. दोघांचीही ऑफिसेस पवई एरीयामध्ये आगदी जवळजवळ. रहायला देखील जवळपासच. मस्त धमाल आयुष्य चालू होतं.
आता दोघेही आपापल्या करिअरच्या पाहिऱ्या चढत होते. आता दोघांनाही बघता बघता ३ वर्षांचा अनुभव आला होता. आपापली कामं, कंपन्या, कंपन्यांच्या पॉलिसिज, वर्क कल्चर, दोघांनाही मिळालेले प्लॅटफॉर्मस ह्या बाबत ते समाधानी होते. सल फक्त एकच होती. दोघानांही अॉन साईट जायला मिळाले नव्हते अजून. नवीन नवीन जॉईन झालेल्यांना बाहेर जाण्याची संधी मिळत होती. पण ह्या दोघांच्या बाबतीत कुठे माशी शिंकत होती तेच कळत नव्हते. त्यातूनच घरून आता लग्न करा म्हणून प्रेशर येत होतं. पण दोघांनाही त्या अॉन साईट असाईनमेन्टचे काय अप्रूप होतं देव जाणे. पण एकदा का होईना वर्ष – दोन वर्ष अॉन साईट जाऊन आल्याशिवाय लग्न करायचे नाही असे त्यांनी ठरवले होते. घरच्यांना हे काही पसंत नव्हते. त्यांनी त्यांना अजून सहा महिन्यांची मुदत दिली होती.
पण अखेर त्यांचा दिवस आला. आदित्यच्या ऑफिस मधून त्याला सांगण्यात आले की त्याला जर्मनीला २ वर्षांच्या असाईनमेंट साठी जायचे आहे. तो एकदम खुश झाला. लगेच व्हिसा वगैरेच्या तयारीला लागला. संयुक्ताचं मात्र अजून काही होत नव्हतं. ती थोडी अपसेट होती. पण त्याच्यासाठी खुश होती. ज्या दिवशी त्याला व्हिसा मिळाला त्यादिवशीच तिला अचानक ऑफिस मधून कळले की तिला देखील आता २ वर्षांसाठी यूएसएला जावे लागणार होते. आधी दुसरे कोणीतरी जाणार होते पण त्याचा व्हिसा रिजेक्ट झाल्यामुळे मग हिला संधी मिळाली. तिला आता तातडीने जावे लागणार होते. त्यामुळे तिला देखील लगेच व्हिसा अप्लाय करावा लागला. काही दिवसात तिचा व्हिसा इंटरव्ह्यू होऊन व्हिसा मिळाला देखील.
एकदा किस्मतके दरवाजे उघडले की खूप काही चांगलंच घडत असतं. दोघांचाही जाण्याचा दिवस एकच होता. फ्लाईट सिलेक्ट करण्याचा ऑप्शन असल्याने दोघांनी जर्मनी पर्यंतचे एकाच फ्लाईटचे बुकिंग केले. दोघांचीही मुंबईहून फ्लाईट होती आणि दोघेही एकाच फ्लाईटने फ्रॅंकफर्ट पर्यंत जाणार होते. तिथून ती न्युयॉर्कला आणि तो जर्मिनीतील दुसऱ्या शहरात डोमॅस्टिक फ्लाईट ने जाणार होता. एकच प्रॉब्लेम होता तो म्हणजे ते निघणार त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचा वाढदिवस होता. संयुक्ताला तो दिवस आदित्य बरोबर एन्जॉय करता येणार नव्हता. पण त्याच्यासाठी एक छानसे गिफ्ट घेऊन ठेवले होते आणि फ्रॅंकफर्ट एअरपोर्ट वर त्याला द्यायचे ठरवून प्याकिंग केले.
ठरल्या दिवशी ठरल्या वेळी ते दोघेही निघाले. एकाच टॅक्सीने मुंबईच्या इंटरनॅश्नल एअरपोर्टवर वरती आले. चेकइन करून त्यांची फ्लाईट अनौंस होण्याची वाट पाहत असताना अनौंसमेंट झाली… त्यांची फ्लाईट अनौंस झाली होती. बाकीच्या फॉरम्यालिटिज कम्प्लीट करून ते दोघे आपल्या जागी बसले आणि काही क्षणात त्यांचे बोईंग ७७७ आकाशात झेपावले. ७ तासांच्या प्रवासात ते जर्मनीत पोहचले देखील. आणखी ३ तासांनी तिची न्यूयॉर्कची फ्लाईट होती आणि ४ तासांनी त्याची डोमॅस्टिक फ्लाईट होती.
दोघे फ्रेश झाले. ब्रेकफास्ट केला. थोडी भटकंती केली. त्याची फ्लाईट वेगळ्या टर्मिनल वरून होती तिची ते आत्ता ज्या टर्मिनल होते तिथूनच होती. त्यामुळे त्याला आता निघावे लागणार होते. आता लवकर भेट नाही होणार… फोन, व्हिडीओ कॉल्स होतील पण ते समोरासमोर नसेल म्हणून दोघे जरा भाऊक झाले. पण आता इलाज नव्हता. इट वॉज टाईम टू चेस द ड्रीम. तो तिला बाय करून निघाला. त्याला पाठमोरे जाताना बघून उगाच तिच्या मनात कालवाकालव झाली.
ती पण वळली. तिची फ्लाईट आता अनौंस होणार होती. ती एक खुर्ची पकडून बसून राहिली. काही वेळ गेला. तिचा फोन वाजला. बघितले तर त्याचा whatsapp होता. तो त्याच्या बोर्डिंग गेट जवळ पोहचला होता. तिने त्याला मिसिंग यू म्हणून मेसेज केला. तो पण हळवा झाला आणि सरळ त्याने तिचा आवाज ऐकण्यासाठी फोन लावला. थोडं बोलणं झालं उगाच दोघांचे आवाज घोगरे होऊ लागले.
संयुक्ता – आय विल मिस यू डीअर
आदित्य – मी टू
संयुक्ता – पण का असं का? तू एकीकडे मी एकीकडे असे का? आपल्याला एकाच ठिकाणी का नाही रे मिळाला प्रोजेक्ट.
आता ह्या प्रश्नांना काही उत्तर नव्हते कारण त्यांची स्वप्नं सुध्दा तशीच होती ना.
तिला समजावत समजावत तो अचानक बोलून गेला – हो रे माझ्या सोनचाफ्या हो रे.
अन त्याने एकदम जीभच चावली.
पाठीमागे त्याला आवाज ऐकू आला. गोल्डन एअरवेज इज हॅप्पी टू अनौंस देअर फ्लाईट टू न्यूयॉर्क. अवर फ्लाईट GA 400 इज रेडी फॉर बोर्डिंग नाऊ.
आदित्य – चला तुझी फ्लाईट अनौंस झाली. बाय. ह्याव सेफ फ्लाईट. नंतर बोलू.
काही काळ मध्ये गेला. तिच्या फ्लाईट ने आता टेक ऑफ केले असेल असा विचार करत तो बसून होता आणि अचानक एअर पोर्टवर एकदम दंगा आणि धावपळ झाली. इमर्जन्सी सायरन वाजू लागले. काय झालय कोणालाच कळत नव्हते. सगळ्याच फ्लाईट डीले किंवा कॅन्सल केल्याचे डिस्प्ले वर दाखवत होते. बऱ्याच वेळाने कुठले तरी विमान क्रॅश झाले आहे असे कळले. अरेच्चा… आता आपले कसे होणार? कि आपण आता इथेच अडकून पडणार. तिचं बरं आहे. वेळेत गेली तिची फ्लाईट असा एक विचार त्याच्या मनात आला.
थोडं स्थिरस्थावर झाल्यावर त्याने चौकशी केली असता न्युयॉर्कला जाणारे एक फ्लाईट दुर्घटनाग्रस्त झाल्याचे त्याला कळले. न जाणो कसली अनामिक भीती त्याच्या मनात दाटली. त्याने आणखी डीटेल्स विचारले असता त्या कौंटरवरच्या माणसाने समोरच्या डिस्प्लेवर डीटेल्स आहेत असे सांगितले. त्याने थरथरत तो डिस्प्ले गाठला. बरेचजण तिथे गर्दी करून उभे होते. त्याने खिशातून मोबाईल काढला आणि तिच्या तिकीटाची माहिती पाहू लागला. दुर्दैवाने त्याच्या मोबाईल आणि समोरच्या डिस्प्लेवर एकच फ्लाईट नंबर होता. GA 400
तो मटकन खाली बसला. असंख्य वेदनेने त्याचे ह्रदय पिळवटून गेले… एवढे सगळे छान घडले. दोघांच्याही मनासारखे झाले आणि आता हा काय प्रसंग? आता कसा आणि कोणासाठी जगु मी?त्याचे भान हरपले. काही जणांनी त्याला आर यू ओके सर? म्हणून धरून बाजूला बसवले. प्यायला पाणी दिले.
————————————
काही वेळापूर्वी –
जेंव्हा ते फोन वर बोलत होते तेव्हा आदित्यने फोन ठेवला आणि संयुक्ताला अचानक कसेतरीच झाले. त्यातच त्याला आणलेलं गिफ्ट आपल्याच सॅक मध्ये राहिल्याचं तिला जाणवलं. पण जेंव्हा तो ओ रे माझ्या सोनचाफ्या म्हणाला तिथे सगळे संपले होते. कारण जेव्हा जेव्हा त्याच्या तोंडून हे वाक्य येई तेव्हा तेव्हा तिचे मन हरकून जात असे. अंगात एक शिरशिरी येत असे, अंगाला हलकासा कंप सुटत असे, आता काय करू अन काय नको असे होऊन जात असे, मनात प्रेमाचे धुमारे फुटत असत आणि मन अगतिकतेने त्याच्याकडे ओढ घेत असे. अशा वेळी तिला दुसरे काहीहि सुचत नसे आणि ती बाकी स्थळ काळ न बघता, दुधात विरघळणाऱ्या साखरेसारखी त्याच्या मिठीत अलगद विरघळून जात असे. आगदी हरवून जात असे. एकदा बहर ओसरला की मग गाडी पूर्वपदावर येई.
आत्ता तो हे अचानक बोलून गेला त्यामुळे त्याने जीभ चावली. बरं त्याने फोन ठेवला तरी त्याचं ओ रे माझ्या सोनचाफ्या वाक्य तिच्या कानात घुमत होतं आणि तिला बाकी काहीही सुचत नव्हतं. आता मला बाकी काही नको फक्त तो हवाय ह्या तिच्या मनाच्या हट्टापुढे ती कमजोर पडू लागली. इतक्यात तिच्या नावाची पुकारणी झाली होती फ्लाईट वर बोर्ड होण्यासाठी हा फायनल कॉल होता. पण तिचं मन ऐकायला तयार कुठे होतं. ते त्याच्याकडेच धावत होतं. आणि काही झालं तरी एकदा त्याला भेटून त्याच्या मिठीत शिरून मग बाकीचा विचार आणि त्याचं गिफ्ट पण त्याला देऊ म्हणून ती धावत सुटली.
संयुक्ता विचार करत होती. आपण धावतोय खरे पण त्याची फ्लाईट कोणत्या गेट वर आहे हे कुठे माहिती आहे. म्हणून मग तिने त्याची फ्लाईट कोणत्या गेटवरून आहे ते पाहिले. तेवढ्यात मोठा आवाज झाला. पण तिने साफ दुर्लक्ष केले अन धावत सुटली. अचानक सायरन वाजताहेत, माणसं का पळतायत हे तिला कळत नव्हते पण ती तिच्याच तंद्रीत धावत होती. एवढा गोंधळ गोंगाट आजूबाजूला सुरु होता पण ते सगळं सोडून ती त्याच्या मिठीत शिरण्यासाठी आतुर झाली होती. बऱ्याच वेळ धाऊन ती त्याच्या गेटपाशी पोहचली. इतकावेळ धावताना लक्ष गेले नाही पण आता तिने डिस्प्ले पाहिला आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. भिरभिरत्या नजरेने त्याला शोधू लागली. तो कुठेच दिसेना म्हणून मग फोन करण्याचा प्रयत्न केला तर फोन लागत नव्हते. नेटवर्क जाम झालं होतं. हताश होऊन ती वळली आणि त्या कोपऱ्यात बसलेल्या आदित्यची आणि तिची नजरानजर झाली.
————————————
आत्ताची वेळ –
धावत जाऊन संयुक्ता त्याच्या मिठीत शिरली. हमसून हमसून रडली. त्याला काहीच कळत नव्हते हे नक्की काय आहे. ती इथे कशी?
आदित्य – तू… तू… फ्लाईट मध्ये बसलीच नाहीस? आणि तुला कळले का ती फ्लाईट क्रॅश झाली. मी मी किती घाबरलो होतो माहितेय का तुला?
संयुक्ता फक्त इतकेच म्हणाली – तुझा सोनचाफा तुझ्या मिठीत विसावल्या शिवाय कधी शांत झालाय का?
आदित्य – म्हणजे?
संयुक्ता – काही नाही. असे म्हणून तिने त्याचे गिफ्ट काढले आणि त्याच्या हातावर ठेवत म्हणाली हैप्पी बर्थडे डीअर…
आणि पुन्हा एकदा त्याच्या मिठीत शिरली. आगदी दुधात विरघळणाऱ्या साखरेसारखी विरघळून गेली. हरवून गेली.
पाठचा डिस्प्ले दाखवत होता Golden Airway’s flight crashed during takeoff at Frankfurt airport. Crashed flight number is GA 400.
Latest posts by Abhijit Inamdar (see all)
- पाऊस - July 30, 2021
- बडी ताकत के साथ… बहोत बडी जिम्मेदारी भी आती है - May 11, 2021
- आठवणींच्या_पटलावर - April 20, 2021
are waa ..khup surekh lihiley